22 April 2019

News Flash

गणेशभक्तीला कोंदण पर्यावरण जतनाचे

चराचर सृष्टी व्यापणाऱ्या अनंताचं दर्शन निसर्गाच्या विविध रूपांतून होत असतं, हे सांगणाऱ्या या ओळी.

‘पर्यावरण दक्षता मंच’तर्फे शालेय मुलांसाठी आयोजित केलेली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा.

गणेशोत्सव आनंदात सुरू झालाय, परंतु विसर्जनानंतर मूर्तीच्या विघटनापासून निर्माल्याच्या व्यवस्थापनेपर्यंत अनेक गोष्टींमुळे  जैविक संपदेची हानी होते. ती भरून काढण्यासाठी अनेकांनी विविध विधायक उपाय शोधून काढले आहेत. यात अगदी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागापासून शासकीय योजनांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.  त्यासाठी

गेली अनेक र्वष सातत्याने झटणाऱ्या काही अवलियांची ही  खास ओळख..

तुला पाहिले ऋतुऋतुतून, फुलाफळांतून

त्या गगनातून या मातीतून, स्थितीगतीतून

संघर्षांतून, सुख-दु:खातून, व्यथेव्यथेतून

या सृष्टीतून अन् भवतीच्या मानवतेतून

रे कसे शोधू तुला वेडय़ापरि मी तुलाच टाकून

मी कधीच नाही म्हटले तू दे मज दर्शन..!

–  मंगेश पाडगावकर

चराचर सृष्टी व्यापणाऱ्या अनंताचं दर्शन निसर्गाच्या विविध रूपांतून होत असतं, हे सांगणाऱ्या या ओळी. पण आज आपण बघतोय की गणरायाच्या उत्सवासाठी त्याचाच अंश असणाऱ्या निसर्गाचा नाश केला जातोय. जैविक संपदेच्या अशा हानीमुळे ओढवणाऱ्या संकटातून पृथ्वीला वाचवण्यासाठी आता सर्वत्र प्रयत्न सुरू झाले आहेत. या नव्या जाणिवेचे पडसाद गणेशोत्सवातही उमटलेले दिसतात. बदलाची ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी गेली काही र्वष सातत्याने झटणाऱ्या काही पर्यावरणप्रेमींची, म्हणजेच गणेशभक्तीला पर्यावरणजतनाच्या कोंदणात बसवणाऱ्या काही अवलियांची ही ओळख..

गणेशोत्सवासाठी रूढ झालेल्या पारंपरिक प्रथांमुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय हे शास्त्रोक्त पद्धतीने समप्रमाणात दाखवून देणारी पहिली संस्था म्हणून ठाण्याच्या ‘जिज्ञासा ट्रस्ट’चा उल्लेख केला तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही. शालेय मुलांच्या सर्वागीण विकासाचं व्रत घेतलेल्या ‘जिज्ञासा’च्या इयत्ता नववीतल्या चार विद्यार्थ्यांनी १९९७ मध्ये आय.आय.टी., मुंबई येथील प्राध्यापक डॉ. शाम असोलेकर, ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजचे

प्रा. नागेश टेकाळे आणि संस्थापक सुरेंद्र दिघे- सुमिता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ठाण्याच्या मासुंदा तलावातील पाण्यावर गणपती विसर्जनामुळे होणारा परिणाम’ या विषयावर एक प्रकल्प तयार केला; जो राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत अव्वल ठरला. भारत सरकारने त्यावर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत दहा मिनिटांचा माहितीपट तयार केला. हा माहितीपट संपूर्ण देशभर दाखवला गेला आणि त्याने इतिहास घडवला. प्रेक्षकांतील अनेकांनी पर्यावरणपूरक मूर्ती आणण्याचा निश्चय केला. त्या अर्थाची पत्रं ‘जिज्ञासा’कडे आली. त्यात कौतुक करणारं एक पत्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचंही होतं.

काही वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जल प्रदूषणसंदर्भात एक याचिका दाखल केली. त्यात ‘जिज्ञासा’च्या या विज्ञान प्रकल्पाच्या अहवालाचा महत्त्वाच्या दस्तऐवजात उल्लेख केला गेला. न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारला २००८ मध्ये जलनीती जाहीर करावी लागली. या जलनीतीनुसार पाण्याच्या सर्व स्रोतांचे नियमन करणे ही शासनाची कायदेशीर जबाबदारी ठरली. परिणामी तळी संवर्धन करण्यासाठी शासनाला विसर्जनावर बंधने घालावी लागली. अशा तऱ्हने शालेय विद्यार्थ्यांच्या एका प्रकल्पामुळे एका देशव्यापी चळवळीला तोंड फुटले.

मूर्तीबरोबर पाण्यात निर्माल्य टाकू नये यासाठी विसर्जन घाटावर मानवी साखळींचं आयोजन आणि उत्सव काळात ठिकठिकाणचं ध्वनिप्रदूषण उपकरणाद्वारे मोजून पोलिसांना केलेली मदत हेदेखील ‘जिज्ञासा’च्या मुलांनी दहा बारा वर्षे राबवलेले उपक्रम. याबरोबर ठाणे जिल्ह्यतील शाळांमधील मुलांसाठी पथनाटय़ स्पर्धा हादेखील ‘जिज्ञासा’च्या वाटचालीतील एक मैलाचा दगड. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अट अशी की, अंतिम फेरीतील विजेत्यांनी आणि उपविजेत्यांनी आपलं पथनाटय़ पाच सार्वजनिक गणपतींसमोर सादर करायचं. या नियमामुळे मुलांनी निवडलेले विविध समाजाभिमुख विषय लोकांपर्यंत सहजी पोहोचले.. पोहोचत आहेत.

अंतर्गत भेद विसरून सर्वानी एकत्र यावं या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली खरी, पण आज गाव असो वा शहर नाक्यानाक्यांवर मंडप उभारून आपापल्या विभागाच्या गणपतीची स्थापना केलेली दिसते. या मंडळांचे वैयक्तिक हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी करण्याची धडपड, यातून होणारे वादविवाद, भांडणं यामुळे गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेलाच तडा जातोय की काय अशी भीती वाटते. यावर उत्तर म्हणून काहींनी ‘एक गाव एक गणपती’ असा आदर्श उपक्रम सुरू केलाय.  एकटय़ा पुणे जिल्ह्यतच अशी ४८९ गावं आहेत.

नवी मुंबईमधील अग्रोळी गावात ही पंरपरा सुरू करण्याचं श्रेय दिवंगत भाऊराव सखाराम पाटील यांच्याकडे जातं. १९६१ चा काळ. भाऊरावांच्या लक्षात आलं की गावकरी हा सण ऋ ण काढून साजरा करत होते आणि त्यापायी कर्जबाजारी होत होते. काहींची तर जमिनी विकेपर्यंत मजल गेलेली. यावर त्यांनी विचारपूर्वक ‘एक गाव एक गणपती’ हा तोडगा काढला. अर्थात ही संकल्पना लोकांच्या गळी उतरवणं सोपं नव्हतं. परंतु भाऊसाहेब आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी जाहीर करून टाकलं की या वर्षांपासून मी घरासाठी नव्हे तर गावासाठीच मूर्ती आणणार. हळूहळू सगळं गाव त्यांच्या मागे उभं राहिलं.

५६ वर्षांपूर्वी घरटी सव्वा रुपया घेऊन सुरू झालेल्या या उत्सवासाठी आता गावकरी आनंदाने हजार हजार रुपये देतात, तेही न मागता सुरुवातीला पत्र्याच्या शेडखाली स्थानापन्न झालेली गणेशाची मूर्ती आता एका खास सभागृहात विराजमान होते. देवापुढे डी.जे. नसतो, तिथे भजन रंगतं. आरतीच्या वेळी अख्खं गाव मंडपात जमा होतं. मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील म्हणाले की, ‘‘आमच्या या निर्णयामुळे गावात एकी तर झालीच, शिवाय लोकांच्या खिशावरील आणि निसर्गावरील ताण कमी झाला.’’ अग्रोळी गावातील सर्वच्या सर्व म्हणजे ११० कुटुंबं आज अभिमानाने सांगतात.. ‘आम्ही एक आमचा बाप्पा एक!’

पर्यावरणरक्षणासाठी झटणाऱ्या आणखी एका अवलियाचं नाव म्हणजे चिंचवडमधील पॅथॉलॉजिस्ट डॉ. अविनाश वैद्य. गणेशमूर्ती विक्री योजनेला त्यांनी वेगळाच रंग दिलाय.  ‘शंकर महाराज सेवा मंडळ’ या ट्रस्टद्वारे चालणाऱ्या या उपक्रमाची टॅगलाइन आहे.. ‘मूर्ती आमची किंमत तुमची!’ डॉक्टर म्हणाले, ‘या उपक्रमाचं आमचं हे पाचवं वर्ष. पहिल्या वर्षी आम्ही शाडूच्या मातीच्या दोनच मूर्ती तयार केल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात महिनाभर मूर्तीसह फिरून त्यांचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वर्षी ३६९ मूर्ती बनवून त्या ‘मोरया प्रसाद हॉल’वर विक्रीसाठी ठेवल्या. प्रत्येक मूर्तीला विक्रीमूल्य दर्शवणारं लेबल अडकवलं आणि त्याबरोबर त्या जागेवर एक फलकही लावला. ज्यावर लिहिलं होतं की तुम्ही तुम्हाला हव्या त्या किमतीत मूर्ती नेऊ शकता.. या योजनेत ग्राहकांना मूर्ती निवडल्यावर एक रिकामं पाकीट देण्यात येतं. त्यात ऐच्छिक रक्कम घालून ते शेजारील देवळातील देवापाशी ठेवायचं. त्यावर कोणतीही खूण नसते किंवा त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नाहीत. त्यामुळे दिलेलं दान हे गुप्तच रहातं. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि दरवर्षी मूर्तीची संख्या वाढत चाललीय. मात्र उडदामाजी काळे गोरे या न्यायाने काही पाकिटं रिकामीही मिळाली तर गेल्या वर्षी या गुप्तदानात एकाने लाख रुपयांची भेट दिली. हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा या वर्षीच्या पंधराशे मूर्ती घरोघर पोहोचल्या असतील.

या उपक्रमाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचं कारण म्हणजे मूर्ती विक्रीतून येणाऱ्या पैशांचा विनियोग ट्रस्टद्वारे वृद्धाश्रम उभारणी, गरजूंना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत.. अशा विधायक कामांसाठी केला जातोय. म्हणजे पर्यावरणाच्या जपणुकीसह सामाजिक भानही!

अंधेरी येथील ‘इको श्री गणेश आर्ट्स’चे प्रणय वस्ते हेदेखील पर्यावरणाचा विचार करणारे एक मूर्तिकार. ‘लोकसत्ता गणेश दर्शन’ स्पर्धेत २०१२ मध्ये सवरेत्कृष्ट मूर्तिकाराचं बक्षीस पटकावणाऱ्या या मूर्तिकाराला मूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना (तुटलेले अवयव / लाटेबरोबर काठावर येऊन पडणं) बेचैन करत होती. त्यांनी निर्णय घेतला आणि मागील तीन वर्षांपासून फक्त लाल मातीच्या आणि कागदाच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली.

अंधेरी येथील ‘इको श्री गणेश आर्ट्स’चं वेगळपण म्हणजे मूर्ती बनवताना त्या मातीत तुळशीच्या किंवा सुंदर फुलांच्या बिया पेरल्या जातात. विसर्जन करताना एखाद्या खोलगट ट्रेमध्ये मूर्ती ठेवून तीन/चार दिवस पाणी टाकत राहिलं की मूर्ती विरघळते आणि पुढच्या काही दिवसांत त्यातून रोप उगवतं. दुसऱ्या मूर्ती ‘पेपर मॅश’अर्थात कागदाच्या लगद्यापासून केल्या जातात. त्यात थोडा ब्राऊन पेपर, माती आणि डिंक असतो. ही मूर्ती पाण्यात सहज विरघळते आणि  तो गाळ झाडांच्या उपयोगी येतो. ‘पेपर मॅश’ गणेशाचा आणखी एक फायदा म्हणजे मूर्ती दिसायला मोठी वाटली तरी वजनाला हलकी असल्याने लहान मुलांनाही बाप्पाला उचलून नेण्याचा आनंद मिळतो. वस्ते कुटुंबाचं सर्वात मोठ्ठं समाधान म्हणजे त्यांनी एक हजार कुटुंबांना ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’वरून माती वा कागदाच्या मूर्तीकडे वळवलंय.

उत्सव असो वा दैनंदिन जीवन वन्यजीवन संरक्षण याच ध्येयपथावर गेली १५ र्वष वाटचाल करणारी संस्था म्हणजे अंधेरी येथील ‘स्प्राउट्स एन्व्हायर्न्मेंट ट्रस्ट’.

तो गाळ झाडांच्या उपयोगी येतो. पेपर मॅश गणेशाचा आणखी एक फायदा म्हणजे मूर्ती दिसायला मोठी वाटली तरी वजनाला हलकी असल्याने लहान मुलांनाही बाप्पाला उचलून नेण्याचा आनंद मिळतो. वस्ते फॅमिलीचं सर्वात मोठ्ठं समाधान म्हणजे त्यांनी एक हजार कुटुंबांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरून माती/ कागदाच्या मूर्तीकडे वळवलंय.

उत्सव असो वा दैनंदिन जीवन वन्यजीवन संरक्षण याच ध्येयपथावर गेली १५ र्वष वाटचाल करणारी संस्था म्हणजे अंधेरी येथील ‘स्प्राउट्स एन्व्हायर्न्मेंट ट्रस्ट’. गडकिल्ल्यांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत ‘जाऊ तिथे स्वच्छता करू’ हा या ट्रस्टच्या मोहिमांमधील एक अनिवार्य कार्यक्रम. स्वच्छता मोहीम राबवतानाही शिबिरार्थीना त्या परिसरातील वन्य/ सागरी जिवांची इत्थंभूत माहिती सांगून त्यांच्या मनात या सृष्टीविषयी कुतूहल जागं करण्याला प्राधान्य. संस्थापक आनंद पेंढारकर यांच्या धमन्यांतूनच निसर्गप्रेम सळसळतंय असं वाटतं. म्हणाले, ‘‘पहिली चार-पाच र्वष आम्ही विसर्जनानंतर किनारे स्वच्छ केले. मग लक्षात आलं की भावी पिढीच्या मनात निसर्गाच्या जपणुकीचं बीज पेरणं हाच या समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो..’’

त्यानंतर संस्थेने वेगवेगळ्या वयोगटांतील मुलामुलींसाठी विविध शिबिरांच्या आयोजनाला सुरुवात केली. पेंढारकरांची वन्यजीव तळमळ सर्वश्रुत झाल्याने कॉपरेरेट क्षेत्रातली मंडळीही आता त्यांच्या मोहिमांत सहभागी होऊ लागलीयेत. गणपतीसंदर्भात शाडूची माती/कागदाचा लगदा वापरून घरच्या घरी मूर्ती बनवणं, हळद, कुंकू, मुलतानी माती आणि गेरू अशा नैसर्गिक रंगांनी त्या सजवणं, पुठ्ठे, कागदांचा वापर करून मखर करणं, लाऊडस्पीकरचे दुष्परिणाम मनावर ठसवणं.. अशा मार्गानी गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यांसाठी संस्थेची धडपड सुरू आहे.

ध्येयाला साजेसं ट्रस्टचं वेगळेपण म्हणजे गणपतीची मूर्ती बनवताना गहू आणि मक्याच्या पीठात पालक घालून तो गोळा आत ठेवला जातो. जेणेकरून मूर्ती विसर्जनानंतर माशांना खाद्य मिळावं. झालंच तर गरिबांना रोजगार मिळावा म्हणून ‘महिला बचत गट’ आणि खेडय़ापाडय़ातील गरजू कारागीर यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून मूर्ती बनवून ट्रस्टतर्फे त्यांची विक्री केली जाते.

कोणतीही संकल्पना मुलांच्या माध्यमातून घराघरात पोहोचवता येते यावर ठाम विश्वास असणारी आण्खी एक संस्था म्हणजे ठाणे येथील ‘पर्यावरण दक्षता मंच’. संस्थापक प्रा. विद्याधर वालावलकर म्हणाले, ‘‘आम्ही दोन महिने आधीच शाळा-शाळांमधील कला शिक्षकांना शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचं ट्रेनिंग देतो. मुलांच्या कार्यशाळेसाठी साहित्य पुरवतो.. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल यांच्यामुळे काय होतं याची चित्रफीत दाखवतो.. या मंथनातून मुलांकडून आकाराला आलेल्या गणपतीच्या ओबडधोबड मूर्तीच आमच्या दृष्टीने पर्यावरणाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर ठरतात. तसंच विसर्जनप्रसंगी मुलांना प्रत्यक्ष घाटावर नेऊन बसवल्याने तिथली दृश्यं पाहून म्हणजे मोठय़ा मूर्तीच विसर्जन होताना करावी लागणारी कसरत किंवा घरगुती गणेशाला निरोप देताना संपूर्ण कुटुंबाचे पाणावलेले डोळे.. वेगळ्या संस्कारांची गरज उरत नाही.

निर्माल्यातून खत बनवण्याची संकल्पना आता नवी नाही. मात्र ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसाठी ‘सिग्नल शाळा’ चालवणाऱ्या संस्थेने या उपक्रमाला सामाजिक दायित्वाची जोड दिलीय.

गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात निर्माल्य गोळा करण्यापासून खताचा विनियोग करेपर्यंत सर्व प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धपणे पार पाडली जाते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत म्हणाले, ‘‘ठाणे शहरात गणपती विसर्जनासाठी एकूण १२ घाट आहेत. त्या प्रत्येक घाटावर आमच्या सहा स्वयंसेविका दोन ट्रकसह सज्ज असतात. या सहामधील चारजणी अविघटनशील वस्तू बाजूला करण्यासाठी ट्रकवर तर दोघी निर्माल्य घेण्यासाठी खाली अशी व्यवस्था असते. हे काम रात्री एक वाजेपर्यंत चालतं. शेवटी प्रत्येक ठिकाणचा एक ट्रक निर्माल्याने भरतो तर दुसरा इतर गोष्टींनी. गंमत म्हणजे या इतरमध्ये देवांच्या जुन्या फोटोंपासून आरती संग्रहापर्यंत अनेक ‘चीजा’ असतात. त्यांच्या विल्हेवाटीची जबाबदारीही आमच्यावरच येते. वर्गीकरणानंतर फुलांचे ट्रक संस्थेच्या निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पावर जातात. त्यानंतर पुढचे दहा दिवस पुन्हा एकदा काटेकोरपणे चाळणी करण्यात येते. एवढय़ा खटाटोपानंतर दोन महिन्यांनी जवळजवळ ३६ टन खत हातात येतं. यातील काही महानगरपालिकेच्या बगिच्यांना, काही गणेशोत्सव मंडळांना आणि उरलेल्या विक्रीतून समाजसेवा..’’

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या समस्येवर लोकमान्य आणि राजमान्य तोडगा शोधून काढण्याचं श्रेय पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडे (एन.सी.एल) जातं. एन.सी.एल.च्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शुभांगी उंबरकर म्हणाल्या, ‘‘नदी पर्यावरणाच्या दृष्टीने माती काय किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस काय दोन्ही घनकचराच. यावर देवघरातील धातूची मूर्ती हाच योग्य पर्याय. तरीही जलसंरक्षण व्हावं यासाठी आम्ही हा प्रयत्न केला..

यामध्ये अमोनियम वाय काबरेनेटचा (बेकरीत वापरला जाणारा सोडा) उपयोग केला आहे. हे संयुग पाण्यात सहज विरघळतं आणि अशा तऱ्हेने बनलेल्या द्रावात मूर्ती ४८ तासांत पूर्ण विरघळते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खाली कॅल्शियम काबरेनेटचा साका जमा होतो, त्याचा उपयोग खडू, विटा बनवण्यासाठी तसंच मैदानावर रेषा आखण्यासाठी फक्की म्हणून होतो आणि वरचं द्रवरूप अमोनियम सल्फेट झाडांसाठी खत म्हणून कामी येतं.’’

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी एन.सी.एल.ला पुणे महानगरपालिकेने सहकार्याचा हात दिला. सर्वप्रथम एका वेळी १०० मूर्ती विरघळू शकतील असे पाच हजार लिटर क्षमतेचे दोन हौद लॅबच्या आवारात बांधण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या विसर्जन स्थळांवर जाऊन तिथे आलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती (प्रतीकात्मक गमनानंतर) ताब्यात घेऊन त्यांचं हौदात पद्धतशीर विघटन करण्यात आलं. या पद्धतीने दीड महिन्यात जवळजवळ दहा हजार मूर्तीचं शास्त्रशुद्ध विघटन झालं.

मात्र लोकांनी हा प्रयोग घरच्या घरी करावा असा दोन्ही आयोजकांचा प्रयत्न आहे. यासाठी गेली दोन र्वष आर.सी.एफ.कडून ११० टन अमोनियम बाय काबरेनेट घेऊन त्याच्या दोन-दोन किलोच्या पिशव्या बनवून विनामूल्य दिल्या जात आहेत. मागच्या वर्षीपासून ही पाकिटं मूर्ती विक्रीच्या जागीही उपलब्ध करण्यात आली. त्यांचं रेकॉर्ड ठेवलं गेलं. त्यानुसार २०१६ मध्ये ३५ हजार तर २०१७ मध्ये ५० हजार गणेशमूर्तीचं विसर्जन घरातच झाल्याचं सिद्ध झालं. या अभिनव मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘विज्ञान भारती’ आणि ‘रोटरॅक्ट’च्या विद्यार्थ्यांची मदत झाली. आता या लेखाच्या माध्यमातून हे उत्तर सर्वत्र पोहोचावं अशी त्या विघ्नहर्त्यांच्या चरणी प्रार्थना.

गणपती ही विवेकबुद्धीची देवता आहे. विवेकबुद्धी ही योग्य आणि अयोग्य यातून श्रेयस्कर निवडीचं सामथ्र्य देणारी शक्ती आहे. ही बुद्धी आपण मूर्तीच्या निवडीपासून सजावटीच्या सामग्रीपर्यंत आणि मिरवणुकीपासून करमणुकीच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक निर्णयात वापरली तर गणपती खऱ्या अर्थाने पावला असं म्हणता येईल.

waglesampada@gmail.com

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी

जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे

९८२०१३७५७६

jidnyasatrust@gmail.com

मूर्ती आमची किंमत तुमची  – डॉ. अविनाश वैद्य

९८२२३७६७०४

Dr.avinashvaidya@gmail.com

इको श्री गणेश आर्ट्स, मुंबई

९८२०५०११२७

ecoshreeganeshaarts@gmail.com

स्प्राउट्स एन्व्हायर्न्मेंट ट्रस्ट, मुंबई

९८२०१४०२५४

sproutsonline@gmail.com

पर्यावरण दक्षता मंच, ठाणे

०२२-२५३८०६४८

paryavaranshala1@gmail.com

डॉ. शुभांगी उंबरकर

एन.सी.एल. पुणे

०२०-२५९०२०४४

samarthbharat@gmail.com

First Published on September 15, 2018 1:17 am

Web Title: article about ganpati festival environment consciousness