ग्रामीण आरोग्य सुधारावं यासाठी शासनानं गावागावांत ‘आशा कार्यकर्त्यां’ची नियुक्ती केली. त्याचा आशादायी परिणाम दिसू लागला आहे. गावाचं आरोग्य सुधारण्यासाठी हातभार लावतानाच या ‘आशा’चं व्यक्तिगत आयुष्यही बदलू लागलं आहे. त्यातल्याच औरंगाबाद जिल्ह्य़ातील ४० गावांची जबाबदारी सांभाळणाऱ्या या सहा ‘आशा’. त्यांनी स्थापन केलेल्या ‘ग्राम संजीवनी प्रतिष्ठान’ या संस्थेमुळे हे काम अधिक जोरदारपणे होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही..

आरोग्य जतनाची ही सगळी प्रक्रिया घडताना प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला असणाऱ्या डॉ. प्रतिभा फाटक म्हणतात, ‘कोणत्याही क्षेत्रात मनुष्यबळ उभं करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम असतं. ठेचकाळणाऱ्याला आधार देत आरोग्य क्षेत्रात कार्यकत्रे उभे करण्याचं काम ‘संजीवनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पा’तून होत आहे. जिल्ह्य़ात १ हजार ६०० पेक्षा अधिक आशा कार्यकर्त्यां आहेत. त्यांचं कामही चांगलं सुरू आहे. मात्र, या सहा जणींचं काम सध्या ठळकपणे पुढे येत आहे.’’

ही आहे सहा जणींच्या संघर्षांची कहाणी. बाईपणाचं बंधन असलं तरी जगताना लागणाऱ्या अपार ऊर्जेशी त्यांची आता नाळ जुळली आहे. प्रत्येकीचा व्यक्तिगत लढा निराळा. प्रत्येकीची समस्येतून मार्ग काढण्याची पद्धतही वेगळी. त्यांच्या भाषेचा लेहजा ग्राम्य नि शहाणपण थक्क करणारं. सहा जणींपकी एकीचंही शिक्षण तसं फार नाही. दहावी- बारावी शिकलेल्या. मात्र, औरंगाबाद जिल्ह्य़ातील ४० गावांत त्यांच्या येण्याचं मोठं कौतुक आहे कारण गावातील मंडळींसाठी जणू त्या डॉक्टरच आहेत.
त्या लोकांचा रक्तदाब मोजतात. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण काढू शकतात. एवढंच नाही तर गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मोजतात, गर्भवतीला योग्य आहार सुचवतात. डोकं दुखणं, हगवण, सर्दी यासारख्या छोटय़ा छोटय़ा आजारावर औषधंही देतात. त्यांची आरोग्यविषयक माहिती लोक ऐकून घेऊ लागले आहेत. त्यातील एकीने नुकतेच जागतिक मानसिक आरोग्य परिषदेत अनुभवकथन केलं. त्यांच्या कामांमुळे गावात नवीन ‘आशा’ निर्माण झाली आहे. जगण्याचं बळ देणाऱ्या या कार्यकर्त्यांना भेटल्यावर, बोलल्यावर जाणवतं की त्यांनी त्यांच्या आयुष्याला तर एक दिशा दिलीच, मात्र गावच्या आरोग्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठीही त्या सज्ज आहेत.
त्यांच्यातल्याच एक नंदाताई. माहेरी कौतुकात वाढलेल्या नंदाताईंना सासरच्या घरात मात्र ‘ब्र’ काढायचीही परवानगी नव्हती. गंगापूर तालुक्यातल्या नांदेडा गावात राहणाऱ्या नंदाताई चारचौघींसारख्याच. त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना नवरा दारू पितो हे माहीत नव्हतं. लग्न झालं तेव्हा कधी कधी दारू पिणाऱ्या नवऱ्याचं व्यसन वाढतच गेलं. एवढं की, सकाळपासून तो व्यसनात बुडून जायचा. त्यामुळे नंदाताईंच्या हाती शेतीची कामं आली. एके दिवशी मात्र नवऱ्याबरोबर जोरदार भांडण झालं. त्यानं डोक्यात फुंकणी घातली. मोठी खोक पडली. नंदाताईंना दवाखान्यात दाखल करावं लागलं. तेव्हा अनेकांनी सुचवलं ‘पोलिसात तक्रार कर!’ नंदाताईंनी तेव्हा विचार केला, कधी तरी त्याला पश्चात्ताप होईल कशाला तक्रार करायची. मात्र, त्यांनी जखमेवरील उपचाराची कागदपत्रं जपून ठेवली होती. त्यानंतर त्या नवऱ्याला नेहमी म्हणायच्या, ‘आता मारलं तर पोलिसात तक्रार करेन.’ त्यामुळे त्यांचा सासुरवास कमी झाला. दरम्यान, कुणी तरी त्यांना ‘आरोग्यमित्र’ होण्याबद्दल सुचवलं. याच काळात त्या डॉ. प्रतिभा फाटक यांच्या संपर्कात आल्या. हेडगेवार रुग्णालयाशी संबंधित ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या ‘आरोग्य संजीवनी’ प्रकल्पाचं काम डॉ. फाटक पाहतात. त्यांनी नंदाताईंना ‘आरोग्यमित्र’ बनविलं. त्यांच्या घरात आरोग्य बँक आली. किरकोळ आजाराच्या गोळ्या त्यांच्याकडे देण्यात आल्या. हळूहळू गावातील मंडळींना योग्य त्या आजारावर गोळ्या देण्याचा सराव नंदाताईंना होऊ लागला. मात्र, गावातल्या लोकांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसला नव्हता. एकेदिवशी गावात एकाने दारू पिऊन गळफास लावून घेतला. लोक जमा झाले. एकाने नंदाताईंना म्हटलं, ‘जरा बगा, जित्ता आहे का मेला? तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त कळतं म्हणे.’ नंदाताईंनी गळ्याजवळची नस तपासली. ‘उपचारासाठी पुढे न्या,’ त्यांनी सांगितलं. त्या व्यक्तीवर उपचार झाले आणि तो आजही जिवंत आहे. तेव्हापासून गावातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि आजारी व्यक्तींवर उपचार करण्याचा नंदाताईचा, मर्यादित का होईना पण मार्ग सोपा झाला.
ताप आला, हगवण लागली किंवा डोकं दुखलं तरी गावातल्या स्त्रिया रात्रीदेखील त्यांचं दार ठोठावू लागल्या. एका बाजूला हे काम सुरू होतं तर दुसरीकडे नवऱ्याचं दारूचं व्यसन काही कमी होत नव्हतं. नवऱ्याच्या वागण्याला कंटाळून नंदाताईंनी आपल्या मुलाला माहेरी पाठवलं. पण आजोळी असतानाच तापाचं निमित्त होऊन तो त्यातच गेला. त्यांच्या आयुष्यातला जगण्यातला रसच गेला. मात्र त्याच वेळी एकदा एका आरोग्य शिबिरात गेल्या असता, ‘दारू पिणं व्यसन नाही, आजार आहे,’ असं त्यांना समजलं. तेव्हापासून त्यांचा नवऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपलं दु:ख बाजूला सारून त्या परिस्थितीशी दोन हात करायला तयार झाल्या आणि स्वत:ला आरोग्य सेविकेच्या कामात गुंतवून घेतलं. त्या कामाचं सखोल ज्ञान करून घेतलं. त्या आता फक्त त्यांच्या गावातच काम करत नाहीत तर सहा गावांत काम करतात. वेगवेगळी उपकरणंही त्या वापरायला शिकल्या आहेत. केवळ दहावी पास असणाऱ्या नंदाताई आता रक्तदाब मोजतात. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण काढू शकतात. एवढंच नाही तर गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजतात. या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना रक्तदाब मोजण्याचं मशीन, गुल्कोमीटर, वजन व उंची तपासणीचं साहित्य देण्यात आलं आहे.
नंदाताई गावोगावी जातात, गावातील स्त्रियांची तपासणी करतात. त्यांच्या नोंदी घेणाऱ्या अ‍ॅपमध्ये त्या माहिती भरतात. कोणत्या नोंदी अधिक गंभीर यांचे निकष त्यांना आता पाठ झाले आहेत. त्याबरोबर ग्रामीण भागातील पुरुषांची मानसिकता आणि स्त्रियांकडून आरोग्याबाबतीत नक्की कुठे दुर्लक्ष होते याची यादी त्यांना जणू पाठ आहे. बाईपणाच्या बंधनावर मात करत नंदाताईंची धिटाई एवढी की नुकत्याच जागतिक महिला आरोग्यावरील परिषदेत त्यांनी माता-बाल आरोग्यावरील त्यांच्या कामाचे हिंदीतून सादरीकरण केले. त्या म्हणाल्या, ‘इंग्रजी फारसे कळत नाही. पण जे केले ते सांगितले. आता कौतुक होत आहे.’
जशा नंदाताई तशाच प्रभावती पडूळ. गाय-वासरू आणि ‘पोलन’ हे यांचं आयुष्य. पोलन म्हणजे फुलांच्या परागीकरणाची प्रक्रिया. भेंडीच्या पिकात फूल हातात घेऊन दुसऱ्या फुलाला लावावे लागते. पहाटे ही प्रक्रिया नाही केली तर परागकण गळून पडतात. त्यामुळे थोडंसं फटफटलं की प्रभावतीबाई शेत गाठतात. काम एवढं की, कोणाशी बोलण्याची उसंतच नसे. प्रभावतीबाईंना दोन मुली व एक मुलगा. एकदा नवऱ्याच्या मनात शेत विकण्याचं खूळ आलं. मोठय़ा हिकमतीने त्यांनी ते रोखून धरलं तरी एक एकर शेत विकावच लागलं. त्याच वेळी प्रभावतीबाईंनी नवऱ्याला अट घातली, उरलेली शेती त्यांच्या नावावर करायची. हे सगळं सुरू असेपर्यंत प्रभावतीबाईंचं आयुष्य चूल-मूल आणि पोलन एवढंच, पहाटेपासून ते झोपेपर्यंत! आता त्या हातमाळी गावाच्या आरोग्याची काळजी घेतात. प्रभावतीबाईंचे शिक्षण १० वीपर्यंतच. मात्र, कोणत्या बाईची प्रसुती अधिक धोक्याची हे त्या अचूक सांगतात. गावातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या-कोताऱ्यापर्यंत प्रत्येकाची मानसिकता कशी आहे, याचं त्यांना भान आहे.
आठ वर्षांपूर्वी त्यांनी ‘आरोग्यमित्र’ व्हावं, असं त्यांच्या दिरानं त्यांना सुचवलं. चार पसे मिळतील म्हणून त्यांनी हे काम स्वीकारलं. गावातच किरकोळ आजारावर त्या गोळ्या देऊ लागल्या. ताप आल्यावर, अतिसार झाल्यावर काय करायचं हे सांगत आणि औषधोपचार करत. आता त्यांचं काम वाढलं आहे. कारण त्यांना मिळालेल्या डिजिटल किटमुळे त्या अधिक जणींची तपासणी करतात. त्या सांगत होत्या, ‘कितीही संकटात असलो तरी एखाद्या बाईच्या कडेवर बाळसेदार मूल बघितलं की सगळं विसरून जायला होतं.’
नंदाताई, प्रभावतीबाईंना साथ देणाऱ्या औरंगाबाद तालुक्यातील शकुंतला बारबले यांची कहाणीही नंदाताईंशी मिळतीजुळती. नवऱ्याचं व्यसन, घरातील कामांचा व्याप असताना त्या गावोगावी जाऊन महिलांमधील विविध समस्यांवर उपाय शोधत असतात. त्या काम करत असलेल्या लामकाना गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे रात्री कोणाला काही झाले तर औषध मिळणे अवघडच. शकुंतलाताईंकडील गोळ्यांचा डब्बा आता गावकऱ्यांनाही ठाऊक झाला आहे. अडी-अडचणीला त्याचाच वापर होत असतो.
गावातील आठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाचे रक्तातील हिमोग्लोबिनचे खूपच खालावले होते. शहरात जाऊन रक्त देण्यास डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर महागडी औषधं घेण्याची ऐपत नसलेल्या त्या मुलाच्या आई-वडिलांना शकुंतलाताईंनी मुलाच्या जेवणात कोणते बदल करावेत ते सविस्तर सांगितलं. त्यानुसार शेंगादाणे, पेंडखजूर आणि योग्य आहार दिल्यावर त्या मुलाला तरतरी आली. अशी किती तरी उदाहरणे देता येतील. गावोगावी आरोग्यमंत्र देणाऱ्या संगीता कुबेर, यशोदा पठाडे, मंदा दाभाडे, वर्षां जाधव सध्या औरंगाबादच्या आरोग्य क्षेत्रात योगदान देत आहेत. सहा जणींनी आता संस्था स्थापन केली आहे. ‘ग्राम संजीवनी प्रतिष्ठान’ असे त्या संस्थेचे नाव. हेडगेवार रुग्णालयाने या संस्थेतील कार्यकर्त्यांकडून १७०० जणींची हिमोग्लोबिनची तपासणी केली. त्याचा १५ हजार रुपयांचा धनादेशही संस्थेच्या नावावर जमा झाला आहे.
सहा जणीचं व्यक्तिगत आयुष्य थोडंफार प्रमाणात सारखंच, पण त्याला मर्यादा न मानता वेगळ्या वाटेनं जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांचं आयुष्य तर बदलून गेलाच, पण समाजाच्या, गावाच्या आरोग्यालाही दिशा मिळाली..
suhas.sardeshmukh@expressindia.com

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं