38-lp-anand-kanitkarसह्य़ाद्रीच्या काळ्याकभिन्न कातळांमधून निर्माण झाला आहे एक इतिहास सृजनाचा, काळाशी टक्कर देण्याऱ्या मानवी जिद्दीचा. लेणींच्या स्वरुपात टिकून असणाऱ्या या इतिहासाच्या पडद्याआड डोकावणारे सदर.

सह्यद्री, महाराष्ट्राचा मानिबदू! या सह्यद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. सह्यद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटांच्या यशोगाथा जगप्रसिद्ध आहेत. याच सह्यद्रीच्या उदरात सुमारे दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील कारागिरांनी केवळ छिन्नी-हातोडय़ाचे घाव घालून अनेक लेणी निर्माण केली. भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी या महाराष्ट्रातच आहेत. बहुतांश ठिकाणी पांडवलेणी म्हणून ओळखली जाणारी आणि काहीशी पडकी भासणारी ही लेणी निरखून पाहिली तर त्यांच्या स्थापत्यातून, तिथे कोरलेल्या मूर्तीतून, दानलेखांतून त्यांच्या निर्मितीची कथा उलगडत जाते. काही अपूर्ण राहिलेल्या लेणीदेखील आपल्याशी उत्तम संवाद साधतात. अजिंठा, कान्हेरी, नाशिक येथील लेणींमध्ये कोरलेल्या दानलेखांतच लयन हा शब्द वापरलेला आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लेणींच्या निर्मितीची ओळख करून देणारी ही लेखमाला.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची! याच सह्यद्रीच्या उदरात ही लेणी आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पाश्र्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिक, इत्यादिंनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, िहदू व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. त्यामुळे भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी महाराष्ट्रातच आहेत.

इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात मौर्यवंशीय सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला होता. सम्राट अशोकाचे प्रस्तरलेख आणि स्तंभलेख हे अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेले आहेत. महाराष्ट्रात पौनी येथे उत्खननात सापडलेला स्तूप हा मौर्य काळातील स्तूप असावा असे संशोधकांचे मत आहे. मुंबईजवळ सोपारा येथेही विटांनी बांधलेला स्तूप तसेच अशोकाचे शिलालेखही सापडले आहेत. भगवान बुद्धांच्या सूचनेनुसार वर्षभर धर्मप्रसारासाठी फिरतीवर असणारे बौद्ध भिक्षू पावसाळ्यातील निवासासाठी (वर्षांवासासाठी) तात्पुरता निवारा उभारत. प्राचीन बौद्ध ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ही वर्षांवासाची जागा गावाच्या अथवा शहराच्या सीमेबाहेर परंतु शहरापासून जवळ असे. कारण भिक्षेसाठी एखादं गाव जवळ असणे गरजेचे होते. त्यामुळे अनेक बौद्ध स्तूप आणि विहार हे गावाच्या जवळ उभारले जाऊ लागले.

37-lp-cave

इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात महाराष्ट्रात सातवाहन घराणे उदयाला आले होते. याच काळात भारताचा ग्रीस व रोमबरोबर व्यापार समुद्रमार्गाने व्यापार सुरू झाला होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या सुरुवातीला या व्यापाराला नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या शोधाने मोठी चालना मिळाली आणि नर्ऋत्य मोसमी वारे शिडात भरून सागरी मार्गाने दरवर्षांला १२० रोमन जहाजे व्यापारासाठी भारताच्या किनाऱ्यावर येऊ लागली.

सातवाहन काळात महाराष्ट्राच्या भूभागातील व्यापारी मार्ग दक्षिणापथ या नावाने ओळखला जात असे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी’ या १९०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या खलाशांच्या मार्गदर्शक पुस्तिकेतही या दक्षिणापथाचा उल्लेख आढळतो. याच पुस्तिकेत महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठा म्हणून तेर आणि पठण या शहरांचा तसंच कल्याण, चौल, सोपारा या बंदरांचा उल्लेख आढळतो. या बंदरांवर आलेल्या रोमन जहाजांना तेर, पठण व इतर शहरांतून व्यापारी मार्गाने माल पाठवला जात असे. सार्थवाह हे मालाचे तांडे घेऊन जात असत. या विविध व्यापारी मार्गावर असणाऱ्या डोंगररांगांतील काळ्याकभिन्न कातळात व्यापाऱ्यांनी  दिलेल्या दानामधून लयननिर्मितीला सुरुवात झाली. कुठलेही दान देण्यासाठी दानी माणसाकडे मुबलक प्रमाणात पसा असावा लागतो. तो पसा रोमसोबतच्या व्यापारातून व्यापाऱ्यांकडे आणि मालाला उठाव असल्यामुळे सामान्य माणसाकडेही उपलब्ध होता.

लेणींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, लेणी बांधली जात नसत तर एकसंध पाषाणात कोरली जात असत. अजिंठा तसेच जुन्नर येथील काही अर्धवट कोरलेल्या चत्यगृहांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, ही लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे. कारागीर केवळ छिन्नी हातोडय़ाच्या मदतीने ही लेणी कोरत असत. तत्कालीन लाकडी बांधीव स्थापत्याची प्रतिकृती असलेली ही लेणी कोरताना कातळावर स्थपतीने आखलेल्या रेखांकनाप्रमाणे खांब आणि तुळयांच्या जागा सोडून कारागीर इतर भाग कोरत खालच्या भागाकडे येत. त्यानंतर शिल्पकार त्या खांबांना सुबक आकार देऊन त्यावर नक्षी कोरत असत. प्रसिद्ध फ्रेंच मूíतकार रोदां म्हणाला होता की कुठलीही मूर्ती ही दगडात मूळचीच असते; मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. त्याप्रमाणे ही लेणी कोरून काढणाऱ्या भारतीय शिल्पकारांना त्यातील स्थापत्य, मूर्ती, शिलालेखाच्या जागा माहीत असायच्या; इतर नको असलेला भाग ते कोरून काढायचे.

बौद्ध धर्मीयांच्या लेणींत प्रामुख्याने चत्यगृह (पूजेची जागा), विहार (राहण्याची जागा), भोजन मंडप, स्मशाने, न्हाणपोढी (आंघोळीची पाण्याची टाकी), पाणपोढी (पिण्याच्या पाण्याची टाकी), कोढी (पूजेचे कोनाडे) या स्थापत्य प्रकारांचा अंतर्भाव होत असे. मुख्यत: भाजा, कान्हेरी व जुन्नर येथील मोठय़ा लेणीसमूहांमध्ये हे स्थापत्य प्रकार आढळतात. चत्यगृह म्हणजे पूज्य वस्तूंच्या उपासनेसाठी निर्माण झालेल्या बांधीव स्तूपमंदिराच्या प्रतिकृती आहेत, तर विहार हे भिक्षूंच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या कुटिरांच्या प्रतिकृती आहेत.

भारत व रोम यांमधील वाढत्या व्यापारामुळे तसेच बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात इसवी सन पहिले ते तिसरे शतक या काळात भाजे, अजिंठा, पितळखोरा, काल्रे, नाशिक, जुन्नर, कुडा, कान्हेरी, महाड इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर लयननिर्मिती झाली. इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात वाकाटक राजे आणि त्यांचे मंत्री यांच्या आश्रयाने अजिंठा येथील बौद्ध लयननिर्मितीचा दुसरा टप्पा पार पडला.

इसवी सनाच्या सहाव्या शतकात कलचुरी राजांच्या आश्रयाखाली घारापुरी येथील पाशुपत पंथासाठी (एक शैव उपपंथ) लेणी कोरण्यात आली. शैव पंथाला आश्रय मिळण्याच्या या सुरुवातीच्या काळात मंडपेश्वर, जोगेश्वरी आणि वेरुळ येथील सुरुवातीच्या काळातील शैव लेणी कोरण्यात आली. इसवी सनाच्या आठव्या शतकात विविध ठिकाणी लयननिर्मितीचा प्रवाह खंडित झाला आणि कान्हेरी व पन्हाळेकाजी ही ठिकाणे वगळता वेरुळ येथे मोठय़ा प्रमाणावर दानाचा ओघ वाढला. आठव्या शतकात वेरुळ येथे भव्य दुमजली, तिमजली बौद्ध लेणींची तसेच चत्यगृहाची निर्मिती झाली. याच काळात महाराष्ट्राच्या लयन स्थापत्यामध्ये कळस चढवला तो वेरुळच्या अद्वितीय कैलास लेणींच्या निर्मितीने! राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कारकिर्दीत आठव्या शतकात कैलास लेणे वेरुळच्या टेकडीमध्ये कोरण्यात आले. अर्थातच वरच्या भागापासून बाहेरून सुरुवात करून कारागीर लेणी कोरत खाली येत असल्यामुळे कैलास लेणेही ‘आधी कळस, मग पाया’ असेच कोरण्यात आले होते. अग्निजन्य खडक हा एक माध्यम म्हणून किती सामथ्र्यवान आहे आणि आठव्या शतकातील शिल्पकारांनी आपल्या अनेक पिढय़ांच्या पूर्वपुण्याईने या माध्यमावर किती कमालीचे प्रभुत्व मिळवले होते या दोन्हीचा पुरावा कैलास लेणी बघताना मिळतो! यानंतर वेरुळ येथेच नवव्या व दहाव्या शतकात जैन लेणींचीही निर्मिती झाली. विविध जैन र्तीथकर आणि जैन यक्ष, यक्षी यांच्या मूर्तीनी नटलेली ही लेणी वेरुळ येथील लयननिर्मितीचा शेवटचा महत्त्वाचा टप्पा ठरली.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश संशोधकांनी महाराष्ट्रातील या लेणींचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी लेणींसाठी केव्ह टेम्पल्स ही संज्ञा वापरली. त्याचा अर्थ गुहामंदिरे असा होतो तर २० व्या शतकात काही भारतीय तसेच परदेशी संशोधकांनी शैलगृह किंवा मानवनिर्मित गुहा अशा संज्ञा वापरल्या आहेत. परंतु गुहा आणि लेणी यात फरक आहे. गुहा हा शब्द डोंगरातील निसर्गनिर्मित मोठय़ा पोकळीवजा जागेसाठी अपेक्षित आहे, तर लेणी या शब्दात मानवाने कातळात कोरून निर्माण केलेली जागा अपेक्षित आहे. याचे फरकाचे पुरावे आपल्याला प्राचीन ग्रंथांतून तसेच शिलालेखांतून सापडतात.

दिघ्घनिकाय या बौद्ध ग्रंथातील सक्कपन्न सुत्तामध्ये शक्र (म्हणजे इंद्र) राजगृहाजवळ इंदसल गुहेत ध्यान करीत असलेल्या भगवान बुद्धांना भेटण्यासाठी येतो त्या वेळचे वर्णन आहे. या कथेचे अंकन बौद्ध शिल्पकलेत सांची, बारहुत, नागार्जुनकोंडा इ. ठिकाणी बघायला मिळते. परंतु गांधार प्रदेशातील (आताचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा भाग) कलेत इंदसल गुहा या कथेचे शिल्पांकन करताना शिल्पकारांनी ही गुहाच दाखवली आहे हे तिच्या आजूबाजूच्या डोंगराळ भागावरून, जंगली प्राण्यांच्या शिल्पांवरून तसेच गुहेतील स्थापत्याच्या पूर्ण अभावावरून स्पष्ट होते.

इसवी सनाच्या पाचव्या शतकातील लेखक बुद्धघोष यांनी बौद्ध ग्रंथावरील भाष्य लिहिले आहे. वर उल्लेख केलेल्या सक्कपन्न सुत्तावर भाष्य करताना याच इंदसल गुहेबाबत ते म्हणतात की, ती गुहा एका दात्याने लेणीत रूपांतरित केलेली होती. तिला दारे व खिडक्या होत्या. इतकेच नाही तर लेणींच्या िभतींवर पांढरा रंग दिलेला असून त्यावर वेली व फुलांची नक्षी काढलेली होती. या भाष्यात बुद्धघोष यांनी वापरलेल्या गुहा आणि लेणी या शब्दांवरून हे दोन्ही प्रकार वेगळे मानले जात होते हे उघड आहे. (अशा प्रकारे गुहेचे बाहेरून लावलेल्या दगडी खांब आणि तुळयांच्या आधाराने दार व खिडक्या उभारून लेणींमध्ये रूपांतर केल्याचे श्रीलंकेतील मिहिन्तले येथील कलुदिय पोकुण येथे आढळून येते.)

महाराष्ट्रातील लेणींमधील तत्कालीन कोरीव दानलेखांतूनही घर, लयन, लेणी, वेश्म हे शब्द वापरलेले आहेत. गुहा हा शब्द वापरलेला दिसत नाही. त्यामुळे हे सर्व शब्द मानवनिर्मित जागा म्हणजे लेणे सूचित करतात, निसर्गनिर्मित गुहा नाही. अजिंठा येथील १६ व्या क्रमांकाच्या लेणीमधील वाकाटक राजा हरिषेण (इसवी सन पाचवे शतक) याचा मंत्री वराहदेव याच्या शिलालेखात त्याने निर्माण करवून घेतलेल्या जागेला ‘वेश्म’ व ‘लयन’ म्हटले असून त्याला दारे, खिडक्या, जिने, खांब, विथीका तसेच शिल्पांनी सजवल्याचे नमूद केले आहे. वेश्म हा शब्द फक्त अजिंठा येथील दोन शिलालेखांतच येतो.

‘समरांगणसूत्रधार’ या ११ व्या शतकातील स्थापत्यशास्त्रावरील ग्रंथात विविध प्रासादांची म्हणजे मंदिरांची माहिती दिली आहे. त्यात स्थापत्यानुसार मंदिरबांधणीचे विविध प्रकार, बांधकामाचे साहित्य यांचे वर्णन आहे. याच ग्रंथात लयन म्हणजे कातळातून कोरून काढलेले मंदिर, ज्याला दारे, खिडक्या, जिने, सज्जे असतात असे नमूद केले आहे. यावरून तसेच अजिंठा, काल्रे, नाशिक, जुन्नर, कुडा, कान्हेरी, महाड, कोळ येथील लेणींतील अनेक तत्कालीन संस्कृत आणि प्राकृत भाषेतील शिलालेखांत वापरल्याप्रमाणे कातळातून कोरून काढलेल्या मानवनिर्मित जागेला लयन अथवा लेणी हाच शब्द रूढ होता असे दिसते.

अशा या महाराष्ट्रातील लेणी आणि त्यातील शिलालेख हे आपल्याला फक्त त्यांची निर्मितिकथाच सांगत नाहीत तर महाराष्ट्राच्या तत्कालीन आíथक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाचा पटही आपल्यासमोर ठेवतात. हे शिलालेख ब्राह्मी लिपीत व प्राकृत अथवा संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. सातवाहन, क्षत्रप, वाकाटक इत्यादी राज्यकत्रे, त्यांचे मांडलिक, सरदार वगरेंचे उल्लेख दानलेखांतून आढळतात. त्यातून राजकीय सत्तांतरांचीही माहिती मिळते. याशिवाय समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी दाने दिलेली आढळतात. भिक्षू, भिक्षुणी, यवन, शक व त्यांच्या पत्नी, माळी, सुवर्णकार, लोहवणिज (लोखंडाचे व्यापारी), वंशकार (बुरूड), कांस्यकार (तांबट), गृहपती (गृहस्थ), सार्थवाह (व्यापारी), हालिक (शेतकरी) व त्यांच्या पत्नी, श्रेष्ठी इत्यादींनी दिलेल्या दानाचे उल्लेख या शिलालेखांतून येतात. याच लेखांतून ‘अक्षयनिधी’ म्हणजे कायमस्वरूपी ठेव गावातील व्यापारी संघाकडे ठेवली जात असे व त्यातून येणाऱ्या व्याजातून भिक्षूंना दान दिले जात असे याची माहिती मिळते.

स्थानिक लोक अनेकदा ज्याचा निर्मितीचा इतिहास आपल्याला सांगता येत नाही ते पांडवांनी अज्ञातवासात बांधले होते असे सांगून मोकळे होतात; परंतु अशा अनेक लेणी आणि मंदिरांचा इतिहास पूर्वसुरींनी केलेल्या अभ्यासावरून आणि उपलब्ध पुराव्यांवरून मांडता येतो. लेणींतील ब्राह्मी लिपीत लिहिलेले लेख वाचता येतात, त्यांचा अर्थ लावता येतो. स्थानिक लोकांना याची कल्पना नसल्यामुळे या शिलालेखांत खजिन्याची माहिती लिहिली आहे असाही त्यांचा समज होतो. प्राचीन भारतातील डोंगर कोरून लयन निर्माण करण्याची प्रक्रिया कशी होती याचा अभ्यास न करताच अनेक जण वेरुळ येथील इसवी सनाच्या आठव्या शतकात निर्माण करण्यात आलेले कैलास लेणे हे परग्रहावरून आलेल्या सजीवांनी निर्माण केले होते असा दावा करतात.

महाराष्ट्रातील लेणींतील स्थापत्य, शिल्प, चित्रकला, दानलेख यांचा अभ्यास १९ व्या आणि २० व्या शतकात अनेक संशोधकांनी केलेला असला तरी तो पुरेसा नाही. अजूनही अनेक पद्धतीने महाराष्ट्रातील लेणी आणि मंदिरांवर संशोधन होणे बाकी आहे. या लेणींतून वावरणारे बौद्ध भिक्षू व उपासक, जैन मुनी व श्रावक, शैव आणि वैष्णव आचार्य व त्यांचे शिष्य त्यांच्या लेणींचा वापर धार्मिक विधींसाठी कसा करीत असतील, त्यांचे व्यवस्थापन कसे केले जात असेल हा अद्याप पूर्णपणे न उलगडलेला भाग आहे.

एकविसाव्या शतकातही भारतातील लेणी आणि मंदिरांवर अनेक भारतीय व परदेशी संशोधक संशोधन करीत आहेत. अर्थात त्यात महाराष्ट्रातील लेणींचा अभ्यास करणारे अभ्यासक तुलनेने कमी असून त्यांचे लिखाण हे मुख्यत: संशोधन वर्तुळातील संशोधन पत्रिकांमध्ये इंग्रजीमधून प्रसिद्ध होत असते. त्यामुळे ते सामान्य वाचकांपर्यंत पोचत नाही. युनेस्कोने जागतिक वारसा घोषित केलेल्या अजिंठा, वेरुळ, घारापुरी या लेणींना पर्यटक भेट देतात. हे प्रसिद्ध लेणीसमूह वगळता महाराष्ट्रातील कुडा, महाड, पन्हाळेकाजी, काल्रे, भाजे, बेडसे, जुन्नर, नाशिक, अंकाई टंकाई, पितळखोरा, औरंगाबाद, खरोसा, अंबेजोगाई, मुंबईमधील जोगेश्वरी, मंडपेश्वर, कान्हेरी येथील लेणींची आपल्याला कित्येकदा पूर्ण माहितीही नसते. या सर्व जगप्रसिद्ध पण महाराष्ट्रात स्थानिकांच्यात अज्ञात असणाऱ्या लेणींतील स्थापत्य, शिलालेख, शिल्प, चित्र यांच्या आधारे त्यांच्या निर्मितीचा इतिहास आणि त्यातून दिसणारा दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचा तत्कालीन महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखमालाप्रपंच!

(लेखक पुरातत्त्वतज्ज्ञ आहेत.)
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com