मुलांबरोबरच्या साद-प्रतिसादाच्या भाषेबद्दल गेल्या काही लेखांमधून बोलतो आहोत. मुलांच्या भावना ओळखून त्या आपल्याला कळल्या आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे एम्पथी. दुसऱ्यापर्यंत पोहोचायचा, त्याला समजून घ्यायचा हा अतिशय प्रभावी मार्ग आहे.
मुलांच्या (किंवा अन्य कोणाच्याही) भावना ओळखताना एक पथ्य कटाक्षाने पाळायचं- अमुक भावना का आली तुझ्या मनात, हा प्रश्नच इथे गरलागू. एखाद्या प्रसंगाने प्रत्येक व्यक्तीच्या मनात येणारी भावना वेगवेगळी असू शकते; किंबहुना असते, हे भान सारखं जागं ठेवणं, हा यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे.
एक उदाहरण पाहू या. मुलगा घरी येतो तोच खूप धुमसत. शाळेत त्याला सर खूप ओरडले आहेत-भूमितीच्या तासाला जॉमेट्री बॉक्स आणली नाही म्हणून. आधी ओरडले, मग वर्गाबाहेर काढलं आणि कॅलेंडरमध्ये रिमार्कही लिहिला. इथे मुलाची चूक झाली हे खरं आहे, पण कोणत्या चुकीसाठी किती शिक्षा द्यायची याचे प्रत्येक शिक्षकाचे मानक वेगवेगळे असू शकतात. त्याची चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाही. आणि मुख्य म्हणजे जोडीला अपमानास्पद बोलणं आलं तर घाव जिव्हारी लागू शकतो- खासकरून टीनएजर्सना. अशा वेळी पालकांचे टिपिकल रिस्पॉन्सेस काय असतात-‘तू का नाही आठवणीने जॉमेट्री बॉक्स आधीच भरून ठेवत दप्तरात?’ किंवा ‘आता का अपमान होतोय? मी सारखी आठवण करते तेव्हा द्यायचं नसतं ना लक्ष! घ्या आता!’
अशा वेळी बऱ्याचदा मुलात जो बदल/सुधारणा अपेक्षित असतात त्या तिथल्या तिथे वाजवून घेतल्या जातात. त्यामुळे मुलाच्या मनात काय येतं- आपल्याला कुणीच समजून घेत नाही. खरं तर एरवी आई-वडिलांशी कितीही चांगलं नातं असलं तरी त्या क्षणी त्याच्या मनात येतं ते हे. (हे असं वाटणं ही प्रीटीन एजर्स आणि टीन एजर्स वयाची खासियत आहे.) म्हणजे मुळात अपमान झाल्याचं दु:ख आणि वर आई-बाबांकडून बोलणं खाणं अशी दुहेरी कोंडी मुलाची होऊ शकते. आणखी वर त्रस्त झालेली आई फोनवरून आणखी दोघा-तिघांशी बोलते-‘‘कसा बघ हा साध्या गोष्टी नीट करत नाहीय’’ किंवा ‘‘सरांनी एवढी शिक्षा केली ती योग्य होती का?’’ याने परिस्थिती आणखी चिघळू शकते.
अशा वेळी आपल्याला मुलाला जे उपाय किंवा पर्याय सुचवायचे आहेत, ते लगेचच सांगितले तर काय होतं? आधी मुलगा दुखावलेला आहे. त्यात राग, अपमान आणि एकटं पडल्यासारखं वाटणं (मला कुणी समजून घेत नाही म्हणून), असा सगळा भावनांचा कल्लोळ. काही ऐकून घेऊन ते अंगी बाणवण्याच्या स्थितीत तो आत्ता या क्षणी तरी नक्कीच नाही. अशा वेळी नुसतं त्याचं ऐकून घेणं, त्याच्या भावनांना आपण शब्दरूप देणं, हे मुलासाठी फार दिलासा देणारं असतं. त्यातून त्याला शांत वाटू शकतं.
अनेक आई-बाबांना वाटतं की एम्पथीमुळे मुलं डोक्यावर चढून बसतील. आपली चूक झाली आहे हे त्यांना कळणारच नाही. प्रत्यक्षात मुलाला चूक कळलेली आहेच, पण तिचा आवाका, परिणाम, आणि पुन्हा ती होऊ नये म्हणून काय करायचं, हा सगळा विचार करायच्या स्थितीत तो आत्ता नाही. त्यामुळे तो जरा शांत झाला की या सगळ्या गोष्टींवर बोलता येईलच की.
पण नेमका इथेच बऱ्याचदा गोंधळ होतो. एकतर पालकांसाठीही हे सगळं क्लेशकारकच असतं. त्यांनाही ते प्रकरण लवकरात लवकर बोलून संपवावंसं वाटतं. यामुळे मग तोफगोळे सुटत राहतात, उलटसुलट बोललं जातं आणि दोन्ही पक्ष रक्तबंबाळ होतात.
या उलट एम्पथीच्या दिलाशाने शांत झालेलं मूल स्वत:हून विचार करण्याच्या स्थितीत लवकर येतं. असा प्रकार पुन्हा टाळता येण्यासाठी काय करता येईल, यावर त्याच्याशी बोलता येतं. पालकांनी विचारलेला ‘काय करता येईल?’ हा प्रश्न फार कळीची भूमिका बजावतो. यातून मुळात मूल विचार करण्याची, उपाय शोधण्याची, त्यानुसार वागण्याची जबाबदारी स्वत:कडे घेण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. उदा. इथे रात्रीच जॉमेट्री बॉक्स दप्तरात भरून ठेवणं किंवा जॉमेट्री बॉक्समधूनच पेन, पेन्सिल्स शाळेत नेणं, म्हणजे तो बॉक्स रोजच बरोबर राहील, असे वेगवेगळे पर्याय आजमावून पाहता येतात.
माणसाला त्रस्त करणाऱ्या अनुभवांतून स्वत:चं स्वत: उठायचं बळ एम्पथी देतं. एम्पथीची ही फार मोठी ताकद आहे.
आपल्या मुलांच्या पुढच्या आयुष्यासाठीची केवढी अनमोल बेगमी आहे ही!
-मिथिला दळवी, mithila.dalvi@gmail.com