राहुल गांधी गांभीर्याने राजकारण करतात, पण त्यात सातत्य नाही. मेहनत घेतात, पण एकंदरीतचा अनुभव बेभरवशाचा आहे. चेहरा राजकारण्याचा आहे, पण पिंड झोलीवाले बाबाचा. राजकीय मूल्ये पक्की आहेत, पण वृत्ती धोरण धरसोडपणाचे आहे. राजकीय आवाका आहे, पण खोली मात्र तेवढी नाही. राजकीयदृष्टय़ा लवचीक आहेत, पण मुत्सद्दीपणात मार खातात..

भूतानमधील डोकलाम सीमेवर भारत व चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परिस्थिती तणावपूर्ण होती आणि चीनकडून सतत उग्र धमक्या दिल्या जात होत्या, की संघर्ष चिघळण्याचे सावट होते. सीमेवर असा पेचप्रसंग असताना नेमके त्याच वेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चीनचे भारतातील राजदूत लोऊ झाल्हुई यांना ‘गुपचूप’ भेटले. सोबत माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. शिवशंकर मेननदेखील होते. पण का कुणास ठाऊक काँग्रेसने ती भेट लपविली. माध्यमांना त्याचा वास लागला होता. पण काँग्रेस इतकी ठाम होती, की तिने भेटीचे वृत्त देणाऱ्या माध्यमांना ‘मोदीचे चमचे’, ‘फेक न्यूज’ अशी शेलकी विशेषणे लावली. पण त्याच वेळी खुद्द चिनी दूतावासानेच भेटीची छायाचित्रे उघड केल्याने आणि लगेचच संशयास्पदरीत्या ती मागे घेतल्याने काँग्रेसची चांगलीच फटफजिती झाली. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री चांगलेच संतापले होते. ‘‘हा बालिशपणा आहे. असला पोरखेळ यांना सुचतोच कसा? चीनबरोबर सीमेवर तणाव असताना चिनी राजदूतांना भेटण्याचा मूर्खपणाचा सल्ला यांना देतो तरी कोण?’’ असे ते रागारागाने म्हणत होते. ते पुढे उद्वेगाने म्हणाले, ‘‘आता देवच काँग्रेसचे भले करो..’’

तेच ज्येष्ठ नेते मध्यंतरी भेटले, तेव्हा खुशीची गाजरे खात होते. ‘‘राहुलजींमधील जबरदस्त बदल दिसतोय का तुम्हाला? मी त्यांच्या ट्वीट्सवरून म्हणत नाही, तर बदललेल्या शारीरिक आत्मविश्वासांवरून म्हणतोय. त्यांची शब्दफेक दिवसेंदिवस क्षेपणास्त्रासारखी टोकदार होत चाललीय आणि मोदी हळूहळू घायाळ होताना दिसताहेत..,’’ असे ते म्हणत होते. बदललेल्या राहुलजींची स्तुती किती करू, असे त्यांना झाले होते. राहुलजींनी आता ‘होय-नाही, होय- नाही’चा धरसोडपणा सोडावा. पक्षाध्यक्ष होण्यासाठी आताइतकी चांगली संधी दुसरी येणार नाही, असेही ते म्हणत होते.

२००४ मध्ये सक्रिय झाल्यानंतर आणि २०१३ मध्ये उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल यांच्याबद्दल काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये (प्रथमच) आशा पल्लवित होत असल्याचे त्या नेत्याला सुचवायचे होते आणि अशी संधी दडवू नये, असे त्याला प्रामाणिक वाटत होते. कारण उद्या जर गुजरातमध्ये अपयश आले आणि हिमाचल प्रदेशमधील सत्ता हातातून निसटली तर पुन्हा एकदा पक्षाभिषेक लांबणीवर टाकावा लागेल. जर गुजरातमध्ये यश मिळालेच तर त्याचे सर्व श्रेय त्यांच्या पक्षाध्यक्षपदाला देता येईल, असे गणित तो मांडत होता. असे गणित मांडणारा तो काही एकटा नेता नाही. बहुतेकांना तसेच वाटतंय. बहुधा राहुल, त्यांच्या मातोश्री सोनिया आणि बहीण प्रियांका यांना ते पटलं असावं, असे मानायला हरकत नाही. सोनियांच्या भाषेत सांगायचं झालंच तर, ‘‘तुम्ही ज्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत होता, ते लवकरच प्रत्यक्षात उतरेल.’’

कारण आज (२० नोव्हेंबर) कदाचित काँग्रेस महासमितीच्या बैठकीत पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी जाहीरपणे सांगितल्यानुसार, आई किंवा मुलगा या दोनच व्यक्ती पक्षाध्यक्ष होऊ  शकत असल्याने राहुल यांची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत खात्री बाळगायला हरकत नाही. तसे झालेच तर गुजरात निवडणुकीपूर्वीच पक्षाभिषेक झालेला असेल. पक्षाभिषेक हा खरे तर अपेक्षित, पण अनावश्यक लांबविलेला राजकीय सोहळा. २०१४ मधील ४४च्या नामुष्कीनंतर पक्षाभिषेकाचे किमान तीन तरी मुहूर्त काढले गेले. गेल्या दीड दोन वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनियांनी दैनंदिन पक्षकार्यातून स्वत:ला पूर्णपणे दूर केलंय. त्यांचा सहभाग अतिमहत्त्वाच्या निर्णयांपुरताच असतो. कुणीही कशासाठीही भेटले की त्यांचे साधारणत: एकच उत्तर असते.. ‘‘राहुलजींना विचारा आणि काय ते ठरवा.’’ मग तरीही माशी कुठे तरी शिंकायची आणि पक्षाभिषेक लांबायचा. पण दरवेळी एकच रडगाणे असायचे- राहुलजी अद्याप (मनापासून) तयार नाहीत! आपण नाखुशीनेच राजकारणात असल्याचे राहुल प्रारंभी भासवायचे. त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच ‘कॅज्युअल’ वाटायचा. संसदेकडे फारसे फिरकायचे नाहीत, मतदारसंघात जायचे नाही, मुख्यालयात क्वचितच यायचे, मधूनच परदेशात सुटीवर जायचे, नामुष्कीचा सामना करणाऱ्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धडपड करीत असल्याचे काही जाणवायचे नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे प्रवाद व प्रतिमा खरीही वाटायची. अर्धवेळ राजकारणी वाटत राहायचे. किंबहुना काँग्रेसमधीलच मंडळी सांगायची, ‘‘राहुलना अजिबात रस नाही, पण मॅडमचा पुत्रमोह काही सुटत नाही..’’ त्यातच विविध राज्यांतील पराभवाच्या मालिकांनी अपशकुनाची भीती असायची. म्हणजे पक्षाध्यक्षपद स्वीकारले आणि एखाद्या राज्यात पराभव झाल्यास राहुलना ‘पनवती’ मानले जाण्याची शंका डाचायची. मग त्यानेही सोहळा लांबणीवर पडायचा. तोपर्यंत दुसऱ्या राज्यातली निवडणूक यायची. अखिलेश सिंह यादव यांच्याबरोबर हातमिळविणी केल्यानंतर हे ‘यूपी के दो लडके’ सत्ता मिळवणारच अशी ठाम खात्री काँग्रेसला होती. उत्तर प्रदेश जिंकायचे आणि मोठय़ा दिमाखात पक्षाभिषेक करण्याची भव्य योजना डोक्यात होती. पण उलटेच झाल्याने योजना बारगळली आणि काँग्रेस पुन्हा एकदा कोमात गेली. पण राजकारणात चित्र बदलण्यासाठी दोन-तीन महिनेदेखील पुरतात. तसेच काही झाले आणि अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल यांच्यामध्ये अक्षरश: चमत्कार वाटावा इतका ‘मेक ओव्हर’ झालाय. त्यांची धारदार, उपरोधिक भाषा आणि त्यांची आक्रमक भाषणे आणि आत्मविश्वास झळकत असलेली देहयष्टी काँग्रेसजनांमध्ये आशा निर्माण करणारी आहे. मोदींच्या तीन वर्षांच्या राजवटीमध्ये काँग्रेस लयाला जात असताना ही आशेची झुळूक काँग्रेसजनांना सुखावणारी आहे. ‘वो काँग्रेस को डुबा के ही छोडेगा’ असे म्हणणारे आणि मुख्यालयात बसूनच त्यांना ‘पप्पू’ आणि ‘मोदींचे विमा संरक्षण’ म्हणणारेही राहुलबद्दलची आपली मते पुन्हा तपासू लागलेत. राहुलबद्दल खूपच अढी असलेल्या शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्यालाही बदल जाणवतोय. ‘‘मोदींसमोर काय पाडाव लागणार?’’ अशी जाहीरपणे कुत्सित हेटाळणी करणाऱ्या पवारांना राहुल गांधींना (त्यांचे ‘शिष्य’) मोदी घाबरल्याचे सांगावे लागणे यातच सर्व काही आलंय. त्यामुळे पक्षाभिषेकासाठी याच्याइतकी चांगली संधी येणार नाही, हे खरंच आहे.

अर्थात काही धोकेदेखील आहेत. जर गुजरातमध्ये उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती झालीच तर त्याच्याइतका राहुल यांच्यासाठी दुसरा राजकीय अपशकुन नसेल. पण जर चमत्कार झालाच आणि काँग्रेसचे नेते खासगीत पैजा लावत असल्याप्रमाणे भाजपचा दिल्ली व बिहारसारखा दारुण पराभव झालाच तर राहुल एकाच झटक्यात ‘पोल व्हॉल्ट’प्रमाणे इतक्या राजकीय उंचीवर पोचतील, की त्याची केवळ स्वप्नातच कल्पना केली जाऊ  शकते. पण गुजरातची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची करण्यात काहींना धोका वाटतोय. पण बहुतेकांना राहुल यांचे  मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात असे ताकदीने चालून जाणे आवडलंय. हारजीतपेक्षा  लढणे महत्त्वाचे. अगदी भाजपच्या मागील वेळेपेक्षा पाच-दहा जागा कमी झाल्या तरी भाजपच्या बालेकिल्ल्याला धडक मारण्याचे श्रेय राहुलना मिळू शकते. थोडक्यात, धोका स्वीकारण्यातील तोटय़ापेक्षा फायदा अधिक असू शकतो. तो धोका स्वीकारण्याची मानसिक तयारी राहुल-सोनिया-प्रियांका या ‘गांधी त्रिमूर्ती’ने केली असे दिसतंय.

(नेहमीप्रमाणे) राहुलनी यंदा ऐनवेळी कच खाल्ली नाही तर ते गुजरात मतदानापूर्वीच पक्षाध्यक्ष झालेले असतील. १९९८ मध्ये पक्षाध्यक्ष झालेल्या सोनियांनी रसातळाला पोचलेल्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन केले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती राहुलना करावी लागेल. कारण २०१७ मधील काँग्रेसची अवस्था १९९८ मधील काँग्रेसपेक्षा वेगळी नाही. फरक एवढाच की तेव्हा ‘कुटुंबा’ला पुढे येऊन पक्ष वाचवावा लागला होता, आता ‘कुटुंबा’च्या हाती सर्व सूत्रे असतानाही पक्षावर संकट आहे. एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यात केवळ तीन-चार लहानसहान राज्ये उरलीत. कर्नाटकची सत्ता टिकवण्याचे आणि किमान राजस्थान तरी भाजपकडून खेचून आणण्याचे आव्हान आहे. मग तोंडावर असेल २०१९ची लोकसभा. समोर मोदी-शहांसारखी शक्तिशाली दुकली आहे. मोदींना सत्तेपासून रोखायचे आणि तेही न जमल्यास किमान त्यांना स्वबळावर सत्तेवर येऊ  न देण्यासाठी पावले टाकावी लागतील. हा सर्व मार्ग कठीण अडथळ्यांचा आहे. हे शिवधनुष्य राहुल कसे पेलतात, यावर काँग्रेसचाच नव्हे, तर देशाचा राजकीय प्रवास बव्हंशी अवलंबून असेल..

santosh.kulkarni@expressindia.com