Maharashtra HSC 12th Result 2018 : असा घालवा निकालाचा ताण

भविष्यात अनेक संधी येणार आहेत यावर विश्वास ठेवा

परीक्षेच्या निकालाची वाट पाहणे ही अनेकांना घाबरवून टाकणारी गोष्ट असते.. जणू काही त्यांची निकालाच्या दिवशी भीतीशी गाठभेट होणार असते.. निकालाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो तसे पोटात बाकबूक सुरू होते. खरंतर तुम्हाला या दिवसांत ताण येणं, अस्वस्थ वाटणं, काळजी वाटणं हे सारं होणं स्वाभाविक आहे.. निकालाचा आलेला हा ताण दूर कसा करता येईल, हे जाणून घेऊयात-

परीक्षेच्या निकालाआधी काय करता येईल?

स्वत:कडे लक्ष द्या –

निकालाआधीच्या काही दिवसांत रिलॅक्स होण्याकरता वेळ काढा. आपण सदैव व्यग्र असतो किंवा काही ना काही कामांत गुंतलेलो असतो. त्यामुळे निकालाआधी काही वेळ निवांत राहण्यासाठी व्यतीत करा. मग ती भटकंती असू शकते, आवडता खेळ ण्यासाठी काढलेला वेळ असू शकतो किंवा आवडते संगीत ऐकणेही असू शकते. या फावल्या वेळात रिलॅक्स होण्यासाठी काय करायचं ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. आवडती गोष्ट केल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं.

व्यायाम करा –

ताण कमी करण्यासाठी व्यायाम करणं हे उत्तम साधन आहे. व्यायामाने ताजतवानं वाटतं, आत्मविश्वास जागा होतो आणि ताण निवळतो.

 मित्रमैत्रिणींशी बोला –

तुम्हाला आलेला तणाव, तुमच्या निकालाविषयीच्या भावना मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही असंच वाटतंय.. हे लक्षात आल्यावर तुम्हाला हायसं वाटतं.

स्वत:च्या भावना ओळखा-

जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं, निराश वाटतं.. तेव्हा आपल्याला असं  वाटतं हे तुम्ही स्वीकारायला हवं आणि
तुमच्या या भावना तुम्ही व्यक्त करायला हव्या. जर तुम्हाला हे कुणाशी बोलावंसं वाटत नसेल तर रोजनिशीत याची नोंद करा. चित्राद्वारे आपल्या भावना मांडा.

तुमच्या स्वत:च्या अपेक्षा समजून घ्या –

परीक्षेच्या निकालाबाबत तुमच्या स्वत:च्या अपेक्षा काय आहेत, हे जाणण्यासाठी वेळ काढा. किती गुण मिळवण्याचं तुमचं स्वत:चं लक्ष्य होतं, किती गुण मिळाले म्हणजे तुम्हाला स्वत:ला आनंद होईल ते बघा.. इतरांच्या अपेक्षा काय आहेत ते नजरेआड करा. कुठल्या विषयांत तुम्हाला उत्तम गुण मिळतात, त्या विषयांत किती गुण मिळतील अशी आशा तुम्हाला वाटते.., कुठल्या विषयांत तुम्ही कच्चे आहात़, त्यात किती गुण मिळाले म्हणजे तुम्हाला आनंद होईल.. या प्रश्नांची उत्तरे मिळवा. लक्षात ठेवा- प्रत्येक व्यक्तीची काही बलस्थानं असतात आणि काही कमकुवत बाजू असतात.

इतरांच्या ज्या अवास्तव अपेक्षा आहेत, त्याविषयी त्यांच्याशी बोला-

पालक, नातेवाईक यांच्या तुमच्याकडून गुणांच्या अवास्तव अपेक्षा असतील तर त्यांच्याशी याबाबत बोला. तुम्हाला वास्तवात किती गुण मिळतील आणि का, तेही सांगा. इतरांच्या अवास्तव अपेक्षांना हाताळणं कठीण असतं. या अपेक्षांची एकदा का चर्चा झाली आणि अपेक्षांचे व्यवस्थापन करता आले की तुम्हालाच मोठा दिलासा मिळेल. ही चर्चा करताना तुम्ही सकारात्मक असायला हवं.

वैद्यकीय मदत घ्या –

जर तुम्हाला निकालाचा ताण येऊन खूपच निराश वाटत असेल आणि त्यामुळे दैनंदिन गोष्टी करण्यात अडचणी येत असतील तर तुमच्या फॅमिली डॉक्टरना भेटा आणि उपचार घ्या.

निकालाचा ताण आला आहे हे कसं ओळखाल?

– कुठलंही काम करताना तुमचं मन एकाग्र होत नाही.

– डोकं दुखतं, ओटीपोटात दुखतं, श्वास घ्यायला कठीण जातं, हृदयाचे ठोके
वाढल्यासारखे वाटतात.

– रात्री झोप लागत नाही.

– नेहमीपेक्षा जास्त खावंसं वाटतं.

– इतरांवर वारंवार चिडता..

– हसावंसं वाटत नाही.

– गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत, असं वाटू लागतं..

– सारखा चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स प्यावीशी वाटतात.

– मनात वारंवार नकारात्मक भावना येतात.

– मित्रांना, नातेवाईकांना भेटू नये, असं वाटत राहतं.

– नवं काही करण्याचा उत्साह वाटत नाही.

– पुरेशी झोप झाली तरी खूप थकल्यासारखं वाटतं.

– गळून गेल्यासारखं वाटतं.

 

योगिता माणगांवकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra board hsc 12th result 2018 stress management

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी