अक्षयला सकाळी उठणं खूप जड जातं. त्याने सकाळी उठून तयार होऊन वेळेत शाळेत पोहोचणं हा त्याच्या घरचा रोजचा समर प्रसंग असतो. तो रात्री वेळेत झोपत नाही, म्हणून त्याला सकाळी उठवत नाही, हे त्याच्या आईबाबांना दिसत असतं. त्यामुळे रोज सकाळी ते अक्षयला ‘लवकर झोपायला जायला नको तुला’, असं ऐकवत असतात. आणि रात्री अकरा साडेअकरा वाजले की, ‘आता झोपायला जा’, असं सांगत असतात. पण तेव्हा अक्षयचा अभ्यास आवरलेला नसतो, काही ना काही शिल्लक असतं, अशीच परिस्थिती असते. त्यामुळे वेळेत झोपणं काही अक्षयला जमत नाही. कमी-अधिक प्रमाणात हा रोजचा पॅटर्न असतो. आणि एरवी त्याची झोप पुरी नाही होत, म्हणून सुट्टीच्या दिवशी तो छान दहा- अकरा वाजेपर्यंत ताणून देतो. त्यामुळे त्या दिवशी त्याचं खाण्या जेवण्याचं सगळंच टाइमटेबल वेगळंच होऊन जातं. परिणामी, त्याची आणि आईबाबांची सोमवारी सकाळी अगदी घनघोर लढाई होते. तेही कावलेले असतात. ‘कित्तीही वेळा सांगितलं तरी..’ हे वाक्य आईबाबांच्या तोंडून अतिशय उद्विग्नतेने निघतं. हा अक्षय पाच ते पंधरा अशा कोणत्याही वयोगटातला असू शकतो. पण तो टीनएजर असेल तर या सगळ्याला ‘अक्षय जुमानतच नाही आजकाल, दुर्लक्ष करतो’, अशी दुखावणारी जोडही असू शकते.
एखादी गोष्ट जमत नसेल तर मुलांनी स्वत:त, स्वत:च्या दिनचय्रेत एखादा बदल करावा अशी पालकांची अपेक्षा असते. पण वारंवार सांगून तो बदल होत नसेल तर काय?
मुलांच्या बाबतीत आपण त्यांना काय सांगतो, तसंच ते कसं सांगतो हेही महत्त्वाचं असतं. त्यामुळे अनेकदा सांगूनही एखादी गोष्ट होत नाही, तेव्हा त्या सांगण्याच्या पद्धतीत काहीतरी बदल करून पाहणं ही पहिली महत्त्वाची पायरी.

आपण सांगत असताना मुळात अक्षय ऐकण्याच्या स्थितीत आहे की नाही, याचं भान आईबाबांना असणं सर्वात महत्त्वाचं. अक्षय उठत नाहीय आणि सगळा सकाळचा टेन्शन सीन आहे, ही वेळ मुळात काही बोलायची नाहीच. हेच सूत्र रात्री अकरा वाजताही लागू पडतं. त्यामुळे सगळेच शांत निवांत असताना हा विषय निघाला, तर सगळे काहीतरी बोलण्या-ऐकण्याच्या स्थितीत तरी असतील.
अक्षयला सकाळी लवकर उठायला जमत नाही याची असंख्य कारणं असू शकतील. त्याचं स्वत:चं वेळेचं नियोजन ढिसाळ आहे, पासून ते ‘काय बिघडतं, उठलं नाही वेळेत’, असं त्याला वाटत असण्यापर्यंत अनेक शक्यता असू शकतील. पण त्यात अक्षयचा एकटय़ाचा हा प्रश्न नाही. अख्ख्या घराला त्याचा ताण येतो आहे, हे मुळात अक्षयपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं. त्यामुळे प्रश्नाची उत्तरं शोधायची जबाबदारीही सगळ्या घराची, हे अक्षयपर्यंत पोहोचवणं, ही यातली कळीची गोष्ट आहे.
बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम कळतो, पण त्यावर उत्तर कसं शोधायचं हे कळत नाही. उठत जा ना जरा लवकर, किंवा काय होतं रे तुला लवकर उठायला-अशा भाषेने उपाय शोधायची सगळी जबाबदारी अक्षयवर पडते आणि तो गोंधळून जातो.
सगळे रिलॅक्स्ड असताना, अक्षय तुला सकाळी उठायला कठीण जातं, हे दिसतं आहे, काय करता येईल आपल्याला त्याबाबत, अशी भाषा वापरली, तर एकटय़ा अक्षयवर एकवटलेला धारदार रोख कमी
होतो. त्यातून अक्षयकडून काही सुझाव येण्याची शक्यता खूप वाढते.
आणि त्याच्याकडून आल्यामुळे तो अमलात आणण्यासाठी प्रयत्न होण्याचीही.
वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणं, ते अजमावून पाहणं, जमलं तर दाद देणं आणि नाही जमलं तर मान्य करणं, त्याला पुन्हा काही वेगळ्या आचार-विचारांची जोड देणं ही टय़ुिनगची प्रक्रिया करत राहावी लागते. यासाठी आईबाबांकडे खूप पेशन्स लागतात. कधी कधी हा प्रकार लांबू शकतो आणि तेव्हाही किल्ला लढवत राहावा लागतो. अशा वेळी छोटे छोटे टप्पे सर झाले की दाद देण्याने खूप फरक पडतो. ‘मागच्या आठवडय़ात दोनदा उठता आलं वेळेत’, ‘आज तुझा अभ्यास वेळेत आटपला’, किंवा ‘हे जमलं की रे’ अशा छोटय़ा वाक्यांमधून मिळणारी दादही खूप मोठ्ठं काम करत असते. मुलांचा आणि आपला हुरूपही त्यातून टिकून राहतो.
बदल घडून येण्याची दाट शक्यता असणारा हा एक प्रवास.. ज्यात मुलं शक्यतांबद्दल बोलतात, चर्चा करतात, स्वत: पर्याय सुचवतात, ते वेगळं सुचवलेलं करून पाहायची तयारी दाखवतात, प्रयत्न करतात.. ‘कित्तीही सांगितलं तरी..’ ची भाषा मग आपोआप मागं पडते, विरून जाते ..