करिअरची निवड प्रामुख्याने, त्या त्या करिअर क्षेत्रातील नोकरीच्या संधींची किंवा आर्थिक लाभाची शक्याशक्यता पडताळत केली जाते. हे नक्की की, करिअर निवडताना, व्यक्तिगत स्वभावानुसार करिअर निवडणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. मात्र, जर व्यक्तिमत्त्वाला अनुसरून करिअरची निवड केली तर व्यक्तीची कामातील प्रगती वेगाने होते आणि ती व्यक्ती आपल्या कामाबाबत अधिक समाधानी राहते. कर्मचाऱ्यांची निवड, कामाचे स्वरूप आणि उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व यांचा मेळ साधला गेला तर कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुरळीतपणे होते, असे विविध मानसशास्त्रीय सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही व्यक्तीची मानसिकता, पालनपोषण, भोवतालची सामाजिक, आíथक, राजकीय व्यवस्था, शिक्षण, कार्यानुभव यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मानसशास्त्रीय अभ्यासकांच्या मते, नवनवीन गोष्टी अनुभवण्याची तयारी, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची महत्त्वाकांक्षा, प्राप्त परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, (सकारात्मक/ नकारात्मक) परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी, परोपकारी मनोवृत्ती, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना प्रतिसाद देण्याची पद्धत, व्यक्तिगत आवडीनिवडी, सवयी, छंद, वर्तणूक अशा विविध निकषांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे ढोबळमानाने १६ प्रकार होतात.
व्यक्तिमत्त्वाच्या या विविध प्रकारांचा वेगवेगळ्या करिअर क्षेत्रांसाठी उपयोग करणे शक्य असते. कोणताही शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी, जर डोळसपणे स्वत:चे व्यक्तिमत्त्व पारखता आले तर आपल्याला भावणाऱ्या करिअरसाठी योग्य शिक्षणक्रम निवडणे सोपे होते आणि अर्थातच निवडलेल्या करिअर क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्गही आपोआप सुकर होतो.
व्यक्तिमत्त्व आणि त्याला अनुकूल ठरणाऱ्या करिअर क्षेत्रांचा घेतलेला धांडोळा-

उत्साही, निर्णयक्षम, सुनियोजित व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती, कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणायचा असल्यास अथवा भविष्यकालीन योजनांची आखणी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. नव्या योजना त्या यशस्वीरीत्या राबवू शकतात. अशा व्यक्ती ध्येयवादी आणि विश्लेषक असतात. तर्कसुसंगत दृष्टिकोनामुळे ते भोवतालच्या परिस्थितीत योग्य ते बदल घडवू शकतात.
कामाच्या ठिकाणी स्वेच्छेने पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारणे आणि पूर्ण करणे त्यांना शक्य होते. कामाचे काटेकोर नियोजन आणि नेतृत्व गुण ही या व्यक्तिमत्त्वाची बलस्थाने आहेत. स्वत:ची किंवा समूहाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
अशा व्यक्तींना कॉर्पोरेट क्षेत्रात, ऑडिटर (लेखापरीक्षक), कॉस्ट ऑडिटर, अर्थ विश्लेषक, आरोग्य सेवा क्षेत्र, विधी सल्लागार किंवा तज्ज्ञ, खासगी किंवा सरकारी सुरक्षा यंत्रणा अशा विविध कार्यक्षेत्रांत प्रगतीच्या संधी अजमावता येईल.

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

सभ्य, अंतर्मुख, दयाळू व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती आदर्शवादी विचारसरणीच्या असतात. स्वत:सोबत अन्य सहकाऱ्यांचीही प्रगती व्हावी याकरता प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कल्पकता आणि सृजनशीलता असते. प्राप्त परिस्थितीत स्वत:ला व्यक्त करताना या व्यक्ती निरनिराळ्या कल्पना आणि शक्यता शोधून त्यांचा योग्य वापर करतात. स्वत:च्या विचारांबाबत तसेच निर्णयांबाबत या व्यक्ती आग्रही असतात. या व्यक्तींची स्वभावरचना लवचीक आणि सर्वसमावेशक असते. कल्पनांचे आणि विचारांचे आदानप्रदान करण्याकरता या व्यक्ती सकारात्मक असतात.
या व्यक्ती डिझायनर, मल्टिमीडिया, ग्रंथपाल, ऑडियोलॉदिस्ट, कर्मचारी प्रशिक्षक, भूगोल अभ्यासक, लेखक अशा क्षेत्रांमध्ये चमकतात.

तार्किक, स्वयंपूर्ण, सक्षम
तर्क सुसंगत विचारसरणीच्या, विश्लेषक, समीक्षक वृत्तीच्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय भावनेपेक्षा, बुद्धीच्या आणि अंत:प्रेरणेच्या बळावर घेतात. कोणतीही गुंतागुंतीची जबाबदारी अभ्यासपूर्ण आणि सक्षमतेने पार पाडतात; या व्यक्ती आचार विचाराने स्वयंपूर्ण असतात. अंतर्मुख होऊन स्वत:च्या विचारांवर विश्वास ठेवूनच त्या निर्णय घेतात. ध्येयपूर्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे अशा व्यक्तींना भावते. स्वत:ला अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी या व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असतात.
अशा व्यक्ती गणितज्ज्ञ, संख्याशास्त्रज्ञ, अभियांत्रिकी, विज्ञान अभ्यासक, संगणक तज्ज्ञ, वकील, अ‍ॅक्च्युरी, न्यायाधीश अशा कार्यक्षेत्रात प्रभावीरीत्या काम करू शकतात.

दिलखुलास, द्रष्टा, विश्लेषक व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती आव्हानात्मक परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोऱ्या जातात आणि स्वत:च्या कल्पक बुद्धीचा विचार करून योग्य मार्ग निवडतात. पूर्णत: नवा बदल अशा व्यक्ती सहज स्वीकारतात. कोणत्याही प्रश्नावर या व्यक्ती स्वयंप्रेरणेने काम करतात. नावीन्यपूर्ण पर्याय शोधण्याची क्षमता त्यांच्यात असते. कामाच्या ठिकाणी मतभेद असणाऱ्या सहकाऱ्याशी चतुराईने वागणे त्यांना सहज जमते. या व्यक्तींच्या विचारांची, निर्णयांची झेप मोठी असते आणि भविष्याचा अंदाज ठेवून होते.
या व्यक्ती बाजारपेठ अभ्यासक (मार्केट रिसर्चर), उद्योजक, जनसंपर्क अधिकारी, व्हेन्चर कॅपिटलिस्ट (नवीन उद्योगांतून अर्थ गुंतवणूकदार), आरोग्य सल्लागार, निर्माता किंवा दिग्दर्शक, गुन्हे शोध, मालमत्ता व्यवस्थापक, मनुष्यबळ विकास या कार्यक्षेत्रांत यशस्वीपणे कार्यभार सांभाळू शकतात.

निष्ठावान, स्पष्टवक्ता, प्रेमळ व्यक्तिमत्त्व
सहकार्य, परोपकार, निष्ठा हा असा व्यक्तींचा स्थायिभाव असतो. इतरांच्या मदतीकरता ते स्वत:चा वेळ, ऊर्जा, खर्च करतात. अशा व्यक्ती मेहनतीने कामाची घडी व्यवस्थित बसवू शकतात. चांगल्या-वाईटाची पारख त्यांनी उत्तमप्रकारे करता येते. या व्यक्ती स्वत: नियम पाळतात आणि इतरांनीही नियमांचे पालन केलेले त्यांना पसंत असते. नियोजन आणि शिस्तीच्या जोरावर अशा व्यक्ती कोणतीही जबाबदारी पेलू शकतात आणि संबंधित लोकांची काळजीही घेतात.

अशा व्यक्ती उत्तम व्यवस्थापक, इव्हेंट व्यवस्थापन, शाळा शिक्षक, समुपदेशक, कॅटरर (अन्नपुरवठादार), फिटनेस प्रशिक्षक म्हणून काम करू शकतात.

सुस्वभावी, सहृदय, आश्वासक व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या भावना चटकन समजून घेऊ शकतात. आपल्या कृतीतून, बोलण्यातून इतरांना आधार देतात आणि वातावरण निकोप, उत्साही राखण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना घेऊन एकत्रित प्रगती साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्यांच्या अडचणी त्यांना न सांगताही जाणवू शकतात, स्वत:ची कामे इतरांकडून करवून घेताना सहकार्य, एकोपा या गोष्टींचा ते अवलंब करतात. अशा व्यक्ती कामाच्या ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा व्यक्ती कर्मचाऱ्यांच्या मोठय़ा गटाचे यशस्वी नेतृत्त्व करू शकतात. समाजकार्यासाठी एकत्रितपणे काम करण्यात त्यांना समाधान प्राप्त होते.
अशा व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात, समुपदेशक, शिक्षक किंवा समाज कार्यकर्ता, कॉर्पोरेट क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, मनुष्यबळ विकास सल्लागार, विपणन अधिकारी, विमा एजंट अशा करिअर क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी बजावू शकतात.

परोपकारी, सुस्वभावी, उत्स्फूर्त व्यक्तिमत्त्व
या व्यक्ती स्वभावत: खेळकर असतात. एकाच वेळी निरनिराळ्या गोष्टींत सहभागी व्हायला, सर्वाचे लक्ष वेधून घ्यायला त्यांना आवडते. चतुराई आणि नर्मविनोदी बोलणे, दुसऱ्याला नेहमी मदत करणे आणि भोवतालच्या लोकांची शाब्दिक कोटय़ांच्या आधारे करमणूक करणे या व्यक्तींना चांगलेच जमते. सकारात्मक आणि आनंदी मनोवृत्ती असलेल्या अशा व्यक्ती भोवतालच्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात. ते उत्तम निरीक्षक आणि वास्तववादी आणि उत्साही असतात.
अशा स्वभावरचनेच्या व्यक्ती शिक्षक, विपणन अथवा विक्री अधिकारी, शेफ (खाद्य व्यवसाय), फूल व्यवसाय, छायाचित्रकार, संगीतकार, इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकतात.