|| शुभा प्रभू साटम

आज असंख्य घरी, विशेषत: शहरात पोळीभाजी केंद्र वा घरी येऊन चपात्या करणाऱ्या मावशींचं प्रमाण वाढत चाललं आहे. इतर स्वयंपाकापेक्षा चपात्या-भाकऱ्या करणं, कामावरून थकून आल्यानंतर स्त्रियांसाठी जिकिरीचं होत चाललं आहे, म्हणूनच हा पर्याय आता घरोघरी स्वीकारला जाऊ लागला आहे. मात्र बाईच्या हातातील पोळपाट-लाटणं सुटलं म्हणजे ती मुक्ती झाली असं समजायचं का? असा खोचक सवाल इथं उठू शकतो. त्याला उत्तर हे की काम कमी होणं किंवा ते अन्य कोणी करणं, इतक्या तकलादू रुपकावर समानता आधारलेली नसते. कामामध्ये असणारा जुनाट लिंगाधिष्ठित विचार मागे पडतोय आणि बुद्धिनिष्ठ तर्कशुद्ध नजरेने पाहिलं जातेय, हा टप्पा महत्त्वाचा आहे.

life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
kalyan passengers marathi news, dombivli kalyan local trains marathi news
सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

रविवारची पहाट, मस्त थंडी. आज सुट्टी म्हणून सर्व जग गुरफुटून झोपलंय. अशा वेळी मालती खलाटेच्या घरात मात्र गॅस धडधडून पेटलाय आणि चपात्या भाजल्या जातायत. खरपूस शेकलेली चपाती मालतीबाई उलथण्याने सफाईदारपणे बाजूच्या तयार चपात्यांच्या जंगी चवडीत टाकतात. सूनबाईने तोपर्यंत पुढची चपाती लाटून तव्यावर टाकलेली असते. दोघींचं काम लयीत चालू असतं. भरभर पण शिस्तबद्ध! चपात्यांचा घाणा आटोपून भाकऱ्या करायला मालतीबाई सज्ज होतात. तांदळाची उकड मुलायम मळून भाकऱ्यांचा रगाडा सुरू होतो. घरभर फक्त भाकरी थापण्याचा आवाज थाप थाप थाप..

संसाराला हातभार म्हणून किंवा अधिक उत्पन्न म्हणून बाईने पोळपाट-लाटणे हातात घेणे हे तसे नवे नाही. अनेक वर्षांआधी शिक्षण नसलेल्या अथवा अन्य कौशल्याचा अभाव असलेल्या असंख्य स्त्रियांनी स्वयंपाकाच्या या अंगभूत कौशल्यावर स्वाभिमानाचा रोजगार मिळवला आहे. पण तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत आमूलाग्र फरक पडलाय. साधारणपणे ३०/३५ वर्षे आधी संसारी घरात बाहेरून डबा आणणं किंवा चपात्या/भाकऱ्या आणाव्या लागणं किंवा अगदी घरी चपात्या करायला बाई लावणं याला मुख्य कारण असायचं ते घरातली स्त्री आजारी पडणं किंवा तिची अनुपस्थिती. घरात असणाऱ्या बाईनं बाहेरून चपात्या मागवणं, यात तिच्या गृहिणीपणाचा पराभव आहे, असा शेराही मिळायचा आणि त्यातही आमच्या यांना/मुलांना तव्यावरची गरम पोळी नसली तर जेवतच नाही, अशी लादलेली कौतुकं असायची. बारा-चौदा तास बाहेर असणारी नोकरदार बाई घरी आली की प्रथम चपात्यांना भिडायची. नवरा घरात आरामात बसलाय आणि बायको काम उपसतेय हे दृश्य नवं नव्हतं आणि गैर तर वाटायचंच नाही. पण सध्या किंबहुना गेल्या पंधराएक वर्षांत हे चित्र बदलले आहे.. बदलते आहे.

बाहेरून चपात्या आणणे किंवा आता तर घरी चपात्या करायला बाई वा मावशी येणं हे निदान शहरात तरी सर्रास झालेय. गोरेगावात राहणारी वीणा पाटील (नाव बदलले आहे), कोणे एके काळी पहाटे उठून पोळीभाजी नव्हे तर सर्व स्वंयपाक करून निघायची आणि संध्याकाळी दमून परत आल्यावर पुन्हा स्वयंपाकघरातच जायची. त्याच वीणाने कालांतराने बाहेरून चपात्या आणण्याचा पर्याय निवडला, आणि तोही पूर्ण विचाराअंती. नाही जमत, यापेक्षा मला तो वेळ दुसऱ्या कामासाठी द्यायचा आहे किंवा माझ्यासाठी वाचवायचा आहे, ही भूमिका त्यामागे होती. आता यात नवं काय? नवं हे की स्वयंपाक तो पण सकाळ-संध्याकाळ चारीठाव करणे, या पारंपरिक मानसिकतेमधून अनेकजणी आणि हो, पुरुषसुद्धा बाहेर पडत आहेत.

तरुण मुलांनी बाहेरून डबा/चपात्या आणणे अथवा एकटय़ा पुरुषाने आणणे याकडे नकारात्मक नजरेने पाहिले जायचे नाही, पण तीच कृती घरात बाई असताना झाली की, त्यावरून त्या बाईची लायकी किंवा एकूणच तिची निष्ठा ताबडतोब जोखली जायची. दिवाळीचा फराळ विकत आणणाऱ्या बायकांकडे कसे पाहिले जायचे किंवा जाते तसेच! तर त्या गृहिणीपणाच्या परीक्षेत आपण नापास ठरू, या अदृश्य दडपणाने मुकाटय़ाने अनेकजणी सकाळ-संध्याकाळ कधी दहा, कधी वीस तर कधी चाळीस चपात्या करणे सहन करायच्या. या पूर्वग्रहदूषित मानसिकतेला सध्या अगदी उघडपणे मागे टाकलं जातंय. ज्यात नेहमीप्रमाणे तरुण आहेतच, पण स्त्रियाही आहेत. करिअर करणाऱ्या, उद्योजिका, नोकरदार स्त्रियाच नव्हे तर अगदी पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या घरातही तयार चपात्या येणे किंवा चपात्या करायला मावशी येणे नवलाईचे राहिलेले नाही. यात एक मानसिकता अशीही आहे की, जे काम मीच केलं पाहिजे किंवा करू शकते असे नाही. त्यासाठी दुसरीची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. तो वेळ मी माझ्यासाठी किंवा अन्य महत्त्वाच्या कामासाठी वापरू शकते. घरच्या कमाईतला थोडासा पैसा या वेगळेपणासाठी वा आरामासाठी घालवायला काहीच हरकत नाही, शिवाय त्यामुळे अनेकींचे संसारही उभे राहिलेले आहेत, हा त्याच्या आत दडलेला फायदा आहेच. चांगली गोष्ट ही की नवरा नावाचा पुरुषही या बदलाला स्वीकारतो आहे. वीणा पाटील सारखीच कोमल पंत (नाव बदलले आहे). तिने तिच्या नोकरदार आईची धावपळ पाहिली होती. आळशी आई म्हणून स्वत:ला शेरा मिळू नये यासाठीचे तिचे कष्ट पाहिले होते आणि त्यामुळेच जेव्हा तिला तयार चपात्यांचा पर्याय गोरेगावच्या प्रज्ञा रहाटेच्या रूपाने मिळाला तेव्हा तिने तो तात्काळ स्वीकारला. यात मला काहीही सिद्ध करायचे नाहीये. आम्ही दोघेही सकाळीच बाहेर पडतो. घरी येण्याच्या वेळा अनिश्चित, यामुळे अशा तयार चपात्या/ भाकऱ्यांचा पर्याय मला सोयीस्कर वाटला, असं कोमलचे आणि नवऱ्याचे सडेतोड मत आहे.

अर्थात अशीही काही घरे आहेत ज्यांना बाहेरच्या तयार चपात्या, भाकऱ्या आवडत नाहीत. आधी म्हटले तसे चवीचे चोचले, लाडावलेली जीभ, तर अनेक घरांत पोळी भाजीवाल्या मावशी/ताई येतात. आता यात कौतुक काय, तर अशी मदत घेण्याचा निर्णय घरातील बाई घेते, नोकरी उद्योगावरून आल्यावर तिला परत ओटय़ासमोर उभे राहायचे नसते. आईच्या हातची गोडी येणारे का दुसऱ्याच्या हाताला, असे टिपिकल टोमणे तिने कधीच कानाआड केलेत. समाजाने लादलेल्या विनाकारण भयगंडामधून बाई बाहेर पडतेय. कोणे एके काळी श्रीमंत घरात महाराज/ काकू असायच्या, स्वयंपाक हा पूर्णपणे बाईची जबाबदारी होती, ती नोकरी करू लागल्यावरही चित्र पालटले नव्हते. या पाश्र्वभूमीवर अलीकडच्या काळातला हा फरक नक्कीच स्वागतार्ह आहे. अर्थात व्याप्ती सर्वत्र नसली तरीही तो घडतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे, विशेषत: मध्यमवयीन, मध्यमवर्गीय घरात!

पण तत्पूर्वी आलेली पोळीभाजी केंद्रे आता नवी राहिलेली नाहीतच. डोंबिवली, ठाणे, कल्याण, दादर, विलेपाल्रे अशा ठिकाणी असंख्य घरगुती पोळीभाजी देणारे आढळतील. पण अनेकदा भाजी/आमटी आवडीची नसते. अन्नाची चव भावत नाही, त्रास होतो आणि कितीही म्हटलं तरी चपात्या/भाकऱ्या करणे हे तसे वेळखाऊ किचकट काम असते. नेमके यालाच हेरून संगीता राकेश उतेकरने घरातून चपात्या द्यायचा उद्योग सुरू केला. तिच्या म्हणण्याप्रमाणे पोळीभाजी केंद्र म्हणा किंवा डबे देणे यात आर्थिक गुंतवणूक लागते आणि मनुष्यबळ पण गरजेचे असते. त्याऐवजी फक्त चपात्या देणे हे अधिक फायदेशीर ठरते. संसाराला हातभार म्हणून संगीताने सुरू केलेला हा उद्योग चांगलाच फोफावलाय. ती वैयक्तिक किंवा किरकोळ पुरवठा करतेच, त्याशिवाय दादर भागातल्या मोठय़ा रेस्टॉरंटनाही चपात्या पुरवते. पीठ मळणे, पॅकिंग करणे यात नवऱ्याची प्रचंड मदत असते. पहाटे पाचेक वाजता दोघेही चपात्याच्या घाण्यावर बसतात ते साधारण ४०० चपात्या दहा वाजेपर्यंत होईपर्यंत.

प्रज्ञा रहाटे, संगीता यांच्यासारख्याच एक मालतीताई खलाटे. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी पोळीभाजी केंद्रावर काम केले. जेव्हा ते बंद झाले तेव्हा आणि त्याच वेळी त्यांच्या चपात्यांवर खूश असणाऱ्या एकीने त्यांना तिच्यासाठी पाचेक चपात्या द्याल का, असे विचारले तेव्हा मालतीताईंना ही नवी दिशा मिळाली. दिवसाला कमाल एक हजार भाकऱ्या अथवा चपात्या त्या देतात. आधी सर्व काम एकटय़ा करायच्या, आता हाताशी सुनबाई आहे. पहाटे तीन वाजता सुरू होणारे त्यांचे पोळी/भाकरी सत्र साधारण सकाळच्या आठ-नऊपर्यंत चालते. मऊसूत अशा तांदळाच्या भाकरी आणि नरम चपात्यांची चवड रचली जाते. ग्राहक येतात, घेऊन जातात.या सर्व जणींचे चपात्या/भाकरीचे ग्राहक सर्व थरांतले आहेत. कोणी चार चपात्या/भाकरी मागतात. कोणी ४०. केटर्स, पोळीभाजी केंद्र, रेस्टॉरंट यांसारख्या मोठय़ा उद्योगापासून एकटय़ा राहणाऱ्या आजी-आजोबापर्यंत सर्व थरांतले ग्राहक असतात. गोरेगावला अनेक नोकरदारच नव्हे तर घरात असणाऱ्या असंख्य बायका व्यावसायिक, विद्यार्थी, डॉक्टरसुद्धा प्रज्ञाकडून चपात्या घेतात आणि मुले परदेशी असल्याने एकटय़ा असणाऱ्या आज्जीसुद्धा. या सर्वातून समोर येणारी गोष्ट ही की, चपाती/ भाकरी विकत देणे हा एक मोठा गृहउद्योग आहे. अत्यंत वैयक्तिक/ खासगी पातळीवर चालणारा हा उद्योग अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून देत आहे. पण त्याचबरोबर असंख्य लोकांची (आणि यात नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी, आजारी, वृद्ध) सोय होतेय.

नेरुळला भाडय़ाने घर घेऊन वैद्यकीय शिक्षण घेणारे चार विद्यार्थी आहेत. त्यातील दोघांना स्वयंपाक येतो आणि त्यामुळे अशी पोळी/भाकरी देणारी केंद्रे त्यांच्यासाठी वरदान ठरतात. बेलापूर येथे राहणारी श्रुती कामावरून घरी जाताना करुणा म्हात्रेंकडून पांढऱ्याशुभ्र तांदळाच्या भाकऱ्या उचलते. भाजी, रस्सा करणे फारसे कठीण नाही. पण चपात्या भाकऱ्या करणे वेळखाऊ आणि वैताग. असं तिचं व्यवहारी मत आहे. तयार चपात्या/भाकरी आणि घरची भाजी! काम झाले. तर करुणा परशुराम म्हात्रे बेलापूर दिवाळा भागात तांदळाच्या भाकऱ्या पुरवतात. अगदी लग्न, हळद, अशा समारंभासाठी सुद्धा त्या भाकऱ्या देतात. बेलापूरमधील नामांकित रेस्टॉरंटला त्याच्याकडून भाकऱ्या जातात आणि वैयक्तिक घरगुती मागणीनुसार सुद्धा. करुणा, मालती, प्रज्ञा, संगीता या सगळ्या जणींनी तसं बघायला गेल्यास परंपरागत उद्योग चालू केलाय, पण त्यांचे जे ग्राहक आहेत ते मात्र बऱ्यापैकी बदललेत.

महाराष्ट्रीय माणसाची चपाती-भाजीची ओढ कमी होत नसते, हा आणखी एक मुद्दा. बाहेरचे खाणे अथवा डबा आणणे परवडत नाही किंवा आवडत नाही किंवा रोज खाऊन कंटाळा येतो. स्मुदी, डोसे, इडली, वॅफल्स, पराठे, ओटस असे नास्त्यांचे अगणित पर्याय उपलब्ध असूनही आणि वन डिश मील, सूप सॅलड, सॅण्डवीच जेवण असे आवडणारे असूनही, आजही भारतात किंवा मुंबई, महाराष्ट्रात पोळी भाजी या जोडगोळीला पर्याय नाही. वर सांगितलेले सर्व पदार्थ अनेकवेळा ठरावीक वर्गाची मक्तेदारी ठरतात. म्हणूनच पोळीभाजी हा कॉम्बो भक्कम असतो. अनेक घरात तुपसाखर पोळी, चहा-चपाती, झुणका-भाकर असा नाश्ता असतो. कितीही रॅप्स, रोल्स येवोत. टॉर्टयिा असोत महाराष्ट्रीय माणसाला चपाती-भाजी लागतेच. अर्थात या चवीच्या चोचल्यांसाठी आधीच्या पिढीतल्या आया कामावरून येऊनसुद्धा पदर खोचून चपात्या लाटायच्या. पण सध्या मात्र या विचाराला मागे पाडून चपात्या बाहेरून आणणे आणि बाकी भाजी/आमटी/ चिकन जे असेल ते घरी करणे रूढ होतेय. मुख्य म्हणजे त्यात गैर अथवा अपराधी वाटणे म्हणा (अर्थात फक्त स्त्रीला) मागे पडतेय. आमच्या आईच्या किंवा हिच्या हातच्या चपात्यांची सर कश्शाला नाही असे प्रौढी मारणाऱ्या पिताश्रींचे पुत्र घरी येऊन वॉशिंग मशीन लावतात, कुकर चढवतात आणि त्याची बायको घरी येता येता तयार चपात्या उचलते.

आधीच्या लिंगाधिष्ठित कामामधील परंपरागत विचार, कामाची विभागणी आता बदललेली आढळून येतेय. या वर्गाबरोबरच मुले परदेशी बाहेरगावी असल्याने एकटे राहणारे वृद्ध पालकही आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित होणारे, शिक्षणासाठी आलेले असे असंख्य लोक आहेत. चाळीसेक वर्षांपूर्वीचा समाज आणि आताचा समाज याच्यात बऱ्यापैकी फरक पडलाय. असे असताना कामाच्या जुनाट, परंपरागत समजुतींना कवटाळून बसणे अनेकांना परवडत नाही आणि आवडतही नाही. अशा असंख्य लोकांसाठी चपात्या/भाकऱ्या देणाऱ्या सोयी फार उपयुक्त ठरत आहेत. म्हणूनच अगदी कष्टकरी आणि निम्न आर्थिक स्तरातले अनेक जण या तयार चपात्या-पोळीचा फायदा घेताना आढळून आले. गोरखपूरचा विजय कश्यप कामावरून येताना म्हात्रे मावशीकडून भाकऱ्या/चपात्या उचलतो आणि घरी आल्यावर गावच्या आम का अचारसोबत अंडा, भुर्जी आणि पोळी यावर भूक भागवतो. त्याच्या आर्थिक गणितात असे जेवण व्यवस्थित बसते.

घरातून चपात्या-भाकऱ्या देणाऱ्या असंख्य अनामिक स्त्रिया/ उद्योजक आजच्या घडीला फक्त मुंबई नव्हे तर पुणे/नाशिक इथेही आहेत. मोठमोठय़ा समारंभाला वेळेला हजार ते पाच हजार चपात्या देणाऱ्या आहेत आणि वैयक्तिक पुरवठा करणाऱ्याही. अर्थात ज्यांना त्याच चौकटीत राहून कामाखाली मृत्युमुखी पडायचे आहे त्यांची गोष्ट वेगळी, पण आपले श्रम, वेळ, पसा आणि गरज यांचे अचूक गणित मांडणारा हा नवा समाज आहे. ज्यांचे नियम, कामे (रोल प्ले) हे संपूर्ण आधुनिक आहे. बाहेरची चपाती/भाकरी आणि घरची भाजी असे परफेक्ट समीकरण मांडून या सर्वानी चक्र सुरू ठेवले आहे. यात त्यांना निवडीचे स्वातंत्र्य आहे हे सर्वात महत्त्वाचे आणि या मागणीला पूर्ण करणाऱ्या स्त्रियांनाही आर्थिक स्वातंत्र्य त्यामुळे मिळालंय.

साधारण १९८५च्या सुमारास ‘स्त्री मुक्ती संघटने’ने तेव्हा माफक दरात पोळी भाजी/ झुणका भाकरी देणारी केंद्रे एक सामाजिक संस्थेच्या समन्वयाने सुरू केली होती. तिथेच धुऊन चिरलेल्या भाज्याही मिळायच्या, तो निर्णय काळाच्या किती पुढचा आणि दूरदृष्टीचा होता, याची आता प्रकर्षांने आठवण येते. तेव्हाही आम्हाला आळशी बायका/ घरसंसार सोडून नसते उद्योग करणाऱ्या असे शेलके शेरे मिळाले होते. पण आज त्या कामावर एक अदृश्य शिक्कामोर्तब झालंय.

समाजाचे नव्या दृष्टीने जीवनाकडे पाहणाऱ्या समुदायाचे, बाईच्या हातातील पोळपाट-लाटणे सुटले म्हणजे ती मुक्त झाली असे समजायचे का, असा खोचक सवाल इथं उठू शकतो. त्याला उत्तर हे की काम कमी होणे किंवा ते अन्य कोणी करणे, इतक्या तकलादू रुपकावर समानता आधारलेली नसते. कामामध्ये असणारा जुनाट लिंगाधिष्ठित विचार मागे पडतोय आणि बुद्धिनिष्ठ तर्कशुद्ध नजरेने पाहिलं जातेय, हा टप्पा महत्त्वाचा आहे. एका घटकाची सोय आणि त्याच सुमारास दुसऱ्या घटकाला त्यामुळं मिळणारी आर्थिक संधी/रोजगार या नजरेने पाहायला हवे. थोडा विचार बदलायला लावला, थोडे जुळवून घेतले की आयुष्याचे गाडे चालते. आईच्या हातच्या मऊसूत चपात्या आवडणे अजिबात चूक नाही, पण आपल्यासारख्या बाहेर बराच वेळ असणाऱ्या नोकरदार पत्नीकडून ती अपेक्षा ठेवणे नक्कीच योग्य नाही. हे आता समजून घेऊन बाहेरच्या पण घरगुती किंवा घरीच मावशींनी येऊन सकाळी केलेल्या चपात्या ‘मायक्रो’त गरम करून घरच्या तुपात माखवून एकमेकांसोबत वेळ घालवत खाणं केव्हाही स्वागतार्ह!

ज्याची खावी पोळी..

खाद्यपदार्थाचे विपुल पर्याय असले तरी आजही पोट भरावयाचे असेल तर पोळी वा चपाती खाण्याशिवाय गत्यंतर नसते. पुण्यातही पोळी करून देणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढती आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड येथे तब्बल एका वेळेसाठी पाच लाख पोळ्यांचा पुरवठा होतो व त्यासाठी  येथे ३५ कारखाने कार्यरत आहेत. यातून तब्बल प्रत्येकी १० ते १५ हजार पोळ्या वितरित केल्या जातात. याव्यतिरिक्तही अनेक स्त्रिया घरगुती स्तरावर पोळ्या करून विकतात. त्यातल्याच काहींचे हे अनुभव.

‘‘ओळखीच्या लोकांकडून मागणी असते त्यानुसार घडीच्या पोळ्या केल्या जातात. मात्र पोळ्यांचे काम करताना सकाळी नऊची वेळ गाठणे ही कसरत करावी लागते,’’ धनकवडी परिसरामध्ये घरगुती स्वरूपाचा पोळ्यांचा व्यवसाय करणाऱ्या वंदना घाटपांडे सांगतात. या कामामध्ये त्यांना मुलगा आदित्य याची मदत होते. ‘‘दररोज किमान पन्नास पोळ्या तरी असतातच. पण, ज्यांना पोळ्या हव्या आहेत ते आदल्या दिवशी मोबाइलवरून तशी मागणी करतात. अधिक पोळ्यांची ऑर्डर असते तेव्हा एका मैत्रिणीला मदतीसाठी बोलावून घेते,’’ असेही त्यांनी सांगितले.

कर्वेनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या मंजुळा माने याही गेली १७ वर्षे दररोज किमान अडीच हजार पोळ्या पुरविण्याचे काम करीत आहेत. ‘‘माझ्यासमवेत चार जणी प्रत्येकी पाचशे याप्रमाणे आम्ही दररोज पोळ्या लाटतो. सकाळी लवकरच कामाला सुरुवात होते आणि काम पूर्ण झाल्यावरच मोकळीक मिळते. माझ्याबरोबर काम करणाऱ्या स्त्रिया गरजू आहेत. पोळ्या लाटण्याचे काम करून त्या आपल्या प्रपंचाला मदत करतात,’’ असे मंजुळा माने यांनी सांगितले.

औंध परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या सुरेखा कुलकर्णी यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून नलीशा गुजर या पोळ्या करण्यासाठी येतात. कुलकर्णी यांच्याच सोसायटीमध्ये आणखी सहा घरांमध्ये गुजर पोळ्या करण्याचे काम करतात. ‘‘पोळ्या करण्याच्या कामामुळे मला संसाराला हातभार लावता येतो. माझ्या तीन मुलांनी माझ्यासारखे अडाणी राहू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी तरी मला काम करावेच लागणार आहे,’’ असे नलीशा गुजर यांनी सांगितले. ‘‘ज्या घरांमध्ये मी काम करते तेथील मंडळींचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक मला त्यांच्या घरातील एक मानतात हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे,’’, असेही त्या म्हणाल्या. ‘‘नलीशा पोळ्या करण्याचे काम करीत असल्यामुळे मला सकाळच्या वेळात मोकळीक मिळते आणि हा वेळ मला माझ्यासाठी देता येतो,’’ असे सुरेखा कुलकर्णी यांनी सांगितले.

– विद्याधर कुलकर्णी

shubhaprabhusatam@gmail.com

chaturang@expressindia.com