पर्यटन क्षेत्राची झपाटय़ाने वाढ होत आहे. या क्षेत्राने आजमितीस उद्योगाचे स्वरूप धारण केले आहे. क्रयशक्ती वाढल्याने पर्यटकांच्या संख्येत वर्षांकाठी मोठी वाढ होताना दिसते. त्यामुळे पर्यटन आणि वाहतूक कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. या कंपन्या पर्यटनाची वेगवेगळी पॅकेजेस तयार करतात आणि इच्छुक ग्राहकांना पर्यटनाची सेवा पुरवतात. बहुतांशी या सेवा समूहासाठीच असल्या तरी अलीकडे पर्यटन कंपन्यांतर्फे व्यक्तिगत स्वरूपातही- ग्राहकाच्या गरजेनुसार व्यक्तिगत पर्यटन योजना आखून दिली जाते. ग्राहकांच्या बजेटनुसार, इच्छित स्थळी पर्यटन सेवा उपलब्ध करून दिली जाते. पर्यटकांना दर्जेदार सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या यशात त्यांच्याकडील प्रशिक्षित आणि कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचा सर्वात मोठा वाटा असतो. अशा मनुष्यबळामध्ये टूर मॅनेजर या व्यक्तीचा अग्रक्रमाने समावेश करता येईल. या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरू शकतील असे पर्यटन उद्योगाशी निगडित अनेक अभ्यासक्रम गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरू केले आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत चालवल्या जाणाऱ्या या संस्थेत विविध क्षेत्रांसाठी आवश्यक असणारे तंत्र-कौशल्याचे प्रशिक्षणक्रम उपलब्ध आहेत. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा कोर्स इन टूर मॅनेजमेंट : कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. हा अर्धवेळ अभ्यासक्रम आहे.* डिप्लोमा इन टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट : कालावधी- दोन वष्रे - पूर्णकालीन. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी.* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट : कालावधी- एक वर्ष - पूर्णकालीन. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.संस्थेचा पत्ता- मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व) कॅम्पस, मुंबई- ४०००९८.वेबसाइट- www.giced.edu.in ईमेल- garware@giced.mu.ac.in