लिखित स्वरूपातील अथवा डिजिटल स्वरूपातील नोट्सचे व्यवस्थापन नीटपणे होणे आवश्यक असते. अन्यथा, नोट्स तयार करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्याहून अधिक वेळ हरवलेल्या, गहाळ झालेल्या नोट्स शोधण्यात वाया जातो.

तुम्ही निवडलेले संदर्भाचे मुद्दे अथवा टिपणं तुमच्यासाठी उपयुक्त असतात यात शंकाच नाही. मात्र, अभ्यास करताना वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी काढली गेलेली ही टिपणं आपण सुव्यवस्थित ठेवली आहेत ना, हे लक्षात घ्यायला हवे.
शाळेत असताना वर्गपाठ, गृहपाठाच्या वेगवेगळ्या वह्य़ा असतात. त्या त्या विषयाच्या वहीत संबंधित टिपणं नोंदवली जातात. मात्र, जसजसे आपण मोठे होऊ लागतो तशी आपल्या वह्य़ांची संख्या कमी व्हायला लागते. त्यात उतरवून घ्यायच्या नोट्सही कमी व्हायला लागतात. महाविद्यालयात काही मुलं एखादी वही सर्व विषयांसाठी वापरायला लागतात किंवा काहीजण वर्गात लिहून घेण्यासाठी सुटे कोरे कागद अथवा फुलस्केपचा वापर करतात. वहीत लिहिण्याचा उत्साह जसा मावळू लागतो, तसा कागद आणि पेनाच्या सहाय्याने अनेक स्वारस्यपूर्ण गोष्टी घडू शकतात यावरचा विश्वास उडू लागतो.
अलीकडे काही विद्यार्थी फोन, लॅपटॉप अथवा टॅबलेटवरही नोट्स लिहून घेऊ लागले आहेत. त्याच्या फायद्या-तोटय़ांचा विचार करणे हा लेखाचा विषय नाही, कारण प्रत्येक बाबीला चांगल्या-वाईट बाजू असतात. महत्त्वाचा मुद्दा हा की, काढलेली टिपणं उपयोगी ठरण्यासाठी ती वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असते. त्याकरता तुम्ही या नोट्स कशा ठेवता ते महत्त्वाचे असते. सुटय़ा कागदांपेक्षा वह्य़ांवर नोट्स लिहिणे केव्हाही उत्तम. वह्य़ा हरवण्याची, गहाळ होण्याची, चुरगळण्याची, खराब होण्याची शक्यता सुटय़ा कागदांच्या तुलनेत काहीशी कमी असते. जर सुटय़ा फुलस्केपवर लिहिण्याची सवय असेल तर लिहून झाल्या झाल्या त्यांचे व्यवस्थित फायलिंग करावे.
विषयाच्या विभागवार वह्य़ा कराव्यात. त्यामुळे सत्रानुसार अभ्यासाच्या वह्य़ा तुमच्याकडे एकत्र तयार असतील. क्रमिक पुस्तकांपलीकडची ग्रंथालयातील पुस्तके आणि इतर स्रोतांकडून जी काही संदर्भ टिपणे तुम्ही काढली असतील तर त्यांची वेगळी वही करावी. त्यामुळे वर्गात शिकवलेल्या नोट्सचा प्रवाह तसाच राहील आणि तुम्ही काढलेले जास्तीचे संदर्भ यांची वेगळी टिपणे राहतील.
नोट्स लिहिताना तसेच त्या ठेवताना शिस्त बाळगणे आवश्यक आहे. नोट्स लिहिताना तारीख, पाठाचे नाव अवश्य लिहावे. त्यामुळे तुमच्या लिहिण्याचा संदर्भ समजणे शक्य होते आणि जेव्हा त्या नोट्स वाचाल तेव्हा त्या कधी लिहिल्यात हे माहीत नसल्याने होऊ शकणारा गोंधळ टळतो. ही सविस्तर माहिती मुख्यत: डिजिटल नोट्ससाठी अधिक आवश्यक ठरते, कारण तिथे शीर्षक, लेबल्स हे की-वर्ड्स म्हणून शोधायला उपयुक्त ठरतात.
नोट्स काढण्यासाठी जर तुम्ही डिजिटल उपकरण वापरत असाल, तर नोट्स काढताना तुम्ही या नोट्स कधी व का काढल्यात याची न विसरता नोंद करा. मार्क केलेल्या फोल्डर्समध्ये त्या साठवा म्हणजे परीक्षेच्या वेळेस अथवा जेव्हा तुम्हाला त्या हव्या असतील तेव्हा त्या वापरत्या येतील. डिजिटल माहिती जर नीट मार्क करून साठवली नाही तर कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राइव्हच्या जंजाळात ती हरवून जाऊ शकते.
या सगळ्यासाठी जास्तीचे काम करण्याची गरज असते. पण नोट्सचे नीट व्यवस्थापन केले नाही तर जेवढा वेळ लिखित अथवा डिजिटल नोट्स तयार करण्यासाठी लागतो, त्याहून अधिक वेळ हरवलेल्या, गहाळ झालेल्या नोट्स शोधण्यात जातो. त्यामुळे नोट्सचे नीट व्यवस्थापन करण्यासाठी त्या लिहून झाल्यानंतर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जास्तीचा वेळ काढणे हे उपयुक्त आणि नंतरचा वेळ वाचवणारे ठरते.