scorecardresearch

सुटी आणि व्यक्तिमत्त्व विकास

एखाद्या सुटीत मुलाला जर काहीच करावंसं वाटत नसेल, तर मुलाच्या या निर्णयाचा आई-बाबांनी आदर करायला हवा. मुदलातच व्यक्तिमत्त्व विकास केवळ एखाद्या शिबिरातूनच घडणं शक्य आहे, असं मानणं चुकीचं आहे.

सुटी आणि व्यक्तिमत्त्व विकास

samajएखाद्या सुटीत मुलाला जर काहीच करावंसं वाटत नसेल, तर मुलाच्या या निर्णयाचा आई-बाबांनी आदर करायला हवा. मुदलातच व्यक्तिमत्त्व विकास केवळ एखाद्या शिबिरातूनच घडणं शक्य आहे, असं मानणं चुकीचं आहे.

उन्हाळी सुटी आणि वेगवेगळी शिबिरं यांचं एक वेगळं समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये बनलं आहे. खेळ, कलाकौशल्यांची छोटी-मोठी शिबिरं किंवा व्यक्तिमत्त्व विकासाची, साहसाची निवासी शिबिरं, अशा शिबिरांची मोठी रेंज सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे वार्षकि परीक्षा संपायच्या आधीपासूनच या शिबिरांची नोंदणी सुरू होते. मुळात वर्षभर शाळेच्या रुटीनमध्ये ज्या गोष्टी करता येत नाहीत, त्या करायची सुटी ही छान संधी असते. अनेक नव्या गोष्टी शिकता येतात, नवी ठिकाणं पाहता येतात. नवे मित्रमत्रिणी जोडता येतात, एकंदरच या सगळ्यातून अनेक नवीन अनुभव गाठीला लागत असतात. मुलांचं व्यक्तिमत्त्व घडायला त्यातून नक्कीच हातभार लागत असतो.
या सगळ्याचा एक वेगळा पलू मी अलीकडे पाहते आहे- आईबाबा वेगवेगळ्या शिबिरांची माहिती गोळा करू लागतात, तेव्हा मुलं जाहीर करून टाकतात, या सुटीत कोणताच कॅम्प नाही करायचा! स्वाभाविक प्रश्न येतो, मग काय करायचं सुटीत?
मुलांना नुसतं घरी बसायचं असतं किंवा जवळपासच्या मित्रांबरोबर खेळायचं असतं, किंवा काहीही करायचं नसतं. आईबाबांना मात्र एवढी दोन-अडीच महिन्यांची सुटी सत्कारणी लागावी, असं मनापासून वाटत असतं. त्यातून बऱ्याच घरात सुटीच्या तोंडावर बारीकसारीक कुरबुरी सुरू होतात. ‘एवढी संधी देतो आहोत तुला, खर्च करायची तयारी दाखवतो आहोत, तर तुला काही करायला नको. आमच्या वेळी नव्हत्या असल्या संधी आम्हाला.’ अशा आशयाचं बरंचसं काही बोललंही जातं.
बऱ्याचदा वर्षभर मुलांचं दिवसभराचं शेडय़ुल इतकं भरगच्च असतं, की वेळेचं गणित बसवायची तारेवरची कसरत मुलांच्या तिसरी-चौथीपासूनच होत असते. शाळा, अभ्यासासाठीचे, स्पर्धापरीक्षांचे क्लासेस, एखादा खेळाचा सराव, कलेचं शिक्षण अशा असंख्य गोष्टी त्यात असतात. त्यातल्या काही मुलांच्या आवडीने होतात, तर काही त्यांना कराव्या लागतात. याचा परिणाम म्हणजे मुलं दमलेली-थकलेली असतात. त्यामुळे सुटीतही आईबाबा आम्हाला जरासुद्धा मोकळं सोडत नाहीत, असं मुलांना वाटत राहतं. या बाबतीत आतापर्यंत अनेक आईबाबांशी बोलल्यावर काही वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुळात सध्याच्या स्पध्रेच्या युगात आपलं मूल मागे पडू नये, असं प्रत्येक आईबाबांना वाटत असतं. त्यासाठी परीक्षेतले त्यांचे मार्क्‍स आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व या दोन्ही आघाडय़ा मजबूत व्हाव्यात यासाठी पालकांची पिढी अतोनात परिश्रम करत असते. पण यातही एक पॅटर्न दिसतो आहे. आईबाबांचं म्हणणं असतं, ‘हीच तर वेळ आहे ना, व्यक्तिमत्त्व घडण्याची! नंतर नववी ते बारावी काय, फक्त अभ्यासच करायचा आहे ना!’ आजवर अनेक आईबाबांकडून हा युक्तिवाद मी ऐकला आहे.
मुळात व्यक्तिमत्त्व ही काही फक्त शाळकरी वयात आणि फक्त शिबिरात घडणारी गोष्ट आहे का? अर्थातच नाही! ती अखंडपणे चालू राहणारी क्रिया आहे. आपण उठता बसता करत असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा हिस्सा असतात. त्यातल्याच काही आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळे पलू देत असतात. मग त्यात अभ्यासही अर्थातच आला. आपण अभ्यास कसा करतो, कधी हाताशी वेळ कमी असेल तर कसं नियोजन करतो, कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतो, न जमणाऱ्या गोष्टींकडे पाहायचा आपला दृष्टिकोन काय आहे, त्यात आपण काही बदल करू शकतो आहोत का, काही गोष्टी ‘ऑप्शन’ला टाकण्यातली रिस्क- यातूनही व्यक्ती म्हणून आपण घडतच असतो. त्यामुळे ‘आत्ताच काय ते व्यक्तिमत्त्व घडू दे, मग आहेच अभ्यास..’ असं म्हणणं तितकंसं योग्य नाही. व्यक्तिमत्त्व ही उन्हाळी शिबिरांपुरती सीमित असणारी बाबच नाही. अनेक शिबिरांमधून मुलांना खूप वेगवेगळं एक्सपोजर मिळतं, मजा येते, पण पुन्हा निव्वळ एक्सपोजर म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास नाही ना.. तो फक्त एक पलू आहे. आणखी एक पाहायला मिळतं आहे, ते म्हणजे मुलांचं व्यक्तिमत्त्व ही सर्वस्वी आपलीच जबाबदारी आहे ही काही पालकांची भूमिका. इथे आपलं मूल स्वतंत्र व्यक्ती आहे, आणि तिला येणाऱ्या भल्याबुऱ्या अनुभवांमधून ती घडणार असते याचं भान असणं आवश्यक आहे. जिथून परतीचा रस्ता उपलब्ध असेल, असे पर्याय मुलांना निवडू देणं, त्यात येणाऱ्या अनुभवांना सामोरं जायला मदत करणं- यातून व्यक्तिमत्त्वाला पडणाऱ्या पलूंचं मोल खूप मोठं आहे. म्हणून एखाद्या सुटीत मुलाला जर काहीच करावंसं वाटत नसेल, तर त्याचा आदर करण्याने मूल आणि पालक दोघांची ही जमेची बाजू जास्त भक्कम होऊ शकते. अशा सुटीत मात्र मुलाला आपला थोडा जास्त वेळ द्यावा लागू शकतो, पण मुलांसाठी म्हणून आपण हे करूच की!! सुटीची गंमत अशीही येऊ शकते.
mithila.dalvi@gmail.com

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-04-2015 at 07:30 IST

संबंधित बातम्या