kalaनवी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर सोशल डिफेन्स या संस्थेतर्फे ‘वयोवृद्धांची सेवा’ हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतानाच अर्थार्जनाची संधी देणाऱ्या या अभ्यासक्रमाविषयी..

वय वाढतं, तशा शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या रिंगण घालू लागतात.. अशा वयोवृद्धांना मदतीचा हात देतानाच या क्षेत्रात अर्थार्जन करता येईल, असा एक अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
ज्येष्ठांची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्टििफकेट कोर्स इन जेरिअ‍ॅट्रिक केअर फॉर बेडसाइड असिस्टन्स आणि सर्टििफकेट कोर्स इन जेरिअ‍ॅट्रिक केअर टेकर हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल डिफेन्स या संस्थेने सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या मंत्रालयाच्या अंतर्गत ही स्वायत्त संस्था काम करते. त्यांच्या ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑफ केअर फॉर एल्डरली’ या प्रकल्पाच्या अंतर्गत या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशी कौशल्ये प्राप्त मनुष्यबळ निर्माण करण्याचा मानस आहे.
प्रत्येकी दोन महिने कालावधीचे हे अभ्यासक्रम सातवी उत्तीर्ण आणि १८ ते ३० वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला करता येतात. या अभ्यासक्रमासाठी सध्या कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र निवड झालेल्या व्यक्तींना दिल्लीत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागते.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची निवड करताना समूह चर्चा आणि मुलाखती घेतल्या जातात. यंदा या मुलाखती २४ फेब्रुवारी २०१५ आणि २७ मार्च २०१५ रोजी होतील. २४ फेब्रुवारी रोजी मुलाखतीद्वारे निवडलेल्या व्यक्तींचे प्रशिक्षण २ मार्च ते १ मे २०१५ या कालावधीत होईल आणि २७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे निवडलेल्या व्यक्तींचे प्रशिक्षण ३१ मार्च ते ३० मे २०१५ या कालावधीत पार पडेल.