कधी समाजवादी पक्षाविरुद्धच्या जनमताने मायावतींचे पारडे जड, तर कधी पाकविरुद्धच्या लक्ष्यभेदी कारवाईने भाजपला अनुकूल हवा. तर कधी समाजवादी पक्षाला ताब्यात घेणारे अखिलेशसिंह यादव आणि काँग्रेसमधील आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता.. उत्तर प्रदेशातील राजकीय हवेने अशा भेलकांडय़ा क्वचितच मारल्या असतील. नवनव्या समीकरणांनी, दिवसागणिक बदलणाऱ्या मध्यवर्ती मुद्दय़ांनी उत्तर प्रदेश राजकीयदृष्टय़ा गूढ प्रदेश बनलाय..

राजधानी सध्या चांगलीच गारठलीय. पाच राज्यांच्या, त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीने राजधानीतील राजकीय हवामान तापणार असल्याचे उघड आहे. पण सध्या उलट घडतंय. हवा तापण्याऐवजी संभ्रमाच्या धुक्याने राजधानीला लपेटलंय.

सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी एकच प्रश्न आहे : उत्तर प्रदेशात कोणाची हवा आहे? पण याचे उत्तर दिवसागणिक बदलत चालल्याचे जाणवतेय. सहा महिन्यांपूर्वी सर्वाचे एकजात म्हणणे होते मायावती ऊर्फ बहेनजी बाजी मारणार. लोकसभेत एकही जागा न मिळण्याची नामुष्की झेललेल्या बहेनजींनी जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जबरदस्त यश मिळविले. त्याच वेळी समाजवादी पक्षामध्ये यादवीला तोंड फुटू लागले होते. किळसवाण्या घराणेशाहीत लिप्त झालेल्या कुटुंबातील वाद चव्हाटय़ावर येऊ  लागले. अखिलेशसिंह यादव या युवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणि गुंडागर्दीचा शिक्का असलेल्या समाजवादी पक्षाविरुद्ध जनमत (अँटी इन्कम्बन्सी) असल्याचे जाणवत होते. त्यामुळे बहेनजी आणि भाजपमध्येच लढत होण्यावर सर्वाचे एकमत होते.

पण तेवढय़ात मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध लक्ष्यभेदी कारवाई (सर्जिकल स्ट्राइक) केली आणि भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. उत्तर प्रदेश खिशात घातल्याच्या थाटातच भाजपवाले मिरवत होते. पण खरोखरच हवा भाजपच्या बाजूने झुकल्यासारखी वाटू लागली. त्यातच यादवीने उग्र रूप धारण केले. मग आला नोटाबंदीचा निर्णय. काळ्या पैशांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचे चित्र प्रारंभी निर्माण केल्याने तर बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष आणखीनच गोंधळला. लागोपाठच्या या दोन निर्णयांनी भाजप सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्याची खात्री वर्तविली जाऊ  लागली. पण काही दिवसांतच नोटाबंदीच्या सदोष अंमलबजावणीने चित्र हळूहळू पालटू लागले. बँका आणि एटीएमसमोरील रांगा वाढू लागल्या. अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवू लागले. जनतेमधील संताप वाढू लागला आणि वातावरण भाजपविरोधात जात असल्याची हवा निर्माण झाली. त्याची कबुली खुद्द भाजपचे खासदारच उघडपणे देऊ  लागले. एकीकडे नोटाबंदीचा निर्णय भाजपवर बूमरँग होण्याची शक्यता चर्चिली जात असतानाच खरे कंबरडे मोडले ते मायावतींचे. बहेनजी ‘बॅकफूट’वर गेल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यातच त्यांच्या दिल्लीतील बँक खात्यामध्ये सुमारे दीडशे कोटींची संशयास्पद रक्कम आढळली होती. त्यातच तिकीट वाटपावरून पक्षात बेदिली माजलेली. सुमारे चाळीसहून अधिक आमदार भाजपच्या वाटेवर होते. भाजप नोटाबंदीच्या प्रतिकूल परिणामांशी आणि मायावती नोटाबंदीच्या दणक्याला तोंड देत असताना समाजवादी कुटुंबात ‘यादवी- २’ चालू झाली. ती इतक्या टोकाला गेली की पिता-पुत्र सायकल चिन्हासाठी निवडणूक आयोगात आमने-सामने भिडले. पण या सगळ्या कौटुंबिक नाटय़ात अखिलेशसिंहांची प्रतिमा एकदम झळाळली.अखिलेशने गृहकलहाला अशा पद्धतीने वळण दिले, की बस्स! ही कमाल होती त्यांच्या जनसंपर्क यंत्रणेची. अखिलेशच्या सध्याच्या जाहिराती खरोखरच कमाल आहेत. अखिलेश म्हणजे ‘विकासपुरुष’. अखिलेश म्हणजे समाजवादी पक्षातील गुंडगिरी मोडून काढणारा. अखिलेश म्हणजे यादव-मुस्लिमांपलीकडील अन्य समाजांना जोडू पाहणारा आणि अखिलेश म्हणजे शिवपालसिंह- अमरसिंहासारख्या मंडळींच्या कचाटय़ातून स्वत:च्या वडिलांना व समाजवादी पक्षाला वाचविणारा मसीहा.. अशी प्रतिमा बेमालूमपणे रंगविण्यात आली. त्यातच ‘सायकल’ मिळाल्याने अखिलेशच्या ताकदीवर शिक्कामोर्तबच झाल्यात जमा. मग अखिलेशकडे हवा झुकल्यासारखी वाटू लागले.. काँग्रेसबरोबरील आघाडीने तर यशाची खात्री वर्तविली जाऊ  लागली.

पण तेवढय़ात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचे आरक्षणाबाबतचे वादग्रस्त विधान. या कथित विधानाने मोदींना संघ अडचणीत आणू पाहत असल्याच्या चर्चेला नव्याने खतपाणी मिळाले आणि दुसरीकडे दलितांना स्वत:कडे वळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना ब्रेक लागले. भाजपचे एक खासदार रागारागाने म्हणाले, ‘‘ऐन निवडणुकीच्या तोंडावरच संघाची मंडळी आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर का बोलतात, हेच मुळी समजत नाही. एकीकडे आम्ही दलितांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि हे आगीत तेल ओततात..’’ पण आणखी एक भाजप खासदार तिरकसपणे म्हणाला, ‘‘चला, बरे झाले संघ मोदींच्या मदतीला धावला! उत्तर प्रदेश हरलो तर आता संघावर खापर फोडता येईल. नाही तर नोटाबंदीला आणि पर्यायाने मोदींना दोषी धरले गेले असते..’’

बहुतेकांच्या मते, वैद्यांच्या या आगळिकीचा फटका उत्तर प्रदेशात नक्की बसेल. त्यासाठी बिहारचा दाखला दिला जातोय. बिहार निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरसंघचालक मोहन भागवतांनी असेच विधान केले होते आणि नंतर त्याचा परिणाम सर्वानीच पाहिलेला आहे. पण उत्तर प्रदेश म्हणजे बिहार नव्हे. एक तर बिहारमध्ये भाजपविरुद्ध सगळे झाडून होते. याउलट उत्तर प्रदेशात तिरंगी- चौरंगी लढत आहे. आणि दुसरे म्हणजे, वैद्य म्हणजे सरसंघचालक नव्हेत. सरसंघचालकांच्या विधानांएवढे गांभीर्य खचितच वैद्यांना नाही. म्हणून तर सध्या उमटत असलेल्या प्रतिक्रियांमध्ये फारशी जान नसल्याचे जाणवते. भाजपला फटका बसू शकतो; पण तो कदाचित बिहारएवढा निर्णायक नसेल. या विधानाचा भाजपवर काय परिणाम व्हायचा तो होवो; पण मायावतींना मात्र ‘ऑक्सिजन’ मिळालाय. दलित मतांची भाजपकडून पळवापळवी चालू असल्याने त्या धास्तावल्या होत्या. पण आता ते दडपण जरासे दूर होईल. शिवाय दलित मतपेढी पक्की झाली, की आत्मविश्वासाने मुस्लीम मतांमागे हात धुऊन लागता येईल. म्हणजे तीनही प्रमुख पक्ष पुन्हा सम पातळीवर आल्यातच जमा.

एकीकडे प्रचाराचे मध्यवर्ती मुद्दे पटापट बदलत असताना आघाडय़ा आणि उमेदवारांच्या निवडीतील घोळाने चित्र आणखीनच धूसर झालंय. अखिलेशमुळे यादव-मुस्लीम, काँग्रेसमुळे ‘धर्मनिरपेक्ष’ मते आणि अजितसिंहांच्या राष्ट्रीय लोकदलामुळे जाट मते.. अशी कागदावरची आकडेमोड करून बिहारसारखी महाआघाडी करण्याच्या मनसुब्यांचा बोऱ्या दोन-तीन दिवसांतच वाजला. पहिल्यांदा राष्ट्रीय लोकदलाला बाहेरचा रस्ता दाखविला गेला. चिन्ह आणि पर्यायाने पक्ष ताब्यात आल्याने अखिलेशना काँग्रेसची पहिल्याएवढी गरज उरलेली नाही. त्यातूनच जागावाटपाची चर्चा चालू असतानाच परस्पर १९१ उमेदवारांची घोषणा करून अखिलेशनी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले. त्यातील आठ जागा तर थेट काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघांच्या. यामुळे चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘राहुलजी का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे’ अशा घोषणा दिल्या. पण ‘अपमान’ सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. आघाडी केल्यास जागावाटपात ‘अपमान’ मुकाटय़ाने गिळण्याची वेळ आणि आघाडी न झाल्यास सन्मानजनकही जागा न मिळण्याच्या नामुष्कीची भीती. इकडे आग, तिकडे विहीर. राहुल यांच्या पातळीवर आघाडीचे घोडे पुढे दामटत नसल्याचे पाहून पहिल्यांदा प्रियांका गांधी-वढेरा आणि नंतर खुद्द सोनिया गांधींनी चर्चेची सूत्रे हाती घेतलीत. कदाचित शंभरच्या आसपास जागा देऊन तोडगा निघेल. पण महत्त्वाचा मुद्दा असा, की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला तरी घोळ चालूच आहे. समाजवादी पक्षाच्या तर आतापर्यंत इतक्या याद्या प्रसिद्ध झाल्यात की बोलायची सोय नाही.

असाच गोंधळात गोंधळ भाजपमध्ये आहे. तीनशेहून अधिक मतदारसंघांसाठी वीस-वीस इच्छुकांनी शड्डू ठोकले आहेत. त्यात अन्य पक्षांतील आयारामांना सामावून घेताना तर चांगलीच दमछाक होत आहे. दीडशे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच असंतोषाचा मोठा भडका उडालाय. मोदी व शहांची पक्षावर एककल्ली पकड. पण पहिल्यांदाच मोदी- शहांविरुद्ध ‘११, अशोका रोड’ या पक्ष मुख्यालयात घोषणा दिल्या. उत्तर प्रदेशात तर मोदी व शहांचे पुतळे जाळले गेले. या प्रतिक्रियेने भाजप एकदम गांगरून गेलाय.

पहिल्या टप्प्यातील मतदान ११ फेब्रुवारीला आहे. त्यास अवघे १७-१८ दिवस राहिले आहेत आणि अजूनही कशाचाही नीट पत्ता नाही. प्रत्येकाची झाकली मूठ आहे. प्रत्येक निवडणुकीत धाकधूक असते, औत्सुक्य असतेच. पण वाहत्या हवेचा नूर समजत असतो. उत्तर प्रदेशातील यंदाची निवडणूक त्यास या क्षणापर्यंत तरी अपवाद ठरावी. भल्याभल्यांना अंदाज येईनासा झालाय. एरव्ही कोणत्याही निवडणुकीबद्दल आत्मविश्वासाने अंदाज वर्तविणारी काही अभ्यासू, काही विश्वासार्ह आणि अगदी विशिष्ट अजेंडा चालविणारी मंडळीसुद्धा उत्तर प्रदेशाबद्दल बोलताना कचरत आहेत.

जणू काही उत्तर प्रदेशातील राजकीय हवा ‘सी-सॉ’ खेळू लागलीय..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com