मूल दत्तक घेणं, आता फारसं नवलाईचं राहिलेलं नाही.. अनेक जण यशोदा आणि नंदची भूमिका समर्थपणे बजावत आहेत, मात्र गतिमंद, मतिमंद मुलाला दत्तक घेऊन नवं मैत्र जोडणारे विरळाच!  अ‍ॅना आणि अ‍ॅडम यांनी तर त्यावरही मात करत ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणत इथोपिया, चीन आणि आता भारतातील गतिमंद रियाला दत्तक घेऊन पालकत्वाचा एक नवा आयाम समोर आणला आहे. उद्या जागतिक मैत्री दिन.. त्यानिमित्ताने अ‍ॅना-अ‍ॅडम, टेलर न्यूसन-हना आणि सुरजीत रामस्वामी-शिवानी या जोडप्याच्या या नव्या नात्याविषयी..

कोलाहल सुरू होता आत.. बाहेर होते निषेधाचे उंचावलेले सूर. टिपेला होता आवाज घोषणांचा. गळ्यात गमछे होते. भगवा ध्वज, पताका उंचावत, आरक्षणाची मागणी हिंसक वळणावर आलेली. गाडय़ांवर दगडफेक सुरू होती. जाळपोळ, मारामारी असं सारं आदळत होतं. पोलीस उभे होते चौकाचौकात, काठय़ा आणि बंदुकांसह..  वातावरणात भीती होती.. पण त्याच वेळी दुसरीकडे एक नातं अलवारपणे आकार घेत होतं. अ‍ॅना आणि रियाचं नातं! बिलगून बसली होती रिया तिला. अ‍ॅना आणि अ‍ॅडम वुडवर्थ याचं हे तिसरं दत्तक मूल. तिला बरोबर नेण्यासाठी ती खास अमेरिकेहून आली होती औरंगाबादला. लग्न झाल्यावर अ‍ॅनाला लुकास आणि अ‍ॅडलेन अशी दोन गोंडस मुलं झाली. तरीही अ‍ॅडम आणि अ‍ॅनानं ठरवलं, आपण आणखी मुलं दत्तक घ्यायची. रिया त्यांची तिसरी दत्तक मुलगी. पहिला मुलगा इथोपियाचा. कृष्णवर्णीय, जेम्स. दुसरं मूल चीनमधून घेतलेलं, सीयान. बारीक डोळ्यांचा. फिकट गव्हाळ वर्णाचा आणि आता ही तिसरी मुलगी, रिया भारतातली. मात्र रिया जन्मजात गतिमंद. अ‍ॅना हसून अभिमानानं म्हणाली- ‘हे माझं पाचवं मूलं.’ तिनं बिलगून बसलेल्या रियाच्या डोक्यावरून हात फिरवला. श्रीकृष्णाची यशोदा वाटली. देवकी आणि यशोदा या दोघी एकाच देहात असत्या तर कशा दिसल्या असत्या- अ‍ॅनासारख्या?

घरात विश्व सामावून घ्यायचं ठरवलं असावं अ‍ॅना आणि अ‍ॅडमनं. ‘वसुधव कुटुंबकम्’ हे आपल्याकडचं तत्त्वज्ञान! अ‍ॅना ते प्रत्यक्षात जगणारी. कुठून आलं असेल सारं तिच्यामध्ये? बारीक डोळ्यांचा सीयान तिच्याभोवती पिंगा घालत होता. मधूनच उडी मारायचा, अ‍ॅनाचा मोठा मुलगा लुकास, त्याच्याशी रमला थोडा वेळ. कागदावर त्याने ओढलेल्या रेघोटय़ावर काही तरी चाललं होतं त्या दोघांचं. दोन स्वत:ची मुलं असताना अशी मुलं दत्तक घ्यायची कशाला? बाळबोध प्रश्न, पण विचारलाच. ‘‘खूप जणांना एक घर हवं असतं. नाही का? – भरभरून दिलं आहे आम्हाला ईश्वरानं. मग कोणाला प्रेम देऊन मदत करता येणार नाही का? माझ्या नवऱ्याला दोन दत्तक बहिणी आहेत. त्यांच्या नात्याला वेगळेच पदर आहेत. ते मत्रीचे आहेत, प्रेमाचे आहेत. वेगळंच मैत्र आहे त्या तिघांमध्ये. असंच नातं आपल्या मुलांच्याही आयुष्यात असायला हवं असं वाटलं आणि मूल दत्तक घेण्याचं आम्ही ठरवलं. सकाळी जेव्हा आम्ही नवरा-बायको उठतो ना तेव्हा सगळी मुलं अंथरुणात शिरतात. मायेने जवळ येतात. खूप काही घडतं तेव्हा आमच्यातल्या नात्यात. त्या आनंदासाठी हे सारं. चर्चमध्ये जाते तेव्हा माणूस जोडा, असं सांगितलं जातं. ती कशी जोडायची? -अशी जोडता येतात की नाती! वेगळ्याच पातळीवरचं. नव मैत्र जन्माला येतं.. आई-वडील आणि मुलांमधलं.’’

इथोपियामधून दत्तक घेतलेला कृष्णवर्णीय जेम्स, चीनमधला सीयान, लुकास आणि अ‍ॅडलेन हे एकमेकांचे बहीण-भाऊ. खाणं-पिणं, बसणं, खेळणं अगदी हट्ट असं सारं काही मिळून करणारी. मग अ‍ॅनाच्या नव्या बाळांचा देश कोणता? चेहऱ्यावरचे शंकेचे भाव लक्षात आले असावेत अ‍ॅनाच्या. ती बोलत राहिली.. ‘‘या मुलांना त्याचं मूळ कोणतं हे अभिमानानं सांगता यायला हवं, असंच वातावरण आम्ही त्यांना देऊ.’’ अ‍ॅडम वुडवर्थ वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करणारा. अ‍ॅनाने मानसशास्त्रात पदवी मिळविलेली असली तरी ती पूर्णवेळ गृहिणीच आहे. अशा नव्या वैश्विक घरात औरंगाबाहून आता रिया दाखल होतेय. कंठ दाटून आला..

‘‘अमेरिकन गौरवर्णाचा लुकास आणि कृष्णवर्णीय जेम्स जेव्हा त्याच्या मित्रांबरोबर खेळायला जातात आणि गोरा लुकास म्हणतो, ‘जेम्स माझा भाऊ आहे.’ तेव्हा त्याला माणूसपण अधिक कळायला लागतं. तो जेव्हा सीयानच्या चिनी दिसणाऱ्या मित्रांना सांगतो, तो माझा भाऊ आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो, आश्चर्य वाटतं. पण मग त्यांनाच कळतं माणूस असणं म्हणजे काय ते.’’ अ‍ॅना मुलांचं मैत्र सांगत होती. जगण्याची ही अशी विशाल आणि उदात्त चौकट असू शकते? मनातल्या मूल्यांच्या चौकटी विस्कटून जात होत्या. देशप्रेम, राष्ट्रवाद या शिकलेल्या की शिकवलेल्या संकल्पनांना काहीच न बोलता अ‍ॅना तडे देत होती.  तिचा हात रियाच्या डोक्यावर हलकेच फिरत होता. त्या निरागस डोळ्यात काहीच नव्हतं. आता तरी तिला काही कळणार नव्हतंच. इतकी ती लहान आहे पण तिला आता स्वत:चं हक्काचं घर मिळालं होतं. तिचे हक्काचे आई-बाबा होते. रियाची जन्मदाती असेल कोणी तरी कुंतीसारखीच? समाज भीतीने तिला एकटीला सोडून देणारी. पण रियाचं जगणं आता बदलणार होतं. कारण एक नातं जन्माला आलं होतं. देशाबाहेरचं. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींना ज्या कारणामुळं रेल्वेतून खाली उतरवलं होतं त्या त्वचेच्या रंगाचा मुद्दा अ‍ॅना वेगळ्याच पद्धतीने हाताळू पाहत होती. हे सारं करताना कोणतीही उपकाराची भावना तिच्या शब्दात नव्हती. उलट यात आमचाच स्वार्थ आहे, असं बिनदिक्कत सांगणारी. ‘आम्हा नवरा-बायकोसाठी आनंदाची बाब आहे ही. असे आमचे खूप मित्र आहेत ज्यांना असं जगायला आवडतं. आम्ही कदाचित त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो आहोत.’ असं ती आवर्जून सांगत होती. माणूसपणाच्या कक्षा रुंदावणारी अ‍ॅना विश्वबंधुत्वाचं नवं मैत्र निर्माण करीत होती.

टेलर न्यूसन आणि हनाची चारू

२७ वर्षांचा टेलर न्यूसन आणि त्याची पत्नी हना पंचविशीतील असेल फारतर. तसे आपल्या लेखी धडधाकट. पण मूल जन्माला घालण्याऐवजी ते दत्तक घेऊन वाढवायचा निर्णय घेतला त्यांनी. हना सांगत होती, ‘अनेकांना घर हवं असतं. प्रेमाची भुकेली अनेक माणसं आहेत या जगात. प्रत्येकाला नाही मदत करता येणार. पण कोणा एकाला तरी मदत करता येईलच की!’ हे या दाम्पत्याचं पहिलं मूलं. इथोपियामधला एक मित्र होता. त्याने एक मूल दत्तक घेतलेलं. त्याचा आनंद पाहिला आणि तो आपल्यालाही घेता येईल की असं वाटलं आणि काही क्षणात त्यांनीही दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. टेलर आणि हना एकमेकांकडे पाहून निर्णय प्रक्रियेतील बारकावे एकमेकांच्या चेहऱ्याकडं पाहून खात्री करून घेत होते. चारू ‘नकोशी’ होती कोणाला तरी. कदाचित अगदी स्वत:च्या आईबाबालाही. म्हणूनच औरंगाबादच्या ‘साकार’ संस्थेत आलेली. जन्माला आली तेव्हा तिची नजर स्थिरावतच नव्हती. दृष्टिदोष आहे तिला. पण चालू-बोलू शकते. हनाच्या कडेवर बसून तिचं पा.. बा.. असं काहीतरी चाललं होतं. ‘‘तुझं बोलणं किती गोड आहे गं,’’ असं म्हणत हनाने तिचा मुका घेतला. तिला कडेवर घेताक्षणी ती तिची आई झाली होती आणि टेलर बाबा! जेव्हा केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडून हनाला कळलं की, भारतीय मूल आपल्याला दत्तक मिळू शकतं तेव्हा तिला मोठा आनंद झाला. माणूस ज्या भागात जन्मतो त्या भागाची अशी एक चव असते त्याच्या जिभेला, असं हनाचं म्हणणं. चारूला दत्तक घ्यायचं म्हणून ती मग भारतीय पद्धतीचं जेवण बनवायला शिकली. सहसा अमेरिकी माणसाला मसालेदार पदार्थ आवडत नाहीत, पण मला आवडतात, ती म्हणाली. पण खरं तर केवढं मोठं मन लागतं असं दुसऱ्या देशातल्या एकीला आपलं म्हणताना तिला तिच्या मातीतच वाढवायचं, असा विचार करताना. हनाने तसं ठरवलंय. आमच्याशी बोलता बोलता ती चारूला खेळवत होती, ‘‘भूर्र..’’ असं म्हणत तिच्यात जवळीकता साधत होती. एक वेगळं नातं निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. हे सारं सामाजिक काम असल्या संकल्पनांतून नाही आलं, हे सांगण्याचा प्रामाणिकपणा हनामध्येही आहे. ‘‘आम्हाला आनंद वाटतो त्याचा. आमच्या आनंदासाठीच चारूला घेतलंय आम्ही.’’ ती सांगते. हना उच्चशिक्षण क्षेत्रात नोकरी करते आणि टेलर एका रुग्णालयात थेरपिस्ट म्हणून काम करतो. ते दोघं सांगत होते, ‘‘हे आमचं मूल आहे.’’

सुरजीत रामस्वामी-शिवानीची कश्मीरा

‘कारा’ (Central Adoption Resource Authority) संकेतस्थळावर नोंदवलेली कश्मीरा आम्हाला दत्तक म्हणून हवी आहे, असं कोईम्बतूरच्या सुरजीत रामस्वामी आणि त्याची पत्नी शिवानी कश्यप या दोघांनी नोंदवलं. सुरजित गुवाहाटीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. करणारा तर शिवानी लष्करातील जवानांच्या ताणतणावाशी निगडित, मानसशास्त्रीय विषय हाताळणारी. त्या दिवशी औरंगाबादच्या ‘साकार’मधला दूरध्वनी खणखणला. पलीकडून आवाज आला, ‘मी कश्मीराचा पापा बोलतोय.’ जन्मदाते असूनही कश्मीरा दत्तक जावी, अशी त्यांची अपेक्षा होती कारण कश्मीरा बहुविकलांग आहे. डॉक्टरांनी तिच्या आरोग्याविषयी केलेले निदान मोठं अवघड आहे. ‘सेरेब्रल पाल्सी’ आजारामुळं तिची वाढ खुंटली आहे. तिच्या मेंदूच्या रचनेतच मुळात आजार आहे. त्यामुळे कश्मीराला दत्तक घेण्यासाठी कोणी पुढं येत नव्हतं. गुवाहाटीच्या आयआयटीमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या या दाम्पत्यानं कश्मीराला दत्तक घेण्याचं ठरवलं. ते दोघे औरंगाबादला आले. तेव्हा ‘साकार’च्या समुपदेशकासमोर बसले. नीलिमा सुभेदार त्यांना प्रश्न विचारत होत्या. ‘आता तुम्ही मूल दत्तक घेणारच आहात, तर तुमची दत्तक घेण्याची संकल्पना आणि माझी संकल्पना जरा जुळते का पाहू.’ शिवानी खूप बडबडी आणि रामस्वामी मितभाषी. त्यानं प्रश्न केला, ‘‘आई-बाप व्हायला जनुकांची गरज असते का? खरंच ‘डीएनए’, ‘आरएनए’मुळे आई-बाप होता येतं का? मला नाही वाटत. त्यासाठी जनुकीय गरज आवश्यक नसते.’’ रामस्वामी समुपदेशनाला बसलेल्या ‘साकार’च्या विश्वस्तांना सांगत होता. त्यांना समुपदेशकही तेच सांगत होत्या.

एक मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा तीन जन्म झालेले असतात. एक मुलाचा, दुसरा एक आईचा आणि तिसरा बाबाचा. काही जण जन्मदाते होतात. पण त्यांना आई-बाबा होता येतंच, असं नाही. आपण घेतलेला मूल दत्तक घेण्याच्या निर्णयाला मिळणारा आधार बघून शिवानीच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला होता.. आता फक्त त्यांना तो योग्यप्रकारे निभावायचा होता. त्यांच्या पालकत्वाची कसोटी लागणार आहे कारण कश्मीरा बहुविकलांग आहे. तिची काळजी वेगळ्याच प्रकारे घ्यावी लागणार आहे. जगण्याला नवं आयाम देणारं हे जोडपं एक नवं उदाहरण घालू पहाणारं!

खरं तर मूल दत्तक घ्यायचं ठरवल्यापासूनच जणू शिवानीला आपणच प्रत्यक्ष आई होणार असं वाटत होतं. ते आईपण तिच्या शरीर-मनाच्या जाणिवेत जाऊन बसलं होतं म्हणूनच तिने तिच्या नवऱ्याला एकदा विचारलंसुद्धा, ‘‘बघ रे, माझ्या पायावर सूज आली आहे.’’ अर्थात वास्तवाचं भान असणाऱ्या रामस्वामी यांनी मात्र तिची समजूत घालत, असं होत नसतं, असं बजावलं. मात्र कश्मीराला दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर किती गोष्टी आपल्याला नव्याने घ्याव्या लागतील, याचा विचार करून पहिली कृती त्यांनी केली ती म्हणजे कश्मीरासाठी खरेदी. लेकीची जय्यत तयारी करूनच तिला घरी आणायचं त्यांनी नक्की केलं. कपडे घेतले आणि  लहान मुलांना लागणारं बरंच साहित्य घेतलं. ‘‘रक्तामांसाचं असं काही नसतं हो. आपण कसे वागतो, यावर बरंच काही ठरतं. आता कश्मीराला मला गुवाहाटी आयआयटीच्या परिसरात घेऊन जायचंय. खूप हिरवळ आहे तिथं. बदकंपण आहे तळ्यात. तिला दाखवायची आहेत मला.’’ शिवानीमधली आई बोलत होती आणि रामस्वामीमधला वडील!

कश्मीरासारखं मूल दत्तक म्हणून घेण्याचा शिवानी आणि सुरजितचा निर्णय ‘साकार’मधील कार्यकर्त्यांनाही धाडसाचा वाटतो. कारण आयुष्यभर या मुलाचं सारं काही करावं लागणार आहे शिवानीला. त्यामुळे हा निर्णय भावनेच्या भरात तर नाही ना घेतला या जोडप्यानं, असा प्रश्न सर्वाच्या मनात उभा राहिलाच. या भीतीपोटी शिवानी आणि सुरजीतला जास्तीत जास्त आणि थेट प्रश्न विचारले गेले. पण, त्यांचा निर्णय पूर्ण विचारांती असल्याचं लक्षात आल्यावर हे रसायन वेगळंच असल्याचं लक्षात आलं. पितृत्व आणि मातृत्व कदाचित असेल निसर्गदत्त. पण पालकत्व हे प्रेमाच्या जिवावर बहरतं, असं या जोडप्याचं म्हणणं. अ‍ॅना-अ‍ॅडम, शिवानी- सुरजित, टेलर-हना ही जोडपी नवं विश्व उभं करू पाहताहेत. त्यांना यश मिळाले तर समानतेसाठी लढणारे, वर्णभेदाच्या विरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांच्या विचारांना बळ मिळणार आहे. पण नुसते विचार करण्यापेक्षा कृतीतून नव्या संकल्पनांना भिडणारी  ही मंडळी तशी कमीच. हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढी. तरी ते देत असलेला संदेश ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ हा ज्ञानेश्वरीतील अर्थ जगण्यात उतरवणारी. तत्त्वज्ञान हे असं जगण्यात आणावं लागतं हे सांगणारी ही उदाहरणं माणूसपणाच्या कक्षा रुंदावणारी!

suhas.sardeshmukh@expressindia.com

chaturang@expressindia.com