08 December 2019

News Flash

मोदीवीरांना सुषमांचा धडा!

चार वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या सुषमा स्वराज यांच्यात कमालीचा फरक आहे

महेश सरलष्कर

सुषमा स्वराज म्हणजे राजनाथ सिंह नव्हे. समाजमाध्यमांवरून लक्ष्य बनवणाऱ्या मोदीवीरांशी सुषमांनी थेट दोन हात केले. ही लढाई त्यांनी जिंकलीही! मात्र, वर्षभरावर लोकसभेची निवडणूक आल्यामुळे भाजपकडून मोदीवीरांना वेसण घातले जाण्याची कोणतीही शक्यता नाही. सुषमा प्रकरण विसरून जा आणि नेहमीच्या लक्ष्यावर केंद्रित व्हा, असा संदेश वीरांपर्यंत पोहोचवण्यात आला असेल तर वीरांच्या तलवारीला अधिकच धार येण्याची शक्यता आहे.

बाटलीतून भूत बाहेर काढल्यावर ते कोणाच्या मानगुटीवर बसेल हे सांगता येत नाही. आता भाजपला त्याची प्रचीती आलेली आहे. गेल्या महिन्याभरात नऊ राज्यांमध्ये अफवा पसरून तब्बल २७ जणांचा बळी गेला आणि आता मोदी सरकार व्हॉट्सअ‍ॅप या कंपनीला अफवा थांबवण्याचा आदेश देत आहे. खरे तर या कंपनीने हात वर केलेले आहेत. त्यांना या अफवा थांबवता येणार नाहीत. वास्तविक हे प्रकरण भाजप आणि मोदी सरकारच्या हाताबाहेर गेलेले आहे. राज्य सरकारांना टवाळखोरांवर नजर ठेवण्याचे निर्देश देऊन केंद्र सरकार नामानिराळे झालेले आहे. हे भूत बाटलीबंद कोण करणार, हा खरा प्रश्न आहे!

गेल्या महिन्यात दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी समाजमाध्यमांतून भाजपसाठी लढणाऱ्या वीरांचा मोठा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पक्षाध्यक्षांचे या वीरांना मानसिक बळ देणारे भाषण झाले. अख्ख्या भाषणात त्यांनी कधीही कोणालाही गैरसमज पसरवणे थांबवा, फेक न्यूज थांबवा, कोणाला बलात्काराची धमकी देऊ नका, असा संदेश दिला नाही. उलट, या वीरांचे भाजपला कौतुकच वाटते. आता मात्र निष्पाप लोकांचे प्राण हकनाक जाणे हा दंगलखोरांचा देशद्रोह मानला जाईल, असे सांगितले जात आहे. बेकायदा कृत्य नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. वास्तविक, या कायद्यांतर्गत कोणावरही कारवाई करणे अवघड आहे. कारण त्यासाठी भक्कम पुरावे मिळवावे लागतात. भाजपची सत्ता असलेली राज्य सरकारे हे पुरावे खरोखर गोळा करणार आहेत का? की हे काम केंद्र सरकार करणार आहे? अफवा पसरवून हिंसक कृत्यात सहभागी झालेले तरुण जामिनावर सुटले. त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्र्यांनीच हार घातला. एवढे करूनही हे मंत्री कायद्याचा आपण नेहमीच आदर करतो, असे म्हणतात. ही कुठल्या स्तरावरील असंवेदनशीलता आहे? केंद्रीय मंत्री गळ्यात हार घालणार असतील तर अफवा पसरवणाऱ्यांना कोणता संदेश मिळतो? मग, केंद्रीय गृहमंत्रालय वा माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय अफवा रोखण्यासाठी सरकार गंभीर असल्याच्या बाता कशाच्या जिवावर करते?

समाजमाध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसे ठेवताही येणार नाही. त्यामुळे ही व्यासपीठे दुधारी तलवारीसारखी असतात. त्याचा वापर सकारात्मकही होऊ शकतो आणि अफवा पसरवून लोकांचे प्राणही घेता येऊ शकतात. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हे हत्यार अत्यंत चाणाक्षपणे वापरले जात आहे. म्हणूनच समाजमाध्यमांच्या गैरवापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्द काढलेला नाही.

भाजपचे हे वीर मोदी-शहा या जोडगोळीशी एकनिष्ठ आहेत असे दिसते. अन्यथा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली नसती. चार वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या सुषमा स्वराज यांच्यात कमालीचा फरक आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक म्हणजे अख्खे परराष्ट्र खाते मोदी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल चालवतात. परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमांना फारसा वावच नाही. सुषमा यांनी हे वास्तव स्वीकारलेले आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना स्वत:ची तब्येत सांभाळून कारभार करावा लागतो. त्यामुळे सुषमा स्वत:च्या अख्यतारीत पण मोदीनीतीच्या आड येणार नाहीत अशा अनेक गोष्टी करीत असतात. समाजमाध्यमांतून लोक त्यांच्याशी संपर्क साधतात, त्या तातडीने त्यांची कामे करतात. लोक त्यांना दुवा देतात. स्वत:चे वेगळेपण कोणालाही जपता आलेले नाही, अपवाद सुषमा आणि नितीन गडकरी यांचा. दोघांनीही आपल्या कामातून स्वत:चे अस्तित्व जपले आहे. गडकरी संघाच्या खास वर्तुळातील आहेत, पण याबाबतीत सुषमांची बाजू कमजोर आहे. त्यामुळे त्यांना लक्ष्य बनवणे मोदीवीरांना सोपे गेले आहे.

सुषमांनी आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्याचे समर्थन केले आणि पारपत्र कार्यालयातील अधिकाऱ्याची बदली केली, त्याचा ‘लव्ह जिहाद’ मानणाऱ्या मोदीवीरांना राग आला आणि त्यांनी आक्रमण सुरू केले. भाजपच्याच मंत्र्याविरोधात आपण आघाडी उघडलेली आहे, याचे भानही त्यांना राहिले नाही. या प्रकारामुळे भाजपनेत्यांना धक्का बसलेला होता; पण उघडपणे तसे बोलून दाखवण्याचे धाडस त्यांच्यापैकी कोणाकडे नसल्याने ते गप्प बसले. सुषमांचे समर्थन करणे म्हणजे मोदीविरोधात पाऊल टाकणे हाच संदेश गेला असता. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मोदींची वक्रदृष्टी राजकीयदृष्टय़ा परवडणारी नाही हे भाजपनेते जाणतात. काश्मीरमध्ये पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अपरोक्ष होतो तिथे इतर मंत्र्यांची अवस्था कशी असेल याची कल्पना करता येते; पण सुषमा म्हणजे राजनाथ नव्हे. जे धाडस राजनाथ यांनी दाखवले नाही ते सुषमांनी दाखवले. सुषमांनी मोदीवीरांशी थेट दोन हात केले. त्यांच्या या आक्रमकतेमुळे वीरांनाच दोन पावले मागे जावे लागले. अखेर मदतीला आले ते गडकरी आणि राजनाथ. दोघेही पक्षांतर्गत मोदीविरोधक; पण सुषमांनी मोदीवीरांविरोधातील लढाई एकटीने लढली आणि जिंकलीही!

दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्र सदनात अमित शहा यांच्या उपस्थितीत संघ आणि भाजपची समन्वय बैठक झाली होती. बैठका विषयवार होत होत्या. त्या खात्याचा मंत्री बैठकीत सहभागी होत होता. या बैठकीत काय झाले हे कोणा मंत्र्याने सांगणे अपेक्षितच नाही, पण आपल्याला पत्रकारांशी बोलताना कोणी पाहू नये, ही भीती एका मंत्रिमहोदयाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मोदी सरकारमधील मंत्री इतके गलितगात्र होत असतील, तर सुषमांनी खूपच मोठे धाडस दाखवले, असे म्हणावे लागते.

मोदींना समाजमाध्यमांची ताकद ओबामांमुळे समजली. ओबामांनी अमेरिकेतील तरुणांना आवाहन करून देश बदलण्याची ताकद दिली; पण हे करत असताना त्याचा वापर विघातक कृत्यांसाठी होऊ दिला नाही. उलटपक्षी ट्रम्प यांनी अमेरिकेतील गोऱ्या लोकांमध्ये राष्ट्रवादाचे भूत समाजमाध्यमांचा वापर करूनच निर्माण केले. भाजपनेही राष्ट्रवादाचे भूत याच समाजमाध्यमांना हाताशी धरूनच उभे केले आहे. केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी त्याचा फायदाही झाला. मोदींचा राष्ट्रवाद हा प्रामुख्याने अल्पसंख्याकांविरोधात बहुसंख्य हिंदू एकीकरणाचा आहे. त्यामुळेच हिंदू मुलीने मुस्लीम मुलाशी लग्न करणे हिंदुत्ववाद्यांना, भाजपला, मोदीवीरांना पसंत नाही; पण सुषमा स्वराज यांनी उत्तर प्रदेशमधील आंतरधर्मीय जोडप्याची पाठराखण करून भाजपकृत राष्ट्रवादाला अव्हेरले आहे. त्यामुळेच सुषमा यांना मोदीवीरांचा त्रास सहन करावा लागला, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

गेल्या चार वर्षांत समाजमाध्यमांतून भेदाभेदाची दूषित वातावरणनिर्मिती केली गेली. तीच व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना कारणीभूत ठरली आहे. विद्वेषाच्या बाटलीबंद भुताने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे. या भुताला नियंत्रित केले तर समाजमाध्यमांवरही आपसूक नियंत्रण येते. चूक समाजमाध्यमांसारख्या व्यासपीठाची नाही, तर ते वापरणाऱ्यांची आहे. या व्यासपीठाचा गैरवापर केला गेला, कारण तसा तो करण्याचा संदेश कोणी तरी दिला होता. गेल्या ४८ महिन्यांत हा संदेश कोणाकोणाकडून दिला गेला? ४८ वर्षे आणि ४८ महिन्यांतील यशापयश जोखायचेच असेल तर याही अंगाने त्याची चर्चा होऊ शकते. देशात शांतता राखली जाणे हे सत्ताधाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य असेल तर त्याचे पालन दिल्लीतून झालेले नाही हे स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय मंत्र्यांनाच ट्रोल केले जात असेल आणि त्याविरोधात पंतप्रधान मौन बाळगत असतील तर ते मनमोहन सिंग यांच्यापेक्षा वेगळे कसे ठरतात?

मोदीवीरांनी सुषमा यांच्याविरोधात आघाडी उघडण्याची चूक केली याची जाणीव भाजपला झालेली आहे. मात्र, वर्षभरावर लोकसभेच्या निवडणुका आल्यामुळे भाजप मोदीवीरांना वेसण घालण्याची कोणतीही शक्यता नाही. सुषमा प्रकरण विसरून जा आणि आपल्या नेहमीच्या ‘लक्ष्या’वर केंद्रित व्हा, असा संदेश वीरांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. वीरांचे ‘लक्ष्य’ कोणते हे भाजपच्या हितरक्षणासाठी समाजमाध्यमांमध्ये तलवार घेऊन उभे राहिलेल्यांना माहिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी तलवारीला अधिक धार येण्याचीच शक्यता अधिक दिसू लागली आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com

First Published on July 9, 2018 1:01 am

Web Title: sushma swaraj hits back social media trollers
Just Now!
X