नोकरी तसेच व्यापाराकरता विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे अत्यावश्यक असते. हे लक्षात घेत केंद्र सरकारने कौशल्यांवर आधारित काही विशिष्ट प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. नव्याने सुरू झालेले हे अभ्यासक्रम तुम्ही राहत असलेल्या शहरापासून दूर अशा शहरात उपलब्ध असले तरीही ते अल्पावधीचे असल्याने तुम्हाला काही दिवसांत पूर्ण करता येतील, या हेतूने या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून देत आहोत-
नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू होत असतात. असाच एक अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ मेट्रो अ‍ॅण्ड रेल ट्रान्सपोर्ट या संस्थेने सुरू केला आहे. ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मेट्रो रेल ट्रान्सपोर्ट’ असा हा अभ्यासक्रम असून त्याचा कालावधी एक वर्षांचा आहे. सध्या आपल्या देशात बहुतेक मोठय़ा शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केले जात आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नईतील मेट्रो प्रकल्प अतिशय यशस्वीरीत्या सुरू आहेत. पुणे आणि नागपूर मेट्रोला मान्यता मिळाली आहे. मुंबई, दिल्ली येथील दुसऱ्या व पुढील टप्प्यांच्या मेट्रोसही परवानगी मिळाली आहे.
केंद्र सरकारमार्फत स्मार्ट सिटीजचा कार्यक्रम घोषित झाला आहे. स्मार्ट सिटीच्या या संकल्पनेमध्ये मेट्रोचा ठळकरीत्या समावेश होऊ शकतो. एक मेट्रो रेल क्रांती आगामी काळात घडू शकते. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन या संस्थेने हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, मेकॅनिकल शाखेतील बीई पदवीधरांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो.
मेट्रो रेल्वे वाहतुकीशी निगडित विषय आणि घटकांच्या गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असला तरी अद्याप या अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळामार्फत मान्यता प्रदान करण्यात आलेली नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मेट्रो रेल्वेशी संबधित निर्मिती कंपन्या, सल्लागार कंपन्या, सेवा/देखभाल व्यवस्थापन कंपन्या आदींमध्ये करिअरची संधी मिळू शकते. मेट्रो रेल प्रकल्पातील आवश्यक मनुष्यबळास लागणारे तंत्रकौशल्य या अभ्यासक्रमामार्फत दिले जात असले तरी अद्याप या अभ्यासक्रमाला मेट्रो आणि रेल्वेने मान्यता प्रदान केली नाही. ही बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
पत्ता- पहिला मजला, १६०, पॅन्ट्री स्क्वेअर, पॅन्ट्री नगर, सिकंदराबाद- ५००००३,

वेबसाइट- http://www.imrtindia.edu.in
ई-मेल – academy@imrtindia.edu.in
-सुरेश वांदिले