नव्या नोकरीत रुजू होताना उत्सुकता असते, आनंद असतो, काहीसा तणाव असतो आणि मनात भीतीही वाटत असते.. उत्तम काम करून तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. पण त्याच वेळी तुम्हाला हेही कळून चुकतं की, तुम्ही या व्यवस्थेत नवीन आहात आणि तुमच्या यशाच्या मार्गात अनेक आव्हाने उभी आहेत. नव्या नोकरीत यश मिळवण्यासाठी संधींचे सोने कसे करता येईल, याचा विचार तुम्ही करायला हवा.
> एखाद्या कंपनीत तुम्ही रुजू होत असाल, तर त्या कंपनीची वेबसाइट असल्यास तुम्ही ती वेबसाइट जरूर अभ्यासा. कंपनीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी ही वेबसाइट तुम्हाला मदत करेल. प्रामुख्याने कंपनीचे उद्दिष्ट, कार्यपद्धती, मिशन स्टेटमेन्ट, प्रमुख ग्राहकवर्ग, विविध उत्पादनं, सेवा आणि कंपनीचे स्पर्धक याविषयी वेबसाइटवर तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल.
> कंपनीबाबत अलीकडच्या दिवसांत काही लेख छापून आले असतील, तर ते जरूर वाचा. कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या क्षेत्राविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून या कंपनीत कामाच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि कंपनीसमोर कुठली आव्हानं आहेत, हे समजून घ्यायला मदत होईल. या माहितीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीत तुम्ही प्रवेश केलात तर तुमच्या आशा-अपेक्षा वास्तववादी राहण्यास मदत होईल.
> जर तुमची या क्षेत्रातील ही पहिली नोकरी असेल तर तुम्ही या क्षेत्रातील सद्य घडामोडींविषयी जाणून घ्यायला हवं. या क्षेत्रात कुठल्या कंपन्या कार्यरत आहेत, त्यातील प्रत्येकाची बलस्थानं कुठली हे लक्षात घ्या.
> तुम्हाला नेमून दिलेल्या कामाचे स्वरूप पडताळून पाहा. मुलाखतीच्या वेळेस कामाच्या स्वरूपाबद्दल झालेल्या चर्चेला उजाळा द्या. नव्या नोकरीत रुजू होण्याआधी कामाचे स्वरूप, तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा याविषयी टिपणं काढा. ही टिपणं काढताना तुम्हाला नेमून दिलेल्या कामाविषयी काही प्रश्न पडले असतील, काही शंका मनात उपस्थित झाल्या असतील तर त्याची नोंद करा.
> अनेक कंपन्यांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ओरिएंटेशन आयोजित केले जाते. हे ओरिएंटेशन अनेकदा कंटाळवाणे वाटू शकते. पण या साऱ्या प्रक्रियेकडे गांभीर्याने बघणे आवश्यक ठरते. काही कंपन्यांच्या ओरिएंटेशनमध्ये नव्या कर्मचाऱ्यांना महत्त्वाची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ कंपनीचे उद्दिष्ट, ध्येय, कामाचे तत्त्वज्ञान, कार्यकारी व्यवस्थापन, लक्ष्य बाजारपेठ इत्यादी. या महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुद्दय़ांची टिपणं काढा.
> अनेक बडय़ा कंपन्या नव्या कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक अथवा अनौपचारिक पद्धतीचे प्रशिक्षण आयोजित करतात. अशा प्रशिक्षणवर्गामध्ये जरूर सहभागी व्हा. या प्रशिक्षणातून अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती तर मिळतेच, त्याचबरोबर महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्यायलाही मदत होते. प्रशिक्षणादरम्यान टिपणं काढा. चर्चामध्ये तसेच समूह उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.
> प्रशिक्षण हे तुम्ही यशस्वी व्हावे, याकरता मदत करण्यासाठी म्हणून आयोजित केलेले असते. या प्रक्रियेदरम्यान जर तुमच्या मनात काही शंका डोकावल्या, तर त्या नि:संकोचपणे विचारा. अन्यथा, त्या शंका तशाच मनात वागवल्यात आणि तुमच्यावर स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली तर तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात.
> तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या प्रकल्पात तुमची भूमिका नेमकी काय आहे, हे समजून घ्या. त्यात स्पष्टता असू द्या. त्याविषयीच्या चर्चेदरम्यान तुमचा सक्रिय सहभाग असायला हवा. त्यासंबंधीच्या बैठकांमधून तुम्हाला कंपनीबद्दल आणि कंपनीच्या प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
> जेव्हा तुम्ही कंपनीत रुजू व्हाल, तेव्हा स्वत:हून सहकाऱ्यांशी ओळख करून घ्या. तुमची उपस्थिती इतरांना कळावी, यासाठी हा उत्तम
मार्ग आहे.
> तुमच्या कार्यालयात ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यांच्या सोयीनुसार चर्चेसाठी वेळ निश्चित करा. तुमच्या विभागातील व्यक्तींशी औपचारिक-अनौपचारिक बोलून कामाचे स्वरूप समजून घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्तही अशा अनेक व्यक्ती असतात, ज्यांचा तुमच्या यशात मोलाचा वाटा असतो. अशा व्यक्तींशी ओळख करून घ्या. या बैठका छोटेखानी असल्या तरी पूर्णत: व्यावसायिकही असतात! या चर्चेतून त्यांच्या करिअरची पाश्र्वभूमी, छंद, अपेक्षा
जाणून घेता येतात.
> कामाशी संबंधित अशा काही व्यक्ती कार्यालयांच्या बाहेरही असतात, ज्यांच्यावरही तुम्ही कामादरम्यानच्या टप्प्यात अवलंबून असता. या व्यक्तींशी दूरध्वनीद्वारे वा ई-मेल्सद्वारे संपर्कात राहा. दूरध्वनीवरून संपर्क करताना आधी तुम्ही तुमची ओळख द्यावी. यात तुमचे नाव, कंपनीचे नाव, विभाग, तुम्ही कुणाच्या जागेवर काम करीत आहात, तुमची पाश्र्वभूमी, अनुभव हेही सांगावेत. त्यांना गरज भासल्यास मदत करावी.
> नोकरीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि सारे काही शिकता येईल, असे नाही. त्याकरता सुरुवातीचे काही आठवडे, महिनेही लागू शकतात. तुमचे काम बिनचूक पार पडण्यासाठी जे प्रश्न पडतील, ते बिनदिक्कतपणे विचारा. त्या प्रश्नांच्या उत्तरांमधूनही तुम्हाला तुमच्या कार्यालयीन कामकाजाचे स्वरूप कळेल. कामाच्या ठिकाणी कंपनीच्या शिस्तीचे पालन करणे अभिप्रेत असते तसेच सहकाऱ्यांसोबतची वर्तणूकही व्यावसायिक असावी.
> कामाच्या ठिकाणी स्वत:ला अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ द्या. प्रत्येक काम समजून घेणे हे एक शिकण्यातले वळण असते. काही कामांची काठिण्यपातळी अधिक असते. त्यामुळे एखादे काम शिकताना सुरुवातीला ज्या चुका होतील, त्यामुळे निराश होऊ नका. कठोर मेहनतीतूनच यशाचा मार्ग तयार होतो.
> सकारात्मक विरोध स्वीकारा. कामात अधिक प्रगती साधण्यास नेहमीच वाव असतो.
सहकारी आणि वरिष्ठ यांनी तुमच्या कामात केलेली टिकाटिप्पणी स्वीकारा. त्यांचे सल्ले आणि माहिती यातून तुमचे काम अधिक उत्तम होऊ शकते.
> सकारात्मक विचार करा- चुका आणि त्रुटींच्या पल्याड विचार करा. सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात तरबेज होऊ शकता.
– योगिता माणगांवकर