निवृत्तीनंतर शेती करण्यासाठी बीड-बोरगाव या गावी पोहोचलेल्या अलका यांना धक्का बसला तो या गावात एकही शौचालय नसल्याचं समजल्यानंतर. मग सुरू झाली ती धडपड गाव हागणदारीमुक्त करण्याची. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन गावातले ९५ टक्के गावकरी शौचालयाचा वापर करत आहेत.  हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. गाव छोटंच, त्यामुळे तसं यशही त्यापुरतंच, पण तरीही संपूर्ण गाव एका चांगल्या कामासाठी पुढे येतं आणि यशस्वी होतं तेव्हा त्याचं मोल वेगळंच असतं.

शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातून मी २०१४ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तिवेतनावर माझं सगळं उत्तम सुरू होतं. मात्र निवृत्तीनंतर काही तरी वेगळं केलं पाहिजे, असा विचार मनात घोळत होता. नागपूरपासून २६ किमी अंतरावर बीड-बोरगाव या गावात माझी थोडीफार शेती आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती करावी असा विचार सुरू झाला आणि तो अमलात आणण्यासाठी मी या गावी आले. आमचं शेत गावालगत म्हणता येईल, पण गावाबाहेरच आहे. माझ्या शेतात काम करणाऱ्या राजाने आम्ही शेतीसाठी जमीन साफ करायला घेतल्यावर सांगितलं, ‘‘बरं झालं आपण इथं शेती करणार ते. नाही तर गावातल्या अडल्यानडल्या बायका त्याचा वापर परसाकडला जाण्यासाठी करतात. आता जागेचा चांगला वापर होईल.’’ गावात आल्यावर लक्षात आलं ते म्हणजे इथे कोणत्याच घरात शौचालय नसल्याचं आणि गावातील स्त्रिया उघडय़ावर शौचाला जात असल्याचं.

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
water supply from vvmc still not provided global city area of virar
विरारचा ग्लोबल सिटी परिसर अजूनही तहानलेला

फेब्रुवारी २०१५ मधील हा प्रसंग असेल.. दूरचित्रवाणीवर विद्या बालनची जाहिरात पाहिली. मग ‘स्वच्छ भारत’च्या समस्येचा उलगडा झाला. डोक्यात या प्रश्नानं घर केलं. ५२ घरांच्या छोटय़ा वस्तीचं हे बीड-बोरगाव, पण एकाही घरात शौचालय नाही. इथून पाच कि.मी. अंतरावर देवळी-सांगवी ही गट ग्रामपंचायत. गावात दूरचित्रवाणी संच, मोबाइल, दुचाकी सर्व काही होतं, पण घरात शौचालय असावं असं मात्र कुणालाही वाटत नव्हतं. मात्र मी जशी गावात जाऊ लागले तसतसा या प्रश्नाचा उलगडा मला होऊ लागला. थोडक्यात काय, तर घरात भौतिक साधनांची विपुलता, पण शौचालयाची गरज मात्र कुणालाच जाणवत नव्हती. बरं हे गाव दुर्गम म्हणावं अशीही स्थिती नाही. तरीही म्हणतात ना ‘माणूस हा सवयीचा गुलाम’ तसाच काहीसा प्रकार.. राजानं या मुद्दय़ाचं गांभीर्य त्याच्या भाषेत सांगितलं होतंच आणि मी गावात शौचालयं बांधायचंच या विचाराने भारले गेले.

नोकरीनिमित्त आरोग्य खात्याशी संबंध असल्यानं उघडय़ावर शौचालयाला जाणं किंवा घरात शौचालय नसणं यांच्या दुष्परिणामांची माहिती होती. शौचालय बांधण्याचा निर्धार मी केला असला तरी अनेक शंका, प्रश्न उपस्थित झाले. एवढय़ा मोठय़ा सामाजिक कार्याला प्रारंभ करतोय, मात्र ते नक्की झेपेल ना, याची धाकधूक होती. काम अर्धवट राहिले तर काय? अशीही भीती होती. कामासाठी पैसे कुठून आणणार? असे एक ना अनेक प्रश्न मनात आले. मात्र जिद्दीने पुढे गेले. माझ्या मैत्रिणी, लता आणि ललिता यांनी या कामी मला उत्तम साथ दिली. मुख्य मुद्दा होता गावातल्या स्त्रियांना एकत्र कसं भेटायचं हा? त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय या कामाची सुरुवात करणं अवघड होतं. आधी त्यांच्याशी बोलून तर घेऊ असं ठरवलं. त्याकामी राजाची पत्नी रेणुका माझ्या मदतीला धावून आली. तिच्या मदतीने गावातल्या स्त्रियांशी संवाद साधला, त्यांना बोलतं केलं. ‘‘घरात शौचालय का नको?’’ या प्रश्नावर त्या नि:शब्द झाल्या. सततच्या संवादानं आणि शौचालयाचं महत्त्व त्यांना पटवून दिल्यानं हळूहळू त्यांना शौचालयाची गरज समजू लागली. त्यानंतर गावात शौचालय बांधण्याचे प्रयत्न सुरू केले.

सुरुवातीला काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला, मात्र हाती निराशा आली. एका स्वयंसेवी संस्थेने तर निधी तुम्ही गोळा करून आम्हालाच २० टक्के द्या, असा प्रस्ताव दिला. ते तर कठीणच होतं. हे सगळं सुरू असतानाच मधल्या काळात मी परदेशात गेल्याने शौचालयाचा विषय थोडा बाजूला पडला. परदेशातून आल्यावर मी पुन्हा या प्रश्नाकडे मोर्चा वळवला. शौचालयाच्या उभारणीसाठी मी जिल्हा परिषदेकडे गेले. जिल्हा परिषदेने जी तयार शौचालये इतरत्र दिली होती त्याबाबत वेगळीच समस्या होती. ती गरम होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे लोकांना त्याचा वापर करणं आवडत नव्हतं. मग काय तो विषयही सोडून दिला. या काळात गावात जाणं व्हायचं, पण मूळ विषय काही मार्गी लागत नव्हता. नुसतंच कागदोपत्री सगळं सुरू असल्यानं गावकऱ्यांना माझ्याबाबत विश्वास वाटत नव्हता. अनेक जण राजालाच त्याबाबत सुनावत. ‘तुझ्या ताईला बरेच पैसे मिळाले असतील’, असं बोलायलाही काहींनी कमी केलं नाही. राजाला मी करत असलेली खटपट माहीत असल्याने त्याला त्याचे वाईट वाटे. ‘वाईट वाटून घेऊ नकोस’ असं सांगून त्याला टीकेकडे दुर्लक्ष करायला सांगायची.

शौचालयाच्या बांधणीसाठी बरीच खटपट केल्यावर रोटरियन जयंत देव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांना हा प्रकल्प मनोमन आवडला. त्यानंतर मग रोटरीच्या मदतीने काम सुरू झालं. गावकऱ्यांचं श्रमदान आणि आर्थिक सहभाग असल्यासच प्रकल्प पुढे जाईल हे गावकऱ्यांना पटवून देण्यात आलं. तीन हजार रुपये आणि प्रत्येक कुटुंबाने खड्डा खणून द्यायचा हे निश्चित करण्यात आलं. एवढी रक्कम गावकरी एकदम उभारू नाही शकणार हे मी जाणून होते. म्हणून गावकऱ्यांना सोयीचे पडतील असे पाचशेचे हप्ते पाडण्यात आले. तशी लेखी हमी त्यांच्याकडून घेतली. केवळ आर्थिक अंगानेच नव्हे तर शौचालय वापरण्याची आणि स्वच्छ ठेवण्याची हमी त्यांच्याकडून घेतली. थोडक्यात, आपणही या प्रकल्पातील एक घटक आहोत हे मनोमन पटावं यासाठीचे ते प्रयत्न होते.

फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं. गावातील लोकांकडून पैसे गोळा करणं ते रोटरीला देणं, पुन्हा त्यांच्याकडून पैसे घेऊन ठेकेदार आणि इतरांना देणं हा व्याप मी केला. आता माझ्याविषयीचं चित्र बदललं होतं. सुरुवातीला काम लांबल्यानं गावकऱ्यांचा माझ्याप्रति असलेला अविश्वास माझ्या कामामुळे हळूहळू विश्वासात बदलला. सातत्यानं गावात गेल्यानं त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. कामात सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. संबंधित लाभार्थी व ठेकेदार यांची कामाबाबत वेगवेगळी मतं होती. थोडे वाद झाले, काम रेंगाळणार की काय असं वाटू लागलं. त्यातून काही गावकरीही संतापले. तुमचे तीन हजार परत देऊन दुसऱ्या गावी जाऊ, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर गावकऱ्यांनी कामास संमती दिली. असे अनेक अडथळे पार करत पहिला २० शौचालयांचा टप्पा मे २०१६ ला पूर्ण झाला. या सगळ्या कालावधीत गावकऱ्यांना घरात शौचालय असण्याची आवश्यकता पटली होती ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब होती. अर्थातच दूरचित्रवाणीवर त्याबाबतच्या जाहिरातीही तेवढय़ाच परिणामकारक ठरल्या. हे माध्यम मनाचा ठाव घेते हे मान्यच केलं पाहिजे. नागपुरात शिकायला असलेला घरातला मुलगा-मुलगी, शहरातले पाहुणे शौचालय बांधले तरच सुट्टीत गावात येतील अशी खात्रीही त्यांना पटली होती.

ऑक्टोबर २०१६ मध्ये पुढचा २० शौचालयांचा टप्पा सुरू झाला. दुसरा टप्प्यात खड्डे घेताना अनेक गमतीजमती आल्या. काहींनी कुटुंबात जास्त माणसे आहेत, तेव्हा तो खड्डा लवकर भरेल म्हणून मोठे खड्डे घेतले. पाचशे रुपये दिल्यानंतर कामाला सुरुवात होणार होती त्यातही अनेक जणांनी विलंब लावला.

शौचालय वापराबाबत तर मजेशीर अनुभव आले. शौचालयात गेल्यावर कोणत्या बाजूला बसायचे हेच अनेकांना माहीत नव्हतं. काहींनी तर चक्क स्नानासाठी शौचालयांचा वापर केला. काही गावकऱ्यांना उघडय़ावर जाणंच बरं वाटे. एका शाळकरी मुलीनं मला शौचालयात जायलाच आवडत नाही, असं स्पष्ट सांगितल्यावर तिच्या शिक्षिकेकरवी समजवावं लागलं. गावात शौचालय वापरासाठी मोठय़ा प्रमाणात प्रबोधन करावं लागलं. त्या वेळीही अनेक बरे-वाईट अनुभव आले, मात्र गावकऱ्यांनी साथ दिली हे मान्यच करावं लागेल. त्यातून मला पुढे जाता आलं आणि दुसरा टप्पा मार्गी लागला. तिसऱ्या टप्प्यातलाही अनुभव वेगळाच होता. काही गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून शौचालयासाठी १२ हजार मंजूर करून घेतले. ते आमच्याकडे आले. ‘आम्ही तीन हजार देतो, शौचालय बांधा,’ असा त्यांचा सरळ हिशेब होता. तीन हजारांत शौचालय बांधल्यावर उरलेले नऊ हजार आपल्याला मिळतील, असं त्यांना वाटत होतं. मात्र जिल्हा परिषदेच्या नियमांप्रमाणे गुणवत्तापूर्वक शौचालय बांधायचं असल्यास १२ हजार द्यावेच लागतील, असं त्यांना ठामपणे सांगितलं. नंतर प्रत्येकाने आगाऊ तीन हजार रुपये दिले. हे काम जानेवारी १७ मध्ये सुरू झालं. त्याला फारसा विलंब लागला नाही. अर्थात काही अडचणी आल्या. काही जणांनी पैसे देण्यास विलंब केला. त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागला, पण त्यावर मात करत ती शौचालयं पूर्ण केली.

आज बीड-बोरगावातले ९५ टक्के गावकरी शौचालयाचा वापर करतात. मी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आहे. उघडय़ावर शौचाला बसण्यापासून गाव मुक्त व्हावं यासाठी आता पुढचे प्रयत्न सुरू आहेत. गावात आणखी शौचालये बांधण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. एकूणच बीड-बोरगावमध्ये निवृत्तीनंतर शेती करण्यासाठी गेलेले मी, वेगळ्याच समस्येने माझ्या मनात घर केले, त्यात गावकऱ्यांनी साथ दिली. त्यामुळे जिद्दीने हाती घेतलेले काम आज काही प्रमाणात पूर्ण करू शकले याचे निश्चित समाधान आहे.

एका छोटय़ा गावातून सुरू केलेला स्वच्छतेचा हा वसा, असाच अनेक गावागावांतून यशस्वी व्हायला हवा, तरच ‘स्वच्छ भारत’ ही फक्त संकल्पना राहणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला आत्मप्रतिष्ठेचं आयुष्य जगण्याचा अनुभव येईल.

alkajog@gmail.com

chaturang@expressindia.com