असं अनेकदा होतं की, स्वत:च्या क्षमतांवरील विश्वास डळमळीत होतो.. पुरेसे ज्ञान, अनुभव असूनही ते तोकडे वाटते.. आपल्यापैकी अनेकांना अनेक गोष्टींबद्दल कितीतरी वेळा असुरक्षित वाटते, याचे मूळ पूर्वानुभवात दडलेले असते. पूर्वायुष्यातील वेदना, लहानपणातील कटू अनुभव, नाकारले जाण्याचे, एकाकीपणाचे, अपयशाचे आलेले अनुभव, स्वत:बाबतचा नकारात्मक विचार, परफेक्शनिस्ट होण्याचा दुराग्रह, सामाजिक चिंता अशा विविध कारणांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात असुरक्षितता मूळ धरू लागते.  त्याचा सामना कसा कराल, याविषयी..

अलीकडे आलेले अपयश किंवा नाकारला जाण्याचा अनुभव

अलीकडे आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या असतात, त्यानुसार आपला मूड बनतो किंवा आपल्या आपल्याविषयीच्या भावना होतात. आनंदाविषयी करण्यात आलेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, हॅप्पीनेस कोशंट हा ४० टक्के आपल्या आयुष्यात अलीकडे घडलेल्या घटनांवर अवलंबून असतो. आनंदाच्या वाटेवरील सर्वात नकारात्मक घटक म्हणजे नाते संपुष्टात येणे, सहचराचा मृत्यू, नोकरी जाणे आणि आजार जडणे. तुम्ही आनंदी नसलात तर ही गोष्ट तुमच्या स्वाभिमानावर नकारात्मकदृष्टय़ा परिणाम करते. नकार, अपराधी भाव, अपयश आणि दररोज वाटय़ाला येणाऱ्या वेदनांनी तुम्ही स्वत:कडे अधिकाधिक नकारात्मकरीत्या बघू लागता. ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अपयशाकडे अधिक झुकू लागतात. नोकरी गमावल्याने स्वत:ची किंमत आपण घालवून बसलोय, अशी नकारात्मक भावना होऊ शकते. खच्ची करणारे अनुभव आले तरी मनोधैर्य टिकवून ठेवणे ही आत्मविश्वास उंचावण्याची आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची पायरी आहे.

*पूर्वायुष्यातील जखमा भरून येण्याकरता आणि पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याकरता स्वत:ला वेळ द्यायला हवा.

*तुम्हाला ज्यात स्वारस्य आणि कुतूहल वाटतं त्या गोष्टी जरूर करा.

*मोकळा वेळ, मित्र आणि कुटुंबीयांसमवेत व्यतीत करा.

*विश्वासू व्यक्तींच्या मतांकडे, सल्ल्यांकडे लक्ष द्या.

*ध्येयाप्रति वाटचाल करत राहा.

समाजातील वावराबाबत..

अनेकांना मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी अथवा कौटुंबिक स्नेहसंमेलनात वावरण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाची वानवा असते. आपल्या व्यक्तिमत्त्वातील त्रुटीचे जेव्हा इतर व्यक्ती मूल्यांकन करतात, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता. यामुळे तुम्हाला अशा ठिकाणी जाण्यात स्वारस्य वाटत नाही, उलट कंटाळा येतो आणि मग तुम्ही अशा ठिकाणी जायचे टाळता. तिथले वातावरण तुम्हाला परके भासते. अशा सामाजिक परिस्थितींचा सामना कसा कराल?

*तुमच्यात दडलेल्या समीक्षकाशी संवाद साधा. तुम्हाला अशा समारंभात जाणे आनंददायक वाटेल अशा कारणांची यादी बनवा.

*असा समारंभांना सामोरे जाण्याकरता पूर्वतयारी करा. कुठल्या बातम्या, चित्रपट, छंद, काम, कौटुंबिक आयुष्य अशा कुठल्या बाबतीत आणि काय बोलता येईल, याचा विचार करा.

*अशा सामाजिक समारंभांना जाऊनच तुमची अस्वस्थेतेचा स्तर खाली येऊ शकतो. जर तुम्ही असे प्रसंग टाळलेत तर हा स्तर कमी होण्याऐवजी वाढेल.

*अशा समारंभांना जाताना एक वास्तववादी ध्येय ठरवा. उदा. दोन अनोळखी व्यक्तींशी परिचय करून घेईन. त्यांच्या कामाबद्दल आणि छंदांबद्दल जाणून घेईन इत्यादी.

परफेक्शनिस्ट होताना..

*अनेकांना आपण जे काही करू ते परफेक्ट असावं असं वाटतं. अशा वेळेस आपल्या कामाचा दर्जा तपासणाऱ्यांकडून नकारात्मक टिप्पणी आली तर असुरक्षित वाटते. अशा असुरक्षिततेचा सामना कसा कराल?

*एखादे काम करताना तुम्ही त्यात किती प्रयत्न ओतले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवणं तुमच्या हातात असतं. मात्र, त्यातून जो परिणाम साधला जातो, तो तुमच्या हातात नसतो हे लक्षात घ्यायला हवं.

*तुम्ही तुमचं काम आणखी १० टक्के अधिक चांगलं केलं असतं, तर त्यामुळे काय फरक पडला असता, याचा विचार करा.

तुमच्या कामातील त्रुटींवर लक्ष द्या. स्वत:चे मूल्यांकन करताना तुम्ही ज्या परिस्थितीत काम करत आहात, ते जरूर लक्षात घ्या.

*अनेकदा परफेक्शनिस्ट व्यक्तींचे स्वत:विषयीचे मत हे परिस्थितीवर अवलंबून असते. जेव्हा काम उत्तम जमते, तेव्हा ते हवेत असतात. काम नीट जमत नाही असे लक्षात येते, तेव्हा ते कच खातात. अशा वेळी समतोल विचार करण्याची तारेवरची कसरत जमायला हवी.

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा, नैतिकता अशा गुणांचा सकारात्मक विचार करा म्हणजे स्वत:च्या क्षमतांबाबत वाटणारी असुरक्षितता संपुष्टात येईल आणितुमचा आत्मविश्वास वाढेल.