‘‘डॉक्टर असणाऱ्या आमच्या लेकीने – आश्लेषाने भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि ‘कॅप्टन’ पद सांभाळत काश्मीर घाटीतील सूरनकोट, रजौरी पूँछ अशा अतिसंवेदनशील भागांत साडे तीन वर्षे आपली सेवा दिली. रात्री-बेरात्री जखमी जवानांवर उपचार करताना तिच्या या दोन्ही पदांचा कस लागत राहिला. अत्यंत दुर्गम ठिकाणी सहनशीलतेचे अंत पाहाणारे अनेक प्रसंग तिच्या आयुष्यात आले, पण तिने ते निभावले ते देशाचं, आपल्या मातीचं ऋ ण फेडण्याच्या भावनेने. एक आई म्हणून तो काळ परीक्षा बघणारा नक्कीच होता, मात्र आता त्या अनुभवांमुळे जीवन सार्थकी लागल्याचंही समाधान आहे. म्हणूनच जास्तीत जास्त मुलींनी भारतीय सैन्यदलात जाऊन देशाला अधिकाधिक बळकट करावं,

असंच मी सांगेन.’’ भारतीय सैन्यदलात पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या

मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांच्या आई आदिती यांचं हे मनोगत.

मला माझं आयुष्य जगताना स्त्री असल्यामुळे ज्या ज्या गोष्टींसाठी अवरोध झाला किंवा आडकाठी येत गेली त्या प्रत्येक वेळी मी मनाशी निरगाठ बांधली होती, जर मला मुलगी झाली तर तिच्यावर ही बंधनं कधीच येणार नाहीत, तिला हवं तसं आयुष्य ती जगेल. आणि झालंही तसंच. डॉक्टर झालेल्या माझ्या लेकीने, आश्लेषाने भारतीय सैन्यदलात जायचा निर्णय आम्हाला सांगितला तेव्हा आम्ही फक्त तिच्या मागे विश्वासाने उभे राहिलो. आणि तिने तो विश्वास सार्थ करून दाखवला.

आपला देश एकीकडे स्त्रीशक्तीच्या थोर परंपरेचे गोडवे गातो तर दुसरीकडे तिचा जन्मच रोखण्यापर्यंतचे रिवाज आहेत. ‘मुलगी झाली हो’ म्हणून गळा काढणारा करंटा समाज आहे. या पाश्र्वभूमीवर आश्लेषाचं आमच्या पोटी जन्माला येणं हे आमचं किंवा तिचं एकटीचंच भाग्य नव्हतं तर ते समस्त स्त्री जातीचं भाग्य आहे, असं मी समजते; कारण जो संदेश आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता त्यासाठी ते अपत्य मुलगी असणं जितकं गरजेचं होतं, त्यापेक्षाही ती एकुलती एक असणं जास्त पूरक होतं. आज मागे वळून पाहताना तिचं मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणं काय, डॉक्टर होणं, सैन्यदलात दाखल होऊन अतिदुर्गम भागांत सेवा देणं या गोष्टींना नक्कीच एकुलतेपणामुळे अधिक वजन प्राप्त झालेलं आहे हे जाणवतं.

डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं; पुढे अपरिहार्यपणे एम्. डी. किंवा पद्व्युत्तर शिक्षण घेणं हे तिच्यासारख्या सतत नव्या वाटा शोधणाऱ्या मुलीच्या मनात येत नव्हतं. त्याचवेळी वर्तमानपत्रात वाचलेल्या भारतीय सैन्यदलाच्या ‘डु यू हॅव्ह इट इन यू?’ या जाहिरातीनं तिच्यातील धैयरेर्मीला साद घातली. अत्यंत कठीण निकषांना पार करून ती आर्मीत कॅप्टन म्हणून रुजू झाली आणि तिचा देशसेवेचा आणि चाकोरी तोडण्याचा मार्ग दृष्टिपथात आला. त्या प्रवेशाने, आजवर कोणीही न सांगितलेले, कित्येकांच्या वाटय़ालाही न आलेले तेजस्वी क्षण तिला अनुभवता आले, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच तेजोमय झालं. जन्म सार्थकी लागला. आणि आई म्हणून ती सार्थकता मलाही अनुभवता आली.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अशी इच्छा असते की ज्या मातीत आपण जन्मलो, वाढलो त्या मातीचे ऋ ण फेडावेत. पण सर्वानाच ती संधी मिळतेच असं नाही. आश्लेषा त्या बाबतीत भाग्यवान ठरली असं म्हणावं लागेल. एमबीबीएस करून डॉक्टर झालेली आश्लेषा पुण्याच्या आर्मी बेसमध्ये ‘कॅप्टन’ पदाची सूत्रे स्वीकारून लखनौच्या दोन महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ‘सैनिक’ झाली आणि तिचं पोस्टिंग थेट जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात झालं. तिथेही पी.पी. म्हणजे पर्मनंट पोस्टिंग आणि टी.पी.म्हणजे टेंपररी पोस्टिंग असे प्रकार असतात. पी.पी. मध्ये सकाळी हॉस्पिटलमध्ये काम करून संध्याकाळी आपल्या बरॅकमध्ये परत येणे. टी.पी. म्हणजे रोज सकाळी कमांडर ज्या ठिकाणी जायला सांगतील, जिथे गरज आहे त्या ठिकाणी जाऊन काम करणं.

आश्लेषाने नित्य नावीन्याची आवड असण्याच्या स्वभावामुळे टी.पी. ची निवड केली. नौशेरा या बेस कॅम्पवरून काश्मीर घाटीतील सूरनकोट, रजौरी पूँछ अशा अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागांत तिचं पोस्टिंग झालं होतं. एक एक क्षण युगच वाटावा अशा परिस्थितीत तब्बल साडेतीन वर्षे या भागात तिनं व्यतीत केली. फोनवर संभाषण कधी तरी, कुठून तरी शक्य झालं तर आमचं भाग्य! त्यातून आर्मीचे गुप्ततेचे कडक नियम. या स्थितीत मनातील भाव-भावना व्यक्त करणं असंभवच. तिला तिथलं काही सांगणं शक्य नसायचं, तर इथलं काही सांगून तिचं मन विचलित होऊ नये याची काळजी आम्हाला घ्यायला लागायची. पण फक्त श्वासांच्या कंपनावरून किंवा आवाजाच्या पोतावरून इथे काय घडलं असेल किंवा आमच्या मनात काय चाललंय हे अचूक कळण्याइतकी तरल संवेदनशीलता तिच्याकडे होती. त्यामुळे मी काय किंवा तिचे बाबा (अशोक तावडे) यांच्या आवाजातला जरासाही बदल ती अचूक टिपायची. डॉक्टर असल्यामुळे तर आजारी असलो तर लगेच ओळखायची आणि कशासाठी काय औषध घ्या. कोणाकडे जा. तातडीने जा, असे तिचे प्रेमाचे आदेशच असायचे.

तिच्या या कौशल्याचा सैन्यदलासाठीही फायदा झाला असावा. अचूक निदान हे तिचं वैशिष्टय़ आहे. समोरच्याच्या मनातलं काढून घेण्यात तर तिचा हातखंडा. त्यामुळेच कित्येकदा ती तिथल्या सैनिकांना औषधाविनाही बरं करू शकत होती. अर्थात जिवाचा थरकाप उडण्याचे कित्येक प्रसंगही तिच्या गाठीशी आहेत. एकदा रात्री एक वाजता आश्लेषाचा बॉर्डरवरून फोन आला. आश्लेषाचा फोन पाहून काळजाचा ठोका चुकला! पलीकडून आश्लेषा बाबांना सांगत होती, ‘मी पूर्ण भिजून गेले आहे. पण मला त्याला वाचवता नाही आलं.’ बाबांना कळत नव्हतं तिला नेमकं काय सांगायचं आहे, पण मग तिनेच उलगडा केला की ती रक्ताने पूर्ण भिजली होती. तिच्या त्या दुर्गम भागातील उंचीवरील चिंचोळ्या रस्त्यांवर दोन गाडय़ांची समोरासमोर टक्कर झाली होती. एका गाडीत गावातील (सीमेवरील) काहीजण एका गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले होते आणि त्यांची गाडी अंधार आणि बिकट रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीवर आदळली. त्या धक्क्याने गर्भवतीच्या डोक्याला खोक पडली. कान फाटला, जबडय़ाला मार लागला आणि या वेदनांनी प्रसूती आणखी जवळ आली. दुसऱ्या गाडीतील जवानांनाही खूप इजा झाल्या होत्या. एका जवानाचे डोके फुटले होते आणि कवटी फुटून मेंदूला इजा झाली होती, आश्लेषा ही एकच डॉक्टर त्या प्रसंगात तिथे पोहचू शकली. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिने त्या बाईची प्रसूती सुखरूप केली. आई आणि बाळ वाचवले, पण ज्या जवानाच्या मेंदूला मार लागला होता, त्याला तिला वाचविणे शक्य झाले नाही. याचं अतीव दु:ख ती रात्रीच्या दोन प्रहरी बाबांकडे व्यक्त करत होती. माझी तर तिच्याशी बोलायचीच हिंमत नव्हती. आम्ही फोनवरचे बोलणे संपल्यावर सबंध रात्र जागून काढली, कारण तो संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर दिसत होता. ज्यात माझी ही मुलगी त्या दुर्गम भागात अंधाऱ्या रात्री आपली सर्व कुवत आणि संपूर्ण श्रद्धा पणाला लावून मृत्यूशी झुंजणाऱ्या त्या गर्भवतीला, तिच्या पोटातील बाळाला आणि आपल्या जवानाला मृत्यूच्या कराल जबडय़ातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती.

 

जेव्हा केव्हा आश्लेषा सीमेवरून आम्हाला भेटायला (वर्षांतून एखाद्या वेळेस) येत असे तेव्हा तिच्याकडे पाहण्यातच माझ्या आयुष्याचे समाधान दडलेले असे. तिचा सीमेवरील साधारण साडेतीन वर्षांचा काळ हा आमच्या आयुष्यात साडे तीन युगांसारखा गेला. खरं तर आई म्हणून तिने सैन्यात जाण्याचा घेतलेला निर्णय पटत असूनही पचनी पडत नव्हता. कारण कुठेही पोस्टिंग होऊ शकत होतं. संकटांच्या छायेत, दुर्गम जागी. परंतु एक मुलगी, एक स्त्री हे करू शकते. किंबहुना तिनेही करायला हवं, हेही पटत होतं. त्यामुळे माझ्यातल्या स्त्रीने आईपणावर मात केली.

सैन्यदलात म्हटलं की शत्रूशी सामना हे गृहीत होतं. पण जनावरांचा, किटकांचाही तिला सामना करावा लागे. कारण मुक्कामच अशा ठिकाणी असायचा. एकदा अशाच एका वास्तव्यात तिच्या मोठय़ा बॅगेमध्ये नाग जाऊन बसला होता. एका दुपारी मेसमध्ये जेऊन ती तिच्या रूममध्ये आली. रूम म्हणजे पत्र्याची टेंपररी शेड. तिथल्या एका पडद्यावर काहीतरी असल्याचं तिला जाणवलं पण दिसलं काही नाही. तेव्हा जास्त विचार करायला वेळ नव्हता. हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. संध्याकाळी परत आल्यावर साहाय्यकाच्या मदतीने सर्व सामान तपासताना एक मोठ्ठा नाग वेटोळं घालून बॅगेत बसलेला दिसला. बॅग तशीच बंद करून मैदानात नेऊन त्या नागाला सोडून देण्यात आलं. ही गोष्टही तिने आम्हाला नंतर कधीतरी भेटलो तेव्हा सांगितली. विषारी कोळी, विंचू, जंगली टोळ, अनेक कीटक हेही काही कमी उपद्रवी नव्हते. एका पावसाळ्यात अशीच ती नव्याच पोस्टिंगच्या ठिकाणी गेली. दिवसभर हॉस्पिटलमध्ये काम करून रात्री रूममध्ये झोपली, रात्रभर काहीतरी चावत राहिलं. पण श्रमामुळे प्रचंड झोप डोळ्यावर होती. सकाळी उजेडात पाहिलं मात्र संपूर्ण अंगभर पुरळ आलेलं. अंथरूण- पांघरूण पाहिलं तो काळे कीटक दिसले. नीट पाहिलं त्या

चक्क पिसवा होत्या. जमिनीवरील कार्पेटवर पटापट उडत होत्या. तोपर्यंत फक्त शालेय पुस्तकातील

चित्रात पहिल्या होत्या. कसं निभावलं असेल तिने हे सारं. हा प्रसंग आठवून आजही काळजाचं पाणी

पाणी होतं.

सीमेच्या अलीकडील या शत्रूंशी लढत लढत सीमेपलीकडील शत्रूशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुकाबला करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या आरोग्याची काळजी तिने खूप जबाबदारीने पार पाडली. सर्वच क्षेत्रांप्रमाणे आर्मीतही डॉक्टरांची संख्या कमीच असल्यामुळे तीन-तीन हजारांच्या पलटणीसाठी एक डॉक्टर अशा परिस्थितीत कसल्या ताणाखाली तिने ती साडेतीन वर्षे पार पाडली असतील, हे तिच जाणो. एक अनुभव तिच्या तोंडून ऐकला होता. आर्मीतल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ती सहभागी झाली होती; शीख रेजिमेंट होतं ते. जगंलात घुसलेल्या अतिरेकी घुसखोरांना शोधण्याची ती मोहीम होती. अचानक एक लँडमाईन (सुरुंग) फुटला. त्यातील अणकुचीदार स्प्रिंटर्स एका जवानाच्या पायात घुसले. तो विव्हळत होता. त्याच स्थितीत सर्व स्प्रिंटर्स काढून टाकून त्याला बँडेज केलं. तिने त्याला एवढा विश्वास दिला की तो म्हणाला, ‘‘डॉक्टर आप हो तो मैं दौड भी सकूंगा.’’ हे त्याचे उद्गार हे तिला मिळालेलं मोठं मेडल होतं, असं ती म्हणते. अशा आर्मीतल्या ऑपरेशन्समध्ये डॉक्टर आणि कॅप्टन या दोन्ही पदांचा कस लागेल असे अनेक प्रसंग तिने शौर्याने आणि धीराने निभावून नेले. त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांत डावं-उजवं करायला सैन्याला सवड नसते, किंबहुना गरजही वाटत नाही. तीही कधी आपलं स्त्रीत्व गोंजारत बसली नाही.

तिचं स्वत:चं लग्न दहा दिवसांवर आलेलं असताना ती सैनिकांच्या देखभालीत मग्न होती. तिचं केळवण म्हणजे सैनिकांसोबत घेतलेलं जेवण. लग्न करून आठ दिवसात लगेच डय़ूटीवर हजरही झाली पुन्हा. त्यावेळी तिचे पती तिच्याबरोबर तिच्या पोस्टिंगच्या ठिकाणी गेले होते. तेव्हा अगदी लाडक्या जावयासारखं साऱ्या जवानांनी कोडकौतुक केलं त्यांचं. सुदैवाने तिला सासरची मंडळीही लाखमोलाची मिळाली. पती आदित्य केळकर, सासरे विश्वास केळकर आणि सासूबाई अ‍ॅडव्होकेट विनया केळकर या सर्वाना तिचं सैन्यदलात असण्याचा कोण अभिमान.

साडेतीन वर्षांच्या सीमेवरील पोस्टिंगनंतर मुंबईत मालाड येथील ‘आयएनएस हमला’मध्ये तिची एम.ओ.पदावर नियुक्ती झाली, तरी पोस्ट सोडून ती बाहेर जाऊ शकत नव्हती. लग्नाचे नव्या नवलाईचे सारे सण येत राहिले, पण ती घरी येईल तेव्हा सर्व सण साजरे करण्याची भूमिका घेऊन तिच्या सासरच्या मंडळींनी दिलाशाचा आणि आधाराचा स्तंभ रोवला. ‘आयएनएस हमला’मध्ये असताना नौदलाच्या युद्धनौकांच्या लेखा परीक्षणात तिने सहभाग घेतला. आजवरच्या इतिहासात खूपच कमी स्त्रियांना ही

संधी मिळाली आहे. ‘आयएनएस हमला’मध्ये कार्यरत असताना तिला मेजर ही पदोन्नती मिळाली.

समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही परिस्थितीवर केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या योगे आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची, उमेदीची मौल्यवान पाच वर्षे भारतीय सेनेला अर्पण करून आपल्या देशाचं, आपल्या मातीचं ऋ ण फेडण्याचा तिने प्रयत्न केला. आता पुढची वर्षे एमडी करून दुर्गम ठिकाणी, जिथे माणसांना सेवेची गरज आहे, तिथे जाऊन राहाण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणं सुरूआहे.

लहानपणापासूनच अगदी लाडाकोडात वाढलेली मुलगी आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णायक प्रसंगी किती योग्य आणि खंबीर निर्णय घेऊ शकते याचं उदाहरण म्हणजे आश्लेषा. आपलं एकुलतं एक असणं कुरवाळत बसण्यापेक्षा सीमेवरील जवानांना आईच्या ममतेने थोपटण्यात तिने धन्यता मानली. एका स्त्री डॉक्टरचं महत्त्व या ठिकाणी प्रभावी ठरु शकतं, हे तिने स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिलं.

एक आई म्हणून सुरुवातीला आश्लेषाचा सैन्यात जायचा निर्णय विचारात पाडणारा वाटला तरी आज तिने सैन्यातील पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर मला अभिमानाने सांगावेसे वाटते किंवा आवाहन करावेसे वाटते की, आपल्या देशातल्या जास्तीत जास्त मुलींनी तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेऊन भारतीय सैन्यदलात स्वेच्छेने भरती व्हावं आणि स्वत:बरोबरच देशाचेही हात बळकट करावेत. मुलींनी सैन्यात भरती होणं ही काळाची गरज आहे. भारत स्वतंत्र होऊन पाऊण शतक होतंय तरी सेनेत आजही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी का? स्त्रियांनी स्वेच्छने हे करिअर निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला देश अवघ्या त्रिखंडात अभेद्य राहील, अधिक बळकट होईल.

जय भारत!

आदिती तावडे   

adititawade2014@gmail.com