16 December 2017

News Flash

स्वातंत्र्याची किंमत

‘सर, आम्ही ‘लक्ष्य फाऊंडेशन’तर्फे कारगिल युद्धातील वीरांवर पुस्तक तयार करीत आहोत.

अनुराधा प्रभुदेसाई | Updated: August 12, 2017 1:56 AM

भारतीय स्वांतत्र्य दिनाला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत,

‘‘मी एकदम मस्त आहे. फक्त माझ्या डोक्याला मोठी जखम झाली आहे, माझा उजवा हात प्लॅस्टरमध्ये आहे. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि माझा डावा पाय मिसिंग आहे, कारण आपल्या शेजारच्या देशातील मित्रांनी बॉर्डरवर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर माझा पाय पडला आणि माझ्या डोळ्यादेखत माझा पाय हवेत उडाला..’’ जोरजोरात हसत  कॅप्टन शौर्य म्हणाला, ‘‘बाकी मी फिट आहे मॅम. काळजी नको. पण एक विनंती आहे. माझ्या बडीसाठी प्रार्थना करा. कारण त्याचे दोन्ही डोळे गेले आहेत.’’ कॅप्टन शौर्यच्या या उद्गारातच सैनिकांचं सारं आयुष्यच समोर येतं. आपल्या देशवासीयांसाठी लढणाऱ्या, प्रसंगी आयुष्य वेचणाऱ्या या सैनिकांना आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याच्या किमतीचं भान आपल्याला आहे का हेही स्वत:ला विचारायला हवं.. भारतीय स्वांतत्र्य दिनाला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने..

कॅलेंडरमधील ती फक्त एक तारीख,

२८ सप्टेंबर, पण प्रोफेसर नय्यर यांच्यासाठी त्याचं खूप महत्त्व होतं. बरोबर ३ वर्षांपूर्वी याच दिवशी मी त्यांना भेटले होते. ‘‘आज अनुज ३९ वर्षांचा झाला असता..’’ त्यांच्या या उद्गाराने कारगिल युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या, महावीर चक्राने सन्मानित झालेल्या अनुजच्या आयुष्यात डोकवायची संधी मिळाली.. पहिल्याच वाक्याने त्यांचे डोळे पाणावलेले दिसले..

‘‘सर, आम्ही ‘लक्ष्य फाऊंडेशन’तर्फे कारगिल युद्धातील वीरांवर पुस्तक तयार करीत आहोत. कॅप्टन अनुजवरही लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला भेटायला आले.’’ त्यांनी ‘हो’ म्हटलं आणि बोलू लागले, पण प्रोफेसर माझ्याशी नव्हे जणू स्वत:शीच संवाद साधत होते..

‘‘त्याची एन. आय. एफ. डी., बी. आय. टी. एस आणि आणखी तीन शाळांसाठी निवड झाली होती. अतिशय हुशार होता तो, पण त्यानं एन. डी. ए.ला जायचं निश्चित केलं. अगदी लहानपणापासून तो धाडसी आणि बेडर होता. मारामाऱ्या करायचा, खेळात नंबर वन, शूटिंग खूप आवडायचं आणि मुळात तो खूप द्वाड होता. इतका की एकदा त्याच्या शिक्षिकेनं त्याच्या खोडय़ांना वैतागून नोटीस बोर्डवर लिहिलं होतं, ‘आय वॉन्ट अनुज डेड ऑर अलाइव्ह’ मग त्यानं माफी वगैरे मागितली, पण तो हुशारही तितकाच होता म्हणून त्यांचा लाडकाही होता. त्याचे सगळे गुण हे सैनिक बनण्यासाठीच योग्य होते.’’ एक दीर्घ श्वास घेऊन ते भूतकाळाची कवाडं उघडू लागले..

‘‘कॅप्टन विक्रम बात्रा आणि कॅप्टन अनुज हे बडी होते. जानते हो बडी किसे कहते है? ’’

‘‘हा. हा. मानो दो दिल मगर एक जान.’’ मी उत्तरले.

‘‘वाह क्या बात कही! कारगिलमध्ये दोघांचे टेन्ट युद्धभूमीवर बाजू बाजूला होते. दोघेही शेर होते. हातात हात घालून सैन्यात गेले आणि स्वर्गातही!   युद्धभूमीवरच त्यांना वीरमरण आलं. तुला माहितीच आहे ना २५ वर्षांच्या कॅप्टन विक्रमला मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ तर २४ वर्षांंच्या अनुजला ‘महावीर चक्र’ने सन्मानीत  केलं  गेलं ते. और सुनना चाहते हो बडी के बारेमें? कारगिल युद्धभूमी.. असाच एक अनुजचा ‘१७ जाट’चा बडी होता.  अनुज आणि त्याचे सैनिक वीरता आणि पुरुषार्थाचा परमोच्च बिंदू गाठत होते. अनुजने वाटेतील तीन बंकर उद्ध्वस्त करून शत्रूला जेरीस आणलं  होतं. आता चौथा बंकर. तो उद्ध्वस्त झाला की मोहीम फत्ते! पण अंधारात दडलेला एक बंकर त्यांच्या नजरेतून सुटला.. ते पुढे निघाले. आणि शत्रूने डाव साधला. त्यांना प्रत्युत्तर द्यायला निघालेल्या अनुजच्या छातीत.. बहुतेक शत्रूच्या त्या गोळ्यांवर त्याचे आणि त्याच्या टीमचेच नाव होते. पहाटे ५.३०  वाजता हे घडलं. या घटनेनं चवताळून उठलेल्या अनुजच्या त्या बडीनं ६.३० ला शत्रूवर जोरदार हल्ला करून अनुजच्या शहादतचा बदला घेतला. सगळेच शेर तिथे एकत्र आलेले होते..’’  मी मध्ये काही बोलायचा प्रयत्न केला, पण प्रोफेसर त्यांच्याच विश्वात होते..

प्रोफेसरांशी बोलताना आणखी एक जण आठवला.. कर्तृत्व आणि कर्तव्य शरीरात भिनवलेला कॅप्टन शौर्य.. अगदी नावाप्रमाणेच.. सकाळची धावपळीची वेळ.. मी बाहेर निघायच्या तयारीत असतानाच दारावरची बेल वाजली. मी घाईघाईत दार उघडले. दारात कडक वर्दीत एक फौजी अधिकारी उभा होता.

‘‘अनुराधा मॅम?’’ त्यानं विचारलं.

‘येस.’

‘‘मॅम कॅप्टन शौर्य – गुड मॉर्निग मॅम!’’

मी स्मरणशक्तीला ताण दिला आणि पटकन त्याच्या पायाकडं पाहिले. तो मोकळेपणानं हसला आणि म्हणाला, ‘‘येस मॅम, तोच मी. तुम्ही घाईत दिसताय. मी सोडतो तुम्हाला. नंतर परत येईन.’’ भारावल्यासारखी मी त्याच्या मागोमाग निघाले. त्याच्या मागे ‘रॉयल एनफिल्ड’वर बसले. त्यानं मला माझ्या मुक्कामी उतरवले. मला गेटपर्यंत पोचवलं. छानसं हसत मोटरसायकलला जोरदार किक मारली. आपल्या डाव्या पायाकडे हात दाखवत क्षणार्धात गर्दीत मिसळून दूर निघूनही गेला. धूमकेतूसारखा! मला त्याच्या आठवणीतून बाहेर यायला बराच वेळ लागला.. याला कारणही तसंच होतं, साधारण वर्षांपूर्वी मला श्रीनगरवरून एका कर्नलचा फोन आला होता. त्यांचा एक २३ वर्षांचा अधिकारी मिलिटरी रुग्णालयात दाखल झालेला होता. त्यांची इच्छा होती की मी त्याला भेटून जरा त्याचा ‘हौसला’ वाढवावा. मी चक्क दोन दिवस विचार केला. काही शेरोशायरी, भगवद्गीतेतले अध्याय, इंग्लिशमधली सुभाषिते.. सगळ्याची जय्यत तयारी करून त्या अधिकाऱ्याला फोन केला. समोरच्या बाजूनं खणखणीत आवाज आला. ‘‘कॅप्टन शौर्य हीअर.’’ मी गोंधळून गेले. आपली गफलत झाली की काय? मी धीर गोळा करून कर्नल सी. केंचा संदर्भ दिला आणि कधी भेटायला येऊ, असं विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे मॅम, प्लीज उगाच दगदग करू नका. मी एकदम मस्त आहे. माझी काळजी करू नका. फक्त माझ्या डोक्याला एक मोठी जखम झाली आहे, माझा उजवा हात प्लॅस्टरमध्ये आहे. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झालीय आणि माझा डावा पाय मिसिंग आहे कारण आपल्या शेजारच्या देशातील मित्रांनी बॉर्डरवर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगावर माझा पाय पडला आणि माझ्या डोळ्यादेखत माझा पाय हवेत उडाला..’’ आणि  जोरजोरात हसत म्हणाला, ‘‘बाकी मी फिट आहे मॅम, पण एक विनंती आहे. माझ्या बडीसाठी प्रार्थना करा. कारण त्याचे दोन्ही डोळे गेले आहेत. तो नुकताच, सहा महिन्यांपूर्वी जॉईन झालाय.’’ माझ्या नि:शब्द प्रतिसादातला अर्थ त्या चाणाक्ष अधिकाऱ्यानं ओळखला. ‘‘मॅम, कर्नलना सांगा मी एकदम ठीक आहे आणि हो, पोस्टिंगला जायच्या आधी तुम्हाला एकदा येऊन नक्की भेटून जाईन. टेक केअर मॅम.’’ समोरून फोन ठेवल्याचा आवाज आला.. मी नि:शब्दच होते.. दिलेल्या वचनाप्रमाणे मला भेटून कडक सॅल्यूट ठोकणाऱ्या या कॅप्टन शौर्यनं माझ्या विचारांना एक वेगळा आयाम दिला. आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाचा वाऱ्याच्या साहाय्यापेक्षा स्वत:च्या पंखातील बळावर जास्त विश्वास असतो हे मी वाचलं होतं, पण हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा थरार विलक्षण होता.. आहे..

असं आयुष्य प्रत्यक्ष जगणारे असंख्य शौर्य आपल्या देशात आहेत, किंबहुना ते आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. पण आपल्याला त्यांची जाणीव आहे? आपल्याला त्याची किंमत माहिती आहे? १५ ऑगस्ट १९४७, स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि म्हणून गेली ७० वर्षे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. खरं तर मागील इतकी वर्षे आपल्यासाठी रोजचा दिवस हा स्वातंत्र्य दिन आहे. राज्यघटनेनं आपल्याला आधी जबाबदारी दिली आणि नंतर हक्क. पण आम्ही ‘हक्कांचे’ नामकरण ‘स्वातंत्र्य’ असं करून अर्निबध उडण्याची सोय करून घेतली आणि त्यासोबत येणाऱ्या ‘जबाबदारी’ला बासनात बांधून ठेवलं. बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य.. समाविष्ट नसलेल्या कित्येक नवीन स्वातंत्र्याच्या कलमांची निर्मिती आपल्या लोकशाहीतील विद्वानांनी केली आणि  सर्वानी ती अंगीकारली. त्यातील ही काही कलमे वानगीदाखल..

रस्त्यावर ४०/४० तास ढोलताशा बडवत मिरवणुका काढणे, कर्णकटू आवाजात तासन्तास गाणी वाजवणे, भर रस्त्यात गरब्यांचे मांडव घालून रासलीला करणे, ताबूत काढून उरूस करणे, दहीहंडीचा उत्सव उन्मादात बदलवणे – हे ‘धार्मिक भावना स्वातंत्र्य’, जोरजोरात हॉर्न वाजवत भर वस्तीत वेगाने गाडी हाकणे, नशेत किंवा माजोरडेपणे गाडी चालवून निरपराध्यांचे जीव घेणे, नो पार्किंग, सिग्नल, वन वे या कशाशीच देणं-घेणं नसणे- हे ‘उंडारणे स्वातंत्र्य’. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वादावादी करून नंतर हाणामारी करणे, मासळी, अंडी, शाई तोंडावर फेकणे हे ‘मारझोड स्वातंत्र्य’, बेलगाम, बेमुर्वतखोरपणे कित्येक पिढय़ांना पुरून उरेल इतकी मालमत्ता जमवणे, पर्यावरणाचा ऱ्हास करत अनधिकृत बांधकाम करणे – हे ‘साम्राज्य स्वातंत्र्य’, प्रत्येक गोष्टीचं संवेदनाशून्य राजकारण करणे – हे ‘मोकाट स्वातंत्र्य’, ‘मानवाधिकार’ या गोजिरवाण्या शब्दांची झूल पांघरून वातानुकूल केबिनच्या सुरक्षित कवचाआडून सैन्यदलाच्या  कारवाईवर तारतम्यविरहित गरळ ओकणं हे ‘आसूड स्वातंत्र्य’, बेशिस्तीचे स्वातंत्र्य, अस्वच्छता स्वातंत्र्य, लाच स्वातंत्र्य, उन्माद स्वातंत्र्य – लोकशाहीच्या नावाने चांगभलं’! या स्वयंघोषित स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांना आणि ते अंगीकारणाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

.. स्वातंत्र्याच्या या सर्व लक्तरांमधून वाट काढत खूप दूरवर पोहोचल्यावर एक जण एका चबुतऱ्यात ताठ उभा राहिलेला दिसला. अंगावर ऑलीव्हग्रीन रंगांचा युनिफॉर्म, हातात बंदूक, डोळ्यांची पापणीही न हलवता तो कित्येक तास तसाच उभा होता. शेवटी न राहावून मी म्हणाले, ‘‘ती बंदूक ठेव बाजूला, बस जरा वळचणीला निवांत, थकला असशील. थोडय़ा गप्पा मारू. तुला स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!’’ नजर न फिरवता बंदुकीवरची पकड अधिक घट्ट करीत तो फक्त हसला. जणू म्हणत होता, ‘‘मी इथून हललो तर तुम्ही स्वातंत्र्य दिन कसा साजरा करणार? आम्हाला इथून हलायची मुभा नसते. इथले नियम आणि कायदे वेगळे आहेत. आधी कर्तव्य आहे. हक्क मागाहून येतात. तुम्हाला काहीही करायचे स्वातंत्र्य आहे आणि आमच्यावर न करण्याचे संस्कार! अर्थात हे संस्कार आमच्या घरून मिळाले, अधिकाऱ्यांकडून मिळाले, आमच्या पलटणीकडून मिळाले. आमचं जग आणि तुमचं जग यात बरेच अंतर आहे. तुम्हालाही तुमच्या मुक्त स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!’’

आपल्या देशबांधवांच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे तारुण्य खर्ची घालणारा, वेळ प्रसंगी आपल्या आयुष्याचा होम करणारा. आम्ही सदैव बेरजेची गणितं सोडवत असताना कुठलाही बडेजाव न करता वजाबाकीची गणिते सोडवणारा हा सैनिक आम्हाला कधी कळला का? आम्ही जाणला का? आमच्या अनेकदा स्वैराचाराकडे झुकलेल्या स्वातंत्र्याची किंमत कुणी तरी दुसराच मोजत आहे. निरपेक्षतेने, हे आमच्या कधी लक्षात तरी आले का? सैनिक ही केवळ बोलायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे..

विचारांच्या वावटळीत काही घटना डोळ्यासमोरून तरळून जात होत्या.. त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही, पण त्यातील नायक एकच आहे, सैनिक! स्वातंत्र्य दिनाच्या आसपास ‘भारतमाते’ला चांगले दिवस येतात. देशप्रेम, समर्पण, सैनिक  या शब्दांची  मोठी लाट उसळते. ती विरून जायच्या आत ‘सैनिक’ नावाच्या लाटेवर आरूढ होऊन त्याच्या आयुष्यात डोकावण्याचा हा प्रयत्न.. खरे तर मागील १४ वषार्ंत माझ्या सुदैवाने सैन्याच्या राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, जम्मूमधील पूंछ, राजौरी, नोशेरा, नागरोटा, लडाखमधील द्रास, कारगिल, तुरतुक, बटालिक, काश्मीरमधील उरी, पंचगाम, थ्रेगाम अशा विविध ठिकाणच्या आणि काही अगदी दुर्गम अशा फॉरवर्ड पोस्टवर जाण्याची संधी मिळाली. तिथे अनेक फौजींशी संवाद साधता आला. काही ब्रिग्रेड एच. क्यू.मध्ये रेजिमेंटल सेंटरमध्ये, ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांच्यासोबत राहाण्याचा योग आला. वेगवेगळ्या पासिंग आऊट परेड, ट्राफिक चेक पोस्ट, मिलिटरी हॉस्पिटल्समध्ये जाता आलं आणि या संपूर्ण प्रवासात सैनिक कळला, अनुभवला आणि भावलादेखील!

असं म्हणतात की सूर्यफूल सूर्याच्या भ्रमणावर बरहुकूम मान वेळावून अंतिमत: पश्चिमेकडे टक लावून पहात बसते. पुन्हा पहाट होण्याची वाट बघत! चातक पावसाच्या पहिल्या थेंबाची तर चकोर चांदण्याची.. सैनिकांचे आणि माझे नातेही हळूहळू असेच आहे. सरहद्दीवर काय किंवा रोजच्या जीवनात फौजी भेटला की माझे मन झळाळून जाते..

काही वर्षांपूर्वी द्रासला मराठा लाइट इंफंट्रीच्या युनिटमध्ये जायचा योग आला होता. ‘आम्ही सिव्हिलियन्सनी तुमच्यासाठी काय करावं?’ या माझ्या प्रश्नावर कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष म्हणाले होते, ‘‘तुम्ही बँकेत नोकरी करता ना मॅम, म्हणून सांगतो. माझे सैनिक हे असे दऱ्याखोऱ्यात असतात. तुमचा कामाचा पॅटर्न वेगळा, आमचा वेगळा. तुम्ही जसे फौजीचे काम, भाषा, शब्द, तौरतरीके समजू शकत नाही तसे तो बँकेचे. निदान त्याला रांगेत उभे ठेवून मग या काऊंटरवरून त्या काऊंटरवर पळवू नका. ‘आज वेळ नाही, उद्या या,’ असे म्हणून घरी धाडू नका. कधी तरी रजेवर घरी येणाऱ्या फौजीला आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. तलाठी ऑफिसमध्ये, दवाखान्यात, रेशन ऑफिसमध्ये, विजेचे बिल भरण्याच्या केंद्रात त्याचा वेळ गेला तर कसे चालेल? तुम्ही त्यांची कामे अग्रक्रमाने केलीत तरी आमच्या मुलांना मदत होईल. काश्मीर खोऱ्यातून किंवा ईशान्य पूर्व भागातून महाराष्ट्रातील गावात पोचणाऱ्या सैनिकाचे जाणा-येण्यातच दहा-बारा दिवस गेल्यावर तो घरी किती वेळ देणार? आणि त्याला काहीही झाले तरी वेळच्या वेळी डय़ुटीवर हजर रहावेच लागते. कारण त्याच्या बडीला म्हणजे सहकाऱ्याला रजेवर जायचे असते. म्हणजे उदाहरणच देतो. हा लान्स नाईक जगताप कालच आलाय. त्याला नागीण झालीय, पण तो डय़ुटीवर आला आहे. आमची मुलं मेडिकल सर्टिफिकेट पाठवून रजा वाढवत नाहीत. तो त्यांना अपमान वाटतो.’’

माझ्या बँकेतील ३३ वर्षांच्या नोकरीत युनियनच्या कवचाआड आपली रजा ऐन मोक्याच्या वेळेस संमत करून घेऊन बँक अधिकाऱ्यांना जेरीस आणणारे कित्येक महाभाग मी पाहिले आणि पचवले होते, मुळात पचवावे लागले होते. त्या पाश्र्वभूमीवर हे ऐकताना आणि प्रत्यक्षात पाहाताना अंगावर काटा आला. त्याच भावनेत मी उत्तरले, ‘‘खरंच कर्नल, हा निरोप मी सर्वांपर्यंत नक्की पोचवेन. हा माझा वादा आहे.’’ आणि त्या दिवसापासून मी व्रतच घेतलं. मी जोपर्यंत बँकेत काम करीत होते तेव्हा कुणी ‘फौजी’ ग्राहक आला की काऊंटरवरील कर्मचारी मी कितीही कामात असले तरी माझ्याकडे पाठवीत. मीसुद्धा त्या फौजीच्या पोस्टिंगची, युनिटची, घरची चौकशी करून लवकरात  लवकर त्याचं काम करून मोकळं करत असे. नंतर नंतर आपणहूनच माझ्याकडे येत असत. किंवा मी कामात गढले असेल तर आवर्जून थांबत. सैनिकांच्या त्याच त्याच शंकाचे पूर्ण निरसन करताना समाधान लाभत असे. म्हणजे वैशाख वणव्यात अचानक वळवाचा पाऊस पडून मन उल्हसित व्हावं असंच काहीसं! सतत डोंगरदऱ्यात असलेल्या फौजीला, शत्रूचे बंकर्स सहज सापडतील पण ‘बँकर्सचे’ काऊंटर सापडणे मुश्किल आहे हे मला पक्के ठाऊक होतं. आणि त्याला कारणही तसंच होतं. त्यानंतर ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या कामासाठी बँक सोडताना हा निरोप मी मागे सोडून आले होते. निदान काही दिवस तरी तो अमलात आणला गेला असेल – असावा कारण समुदायाची स्मरणशक्ती फार तात्पुरती असते, असं म्हणतात. म्हणून ती परत जागृत करण्याचा हा प्रयत्न स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्ताने!

‘लक्ष्य फाऊंडेशन’ची स्थापना केल्यापासून युवकांशी बराच संपर्क साधता आला. तरुणांना इतिहासाचे भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची स्वप्नं देण्याच्या आमच्या प्रयत्नांना खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यांच्या डोळ्यातील चमक ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही होती हे निश्चित. पण मग प्रश्न पडला नक्की चुकते आहे कुठे? प्रत्येक मागची पिढी पुढच्या पिढीला एक शिदोरी देत असते, संस्कारांची, अनुभवांची.. गेली तीनचार दशकं ही शिदोरी पुढे दिलीच गेली नाही की काय?

पूर्वी वडीलधाऱ्यांची आलेली पत्रं हीसुद्धा दिशादर्शक असत. कालौघात पत्र लिहिणं कमी झालं, पण सैन्यदलातील कित्येक दिवस ‘संपर्क क्षेत्राच्या’ बाहेर असलेला मुलांना आईवडिलांना पत्रच पाठवावी लागतात. त्यातील  माझ्या संग्रही असलेलं एका आईनं लिहिलेलं प्रातिनिधीक पत्र. सर्व तरुणांना आयुष्यातील वाटचालीत मार्गदर्शक ठरेल असं वाटतं. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधून अधिकारी म्हणून बाहेर पडलेल्या दहावीनंतर ६ वर्षे खडतर प्रयत्न करून, लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलेल्या २२ वर्षांच्या आपल्या पुत्रास ही आई लिहिते,

प्रिय,

ज्या वेळी तुझ्याबरोबरीची बाकीची मित्रमंडळी पदवी घेऊन देशाबाहेर जाण्यासाठी उत्सुक होती त्यावेळी तू देशसेवेत दाखल होण्याचा निश्चय केलास तेव्हा आम्हाला तुझा सार्थ अभिमानच वाटला. गेली ६ वर्षे तू देशसंरक्षणासाठी जे काही शिकलास त्या ज्ञानाचा, त्या अभ्यासाचा वापर करण्याची वेळ आता आली आहे. आपल्या मायभूमीकडे आणि प्रजाजनांकडे जो वाकडय़ा नजरेने बघेल त्याला शासन करणं हा क्षात्रधर्म आहे. ते कर्तव्य पार पाडताना तुझ्यामधील क्षात्रतेज कधी कमी होऊ देऊ नकोस. तिथं प्राणपणानं लढ आणि विजयाची बाजी मारून यशस्वी हो. आईवडिलांची नजर नेहमी आपल्याकडे आहे हे लक्षात ठेव. त्यांची आठवण ठेवलीस तर कधीही कुठलेही वाईट कृत्य तुझ्याकडून होणार नाही. सर्व वडीलधाऱ्यांचा मान ठेव. त्यात कमी पडलास तर मायभूमीच्या सेवेत कुठेतरी कमी पडशील. तसे होऊ देऊ नकोस.

एकच महत्त्वाची गोष्ट सांगते, तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी जी वर्दी अत्यंत अभिमानाने, सन्मानाने तू अंगावर चढवली आहेस त्या वर्दीचा कायम मान ठेव. त्या वर्दीला, तुला स्वत:ला आणि आईवडिलांना कुठलाही कलंक लागेल असे कोणतेही वर्तन तुझ्या हातून घडू नये याची सदैव खबरदारी घे. हाती आलेल्या अधिकाराचा आणि सत्तेचा कुठेही गैरवापर करू नकोस. स्वत:च्या इच्छेप्रमाणे ज्या सन्मानाने ही वर्दी तू अंगावर चढवली आहेस ती तुझ्या स्वत:च्या इच्छेप्रमाणे, तुला पाहिजे असेल तेव्हाच, तितक्याच किंवा त्याहूनही जास्त सन्मानाने, इतमामाने तुला उतरवता आली पाहिजे. दुसऱ्या कुणाच्याही हातात तो अधिकार जाता कामा नये. एक कर्तव्यदक्ष, यशस्वी सेना अधिकारी तू होशीलच, त्याचबरोबर भारताचा एक सुजाण व सहृदय नागरिक हो, आणि त्याहीपेक्षा एक चांगला माणूस हो, जो माणुसकीचे भान ठेवेल. यशस्वी हो! विजयी हो! ‘शुभास्ते पन्थान: सन्तु’।

– तुझी आई.

सैनिकाला घरातून जो पाठिंबा मिळतो त्यावर स्वयंस्फूर्तीने स्वीकारलेल्या खडतर मार्गावर तो मार्गक्रमण करतो. या निग्रही मुशीला घडवणारी ही कूस किती कणखर, करारी असेल याचा हा प्रत्यय! सर्व सैन्यदलात कार्यरत असलेल्या मुलांच्या आईचे मला गवसलेले हे एक प्रातिनिधिक रूप. असे अनेक आईबाबा या साऱ्या प्रवासात भेटले, एका डोळ्यांत पाणी एका डोळ्यांत हसू घेऊन वावरणारे. त्यांच्या वेदना, भीतीची टांगती तलवारही अनुभवली. असेच आणखी एका आईचे पत्र.

प्रिय अनुराधा ताई,

आपली टी.व्ही.वरील मुलाखत ऐकली. मन भरून पावले! खरोखर सारा देश जेव्हा आनंदात, जल्लोषात डुंबत असतो तेव्हा आपल्या काळजाचा तुकडा तिकडे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी बर्फात, वादळात जीवाची पर्वा न करता अभिमानाने उभा असतो. त्यावेळी त्याच्या आईला, पत्नीला, समग्र परिवाराला केवढय़ा भावनिक आंदोलनांना सामोरे जावे लागते याचा अनुभव घेणारी मी एक माता आहे. माझा मुलगा सध्या कर्नल या पदावर सीमा प्रांतात कार्यरत आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी आर्मी ऑफिसर म्हणून रुजू झाला. तेव्हापासून घरगुती आनंदाचे क्षण त्याच्या वाटय़ाला फारच थोडे यायचे. सुट्टीवरून परत जाताना तीच निर्भय, करारी नजर अन् एकदा नमस्कार केला की मागे वळूनही पहायचे नाही ही त्याची सवय. त्याने मलाही निरोप देताना डोळ्यांच्या आत अश्रू लपवायला शिकवले. मुलगा आर्मी ऑफिसर आहे, असे सांगताना खूप धन्य वाटते; पण आत काळीज गलबलतेच, अजूनही! त्यांच्या अत्यंतिक खडतर पोस्टिंगचे अनुभव कुणा दुसऱ्यांकडून कळायचे. पण आम्हाला मात्र तो लाइफ खूप छान आहे, असेच सांगतो.

त्याचे लग्न ठरले नि बॉर्डरवरील काही ना काही इमर्जन्सीमुळे दोनदा पुढे ढकलावे लागले. तिसऱ्या वेळेस तो रजेवर आल्यावर गडबडीत लग्न उरकायचे ठरवले. विवाह विधी पार पडला आणि चित्रपटात शोभावे त्याप्रमाणे आर्मी एच. क्यू.चे पत्र घेऊन एक जण स्टेजवर आला. त्याची रजा रद्द करून परत दोन दिवसांत डय़ुटीवर हजर व्हायचे होते. आदेशाप्रमाणे तो गेलाही. त्यानंतर पूर्ण १० महिन्यांनंतरच तो आपल्या पत्नीला भेटू शकला. त्याला निरोप देणे, नववधूला सांभाळणे. तिच्या भावना सांभाळणे सारेच अवघड होते त्यावेळी.

त्याच्या आयुष्यातले लहान-मोठे प्रसंग आमचे मन कठीण करत गेले. त्याच्या दहशतवादी विरोधी मोहिमा, हिमनद्यांवरचे अतक्र्य अनुभव, दुर्गम भागांतील नेमणुका, सतत संपर्क क्षेत्राबाहेर असणे, युनिटच्या जवानांसोबत भावबंध निर्माण करणे, निसर्गनिर्मित असो किंवा मानवनिर्मित कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला सम्यक विचार करून चिघळू न देता ताब्यात आणणे, आयुष्य ही एक संधी आहे त्याचे सोनं करायचं या निर्धारानं आगेकूच करणं. खरंच सैनिक म्हणजे एक आदर्श आणि परिपूर्ण आयुष्य!

आपल्या आयुष्याचं, तारुण्याचं दान या देशासाठी, देशवासीयांसाठी देणारा सैनिक, त्याच्या भावना त्याच्या अपेक्षा सर्व सामान्यांनी जाणून घेऊन याच्या पाठीशी उभे राहायला हवे. आपणा सर्वाचे आशीर्वाद आणि सदिच्छा आमच्या मुलांचे मनोबल वाढवतात. फक्त एवढी एकच सैनिकाच्या आईची विनवणी. त्यांच्या उदंड आयुष्याची कामना करा.. करालच.

आपली सुहृद

सैनिक सीमेवर लढणारा, देशासाठी प्राणांची आहुती देणारा, ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता आपल्या सग्या-सोयऱ्यांपासून, कुटुंबापासून मित्र परिवारापासून दूर उभा ठाकलेला.. हा सैनिक त्याचे काम करतो आहे. कर्तव्यदक्षतेने, निष्ठने! कुणी तिरस्काराने बोलले तर तो तक्रार करत नाही, कुणी आरोप केले तर तो खंडन करत नाही त्याची फक्त छोटीशी अपेक्षा आहे- आमच्यावर प्रेम करा, सन्मान बाळगा, सदैव आमच्या पाठीशी उभे राहा.

काही सुंदर ओळी वाचनात आल्या ज्या आजच्या मितीला अगदी समर्पक वाटल्या.

अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का ।

सबको मंजिल का शौक है

और मुझे सही रास्तों का।

ये दुनिया इसलिये बुरी नही है

के यहा बुरे लोग ज्यादा है ।

बल्कि इसलिए बुरी है कि

यहा अच्छे लोग खामोश है।

प्रोफेसर नय्यरांशी बोलताना हे सारे सारे आठवले..  ते अजूनही आपल्या मुलाच्या, कॅप्टन अनुजच्या आठवणीतच होते..  सांगत होते,‘‘मैने अनुज को कहा था बेटा, जिओ तो शेर की तरह, लडो तो शेर की तरह और मरो तो भी शेर की तरहा’ तो म्हणायचा, ‘पापा आपका बेटा हँू। गोली पीठपर नही छातीपर लूंगा।’ तो जे म्हणाला तेच त्याने निभावले. मी कधीही कारगिलला नाही गेलो. मेरी तो हिम्मतही नही होती और मै वहा जाने का सोच भी नही सकता. ‘वॉर मेमोरियल’ ज्या पहाडीच्या पायथ्याशी बांधले आहे. त्या पहाडावरच तर माझा अनुज पंचतत्त्वात विलिन झाला. मी तिथे कसा जाऊ? जाऊच शकत नाही..’’

मी घाबरले..  प्रोफेसर नय्यरांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटून ते ओघळू लागले तर मी काय करावं? माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी असा गहिवर कधी झेलला नव्हता. ‘सर, कॅप्टन अनुजचे हे सगळे फोटो कधी काढले आहेत. मला सांगता का त्याची माहिती. मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. आणि मी या फोटोंचे फोटो काढले तर चालेल का?’ विषय बदलण्यासाठी मी केलेली क्लृप्ती नय्यरसरांनी ओळखली. स्वत:ला सावरत त्यांनी माझा हात धरून म्हटलं, ‘‘चलो बहन, व्हाय नॉट. गो अहेड.’’

समोर असलेल्या सर्व फोटोंबद्दल सांगताना ते भावूक होत होते, सावरत होते. पण माझा हात मात्र त्यांनी घट्ट धरून ठेवला होता. त्यांचा तो स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही..  बराच वेळ झाला होता. निघणे क्रमप्राप्त होतं. मी त्यांच्या पायाला स्पर्श केला.. त्यांच्या शरीराचा बारीकसा कंप मला जाणवला. परत भरून आलेले डोळे पाझरायच्या आत त्यांनी मान वळवली आणि झपझप त्यांच्या मुक्कामी  चालू लागले.. मला  जॉन एफ केनेडीचे एक प्रसिद्ध वचन आठवले –

Mankind must put an end to war
before war puts an end to mankind.

.. सैनिकाच्या जीवनातील कित्येक दालने उघडायची बाकी आहेत. आणि मनातली आंदोलनेही! पण एखादी ओवी अनुभवावी म्हणून हा लेखन प्रपंच. गेल्या चौदा वर्षांतील  फौजींच्या सहवासातून जे काही अनुभवाचे गाठोडं तयार झालं ते इथं थोडंसं उघडावेसं वाटलं. माझ्या अल्पमतीला जे पटलं ते मांडलं. कुणी हे गाठोडं फेकून देईल, कुणी माळ्यावर टाकेल तर कुणीतरी विचारपूर्वक डोकावूनही बघेल. त्या क्षणाची मी वाट पहात आहे..

अनुराधा प्रभुदेसाई lakshya.ladakh@gmail.com

First Published on August 12, 2017 1:56 am

Web Title: anuradha prabhudesai article on 70th independence day 2017