News Flash

अद्ययावत प्रशिक्षण गरजेचे!

नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे ही एक गुंतवणूक असते. कर्मचाऱ्यांना याद्वारे नवी कौशल्ये शिकता येतात

तुमच्या नव्या अर्हतेमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची अथवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता दुणावते.

वय, अर्हता अथवा नोकरीतील तुमचे पद या गोष्टींपलीकडे पोहोचत सतत शिकत राहणे आणि व्यक्तिगत विकास साधत राहणे हे कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकाला आज आवश्यक ठरते. शिक्षणाची वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्ती, वयाच्या आणि करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली कौशल्ये व ज्ञान अद्ययावत करण्यासाठी पुन्हा शिक्षणाकडे वळताना दिसतात. जर तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा आला असेल, तुम्ही कामाबाबत निराश झाला असाल किंवा तुमची सहकाऱ्यांबाबतची असूया वाढत चालली असेल तर तुम्हाला तुमची सद्य चौकट भेदून अद्ययावत कौशल्ये शिकण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या.

नव्या कौशल्यांचे अध्ययन
नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे ही एक गुंतवणूक असते. कर्मचाऱ्यांना याद्वारे नवी कौशल्ये शिकता येतात तर व्यापारसमूहांना त्यातून अधिक उत्पादक कामाची निर्मिती करता येते. निरंतर शिकण्याचे मूल्य समजून घ्यायला हवे. अद्ययावत प्रशिक्षणामुळे तुम्हाला क्षेत्रातील नव्या बदलांशी जुळवून घेणे शक्य होते.

नवी कौशल्ये शिकण्याची गरज
* सध्याच्या नोकरीत पदोन्नती अथवा वेतनवाढ मिळण्यासाठी नवी कौशल्ये शिकण्याची गरज असते.
* सद्य नोकरी बदलून नवी नोकरी शोधण्यासाठी शिकलेली नवी कौशल्ये उपयुक्त ठरतात.
* करिअरच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याकरता नवी कौशल्ये शिकणे अत्यावश्यक असते.
* नवा व्यापार सुरू करण्याकरता कौशल्य प्रशिक्षण उपयुक्त ठरते.

नवी कौशल्ये शिकण्याचा आराखडा
* तुम्ही आखलेली करिअरची योजना प्रत्यक्षात यावी, याकरता संशोधन, नेटवर्किंग करण्यासाठी तसेच विचार करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक वेळ काढायला हवा.
* ज्या करिअरमध्ये तुम्हाला स्वारस्य निर्माण झाले आहे त्यातील व्यक्तींशी आणि ज्यांनी अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशा व्यक्तींच्या संपर्कात राहा.
* संधींचा शोध घ्या. त्याकरता कुठला अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरेल ते जाणून घ्या.
* अशा अभ्यासक्रमासाठी किती आर्थिक तरतूद करावी लागेल ते ध्यानात घ्या. पूर्णवेळ अभ्यासक्रम करणे शक्य नसल्यास अर्धवेळ अभ्यासक्रम करा.

अद्ययावत कौशल्यांची आवश्यकता भासणारी उद्योगक्षेत्रे
खरे पाहता सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करण्याची गरज असते. तरीही, नवे शोध, बदलते तंत्र, विज्ञान, यांत्रिकी विकास यामुळे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तर सतत नव्या बदलांचा वेध घेणे अनिवार्य ठरते. अशी काही क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत-
* शिक्षण, अभियांत्रिकी ’माहिती-तंत्रज्ञान
* विक्री व विपणन ’सिक्युरिटी क्लिअरन्स
* कायदा ’वित्त-अकाऊंट्स
* विपणन ’आरोग्य
* विज्ञान ’गणित

सामान्यत: पुढील कौशल्यांची उमेदवारांमध्ये वानवा असते..
शिक्षण आणि कौशल्य यांमध्ये वाढत असलेल्या दरीची चर्चा होत असलेली आपण पाहतो. उद्योगसमूहांना उच्चशिक्षित उमेदवारांमध्येही काही कौशल्यांची त्रुटी जाणवते. उमेदवारांमध्ये सामान्यत: आढळणाऱ्या त्रुटी पुढीलप्रमाणे आहेत-
* तांत्रिक- प्रात्यक्षिक अथवा कामाशी संबंधित वैशिष्टय़पूर्ण कौशल्य
* योजना आणि संस्थात्मक कौशल्ये
* संवाद कौशल्य
* लेखन कौशल्य
* समस्या निवारण कौशल्य
* सांघिक काम करण्याचे कौशल्य
* मुत्सद्दीपणा आणि व्यवस्थापन कौशल्य
* गणिती कौशल्य
* प्रगत माहिती- तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कौशल्य
* परदेशी भाषा कौशल्य.

नवी कौशल्ये शिकण्याचे लाभ
* नवी कौशल्ये शिकल्याने तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. कंपन्यांना अर्हताप्राप्त, अनुभवी आणि स्पर्धात्मक वातावरणात टिकतील अशा अद्ययावत ज्ञान असलेल्या कार्यक्षम उमेदवारांची आवश्यकता असते. निरंतर शिकत राहण्यातून तुमची मेहनती आणि प्रेरणादायी वृत्ती स्पष्ट होते.
* नव्याने शिकण्याच्या प्रयत्नातून तुमची जुळवून घेण्याची आणि जाणून घेण्याची वृत्ती दिसून येते. या गुणांमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता आणि तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत येता.
* तुमच्या नव्या अर्हतेमुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची अथवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता दुणावते. नेहमीच्या रुटीनच्या पलीकडे पोहोचण्याच्या तुमच्या इच्छेतून ‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडे जाण्याची तुमची वृत्ती दिसून येते.
* नवे शिकण्यातून अधिक जबाबदारी पेलण्याची आणि अधिक पैसे कमावण्याची तुमची ऊर्मी प्रतीत होते. जर तुम्ही आपल्या कामासंबंधी असमाधानी असाल आणि करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षेत्रासंबंधी काही तरी नवे शिकल्याने तुमचे कामातील स्वारस्य वाढू शकते.
* तुम्हाला नव्या क्षेत्रांची दारे खुली होतात.
* तुमचे नेटवर्किंग वाढते.
* कधी कधी मध्यमवयात, करिअरच्या मध्यात आता काय करता येईल, हा प्रश्न छळत असतो. अशा वेळी नवे कौशल्य शिकताना नवा अनुभव घेता येतो, आपल्याला नेमकं हेच करायचं होतं, हे लक्षात येऊ शकतं आणि नेटवर्क विस्तारण्याची संधी मिळते.
* नवे कौशल्य शिकल्याने तुमची बुद्धिमत्ता आणि स्व-जाणीव वाढते. आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो.
* ज्ञानाचा विस्तार हा नेहमीच व्यक्तिगत आयुष्यासाठी आणि करिअरसाठी मदतीचा ठरतो.

– अपर्णा राणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 4:28 am

Web Title: we need to update the training
Next Stories
1 मतभेद कसा नोंदवाल?
2 इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी
3 स्वत:चं वेगळेपण जाणा..
Just Now!
X