नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही सादर केलेला रेझ्युमे अर्थात बायोडेटा याचे महत्त्व मोठे असते. रेझ्युमे हा जणू तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच आरसा असतो. रेझ्युमे तयार करताना कुठल्या गोष्टींचे भान राखणे आवश्यक असते, याची माहिती..

नोकरीसाठी अर्ज करताना सादर करावे लागणारे स्वत:च्या कार्यानुभवाचे, शिक्षणाचे परिचयपत्र म्हणजेच रेझ्युमे किंवा ‘बायो-डेटा’. आपल्या रेझ्युमेतून आपलं व्यक्तिमत्त्व, आपली आजवरची कामगिरी प्रतििबबीत होत असते. उत्तम रेझ्युमे हा आपली ओळख जगाला करून देणारे माध्यम ठरू शकते. एखाद्या उत्पादनातील चांगल्या बाबी जशा जाहिरातीद्वारे जगासमोर मांडल्या जातात त्याच प्रकारे आपल्यातील क्षमता, आपल्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानांची ओळख इतरांना आपल्या रेझ्युमेतून होत असते.
आपला रेझ्युमे नोकरी देणाऱ्यांच्या अपेक्षा आणि अटी पूर्ण करणारा असायला हवा. असे असेल तर इच्छुक उमेदवारांच्या गर्दीतही आपण उजवे ठरू शकतो आणि प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढते.
रेझ्युमे बनवण्यामागचा हेतू लक्षात घेणे गरजेचे आहे. सरसकट सर्व अर्जासाठी एकच रेझ्युमे असणे तितकेसे योग्य ठरणार नाही. आपण कोणत्या हुद्दय़ासाठी, कोणत्या कार्यालयीन विभागासाठी अर्ज करत आहोत, नोकरी देणारी कंपनी/आस्थापना कोणत्या प्रकारची आहे (सरकारी/ निमसरकारी/ खासगी/ महामंडळे), आवश्यक शिक्षण, अपेक्षित अनुभवक्षेत्र आणि अनुभवाचा कालावधी.. या अर्हतेत प्रत्येक वेळी थोडेफार फेरफार करून रेझ्युमे बनवणे परिणामकारक ठरते.

woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?

रेझ्युमेतील अत्यावश्यक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत
* रेझ्युमेच्या सुरुवातीलाच स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क पत्ता, मोबाईल, ई-मेल याची खरी, अद्ययावत आणि पूर्ण माहिती मोठय़ा आणि ठळकपणे देणे गरजेचे आहे. कारण या माहितीच्या आधारेच नियुक्त करणारी संस्था आपल्याशी संपर्क साधू शकेल.
* आपल्याला नजीकच्या भविष्यात, कोणत्या करिअर क्षेत्रात कोणत्या हुद्दय़ांसाठी काम करण्याची आकांक्षा आहे हे रेझ्युमेत नमूद केलेले असावे. यातून नोकरी देणाऱ्यांना आपण कोणत्या प्रकारे लाभदायक ठरू शकतो हे स्पष्ट होते.
* कार्य अनुभव- आपण यापूर्वीच्या आस्थापनांतून केलेली ठळक कामे, हाताळलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या, विशिष्ट कार्य परिघापल्याडची पूर्ण केलेली कामे नमूद करायला हवीत. तसेच ज्या कंपनी/ कार्यालयातील जागेसाठी अर्ज करीत आहात, त्यासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रातील आपला कार्यानुभव स्वतंत्रपणे नमूद करणे महत्त्वाचे आहे.
उदा. नोकरीच्या जाहिरातीत अकाउंटंट या पदासाठी जर ‘व्हॅॅट, विक्री कर, सेवा कर या क्षेत्रातील अनुभव आवश्यक’ ठरत असेल तर आपला त्या क्षेत्रांतील अनुभव ठळक अक्षरांत स्वतंत्रपणे लिहून लक्षात आणून देणे आवश्यक ठरते.
* अनुभवाचा कालावधी- पूर्वी नोकरी केलेल्या कंपन्या, संस्थांचे नाव, कामाचा कालावधी तसेच नोकरी सोडण्याचे कारण (उत्तम संधीसाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी असे असावे.) या गोष्टींचा या मुद्दय़ांमध्ये समावेश असावा. काही कारणास्तव शिक्षण किंवा नोकरीच्या कालावधीत खंड पडला असेल तर त्या बाबतचे समर्थनीय उत्तर मनात तयार ठेवावे.
* शिक्षण- मूलभूत पदवी शिक्षणासोबत स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी काही शिक्षणक्रम, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर त्याचा अंतर्भाव रेझ्युमेत व्हायला हवा. यामुळे तुमच्यातील प्रगती साधण्याची वृत्ती नजरेस पडते.
* संगणक व तांत्रिक ज्ञान- आजकाल संगणक साक्षरता आणि कौशल्य या गोष्टी कोणत्याही नोकरीसाठी अनिवार्य मानल्या जातात. या विषयात पूर्ण केलेले शिक्षणक्रम किंवा काही विशिष्ट व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कौशल्यांचा रेझ्युमेतील वेगळा उल्लेख गरजेचा ठरतो.
* अधिक माहिती- आपल्या आवडी, छंद याबाबत थोडक्यात माहिती, छंद जोपासण्यासाठी आपण घेत असलेली मेहनत उद्धृत करणे आवश्यक आहे. यातून आपली वैचारिक, मानसिक, शारीरिक प्रगल्भता निवड करणाऱ्या व्यक्तीला जाणवू शकते, आणि आपली प्रतिमा सकारात्मक होण्यास मदत होते. (उदा. वाचन, स्वयंसेवी संस्थांमधील सामाजिक कार्य, जागतिक राजकारण, पर्यावरण संतुलन याविषयी अभ्यास, गिर्यारोहण, प्रवास अशा स्वरूपाचे छंद अभिप्रेत आहेत. )
* शिफारस पत्रे- शालेय, महाविद्यालयीन कालावधीत, शिक्षण किंवा शिक्षणेतर कारणांसाठी प्राप्त झालेली राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील प्रशस्तिपत्रके, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा आधीच्या नोकरीतील किंवा तेथील मुख्य व्यक्तीकडून (मुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापकीय संचालक) उत्तम कामगिरीसाठी प्राप्त केलेली कौतुकाची पत्रे अथवा संदर्भ पत्रे यांची नोंद रेझ्युमेत असणे आवश्यक आहे.
परिणामकारक रेझ्युमेसाठी..
* रेझ्युमेतील मजकूर सुस्पष्ट असावा. अक्षर वाचनीय असावे. योग्य ती माहिती रकाना स्वरूपात देणे आवश्यक आहे. हल्ली रेझ्युमे बहुतेकदा संगणकावरच बनवले जातात आणि ईमेलद्वारे इच्छित स्थळी पाठवले जाते. अन्यथा, उत्तम प्रतीच्या कागदावर, कोणतीही खाडाखोड न करता ठळक, सुवाच्य हस्ताक्षरांत रेझ्युमे लिहिले जाणे महत्त्वाचे आहे.
* उत्तम रेझ्युमेची लांबी महत्त्वाची नसून त्यातील मजकुराची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. एखाद्या अननुभवी व्यक्तीच्या रेझ्युमेतील मजकूर कमी असू शकतो, तर एखाद्या उच्चशिक्षित, अनुभवी उमेदवाराकडे लिहिण्यासारखे खूप काही असू शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर नोकरीची संधी संपादन करण्यासाठी स्वत:बद्दलची सर्व आवश्यक माहिती समर्पक शब्दांत सादर करणे गरजेचे ठरते.
* आपल्याबद्दल नोकरी देणाऱ्या व्यक्तींना अधिक जाणून घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क साधता यावा, म्हणून आपला दूरध्वनी क्रमांकही रेझ्युमेत समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यासोबतच ज्यांची संदर्भ पत्रे आपण रेझ्युमेसोबत जोडलेली आहेत, त्या आपल्या आधीच्या नोकरीतील उच्चपदस्थ व्यक्ती, शक्य असेल तर आपल्याला ओळखणाऱ्या काही सन्मान्य व्यक्ती, आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांचे संपर्क क्रमांक त्या पत्रांमध्ये असावेत.
* रेझ्युमे बनवताना इंटरनेटवरील नोकरीविषयक विविध संकेतस्थळांवर झळकणाऱ्या आदर्श रेझ्युमेंचा आपल्याला आधार घेता येईल. अलीकडे काही नोकरीविषयक संकेतस्थळांवर नावीन्यपूर्ण रीतीने उत्तम रेझ्युमे ऑनलाइन बनवून दिले जातात. त्यांचीही मदत घेणे उपयुक्त ठरते.
* रेझ्युमेतील लेखनावरून आपल्या भाषाज्ञानाचा आणि लेखन कौशल्याचा अंदाज घेतला जातो, म्हणून तयार रेझ्युमे पुन:पुन्हा वाचून, बिनचूक असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
मित्रहो, सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या एका जागेसाठी हजारो अर्ज दाखल होत असतात. दरवेळी अर्ज करत असताना, जाहिरातीतील नोकरी जणू काही आपल्यासाठीच निर्माण झाली आहे असा विश्वास उमेदवाराला वाटत असतो. तोच विश्वास नोकरी देणाऱ्या कंपनीला/व्यक्तीला आपल्याबद्दल वाटेल तेव्हाच मुलाखतीला जाण्याची संधी मिळेल, आणि हे उद्दिष्ट उत्तम रेझ्युमेतूनच साध्य होते.