आपल्या मनात सामाजिक आरोग्य या विषयाला अजून तितकं महत्त्वाचं स्थान आलेलं दिसत नाही. आपली आरोग्याची संकल्पना आजही ‘माझा आहार, माझा व्यायाम, माझी तब्येत, माझी औषधं, माझे डॉक्टर आणि माझा आरोग्य विमा’ अशा एका संकुचित वर्तुळात अडकलेली आहे. खरं तर, ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य सामाजिक घटकांवर अवलंबून असतं. आपलं सामाजिक आरोग्य टिकावं म्हणून प्रत्येक देश काही ना काही उपाययोजना करीत असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात चाललेले वेगवेगळे प्रयोग समजून घेणं, त्यातील यशस्वी आणि अपयशी मार्गाचं विश्लेषण करणं आणि आपल्या देशाच्या विशिष्ट गरजांनुसार या मार्गातले निदान काही वेचे उचलणं आपल्या समाजाला फायदेशीर ठरू शकतं. अशाच काही प्रयोग, उपाययोजनांची माहिती देणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

मुक्ता गुंडी यांनी फिजिओथेरपीमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर गडचिरोली येथील ‘सर्च’ या संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातून सामाजिक आरोग्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘ग्लोबल हेल्थ ब्रिज’ या संस्थेत समन्वयक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आय.आय.टी. गांधीनगर येथे आरोग्यविषयक प्रकल्पांवर संशोधन साहाय्यक म्हणून काम केले. सध्या त्या आय.आय.टी. गांधीनगर येथे सामाजिक आरोग्य विषयात डॉक्टरेट करीत आहेत. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहमदाबाद जिल्ह्य़ाच्या मानवी विकास अहवालाचे त्यांनी सहलेखन केले आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

सागर अत्रे यांनी औषधनिर्माणशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. पदवीचे शिक्षण चालू असतानाच त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रात मुक्त पत्रकार म्हणून सुमारे ४ वर्षे काम केले. गडचिरोली येथील ‘सर्च’ या संस्थेत काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओहायो विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१२ मध्ये त्यांना अमेरिकेतील ‘साउथ एशियन जर्नलिस्ट असोसिएशन’ या संस्थेची प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळाली. पुढे न्यूयॉर्कमधील ‘प्रोपब्लिका’ या शोधपत्रकारिता करणाऱ्या संस्थेत त्यांनी आरोग्य-पत्रकारितेवरील संशोधन प्रकल्पावर सहसंशोधक म्हणून काम केले. सध्या ते हार्वर्ड विद्यापीठ, आय.आय.टी. गांधीनगर आणि गॉटीन्गेन विद्यापीठ यांच्या बिहारमध्ये राबवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. आरोग्य, पत्रकारिता आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील रुचीबरोबरच त्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे.

बातमी १: ‘आज सेन्सेक्स ४२१ अंकांनी गडगडला’

बातमी २: ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार पर्यावरणातील धोकादायक बदलांमुळे २०३० ते २०५० या कालावधीत जगात दरवर्षी सुमारे २,५०,००० पेक्षा अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे.’

बातमी ३: ‘जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत जगातील घन कचरा निर्माण होण्याचे प्रमाण दिवसाला ६ लाख टन इतके होणार आहे.’

बातमी ४: ‘आज जगातील सुमारे ४०० दशलक्ष लोकांना मधुमेह आहे, त्यापैकी जवळजवळ ६० दशलक्ष मधुमेहग्रस्त जनता भारतीय आहे. भारताला जगाची ‘मधुमेहाची राजधानी’ असे म्हटले जाते.’

बातमी ५: ‘क्ष कपूर आणि य खान यांच्या

नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावले ३०० कोटी रुपये.’

रोज रोज डोळ्यांवर-कानांवर आदळणाऱ्या अशा बातम्या वाचत-ऐकत असताना आपल्या मनात जे तरंग उठतात ते काहीसे असे असतात- ‘अरे बापरे, सेन्सेक्स गडगडला आहे. गुंतवणुकीचं काय होणार.’, ‘क्ष कपूर आणि य खानचा चित्रपट चांगला चालला यंदा, पाहायला पाहिजे रविवारी!’, ‘मधुमेह वाढलाय म्हणे भारतात.. साखर जरा कमी केली पाहिजे’..

‘जगात वाढलेला कचरा, जगातील तापमान बदल’ यांचे परिणाम हे अजूनतरी मी महाराष्ट्रात जिथे नाश्ता करत बसलो/बसले आहे तिथपर्यंत पोहोचल्यासारखं वाटत नाहीत, त्यामुळे ते सेन्सेक्स आणि कपूर-खानच्या बातमीइतके महत्त्वाचे न वाटण्याचीच शक्यता जास्त! थोडक्यात काय, तर आपल्या मनात सामाजिक आरोग्य या विषयाला अजून तितकं महत्त्वाचं स्थान आलेलं दिसत नाही. आपली आरोग्याची संकल्पना आजही ‘माझा आहार, माझा व्यायाम, माझी तब्येत, माझी औषधं, माझे डॉक्टर आणि माझा आरोग्य विमा’ अशा एका संकुचित वर्तुळात अडकलेली आहे. खरं तर, ‘माझं’ म्हणून जे वैयक्तिक आरोग्य असतं ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य सामाजिक घटकांवर अवलंबून असतं. त्यामुळेच जगात वाढत जाणारा कचरा आणि जगातील पर्यावरणीय बदलाचे होणारे परिणाम यांना जितकी एक व्यक्ती कारणीभूत असते तितकीच ती व्यक्ती या सगळ्या घटकांच्या परिणामांना सामोरीही जात असते. काही घटकांचे परिणाम तीव्र आणि ताबडतोब दिसणारे आहेत, काही घटकांचे परिणाम सहज दिसणारे नाहीत तर काही घटकांचे आरोग्यावरील परिणाम सिद्ध व्हायला काही काळ जावा लागेल. परंतु हे सगळे घटक समजून घेत सामाजिक आरोग्याच्या संकल्पनेचं वर्तुळ वाढवणं आज अत्यंत गरजेचं आहे.

सामाजिक आरोग्य नेमकं किती व्यापक असतं, हे समजावणारा ‘असोसिएशन ऑफ स्कूल्स अ‍ॅण्ड प्रोग्रॅम्स ऑफ पब्लिक हेल्थ’ या अमेरिकेतील संस्थेतर्फे प्रकाशित झालेला ‘धिस इज पब्लिक हेल्थ’ नावाचा एक सुंदर व्हिडीओ आहे. यू-टय़ूबवरील या व्हिडीओत रस्त्यांवर भेटणाऱ्या वेगवेगळ्या माणसांना थांबवून एकच प्रश्न विचारण्यात येतो, ‘सामाजिक आरोग्य म्हणजे तुमच्या मते काय?’ दिलेली उत्तरं खूप काही सांगून जाणारी आहेत- कुणी म्हणतं, ‘खाण्याच्या सवयी’, कुणी विचार करून सांगतं, ‘कर्करोग झालेल्यांना मदत करणं’, काही जणांना हा प्रश्न अवघड वाटतो, ते म्हणतात, ‘माहीत नाही बुवा’ आणि कुणी एखादा सहज सांगून जातो, ‘सामाजिक आरोग्य म्हणजे आपल्या आजूबाजूचं सगळंच!’ यानंतर संस्थेचे कार्यकर्ते पटापट जिथे-तिथे ‘धिस इज पब्लिक हेल्थ’ (‘हे आहे सामाजिक आरोग्य!’) असे स्टिकर्स चिकटवू लागतात- सार्वजनिक बसवर, फळांवर, ‘नो स्मोकिंग’च्या पाटीवर, मेन्यू कार्डवर, सार्वजनिक नळावर, हेल्मेटवर. अशी ठिकठिकाणी लावलेली ‘धिस इज पब्लिक हेल्थ!’ असं मनावर ठसवणारी स्टिकर्स पाहिली की आपण समजून चुकतो- सामाजिक आरोग्य म्हणजे आपल्या आजूबाजूचं सगळंच की!

एक उदाहरण घेऊ-मुंबईत राहणारी लोकलने प्रवास करून नोकरी करणारी तीस वर्षांची एक स्त्री उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. तिला होणाऱ्या या त्रासाकरिता आजूबाजूचं काय काय जबाबदार धरता येईल? तिच्या खाण्याच्या सवयी, तिच्या आई-वडिलांचं आरोग्य, तिला खाण्याकरिता उपलब्ध असणाऱ्या सोयी, तिची आर्थिक परिस्थिती, खाद्यपदार्थाच्या किमती, कुटुंबाकडून आणि समाजाकडून तिला मिळणारी वागणूक, लोकलच्या प्रवासाचा ताण, नोकरीच्या ठिकाणी असलेली आव्हाने, दिवसभराचे तिच्या हाताबाहेर गेलेले वेळापत्रक, डॉक्टरांकडे जाण्यासाठी असलेला अपुरा वेळ, शहरातील प्रदूषण आणि गोंगाट, प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाचे पडणारे अपुरे प्रयत्न, भांडवलशाहीने व्यापलेले जगातील स्पर्धात्मक जीवन.. विचार करत गेलं की जाणवेल की हे वर्तुळ व्यक्तीपासून सुरू होते आणि समाजातल्या बहुतांश परिघांना व्यापून जागतिक पातळीवर जाऊन पोहोचते.

आपण एक व्यक्ती म्हणून ज्याच केवळ एक प्राथमिक बिंदू आहोत असे हे सामाजिक आरोग्य जगात घडणाऱ्या कित्येक चांगल्या-वाईट अशा रोज नव्याने उदयास येत असलेल्या विचार आणि प्रक्रियांशी जाऊन थांबते. आरोग्याचा प्रत्येक प्रश्न रुग्णालयात जाऊन किंवा गोळी घेऊन सुटत नसतो. कचरा, हवेतील बदल, आर्थिक व सामाजिक विषमता, अन्यायकारक धोरणे, अपुरी शासनव्यवस्था आदी सर्व घटकांमुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न आपल्या सामाजिक आयुष्याच्या साच्यातच तयार होतात आणि तिथेच त्यांची मुळे रोवलेली असतात! ते प्रश्न त्या साच्यातूनच समूळ काढून फेकणे गरजेचे आहे.

आजच्या जगात घराची खिडकी आपल्याला समोर जे प्रत्यक्ष दिसते आहे त्याच्या पलीकडचं बघायला शिकवते. आकाशातून चाललेलं विमान काही तासांत दुसऱ्या देशात जाऊन उतरणार आहे, समोर दिसणारी क्षितिजाची रेघ केवळ माझ्या देशाला नव्हे तर फार व्यापक अशा जमिनीच्या तुकडय़ाला सामावून घेत आहे, याची तीव्र जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. जगाच्या नकाशावर देशादेशांमध्ये सीमारेषा असल्या तरी दुसऱ्या देशात उभे राहिलेले आरोग्याचे प्रश्न, तिथे केलेल्या उपाययोजना, त्यात आलेले यश-अपयश, त्याचे होणारे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक असे विविधांगी परिणाम आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला मिळणारा सूचक संदेश समजून घेणे, ही म्हणूनच आजच्या काळाची गरज आहे.

अमर्त्य सेन आणि महबूब उल हक या दोन अर्थतज्ज्ञांनी अनेक वर्षांपूर्वी मानवी क्षमतांवर काही महत्त्वाचे विचार मांडले होते. त्यांनी मांडलेल्या विकासाच्या आराखडय़ाला ‘मानवी विकास निर्देशांक’ असे संबोधले जाते आणि आज तो निर्देशांक जगातील एक महत्त्वाचा पायंडा मानला जातो. या निर्देशांकाचा मुख्य विचार काय- ‘कुठल्याही समाजाला आनंदी आणि कार्यक्षम आयुष्य जगायचे असेल तर त्या समाजातील सर्व स्तरातील लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि त्यांना असणाऱ्या रोजगाराच्या संधी या समान किंवा किमान सर्वाच्या आवाक्यात असायला हव्यात.’ हक आणि सेन म्हणतात की, ‘समाजातील श्रीमंत आणि गरीब अशी वर्गवारी कदाचित समूळ नष्ट होण्यास फार मोठा काळ जावा लागेल, परंतु शोषण आणि असमानता कमी करण्याकरिता शासनाने सतत कटिबद्ध राहायला हवे’. मुळातच समाजाची सर्वागीण, न्याय्य आणि सर्वसमावेशक प्रगती होण्यासाठी त्या समाजाचा पाया मजबूत असणे अनिवार्य आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ तसेच समाजशास्त्रज्ञ यांचे एकमत आहे की ‘समाज निरोगी असेल तरच सर्वागीण प्रगती शक्य आहे.’ हा महत्त्वाचा कानमंत्र लक्षात ठेवून जगातील अनेक देशांनी आपल्या परीने आपल्या समाजाचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ही लेखमाला अशाच काही वेगळ्या, द्रष्टय़ा यंत्रणांचा उलगडा वाचकांना करून दाखवणार आहे. क्युबा किंवा मेक्सिकोसारखे काही देश जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत अशा देशांनी सामाजिक आरोग्याच्या क्षेत्रात काही धाडसी पावले उचलली आहेत. जवळजवळ पाच दशके अमेरिकेने लादलेल्या व्यापारबंदीला तोंड देत क्युबाने देशभर प्रभावी आरोग्य यंत्रणा उभारली, इतकेच नाही तर आफ्रिकेत इबोलाची भयानक साथ पसरल्यावर तेथे सगळ्यात मोठे वैद्यकीय पथक पाठवणाऱ्या देशांपैकी एक देश क्युबा होता! देशात एड्सग्रस्त स्त्रीच्या गर्भाला एड्सची लागण होऊ  नये याची शंभर टक्के निश्चिती करणे हे जगात सर्वात प्रथम साध्य करणारा देशही क्युबाच आहे. मेक्सिकोने जनतेतील मधुमेह व हृदयरोगाचे वाढते प्रमाण पाहून २०१३च्या अखेरीस शीतपेयांवर कर लादला. हे धाडसी पाऊल उचलणे आज कोिल्ड्रक कंपन्यांच्या आर्थिक सत्तेमुळे अजून जवळजवळ कोणालाच उचलता आलेले नाही. दुसऱ्या बाजूला फिनलंडसारखा सुबत्ता असलेला देश नवजात बालक तसेच मातांची एका अतिशय अनोख्या पद्धतीने काळजी घेत आहे. ही झाली केवळ काही उदाहरणे! अशा वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेल्या देशांनी समाजाला अधिक आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने टाकलेली पावले पाहिली की आपल्यालाही एक समाज म्हणून अधिक आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी नवीन स्फूर्ती मिळू शकते, हा विश्वास बाळगून आम्ही हे सदर लिहिणार आहोत.

आरोग्याच्या काही समस्यांकरिता आपल्याही देशाने यशस्वी पावले टाकली आहेत. भारताच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे काम असो किंवा इबोलासारख्या देशोदेशी पसरलेल्या संसर्गजन्य रोगांना आपल्या देशात येण्यापासून रोखण्याचे केलेले काम असो, ही देशांतर्गत घडलेली उदाहरणेही महत्त्वाची आहेत. अशा काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशस्वी कथांबरोबरच आपण काही देशांमध्ये फोल ठरलेले प्रयत्न, योजना किंवा धोरणेही पाहणार आहोत, ज्यांचे विश्लेषण आपल्याला एक समाज म्हणून काही शिकवू शकते. भारतापुढे आज क्षयरोग, मधुमेह, हृदयरोग, नव्याने निर्माण होणारे संसर्गजन्य रोग आणि जुने उलटणारे संसर्गजन्य रोग, अपुरी सार्वजनिक दळण-वळणाची साधने, अपघातांचे प्रचंड प्रमाण, प्रदूषण अशी अनेक स्वरूपाची बिकट संकटे उभी आहेत ज्यांचा एकत्रितपणे आपल्या समाजाच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. त्यांच्याशी सामना करायचा असेल तर एक व्यक्ती म्हणून आणि मुख्य म्हणजे एक जबाबदार समाजघटक म्हणून व्यापकतेने विचार करून आणि सचोटीने कृत्य करून तो सोडवण्याकरिता प्रयत्न होऊ  शकतात.

ही लेखमाला वाचताना कित्येकदा मनात ‘त्या देशात ठीक आहे, आपल्या समाजात हे कसे करणार?’ असे प्रश्न येतील. खरं तर ‘तिकडचे बी उचलून इकडे लावू’, असं सांगण्याचा या सदराचा उद्देश मुळीच नाही. तर आजूबाजूची हिरवळ पाहिली की आपल्याही मनात नवीन कल्पनांचे धुमारे फुटू शकतात, यावर विश्वास ठेवत आपल्याला या सदराद्वारे या वर्षीचा प्रवास करायचा आहे.

सामाजिक आरोग्याचं व्यापक होत जाणारं वर्तुळ मी आणि आपण यांना जोडणारं, समाज म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणारं, डोळ्यात अंजन घालणारं, मनाची कवाडं उघडून बाहेरचं जग आपलंसं करायला लावणारं असेल यात शंका नाही. मात्र या वर्तुळाच्या केंद्रबिंदूशीच अडकून न राहता ‘आरोग्यं ‘जन’संपदा’ ही नवी उक्ती समजून घेत या लेखमालेद्वारे यावर्षी जरा लांबची झेप घेऊ या!

 

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com