lr03शहरातील इमारतींची विविध प्रकारची देखभाल आणि दुरस्ती याकरता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जाते. आता तर तसे बंधनकारकच आहे. इमारतींची दुरुस्ती आणि देखभाल यामध्ये सीसीटीव्ही बसवणे, त्याचं संनियंत्रण व देखभाल तसेच अग्निशमन यंत्रणेची स्थापना व देखभाल यांचा समावेश असतो. त्याकरता एकात्मिक इमारत व्यवस्थापन करणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाते. हे नियंत्रण कक्ष मोठय़ा इमारतींना ‘इंटेलिजेंट’ इमारतीचे स्वरूप प्राप्त करून देतात. या नियंत्रण कक्षात इमारतीच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात येते. ही स्वयंचलित आणि मानवी तंत्रज्ञाद्वारे चालवण्यात येणारी यंत्रणा इमारतीच्या विविध सेवा आणि सुविधांची दुरुस्ती, देखभाल आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासोबतच इमारतीमधील कोणतीही सेवा खंडित होणार नाही, दर्जामध्ये घट होणार नाही याकडे लक्ष पुरवत असते. ऊर्जा बचतीकडे लक्ष देत असते. इमारतीची उष्णता, हवा खेळती राहणे, एअरकंडिशिनग, वीज, अलार्म यंत्रणा आदी बाबींचे संनियंत्रण करत असते. 

हे वैशिष्टय़पूर्ण क्षेत्र असून त्या अनुषंगाने एक व्यावसायिक अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतनात सुरू करण्यात आला आहे. दहावी उत्तीर्ण व बांधकाम देखभाल दुरुस्ती क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव असल्यास हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम सहा आठवडय़ांचा आहे. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येतो.
या अभ्यासक्रमात हीटिंग, व्हेंटिलेशन, एअरकंडिशिनग, रेफ्रिजरेशन कार्यप्रणाली, अग्निशमन सेवा कार्यप्रणाली, सीसीटीव्ही देखभाल, नियंत्रण कक्ष या विषयांवर प्रशिक्षित केले जाते. हा अभ्यासक्रम आयटीआय झालेले विद्यार्थीसुद्धा करू शकतात.
पत्ता- शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलिवायरजंग मार्ग, वांद्रे (पूर्व),
मुंबई- ४०००५१.
वेबसाइट- www.gpmumbai.ac.in
सुरेश वांदिले