23 January 2018

News Flash

‘शहाण्यां’ची ‘गुलाम’गिरी

नितीश यांच्या ‘यू टर्न’ची कारणे सर्वविदित आहेत. तेजस्वी यादवांच्या भानगडी हा एक भाग झाला.

संतोष कुलकर्णी | Updated: July 31, 2017 1:39 AM

नितीश कुमार

सतरा वर्षांच्या संसारानंतर भाजपला डच्चू देणाऱ्या आणि नंतर लालू आणि कंपनीशी हातमिळविणी करणाऱ्या नितीशकुमारांनी तत्त्वे पाळलीच नाहीत मुळी. लालूंना जेरबंद करण्यासाठी भाजप, मोदींना रोखण्यासाठी लालू आणि लालूंचे जड ओझे उतरविण्यासाठी आता पुन्हा भाजप.. आजवरच्या प्रत्येक कसरतीनंतर ते मजबूत होत गेले; पण या वेळी मात्र ते पूर्णपणे भाजपच्या कहय़ात गेलेत. 

ना सरकारकडे वैधानिक कामकाज, ना विरोधकांकडे मुद्दे. संसदेच्या चालू अधिवेशनात ‘हॅपनिंग’ असे काहीच नाही. बुधवारचा (२६ जुलै) दिवसही तसाच कंटाळवाणा होता. आपल्या नीरस भाषणाने कृषिमंत्री राधामोहनसिंह राज्यसभेला चांगलेच पकवत होते. ‘‘तुमच्याकडून उत्तर मागून आमची चूकच झाली,’’ हा काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा टोमणाही या बिच्चाऱ्या बिहारीबाबूला कळत नव्हता. एकंदरीत ‘कुछ खास’ नसल्याचा सुस्त भाव मंत्री, खासदार आणि पत्रकारांमध्येही होता.

मात्र, अर्ध्या तासाने दुसऱ्या बिहारी बाबूने सर्वाच्या तोंडचे पाणी पळविले. सायंकाळी सात वाजता संयुक्त जनता दलाच्या आमदारांच्या बैठकीतून मुख्यमंत्री नितीशकुमार बाहेर आले आणि थेट राजीनाम्याची घोषणा केली. सर्वच स्तब्ध. ज्याचा अंदाज होता, काही महिन्यांपासून ‘इशारों इशारों में’ सांगितले जात होते, ते असे एकदम धाडकन अंगावर कोसळले. त्यानंतरच्या घडामोडी तर ‘सुपरसॉनिक’ (ध्वनीपेक्षा जास्त) वेगाने. नितीश यांच्या घोषणेनंतर पाच-दहा मिनिटांनी नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले, अर्ध्या तासाने भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत खलबते झाली, नऊ  वाजता सुशीलकुमार मोदींनी भाजपच्या पाठिंब्याची घोषणा केली, लगेचच दोन्ही पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक झाली, राज्यपालांना भेटून पाठिंब्यांची पत्रे देऊन सत्तास्थापनेचा दावा केला आणि गुरुवारी सकाळी शपथविधीही उरकला. चालक तोच; पण रातोरात भिडू बदलला. केवळ बिहारच नव्हे, तर देशाचे राजकारण बदलले. सारीपाटावरील सोंगटय़ा इकडच्या तिकडे झाल्या. गेल्या काही दशकांमध्ये असले जबरदस्त नेपथ्य क्वचितच झाले असावे. नितीश यांच्या शीर्षांसनाने सारा देश अवाक् झाला. धूर्त लालूप्रसाद यादव ‘चेकमेट’ झाले, काँग्रेसला तर रात्री उशिरापर्यंत सुस्पष्ट प्रतिक्रियाही देता येत नव्हती.

नितीश यांचा हा धक्का विरोधक आणि धर्मनिरपेक्ष-उदारमतवादी मंडळींना अजिबात पचविता आला नसल्याचे दिसतेय. युद्धाची ऐन तयारी चालू असताना आपला (संभाव्य) सरसेनापती शत्रूपक्षाला जाऊन मिळाल्याचे शल्य विरोधकांना काटय़ासारखे बोचले. काँग्रेस व डाव्या पक्षांचे नेते तर अक्षरश: नितीश यांना शिव्याशाप देत होते. खलनायक, सत्तेचा रोग जडलेले, विश्वासघातकी, दुटप्पी, ढोंगी, खोटारडे असले शेलके शब्द वापरत होते. नितीश यांचा इतिहासच तसा असल्याचे गुलाम नबी आझाद म्हणाले. ‘‘तरीही तुम्ही त्यांच्याशी महाआघाडी का केली?’’ या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. लालू, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष मंडळी जो आज राग आळवीत आहेत, तशीच वेळ २०१३ मध्ये भाजपवरही आली होती. भाजपचे तेव्हाचे दु:ख तर अधिक मोठे. सतरा वर्षे संसार केल्यानंतर त्यांना घटस्फोट दिला होता. लालू आणि मंडळींबरोबरील संसार तर जेमतेम दोन वर्षांचा. तरीही लालू आणि मंडळींचा मातम एवढा असेल तर तेव्हा भाजपने किती ऊर बडवून घेतला असेल, याची कल्पनाच केलेली बरी. ‘भक्तां’चे तेव्हाचे दु:ख (मोदी)‘ग्रस्तां’ना आता समजत असेल. २०१३ मध्ये या ‘ग्रस्तां’ना नितीश धर्मनिरपेक्षतेचे नवे हिरो वाटले होते. तेव्हा नितीश यांनी केलेला विश्वासघात त्यांना हवाहवासा वाटत होता. त्याला वैचारिक मुलामा दिला गेला. पण नितीश यांनी तसाच विश्वासघात त्यांच्याबरोबरही केल्यानंतर ही ‘ग्रस्त’मंडळी एकदमच बिथरली. जागा बदलली, की भूमिकाही बदलते असे म्हणतात ते खरेच आहे. नितीश तेच आहेत, त्यांची राजकारणशैली तीच आहे; पण ‘ग्रस्तां’ना ते तेव्हा हिरो आणि आता खलनायक आणि ‘भक्तां’ना तेव्हा विश्वासघातकी आणि आता विश्वासार्ह वाटू लागलेत एवढाच काय तो फरक.

पण नितीश यांचे राजकारण पहिल्यापासूनच कोलांटउडीचे. पहिल्यांदा लालूंची साथ सोडली, मग जॉर्ज फर्नाडिसांची, नंतर भाजपची आणि आता लालू आणि मंडळींची. प्रत्येक वेळी ते रूळ बदलत गेले. पण ते सर्वाधिक काळ रमले ते भाजपच्या कोंडाळ्यात. कारण त्यांच्या रक्तातच असणारा काँग्रेसविरोधी ‘डीएनए’. गुजरात दंगलींच्या निषेधार्थ रामविलास पासवानांनी वाजपेयी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला; पण नितीश मंत्रिपदाला चिकटून राहिले होते. किंबहुना गुजरात दंगलींनंतरही मोदींचे त्यांनी समर्थन केले होते. मोदी गुजरातपुरते सीमित असेपर्यंत त्यांना भाजप खटकत नव्हता. पण २०१३ मध्ये भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि ते बिथरले. मोदींच्या ‘धर्माध’ प्रतिमेने मुस्लीम मतपेढीला चिरे पडण्याच्या भीतीपोटी त्यांनी भाजप सोडली. एकटय़ाच्या बळावर लढलेल्या लोकसभेमध्ये मोठा दणका बसल्यानंतर लालूंच्या मिठीत घुसले. तेव्हा त्यांना मोदी ‘धर्माध’ वाटले, पण लालूंवरील भ्रष्टाचाराचे मोठाले डाग मात्र दिसले नव्हते! आता, तेजस्वी यादववरील भ्रष्टाचाराचे ‘शिंतोडे’ त्यांना मोठाले वाटताहेत आणि मोदी हे भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे जननायक..

नितीश यांच्या ‘यू टर्न’ची कारणे सर्वविदित आहेत. तेजस्वी यादवांच्या भानगडी हा एक भाग झाला. खरे कारण म्हणजे लालूंचा सासूरवास! नितीशांबरोबर काम करण्याचा अनुभव असलेला भाजप नेता सांगत होता, ‘‘नितीश आत्मकेंद्रित नेते आहेत. त्यांना इतरांची ढवळाढवळ अजिबात खपत नाही. भाजप त्यांच्यात फारसा हस्तक्षेप करत नसे. वाजपेयी-अडवाणींशी त्यांचे संबंध उत्तम होते. त्यांना आदरही मिळायचा. त्यामुळे भाजपशी त्यांचे मेतकूट छान जमायचे. पण लालूंचे नेमके उलटे. प्रत्येक पावलावर ढवळाढवळ. राष्ट्रीय जनता दलाचे मंत्री फक्त लालूंकडून आदेश घ्यायचे. बदल्या, बढत्यांमध्ये तर लालू असहय़ असायचे. त्यामुळे नितीश मनोमन कातावले होते. ते सुटकेचे निमित्त शोधतच होते. तेजस्वी व मिसा भारतींवरील आरोपांनी ती संधी मिळाली आणि मग ती त्यांनी सोडली नाही.’’ एका केंद्रीय मंत्र्याने तर या निर्णयाला ‘ईझ ऑफ डुइंग गव्हर्नन्स’ अशी मस्त, चपखल उपमा दिली. कारण त्याच्या मते लालू आणि सुशासन ऊर्फ गव्हर्नन्स हे शब्दच मुळी विरुद्धार्थी!

नितीश व्यावहारिक राजकारणी. बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग देशव्यापी नेण्याची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा त्यांना होती. पण परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या विरोधकांची मूठ बांधणे अवघड असल्याचे आकलन त्यांना फार लवकर झाले. काँग्रेस स्वत: धड उभी राहणार नाही आणि इतरांनाही उभे राहू देणार नसल्याचे मत त्यांनी नजीकच्या नेत्यांना मध्यंतरी सांगितले होते. म्हणजे स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यास काँग्रेस तयार होणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मोदींची लाट क्षणिक असल्याचा अगोदरचा अंदाज बरोबर नसल्याचे जाणवू लागले ते नोटाबंदीदरम्यान. उत्तर प्रदेशातील निकालाने तर त्यावर शिक्कामोर्तब केले. विरोधकांतील हेवेदावे, परस्परविरोधी हितसंबंध, हताश-निराश सूर, विरोधासाठी विरोधातून काहीही साध्य होणार नसल्याची जाणीव या सगळ्या गोष्टी त्यांना भाजपकडे खेचत होत्या. प्रतिक्रियावादी बनलेल्या विरोधकांचे नेतृत्व करण्यात हशील नसल्याच्या निष्कर्षांप्रत ते आले होते. त्यातूनच ‘मूर्खा’चे मालक होण्यापेक्षा ‘शहाण्यां’ची ‘गुलामगिरी’ करण्यामध्ये धन्यता त्यांनी मानली आणि भाजपशी पुनश्च घरोबा केला.

यापेक्षाही आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. तेजस्वी यादव. तिशीतला हा तेजतर्रार नेता तुलनेने परिपक्व असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेने नितीशकुमार अस्वस्थ होते. अगदी नितीश सोबत असतानाही गराडा तेजस्वीभोवती पडायचा. स्वाभाविकपणे नितीशांमधील अस्सल राजकारण्याला धोका वाटला. त्यातूनच राजकीयदृष्टय़ा मरणासन्न असलेल्या लालूंच्या उंटाला आपल्या तंबूत घेऊन त्याला सत्तेचा काढा देण्यात धोरणात्मक घोडचूक केल्याची भावना नितीश यांच्या मनात दाटली होती. ती चूक त्यांनी दुरुस्त केली; पण विश्वासार्हतेची किंमत मोजून.

‘सुशासनबाबू’ ही त्यांची खरी ओळख. यापुढेही ही प्रतिमा राहील. कदाचित लालूंसारख्या उचापतीखोर बिलंदराचे ओझे नसल्याने ती आणखी घट्ट करता येईल; पण त्याचबरोबर इतक्या वेळा भिडू बदलून न झालेली विश्वासघातकीची प्रतिमा आता काही त्यांची पाठ सोडणार नाही. ‘पाठीमागून खुपसलेल्या खंजिराचे’ भूत जसे शरद पवारांची मानगूट सोडायला तयार नाही, तसाच विश्वासघातकीपणाचा शिक्का नितीश यांचा पिच्छा सोडेल असे वाटत नाही. राजकीय फेरा पाहा, हा ‘कलंक’ नितीश यांना ‘कलंकितां’मुळे लागलाय.

नितीश यांच्यासारखा मोहरा गळाला लावणारे हे ‘डील’ दोघांच्याही फायद्याचे. पण अधिक वाटा भाजपला. मोदींच्या मार्गातील मुख्य अडथळा आपसूक दूर झाला, २०१९मध्ये बिहार खिशात ठेवण्याची खात्री वाढली, महाआघाडीच्या देशव्यापी प्रयोगाला अपशकुन झाला. भाजपला आणखी काय हवेय? त्यात नितीश तुलनेने दुर्बळ झालेत. पूर्वी ते स्वयंभू होते. बिहारमध्ये ‘थोरले भाऊ’ होते. भाजपला स्वतालावर नाचवायचे. पण आता विरोधकांकडे पुन्हा परतण्याचे दोर तुटल्याने त्यांचे मोदी-शहांवरील अवलंबित्व वाढेल. बरे, सध्याचा भाजप हा काही वाजपेयी-अडवाणींचा नाही. तो आक्रमक आहे. ‘धाकटा भाऊ’ म्हणवून राहायचे नाही त्याला. मग वाजपेयी-अडवाणी द्यायची तशी मोकळीक मोदी-शहा देतील का? मोदी-शहांनी नाक दाबल्यास पुन्हा कोणत्या तोंडाने विरोधकांकडे जाणार? भाजपच्या विस्तारवादापासून स्वत:ची मतपेढी कशी शाबूत ठेवणार? हे सगळे चक्रव्यूह आहेत; पण तूर्त तरी ‘ईझ ऑफ डुइंग गव्हर्नन्स’चे कोडे त्यांनी सोडविलेय. बाकी पुढचे पुढे. नाही तरी त्यांच्यातील ‘अंतरात्म्या’ला कधीही कंठ फुटू शकतोच की..!

First Published on July 31, 2017 1:39 am

Web Title: nitish kumar forms government in bihar with bjp support
 1. S
  sach
  Aug 1, 2017 at 1:49 am
  निरपेक्ष पत्रकारिता म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध नाही. पण लेखकाचा असाच होरा दिसतोय. पूर्ण कुटुंब भ्रष्टाचारात बुडलेले असताना लालू फक्त धर्मनिरपेक्ष (पक्षी मु धार्जिणे) आहेत म्हणून त्यांची किंवा त्यांच्या पुत्राची भलावण करण्यात लेखक मश्गुल आहेत.
  Reply
  1. V
   vivek
   Jul 31, 2017 at 8:06 pm
   शैली काहीही असो मोदींना तोड नाही. २०१४ पासून विरोधक जैसे थे तर सोडा दिवसेंदिवस कमजोर होत आहेत. एवढ्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात मोदींना आव्हान देऊ शकेल असा नेता नाही शरमेची बाब आहे. कदाचित घराणेशाही लादल्यामुळे इतर नेते पुढे येऊ शकले नाही यात विरोधकांची चुकी आहे. मोदी रोखणे विरोधकांना शक्य नाही. त्यांच्या निवृत्तीची वाट पाहावी आता
   Reply
   1. R
    rajesh
    Jul 31, 2017 at 5:34 pm
    ''तेजस्वी यादव. तिशीतला हा तेजतर्रार नेता तुलनेने परिपक्व'' ... स्मृती इरानींचा शैक्षणिक योग्यता अहवाल छापणारे तुम्ही ह्या अशिक्षित भ्रष्टाचाऱ्याला परिपकव म्हणता? वाचक बुद्धू नाही राहिला आता. सोशल मीडियाने सगळ्यांना सगळे खरे कळते. 'पेपर' वर वाचून मतदान करायचे दिवस गेले. खोट्या बातम्या आणि काँग्रेसी नेत्यांची 'महिमा' वर्णन करून मतदारांचा ानु ी युक्त आशीर्वाद पदरी पडून घेणे हि जुनी गोष्ट झाली . त्याच जोरावर तुमच्या सारखे बाजारबुणगे पेपर वाले गब्बर झाले. मोदी सरकार तुम्हाला काडीचीही किंमत देत नाही म्हणून रोज कुबेर मोदींची निंदा नालस्ती करतो. जनता हुशार झाली.
    Reply
    1. R
     rajesh
     Jul 31, 2017 at 5:34 pm
     ''तेजस्वी यादव. तिशीतला हा तेजतर्रार नेता तुलनेने परिपक्व'' ... स्मृती इरानींचा शैक्षणिक योग्यता अहवाल छापणारे तुम्ही ह्या अशिक्षित भ्रष्टाचाऱ्याला परिपकव म्हणता? वाचक बुद्धू नाही राहिला आता. सोशल मीडियाने सगळ्यांना सगळे खरे कळते. 'पेपर' वर वाचून मतदान करायचे दिवस गेले. खोट्या बातम्या आणि काँग्रेसी नेत्यांची 'महिमा' वर्णन करून मतदारांचा ानु ी युक्त आशीर्वाद पदरी पडून घेणे हि जुनी गोष्ट झाली . त्याच जोरावर तुमच्या सारखे बाजारबुणगे पेपर वाले गब्बर झाले. मोदी सरकार तुम्हाला काडीचीही किंमत देत नाही म्हणून रोज कुबेर मोदींची निंदा नालस्ती करतो. जनता हुशार झाली.
     Reply
     1. N
      narendra
      Jul 31, 2017 at 11:31 am
      चांगले विश्लेषण नितीशकुमार यांच्या एकूण कोलांटयाचे केले आहे पण भाजपला आता पुन्हा ते फसवू शकणार नाहीत उलट कदाचित उप प्रधान मंत्री पद त्यांना मिळू शकेल जर ते इंडी ए शी निष्ठावान राहिले या उलट त्यांनी पुन्हा कोलांटी उडी मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांची स्थिती ना घर का ना घाटका अशी होईल.
      Reply
      1. G
       Ganeshprasad Deshpande
       Jul 31, 2017 at 10:55 am
       काही गोष्टीत लेख चांगला आहे. नितीश (आणि सोबत सर्व डावे, उजवे, उदार, अनुदार) यांच्या राजकारणात तत्व नावाची वस्तू कुठेच नसते, आहे तो सार्व रोकडा व्यवहार हे स्पष्ट मांडले गेले. जेव्हा नितीशना आपली किंमत राहणार नाही असे वाटले तेव्हा त्यांनी लालूंशी समझोता केला. पण लालू अनेक प्रकारांनी आपल्याला बुडवू शकतील असे दिसताच कोलांटी मारली. त्याची जी किंमत लागेल ते ती देतील. पण हा व्यवहार आहे, अन्य काही नाही. तरी भाजपवर हीच वेळ २०१३मध्ये आली होती हे पटले नाही. केवळ घटस्फोट एवढेच या दोन घटनांमधले साम्य. पण भाजप तेव्हा चढत्या-वाढत्या जोमात होता आणि नितीश नेल्याने झालेले नुकसान सोसण्यासारखे होते. आज नितीशच्या जाण्याने विरोधकांना जगण्याचाच लाले पडण्याची वेळ आली आहे. बुडत्याचा आधार नाहीसा होणे आणि तिरुपती किंवा शिर्डी मंदिरातून सोन्याचा मुकुट चोरीला जाणे इतका यांच्यात फरक आहे. बाय द वे, लालू सुखाने राज्य करू देतील असे नितीशना वाटले होते अशी शक्यता कमीच. त्यामुळे सर्व शक्तीनिशी एक प्रयत्न करावा आणि आपली किंमत ठळक करून घेऊन मग पुन्हा भाजपकडे परत जावे हे सर्व नितीशनी २०१३मध्येच ठरवले होते ही शक्यता कितपत?
       Reply
       1. K
        Kumar
        Jul 31, 2017 at 10:49 am
        छान लेख... खुप सूंदर.....
        Reply
        1. बळी
         Jul 31, 2017 at 10:24 am
         छान समीक्षा.
         Reply
         1. उर्मिला.अशोक.शहा
          Jul 31, 2017 at 9:57 am
          वंदे मातरम शहाण्यांची गुलामगिरी उपकारक ठरते च आणि जे प्रवाह विरुद्ध पोहून स्वतःचे पांडित्य पाजळत असतात त्यांना अनेक विवादांचा सामना करावा लागतो शहाण्यची गुलामगोरी हा सल्ला कुलकर्णी मीडिया मॉगल्स ना देतील का?कारण जनतेने निवडून दिलेल्या सरकार विरुद्ध अवास्तव टीका करून पोट भरणारे अनेक अर्धवट पत्रकार या देशात आहेत. अश्यांच्या अंगात परुळेकर संचारत असतो मुख्यमंत्री पद कसे टिकवायचे हे नितीश कडून शिकण्या सारखे आहे. राम विलास पासवान,अजितसिंग,याना देखील मंत्रिपदाने हुलकावणी दिली नाही हे अभ्यासण्या सारखे आहे. जा ग ते र हो
          Reply
          1. Shriram Bapat
           Jul 31, 2017 at 9:18 am
           बादशहाने बिरबलाला तीन प्रश्न विचारले १) घोडा का अडला २) पाने का सडली ३) भाकरी का करपली बिरबलाने या तीनही प्रश्नांचे एकच उत्तर दिले. "न फिरवल्याने " लहानपणी नितीशकुमारांची ही अत्यंत आवडती गोष्ट होती आणि ती ते पुन्हा पुन्हा वाचत असत. आज ते त्याप्रमाणे आचरण करत आहेत.
           Reply
           1. S
            Somnath
            Jul 31, 2017 at 9:09 am
            बिहारचा पराभव ‘भक्तां’चे तेव्हाचे दु:ख (मोदी)‘ग्रस्तां’ना अशी हेटाळणी जर करा पण त्यानंतर मीडियाने नोटबंदीचे का माजवून अनेक प्रकारची सरकारविषयी गरळ ओकून भाजपचं नगरपालिका,महानगरपालिका,पंचायत आणि जिल्हापरिषद,विधानसभा जिंकली.काँग्रेस फक्त हरत राहिली त्याचे दुःख लेखणी खरडून काँग्रेसची कायमची गुलामगिरी करणाऱ्या लोकसत्ताने शिकामोर्तब केले.चार महिन्यापूर्वी सगळंच माहित असलेला तुमच्या लाडक्या बाळराज्यांचा झटपट निर्णय घेण्याचा लकवा,विदेशी मौज मजा यावर सुद्धा खरडले असते तर तुमच्या गुलामगिरीला कलंक लागला नसता.
            Reply
            1. विनोद
             Jul 31, 2017 at 8:57 am
             उत्कृष्ट लेख !
             Reply
             1. G
              GVG
              Jul 31, 2017 at 8:34 am
              सुंदरच
              Reply
              1. उर्मिला.अशोक.शहा
               Jul 31, 2017 at 6:37 am
               वंदे मातरम-नितीश च्या प्रकरणावरून शिवसेने ने धडा घेण्या सारखे आहे जसे नितीश ने मोदी विरुद्ध अकांड तांडव केले होते आणि नंतर शेपूट आंत घालावे लागले तसेच किंबहुना त्याहून हि वाईट हालत शिवसेने ची होईल कारण नितीश सत्तेवर असूनही सुता सारखा सरळ झाला शिवसेने कडे तर सत्ता हि नाही आणि मुंबई व्यतिरिक्त कोठेही प्रभाव नाही आणि आता तर जनता भ्रष्टाचारी राजकारणाला कंटाळली आहे रस्त्यावरील खड्डया मुले वैतागली आहे मुंबईकरांना शिवसेनेली मते देऊन पश्चाताप होतो आहे आणि त्याचे परिणाम हे नक्कीच दिसून येतील मतदार जनतेला मराठी च्या नावावर चुना लावता येणार नाही ज्या तर्हेने ठाकरे बंधूचे राजकारण आहे त्याला जनता विटली आहे त्यांना आता ठाकरे बंधू पासून मुक्ती हवी आहे जा ग ते र हो
               Reply
               1. उर्मिला.अशोक.शहा
                Jul 31, 2017 at 6:29 am
                वंदे मातरम- शहाण्यांची गुलामगोरी शहाणे च करतात मुर्खांच्या नंदनवनात राहणारे मूर्खच ठरत असतात यात विजय नितीश चा का शाह मोदी चा ?राजकारण कसे खेळावे याचा हा सुंदर नमुना आता नितीश कोठेही जाऊ शकणार नाही आणि भाजप च्या ध्येय धोरणांना नख लावू शकणार नाही.मोदी विरोधात लालू शी केलेली सोयरीक चा काडी मोड होणारच होता कारण मूर्खाची संगत आणि भ्रष्टाचारी व्यक्ती बरोबर चा संबंध नितीश सारख्याना किती काळ मानवणार होता? आता २०२४ ची निवडणूक देखील मोदी शाह जोडी जिंकेल असेच वाटू लागले आहे. एका अर्थाने नितीश ची इनिंग हि काँग्रेस मुक्त भारता करिता पाया ठरेल देशभरातून काँग्रेस चे आमदार पक्ष सोडून भाजप मध्ये येत आहेत जसे राजकारण करून काँग्रेस ने भाजप च्या मुसक्या आवळल्या होत्या तसेच राजकारण करून भाजप काँग्रेस ला जेरीस आणत आहे. आणि त्यात वावगे काहीच नाही. जसे पेराल तसे उगवणार मतदार जनतेने सावध राहून घडणाऱ्या घटना लक्ष्यात ठेवयवत आणि देशाच्या विकास ला मत द्यावे जाती धर्माच्या राजकारणाला मूठमाती द्यावी जा ग ते र हो
                Reply
                1. Load More Comments