ज्येष्ठ संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचं एक वाक्य आहे, की आपण बंद झालेल्या दाराकडेच इतका वेळ बघत राहतो, की दुसरा दरवाजा आपल्यासाठी खुला झालाय हेच आपल्याला दिसत नाही.. नोकरीसाठी वणवण करताना आपली अवस्था याहून वेगळी नसते. नोकरी हातात नसते तेव्हा रिकामपण अंगावर येतं, आत्मविश्वास खचतो.. या साऱ्या नकारात्मक परिस्थितीवर मात करून नोकरी मिळण्यासाठी परिणामकारक प्रयत्न कसे करता येतील ते जाणून घेऊयात..

हातात नोकरी नसते तेव्हा..

* अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसली तर काही महिन्यांत तुमचा आत्मविश्वास ढळतो, धीर खचतो, निराश वाटतं. याचं कारण हाताशी पसा नसतो, छोटय़ा-मोठय़ा गरजा भागविण्यासाठी पालकांवर अवलंबून राहणं नकोसं वाटतं. अशा अवस्थेत मित्र-मत्रिणींपासून दूर राहावंसं वाटतं. बेरोजगार असल्याचा शिक्का आपल्यावर बसणं कमीपणाचं वाटतं.. मात्र, लक्षात घ्यायला हवं की नोकरी मिळवताना अनेक नकार पचवावे लागतात.. आणि तरीही आत्मविश्वास कायम असणे ही उमेदवाराची महत्त्वाची अर्हता ठरते.
* तुमच्या हातात नोकरी नसते वा पुढे काय करायचं हे ठाऊक नसतं, तेव्हा तुमच्यापाशी अनेक गोष्टी करण्यासाठी भरपूर फावला वेळ असतो. पण त्यासाठी आवश्यक ठरणारा पसा नसतो. दिवसभरात काय करायचं हे वेळापत्रक नसल्याने उशिरा उठायचं आणि नंतरचा दिवस केवळ ढकलायचा असं आळसावलेलं रुटीन बनतं. बेरोजगारीच्या दिवसांत सुरुवातीला मानसिक धक्का बसतो, निराश वाटतं आणि नंतर परिस्थितीशी तुम्ही अ‍ॅडजस्ट होता.
* जर तुम्ही खूप काळ बेरोजगार राहिलात तर आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण उरलेलं नाही असं वाटून दु:खी, निराश आणि निरुत्साही वाटतं.

आयुष्यावर पकड मिळवण्यासाठी..
* नोकरी शोधणं हे पूर्णवेळ करायचं काम आहे. त्याकरता शक्य तितका वेळ द्या. जर खूप काळ तुम्हाला मनासारखी नोकरी मिळाली नाही तर कामाचा प्रकार, कामाचे स्थान याबाबत लवचिकता ठेवा. ध्येयाप्रत पोहोचण्याची पायरी म्हणून वेगवेगळ्या कामांचा विचार करा.
* कृती योजना बनवा. दिवसभराच्या कुठल्या वेळेत, कुठले काम करायचे त्याची आखणी करा.
* आव्हानात्मक तरीही वास्तववादी ध्येय निश्चित करा. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी कामांची विभागणी करून ती कामे एकेक अशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
* कृती केली नाही तर संभ्रम आणि भीती निर्माण होते आणि कृती केली तर आत्मविश्वास आणि साहस येते. भीतीवर विजय मिळवायचा असेल तर घरी बसून राहू नका. बाहेर पडा आणि तना-मनाने कुठले ना कुठले काम करण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
* नोकरी का मिळत नाही याची उगीच चिंता करत बसू नका. त्यातून काहीच साध्य होत नाही. फक्त वेळ वाया जातो आणि ताण येतो. त्यापेक्षा ठोस काही तरी करण्यावर भर द्या.
* नोकरी हातात नसल्याचा काळ हा खरे तर कौशल्य विकसित करण्यासाठी तुमच्यापाशी असलेले सोनेरी क्षण असतात. हा वेळात तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही व्यतीत करू शकाल.
* तुम्हाला उत्साही वाटतील अशा गोष्टी करण्यावर भर द्या. एखादे पुस्तक लिहिणे, नाटक बसवणे, नवे कौशल्य शिकणे, संगणक शिकणे.. अशा आवडत्या गोष्टी तुम्हाला करता येतील. यातील प्रत्येक कलाकौशल्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उपयोग
हा होतोच.
* तुमच्या आयुष्याचा विचार करण्यासाठी तुमच्या हाताशी असलेला हा फावला वेळ उपयोगी ठरू शकतो. हा वेळ आणि अवकाश तुम्हाला नेमके कसे जगायचे आहे, तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत याचा विचार करण्यासाठी उपयुक्त ठरतील. आयुष्याचे पूनर्मूल्यांकन करा. या वेळात तुम्हाला पुस्तकं वाचता येतील, प्रवास आखता येतील.
* जर तुमचे अर्ज वारंवार फेटाळले जात असतील तर तुमचा बायोडेटा आणि तुमचा अर्ज अधिक सक्षम बनवायला हवा, हे जाणून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करा.

नकाराचा सामना
* नोकरी मिळण्यासाठी केवळ एका होकाराची गरज असते. मात्र, त्यासाठी किती तरी नकार पचवावे लागतात. या प्रवासात वाटय़ाला आलेले नकार व्यक्तिश: न घेता त्यामागची कारणपरंपरा लक्षात घ्यायला हवी.
* एखाद्या मुलाखतीनंतर जर तुमच्या वाटय़ाला नकार आला, तर संपूर्ण मुलाखतीतील तुमची कामगिरी आठवा. जे प्रश्न विचारले गेले त्याची नोंद ठेवा. कुठल्या प्रश्नादरम्यान तुम्ही योग्य उत्तर दिले नाही हे आठवून पाहा. जर पुन्हा भविष्यात तुम्हाला तोच प्रश्न विचारला गेला तर तुमचे उत्तर काय असेल, याचा विचार करा आणि पुढल्या मुलाखतीसाठी सज्ज व्हा.
* अपयशाचा सामना करताना घडत असलेल्या गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हवे, जे घडतंय त्यातील चांगल्या गोष्टी समजून घ्यायला हव्या, त्या गोष्टी स्वीकारायला शिका, अपयशाला हसतखेळत सामोरं जायला शिका.. त्यासाठी व्यक्तिमत्त्वात विनोदाचं अंग विकसित करा.
* आयुष्यात वाटय़ाला आलेले छोटे नकार, झालेली पीछेहाट याचा मनस्ताप करून घेणे उपयोगाचे नाही. नंतर मागे वळून पाहताना ती किती लहानशी गोष्ट होती हे लक्षात येते आणि हसू येते.
* नोकरीचा शोध घेताना तो सृजनात्मक पद्धतीने, सक्रियरीत्या करायला हवा. कंपनी, कामाचे स्वरूप आणि कामाचे क्षेत्र याचे नीट संशोधन करणे आवश्यक असते. कुठल्या प्रकारचे काम करावे लागेल आणि ते काम करण्याचे तंत्र याची सविस्तर माहिती हवी. त्याचप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करण्यासाठी हवी माहिती मिळवण्यासाठी नेटवìकग असावं लागतं तसेच सृजनशील असणं अत्यावश्यक ठरतं.

परिस्थितीचा सामना..
* हातात नोकरी नसते तेव्हा तुमच्यापाशी पसे नसतात. तेव्हा जपून खर्च करा. तुम्ही कशावर किती खर्च करताय, त्याची नोंद ठेवा. वायफळ खर्चाला अजिबात थारा नको.
* एखादे अल्पावधीचे लहानसहान काम हाती धरा. सुरुवातीच्या दिवसांत त्या लहानशा कामातून मिळणाऱ्या पशांचाही मोठा आधार असतो. त्यातून तुमचे जुजबी खर्च तुम्हाला भागवता येतील.
* हाती काम नसल्याने पशांसाठी तसेच इतर कारणांसाठी पालकांवर अवलंबून राहतो. यामुळे आपल्या हक्कांवर गदा आली आहे, असं वाटू लागतं. हे परावलंबन नकोसं वाटतं आणि चिडचिड होते. मात्र, ही चिडचिड, धुसपूस तुमच्यासाठी आणि तुमच्या पालकांसाठीही अयोग्य असते. यातून दोघांना केवळ मनस्ताप होतो. या कालावधीत पालकांशी मोकळा संवाद असू द्या. नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात, ते त्यांच्याशी बोलत राहा. तुमचे हक्क आणि तुमच्या जबाबदाऱ्या यांचं सम्यक भान तुम्हाला असायला हवं.
* या कालावधीत तुम्ही महाविद्यालयीन मित्र-मत्रिणींपासून तुटलेपण अनुभवत असता. अशा वेळेस सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचं नेटवर्क बनवा. त्यांच्याशी तुम्ही बरंच काही शेअर करू शकाल.
* स्वयंसेवी सेवा करणं अथवा अर्धवेळ काम करणं यातून नव्या लोकांशी तुमची ओळख होऊ शकते. नवी नोकरी मिळवण्यासाठी अशा ओळखी उपयोगी ठरू शकतात.