06 August 2020

News Flash

मोदी, शहा आणि पात्रा

सत्ताधारी असल्याने भाजपच्या उमेदवारांबाबत सर्वाधिक उत्सुकता होती.

|| महेश सरलष्कर

सत्ताधारी असल्याने भाजपच्या उमेदवारांबाबत सर्वाधिक उत्सुकता होती. विद्यमान खासदारांवरच पक्षाने पुन्हा भरवसा ठेवल्याचे आत्तापर्यंत जाहीर झालेल्या यादींमधून दिसते. मोदींच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक जागा जिंकणे हेच पक्षाचे ध्येय आहे. पुढील लोकसभेत मोदींना कदाचित शहा आणि पात्रा या द्वयीची साथ असू शकेल.

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यात सत्ताधारी असल्याने सर्वाधिक उत्सुकता भाजपच्या उमेदवारांबाबत असणे साहजिकच होते. २०१४ मध्ये मोदींच्या लाटेत जेटलींचा अपवाद वगळता अनेक जण लोकसभेत जाऊन बसले होते. म्हणूनच विद्यमान खासदारांपैकी किती जण पाच वर्षांनी पुन्हा निवडून येतील याची चाचपणी भाजपला करावी लागली असावी. कदाचित मोदींना स्वत:च्या जबाबदारीवर विद्यमान खासदारांना पुन्हा निवडून आणता येणार नाही असे पक्षाला वाटत असावे. त्यामुळेच विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये नवे चेहरे देण्याचा विचार होत असल्याचे सांगितले जात होते. पण, पहिली सुमारे दोनशे उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यात जेमतेम दहा टक्के नवे उमेदवार भाजपने दिले. उर्वरित नव्वद टक्के उमेदवार विद्यमान खासदार आहेत. भाजपच्या आत्तापर्यंत जाहीर झालेल्या यादींमध्ये महत्त्वाची होती ती पहिलीच यादी. कारण त्यात भाजपच्या दिग्गजांचा समावेश करण्यात आला होता.

सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नवे उमेदवार देणे असे हिंदी पट्टय़ातील (छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान) विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे नेते उघडपणे सांगत होते. काही प्रमाणात त्यांनी नवे चेहरे दिलेही, पण भाजपला तीनही राज्ये  गमवावी लागली. त्यामुळे नव्या चेहऱ्यांचा फायदाही एका मर्यादेपलीकडे होत नाही हे पक्षाने जाणले असावे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने नवे चेहरे देण्याचा खटाटोप थांबवला असावा आणि जिथे जमेल तिथे अन्य पक्षांतून आलेल्या सदस्यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात समाधान मानले असावे. उमेदवार जाहीर होण्याआधी काही विद्यमान खासदारांचे मतदारसंघ बदलण्याची चर्चा सुरू होती. हेमामालिनी यांना पुन्हा मथुरा देण्याआधी फतेहपूर सिकरीचा पर्याय देण्याचा विचार होता, पण त्यांचा मतदारसंघ कायम ठेवण्यात आलेला आहे. मतदारसंघ आणि उमेदवार यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवल्याचे दिसते!

वास्तविक, या लोकसभा निवडणुकीतही भाजपसाठी मोदी ‘लाट’च महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मते मागितली जाणार आहेत आणि मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवत भाजपच्या उमेदवारांना निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागितली होती, या वेळी त्यांचेच नेतृत्व देशाला तारेल या गर्भित इशाऱ्यावर मते मागितली जाणार आहेत. भाजपविरोधक सातत्याने देशातील विविध मुद्दय़ांवर निवडणूक लढवू पाहात असले तरी, भाजप मोदींच्या राष्ट्रवादी नेतृत्वावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनाही मोदींच्या नेतृत्वाचा आधार घेऊनच निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. अशा वेळी उमेदवारांच्या चेहऱ्यांमध्ये बदल झाला नाही तरी पक्षाचे नुकसान होत नाही. म्हणूनच भाजपने नव्या चेहऱ्यांपेक्षाही मोदींच्या झंझावाताचा फायदा करून घेतील असे उमेदवार कायम ठेवलेले आहेत.

भाजपच्या उमेदवारांच्या यादींतून काही धाडसी निर्णय घेतले गेल्याचेही दिसते. पाच वर्षे केंद्रात सत्तेत राहिल्याने कदाचित पक्षामध्ये आत्मविश्वास आला असावा. त्यामुळे काही नेत्यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे ठरवलेले आहे. मोदी सरकारबाबत सातत्याने टीका होत राहिली आहे की, लोकांमधून निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना मंत्री बनवले गेले आहे. जेटली, सीतारामन, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, गोयल हे सगळेच राज्यसभेचे खासदार, पण जबाबदारी मंत्रिपदाची. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही राज्यसभेचे खासदार. भाजपने हे चित्र किंचित का होईना बदलायचे ठरवलेले दिसते. पाटणासाहेब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपने उमेदवारी देऊन शत्रुघ्न सिन्हांना चारीमुंडय़ा चीत करण्याचे मोठे आव्हान पेलण्यास सांगितलेले आहे. पाटणासाहेब या पारंपरिक मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असे दिसते. प्रकृतीच्या कारणास्तव जेटली लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता नव्हतीच. पण राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्य मंत्र्यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात हरकत नव्हती!

भाजपचे अत्यंत बोलके आणि ‘लाडके’ प्रवक्ते संबित पात्रा चित्रवाणीवरील लुटुपुटुच्या लढतीतून आता खऱ्याखुऱ्या लढतीला सामोरे जाणार आहेत. ओडिशातील पुरी मतदारसंघातून पात्रा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मोदींच्या ताकदीवर पात्रा निवडणूक जिंकले तर त्यांच्या बोलण्याला आणखी धार येईल आणि प्रसारमाध्यमांतील चर्चाचा नवा अवतार पाहायला मिळेल. मग कदाचित पात्रा हे मोदी सरकारमधील नवे राज्यमंत्री असतील. शिवाय संसदेच्या अधिवेशनात लोकसभेतील कामकाजातील पात्रा यांचा सहभाग कसा असेल, हेही पाहता येईल. सतराव्या लोकसभेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगरचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. असे मानले जात होते की, त्यांच्या इशाऱ्यावर राज्यसभेचे कामकाज चालवले जायचे. शहा लोकसभेचे प्रतिनिधी झाल्यावर स्वतंत्र संसदीय कामकाजमंत्र्यांची गरज उरणार नाही असेही आता बोलले जाऊ लागले आहे. नव्या लोकसभेत मोदी, शहा आणि पात्रा तिघेही लोकसभेचे सदस्य असू शकतील!

भाजपने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर गेल्या निवडणुकीत सोपवलेली जबाबदारी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवलेली आहे. २०१४ मध्ये इराणी यांना अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास सांगितले गेले होते. तेव्हा त्यांचा राहुल गांधी यांनी पराभव केला होता. या वेळीही इराणी अमेठीतून लढतील. गेली पाच वर्षे भाजपने प्रामुख्याने राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघ लक्ष्य बनवलेला आहे. अमेठी आणि रायबरेली या पारंपरिक मतदारसंघात गांधी घराण्याचा पराभव केला तर संपूर्ण काँग्रेसलाच हादरा बसेल. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाला सुरुंग लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अमेठी आणि रायबरेली मतदारसंघ राजकीयदृष्टय़ा पोखरत नेणे. त्याची जबाबदारी अमेठीत भाजपने इराणी यांच्याकडे दिलेली आहे. इराणी यांनी पाच वर्षांत सातत्याने अमेठीला भेटी दिलेल्या आहेत. मतदारसंघात निधी पुरवला आहे. इराणी आणि जेटली या दोघांनीही त्यांचा खासदार निधी अमेठीकडे वळवला आहे. २०१४ मध्ये इराणी यांचा पराभव झाला असला तरी राहुल गांधींचे मताधिक्य तीन लाखांवरून दीड लाखांवर आले होते. गांधी घराण्यासाठी अभेद्य मानल्या जाणाऱ्या अमेठीत भाजपने खिंडार पाडलेले होते. अमेठी हा गांधी घराण्यासाठी बालेकिल्ला राहिला नाही असे संकेत खुद्द काँग्रेस पक्षानेच द्यायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनी अमेठीतील उमेदवारी कायम ठेवावी, पण केरळमधील मतदारसंघातूनही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होऊ लागली आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार केला जात असल्याचे काँग्रेस पक्षानेच जाहीर केले आहे. राहुल गांधी कदाचित फक्त अमेठीतून निवडणूक लढवतील, पण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, हा संदेश भाजपचा नैतिक विजय मानला जाऊ शकतो.

भाजपमधील काही दिग्गजांची राजकीय कारकीर्द या वेळी अपेक्षेप्रमाणे कायमस्वरूपी संपुष्टात आली आहे. अडवाणी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिलेला होता. मुरलीमनोहर जोशी यांना तिकीट मिळण्याची शक्यताच नव्हती. मोदींच्या भाजपमध्ये उमा भारती वगैरे बुजुर्गाच्या उपयुक्ततेवर कायमच प्रश्नचिन्ह होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिल्याने त्यांची गच्छंती होणारच होती. सुषमा स्वराज प्रकृतीमुळे निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे भाजपचे काही जुनेजाणते नेते या वेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसतील. पण त्याबद्दल प्रसारमाध्यमांमधून जास्त चर्चा होते आहे. भाजपसाठी विषय संपला आहे. भाजपच्या उमेदवारांच्या यादीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याबरोबरच नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा मोदींच्या भरवशावर अधिकाधिक जागा जिंकण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2019 12:18 am

Web Title: narendra modi amit shah sambit patra
Next Stories
1 गुंतागुंतीची निवडणूक
2 काश्मीरमधील धोरणलकवा
3 राफेलचा रुतलेला काटा
Just Now!
X