मंगला सामंत

मातृकुळामुळे पुरुषांमध्ये आलेली बंधुप्रधानता आणि नंतर पितृत्वाचे भान आल्यानंतर आपल्या मुलांबद्दलची जाणीव या विचित्र भावनिक पेचामध्ये पुरुषवर्गाची घुसमट होऊ लागली. इथूनच सुरुवात झाली, पितृत्वाच्या ‘प्रसव-वेदनांची’! सहसा कोणत्याच सस्तन प्राण्यात न दिसणारी ही पितृ-भावना, मानवामध्ये मूर्त स्वरूपात उत्क्रांतीच्या, कोणत्या टप्प्यावर स्वीकारली गेली? त्याचबरोबर ‘पितृत्व’ हे नाते प्रस्थापित करण्यासाठी स्त्री-पुरुषांनी कोणती शारीरिक, भावनिक आणि मानसिक किंमत मोजली? याविषयीचा ऊहापोह, पितृ-पंधरवडय़ानिमित्ताने..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

लवकरच पितृ-पंधरवडा सुरू होत आहे. या पंधरवडय़ात, पूर्वजांची श्राद्धे घालून त्यांचे स्मरण करावे, हा एकूण या १५ दिवसांच्या कालखंडामागील वैचारिक, भावनिक पाया आहे. या पूर्वजांमध्ये पित्याच्या स्मरणाला प्राधान्य आहे. भारतात, मातांची मंदिरे, त्यांच्या जत्रा, उत्सव, मिरवणुका, दहा दिवस त्यांच्या पूजनाचे सोहळे असा वर्षभर त्यांच्या गौरवाचा प्रवास असतो आणि तोसुद्धा विशेषत: माता म्हणून. त्या तुलनेत पित्याची मंदिरे आणि त्याचे उत्सव भारतात आढळत नाहीत. पितृ-पंधरवडय़ात मात्र ‘पिता’ म्हणून पुरुषाचे स्मरण आढळते. सहसा कोणत्याच सस्तन प्राण्यात न दिसणारी ही पितृ-भावना, मानवामध्ये मूर्त स्वरूपात उत्क्रांतीच्या, कोणत्या टप्प्यावर स्वीकारली गेली? त्याचबरोबर ‘पितृत्व’ हे नाते, अनेक हजार वर्षांत स्थिरावलेल्या मातृ-कुळात, प्रस्थापित करण्यासाठी स्त्री-पुरुषांनी कोणती भावनिक आणि मानसिक किंमत मोजली? हे जाणण्याचा प्रयत्न या पितृ-पंधरवडय़ानिमित्त  करणार आहोत. त्याकरिता मातृसंस्कृतीचा संदर्भ प्रथम जाणून घेणार आहोत.

सर्वसाधारणपणे, पृथ्वीवर मानव उभा राहिला, त्यानंतर त्याच्या उत्क्रांतीनुसार जी युगे समजून घ्यावी लागली, ती युगे, जंगली युग, रानटी युग आणि संस्कृती युग अशा भाषेत संशोधक मांडतात. मानवीमातेची उत्क्रांती, ही सरळ सस्तन पशुमातेमधूनच आपल्यापर्यंत पोहोचते. पशुमाता या गर्भार राहिल्यावर नराला आपल्या जवळपास फिरकू देत नसे. कारण सर्वसाधारणपणे, पशु-नराला, आपल्या पितृत्वाची काहीच जाणीव होत नसल्यामुळे, त्या नराने, जन्मलेल्या नव्या जीवास ठार करणे, हे ठरलेले असे. जंगली अवस्थेतील मानव स्त्री-पुरुष याच अवस्थेत होते. स्त्री-माता ही हिंसक असल्याशिवाय मानवी बाळ जिवंत राहिलं नसतं. जसजसा मानवामध्ये बुद्धी आणि स्मरणशक्तीचा विकास होऊ लागला, तसे पहिल्या प्रथम आपली अपत्ये मानवी-मातेच्या लक्षात राहणे आणि आपल्या संततीकरिता, बाळंतपण हे सुरक्षित एका जागी स्थिर राहून होणे, याची जाणीव, स्त्री-मनात जागृत होणे, हे स्वाभाविक होते. उत्क्रांतीच्या या टप्प्यावर, स्त्री ही अग्नीच्या साहाय्याने, गुहेत प्रथम स्थिर झाली. कारण त्या स्थैर्याचे महत्त्व तिच्या माता होण्याच्या घटनेतून, स्त्रीला पुरुषाआधी समजले असावे, असे संशोधकांचे मत आहे. येथून मानवी जीवनाच्या प्रगतीचे नवे वळण सुरू झाले आणि स्थैर्याच्या या कालखंडापासून रानटी युगाला सुरुवात झाली, असे उत्क्रांतीचे अभ्यासक मानतात.

या रानटी युगातील स्त्री, रात्रीचा प्रकाश आणि उष्णता मिळविण्याकरिता अग्नीचा वापर करीतच होती. पण अग्नी फेकून हिंस्त्र श्वापदांना पळवून लावता येणं, अग्नीमुळे जमा केलेले अन्नपदार्थ शिजवून टिकविता येणं, अग्नीच्या साहाय्याने औषधी काढे, चूर्ण, भस्म बनविता येणे, असे अनेक उपयोग ती शिकत गेली. आपल्या अपत्यांचे पालन, संरक्षण आणि रोगापासून बचाव, हे सर्व करतांना, तिच्यामध्ये आणि अपत्यांमध्ये एक भाव-बंध तयार झाला आणि त्यातून एका स्त्रीची मुले ही ‘सख्खी भावंडे’ या नात्याची जाणीव प्रथम रुजली. तसेच या गुहेतील स्थैर्यामुळे जेव्हा केव्हा स्त्रीला आपल्या मुलीचे बाळंतपण करण्याची वेळ प्रथमच आली, तेव्हा ‘आजी’ या अनोख्या आणि अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा मानवी जीवनात प्रवेश झाला, जे नाते अन्य प्राण्यात नसते. तसेच मुलींच्या अपत्यांमुळे, मावशी, मामा, मावस भावंडे अशी मातुल नाती निर्माण झाली. थोडक्यात, ‘माता-मूल’ या नैसर्गिक कुटुंबातून पुढे खूप मजल मारीत, माणसामध्ये आजी, आई, मावश्या, मामा असे मातृकुळ साकार झाले आणि माता-मूल या कुटुंबाचे संरक्षण भक्कम झाले. तयार झालेल्या या विस्तारित कुटुंबालाही ‘नैसर्गिक कुटुंब’ म्हणावे लागते, कारण ते मातृत्व या नैसर्गिक घटनेतून घडत गेलेले आहे. विवाहासारखा कृत्रिम उपाय आणून हे कृत्रिमपणे घडवलेले कुटुंब नाही. हे इथे लक्षात घेतले पाहिजे..

मात्र, प्रथमार्धात, आजी, आई, मावश्या, मामा, भाचे, सख्खे-मावस भाऊ-बहीण अशा मातुल कुळात, पुरुषांनाही काही जबाबदारीचे स्थान दिलेले होते. या पुरुषांनी आपापल्या बहिणींचे मातेकडून येणाऱ्या अधिकाराचे व मालमत्तेचे रक्षण करणे, उत्पादनामध्ये भाग घेणे, उत्पादनासाठी जंगलातून कच्चा माल आणून देणे, बहिणींच्या मुलांना उत्पादन कौशल्ये शिकविणे, कुळा-कुळामध्ये होणाऱ्या संघर्षांमध्ये संरक्षण करणे, वगैरे कामे मातृकुळातील पुरुष करीत होते.

पुरुष हा हजारो वर्षे रूढ झालेल्या, अशा बंधू-अवस्थेच्या भूमिकेतून पितृ-अवस्थेत कसा आला, हे पाहण्यासाठी, त्या काळातील शरीरसंबंधाच्या पद्धतीसुद्धा जाणून घ्याव्या लागतील. रानटी अवस्थेतील प्रथमार्धात, शरीरसंबध हे एकाच कुळात, भाऊ-बहीण, मामा-भाच्या, मावशी-भाचे असे होत होते. ज्याला संशोधकी endogami म्हणतात. कारण कुळात बनले जाणारे उपजीविकेचे पदार्थ व साधने, ही कुळातच रहावीत, ही त्यांची तत्कालीन गरज होती. पण पुढे मातृकुळांची सदस्यसंख्या जशी हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा कुळातील मुली आपापल्या जमिनी, उत्पादन साधने घेऊन वेगळ्या झाल्या. त्यांच्या नावाने त्यांची कुळे ओळखली जाऊ लागली. जसे, भारतीय संस्कृतीत दनु, दिती, अदिती, विनिता, रक्षा वगैरे मातांचे उल्लेख आणि त्यावरून दानव, दैत्य, आदित्य, राक्षस, वैनतेय वगैरे कुळांचे उल्लेख सापडतात. विविध मातृकुलांच्या स्वतंत्र रहिवासामुळे, मातृप्रधान समाज उदयाला आला. मग पुरुष कच्चा माल आपल्या कुळाबाहेरच्या मातृकुलांना जसे पोहचवू लागले, तसे त्यांचे शरीरसंबंध भिन्न कुळातील स्त्रियांशी होऊ लागले. तसेच आपापली उत्पादने घेऊन विनिमय-व्यापार पद्धतीने वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा औषधोपचारासाठी स्त्रियांनासुद्धा अन्य कुळात जावे लागत होते. काही वेळेस त्या कुळात वस्तीला त्या राहत, तेव्हा त्यांचेही संबंध कुळाबाहेरच्या पुरुषांशी होऊ लागले आणि हळूहळू अंतर्गामी (endogami) ही पद्धत लयास जाऊन बहिर्गामी (exagami) ही नाते-संबंधाबाहेर होणारी शरीरसंबंधाची नवी पद्धत उदयास आली. या दोन्ही पद्धतीत शरीरसंबंध हे स्त्री व पुरुषांसाठी नेहमीच मुक्त राहिले. त्यामुळे, पुरुषाचे पितृत्व स्पष्टपणे कळणे, सोपे नव्हते.

जंगली युग आणि रानटी युग हा सुमारे लाखभर वर्षांचा कालखंड निघून गेला. मानवाची विचारांची प्रगती होत होती आणि मातृकुळातील परस्पर भावबंध घट्ट होत होते. इ.स.पूर्व सुमारे १५ ते १० हजार वर्षे दरम्यान मानव पशुपालनतंत्र जेव्हा आत्मसात करता झाला, तेव्हा स्त्रीमध्ये चमत्काराने गर्भ येतो, या धारणेला धक्का बसून, पुरुषापासून स्त्रीला मूल होत असते, या सत्याची खात्री स्त्री-पुरुषांना झाली, असा शास्त्रज्ञाचा दावा आहे. अपत्यांची चेहरेपट्टी पुरुषासारखी दिसण्याचा अर्थ त्यामुळे उलगडला. तोपर्यंत, कुळामधील नात्या-अंतर्गत शरीरसंबंध बंद होऊन काही हजार वर्षे लोटली होती. स्वाभाविकपणे पुरुषांची अपत्ये ही परक्या मातृकुळात त्यांच्या त्यांच्या मातांबरोबर वाढत होती. आपल्या पितृत्वाचे भान पुरुषाला आल्यावर, बहिणींच्या मुलांचे पालन करताना आपलेही मूल कुठे बाहेर वाढते आहे, याची जाणीव पुरुषाला पुढे अस्वस्थ करणारी होऊ लागली. जी मुले आपली स्वत:ची आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला काही अधिकार नाहीत आणि ज्या बहिणींच्या मुलांबद्दल आपल्याला अधिकार आहेत, ती मुले आपली नाहीत. अशा विचित्र भावनिक पेचामध्ये पुरुषवर्गाची घुसमट होऊ लागली. इथूनच सुरुवात झाली, पितृत्वाच्या ‘प्रसव-वेदनांची’!

पुरुषांमध्ये आलेला हा बदल मानवाच्या बौद्धिक उत्क्रांतीमधील आणि भावनिक विकासामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागतो. भविष्यात मातृ-कुळातून पितृस्थान रुजण्याची ही नांदी होती. तोपर्यंत सामान्य पुरुषसुद्धा आक्रमक आणि हिंसक होता. मातृकुळातील मातामहांना पुरुषामधील हा भावनिक बदल आशादायक व आनंददायक वाटला असावा. साहजिक पुरुषाला त्याच्या अपत्याबद्दल वाटू लागलेल्या या जिव्हाळ्यामुळे त्याच्यातील पशु-नराचा कठोरपणा कमी होईल आणि माणूस म्हणून त्याला अधिक ममत्वपूर्ण घडविता येईल, या अपेक्षेने काही मातृ-जमातींनी पुरुषाला पालकत्व देण्याचा प्रयत्न केलेला आढळतो.

याबाबत, संशोधक मॅलिनोव्स्की आपल्या, ‘the sexual life of savages’ या पुस्तकात, ‘टोब्राइंड’ या आजही, आदिम अवस्थेत रहाणाऱ्या जमातीबद्दल आपल्याला माहिती देतो. या जमातीत, दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या स्त्री-पुरुषांमधील स्त्री, गर्भवती झाल्यावर, त्या स्त्री व पुरुषाची इच्छा असेल, तर त्या पुरुषाला होणाऱ्या त्या अपत्याचे पालकत्व काही अटी पूर्ण केल्यावर बहाल केले जाते. त्यातील मुख्य अट म्हणजे त्या पुरुषाने सहा महिने हिंसा न करता राहून दाखवायचं. त्याने शिकार करायची नाही, मांस भक्षण करायचं नाही, कोयता, भाला, कुदळ वगैरे शस्त्रांना हात लावायचा नाही. झाड, गवत कापायचं नाही. त्याची स्त्री बाळंत होईपर्यंत, त्याने शक्यतो झोपून राहायचं. स्वत:वर इतके नियंत्रण ठेवू शकणारा पुरुष हा ‘पिता’ या पदाला पात्र ठरवला जात होता. मूलत: हिंसक असलेल्या पुरुषाकडे मूल सोपविणे, हे तत्कालीन मातृ-जमातींना जोखमीचे वाटले असावे. म्हणून मग पुरुषाने आपण ‘पितृत्व’ भावनेशी बांधील (commited) आहोत, हे सिद्ध करणे, हे त्या काळात महत्त्वाचे होते. त्याची स्त्री बाळंत झाल्यावर, बाळाला मऊ अन्न भरविणे या पित्याला बंधनकारक होते. त्यायोगे, पुरुष व त्याचे अपत्य यामधील भावबंध मजबूत करण्याचा जमातींचा हेतू स्पष्ट दिसतो. मात्र मुक्त संबंधांमुळे त्या स्त्रीपाशी तिची अन्य पुरुषांपासूनची मुलेसुद्धा राहत होती. त्यामुळे, पुरुषाला ‘पितृत्व’ मिळण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला असेल, असे म्हणता येत नाही. शिवाय, प्रत्येक पुरुषाच्या मातृकुळात त्याच्या बहिणीच्या मुलांचे संगोपन-संस्कार करण्याचे व त्यांना घडविण्याची जबाबदारी परंपरेने त्या पुरुषाकडे चालूच होते.

दुसरीकडे, पुरुषांची हे ‘बंधुप्रधान’ अधिकार वापरण्याची हजारो वर्षांची मानसिकता बदलणे, ही त्याला ‘पितृत्वाचे स्थान’ मिळत असतानासुद्धा, अवघड झालेली वस्तुस्थिती होती. बंधुप्राधान्य की पितृप्रधान्य हा संघर्ष नंतरच्या काळात मानवी जीवनात प्रखर झालेला दिसतो. अनेक हजार वर्षे चालत आलेला बंधुत्वाचा अधिकार, ‘पितृत्व’ मिळण्यासाठी सोडून देणे, ही तत्कालीन पुरुषांची मोठी ‘वेदना’ होती. त्या काळात स्त्रिया या आपापल्या मातृ-कुळात आपल्या अपत्यांसह वास्तव्य करीत होत्या. पुरुषसुद्धा प्राचीन परंपरेनुसार स्वत:च्या मातृ-कुळात राहत होते आणि फक्त शरीरसंबंधासाठी पुरुष, स्त्रीच्या मातृ-कुळात जात होते. काहीकाळ अशी ‘व्हिजिटिंग मॅरेज’ स्वरूपाची पद्धत भारतासह, जगभरात रूढ असल्याची उदाहरणे, स्टीफन फ्युज आपल्या १९६३ च्या ‘origin of man and his culture’ पुस्तकातून देतो. आपण ‘बंधुप्रधान्य’ चालू ठेवून, आपल्या स्वत:च्या मातृकुळात राहावं, की ‘पितृप्राधान्य’ पत्करून आपल्या मुलांबरोबर त्या माता-स्त्रीच्या मातृकुळात राहावे? हा प्रश्न ज्या काळात होता, त्या काळात पुरुषाच्या धरसोड वर्तनातून त्याच्या अधिकाराचे पेच निर्माण झाले असावेत, असे दिसते. कारण, काही जमातींनी या वर्तनाला काही  निश्चित रूप देता यावे म्हणून कठोर पावले उचलल्याची उदाहरणे, संशोधक देतात. त्यातील एक म्हणजे, पुरुषांना ‘बंधुप्राधान्य’ महत्त्वाचे असल्यास, त्यांनी स्वत:च्या अपत्याचा बळी देऊन ते सिद्ध करावे आणि ज्या पुरुषाला ‘पितृत्वाची’ आस आहे, त्याने आपल्या बहिणीच्या अपत्याचा बळी द्यावा आणि आपल्या अपत्याच्या मातेच्या मातृकुळात जाऊन राहावे. अशा प्रकारच्या क्रूर पद्धती, या पितृत्वाच्या पेचावर उपाय म्हणून काही काळ, काही जमातींनी अवलंबिल्या. त्यामुळे स्त्री-कुळात हाहाकार उडाला. अशी उदाहरणे आपल्याला, जेम्स फ्रेजर आपल्या ‘totemism and exogamy’, लीप्पर हा संशोधक आपल्या, ‘evolution of culture’ आणि होमरस्मिथ हा आपल्या ‘man and his gods’ या पुस्तकातून देतो. बंधुप्रधानकी की पितृप्रधानकी हा केवळ पुरुषाने घेण्याचा निर्णय होता. माता-भगिनींना हस्तक्षेप करण्याला इथे वाव नव्हता. पुरुषांच्या ‘पितृत्वाला’ मानवी-कुळात स्थान देणं, ही एरव्ही सस्तन प्राण्याच्या जीवन-नियमानुसार एक निसर्ग-विरोधी अघटित घटना असूनही, स्त्री व पुरुषांना त्यांच्या प्राचीन परंपरा मोडून अशा प्रकारच्या नव्या कल्पनेचा स्वीकार करावा लागत होता. मात्र हे परिवर्तन स्त्री-पुरुष दोघांनाही अवघड जात होते. बंधू-प्राधान्यातून पितृ-प्राधान्यात प्रवेश करताना, त्या स्थित्यंतरास विरोध करताना सुरू झालेली ही हिंसा, त्यातून समाजात येणारे मोठे अवघड बदल किंवा पडझड हा मातृ-कुळावर मोठा आघात होऊन राहिलेला होता.

मात्र, तरीही पुरुषाच्या ‘पितृत्वाचा’ प्रश्न काही पूर्णत: सुटला नाही. व्यक्तिगत पातळीवर तो कुणी सोडवलाही असेल, पण सामाजिक पातळीवर तो पेच कायम होता. त्यामुळे ‘खात्रीलायक’ पितृत्वाची आस लागलेल्या पुरुषवर्गाची अस्वस्थता संपलेली नव्हती. पुढे इ.स. पूर्व ४ ते ३ हजार वर्षांच्या दरम्यान, नांगराचा शोध लागला आणि विळ्या-कोयत्याने जमीन खणण्याचे तंत्र लयास गेले, तसेच या अवजारांनी स्त्रिया शेती करत असत, त्यांच्याऐवजी नांगराला जनावरे जुंपून कुळातील भाऊ आणि मामा, हे पुरुष शेतीत उतरले. नांगरामुळे धान्याचे प्रचंड उत्पादन जमिनीतून निघू लागले. सर्व व्यवसायांमधील तोल अचानक बिघडला आणि आर्थिक विषमता वाढली. अर्थव्यवस्थेत आलेल्या या फार मोठय़ा स्थित्यंतरामुळे शेत-जमिनी आणि त्यातून पिकणारे धान्य यावर प्रथमच पुरुषाची मालकी आली. त्यातून मग ‘पुरुषाच्या वारसाचा’ मुद्दा पुढे येत राहिला. पुरुषाचा वारस निश्चित कळायला हवा असेल, तर स्त्रीच्या मुक्त संबंधावर बंदी आणायला हवी, तरच एका पुरुषाचे मूल समजू शकेल. यावर स्त्री-पुरुषांचे एकमत झाले असावे. पण स्त्री-पुरुष मुक्त संबंध गेले काही हजार वर्षे मानवी समाजात इतके रुळलेले होते की, पुरुषास कोणत्याही स्त्रीकडे संबंधासाठी जाण्याच्या सवयीपासून रोखण्यासाठी, समाजसाक्षीने स्त्री-पुरुषांनी ‘पती-पत्नी’ म्हणून एकमेकांचा हात धरून वचन देण्याचा, एक रिवाज निर्माण करण्यात आला, ज्याला ‘विवाह-प्रथा’ असे नाव मिळाले आणि त्यातून प्रथम जमीनदार, राज्यकर्ते अशा श्रीमंत लोकांसाठी ही प्रथा प्रथम रूढ होऊन नंतर झिरपत ती सामान्य जनतेत दृढ झालेली आपण पाहतो.

थोडक्यात, ‘पितृत्व’ ही बुद्धीपातळीवर विवाहप्रथेतून जाणण्याची घटना ठरल्यामुळे, ती अन्य सस्तन प्राण्यात आजही दिसत नाही. तरी, काही हजार वर्षांपूर्वी, आपल्या पूर्वजांनी, विशेषत: कूळ-प्रमुख मातांनी अपेक्षा केली होती की, कुळाबाहेर सतत वावरणारा, शिकारी अवस्थेतील पुरुष, पितृत्व प्राप्त झाल्यामुळे, थोडा कमी हिंसक, होईल. त्यायोगे वात्सल्य, ममत्व या भावना त्याच्यामध्ये निर्माण झाल्या तर ते त्या कुळाला आणि समाजालासुद्धा हितकारक ठरेल. हे मात्र बऱ्याच अंशी आज खरे ठरलेले दिसते आहे.

गेल्या सुमारे ४ ते ५ हजार वर्षांच्या पितृत्वाच्या संस्कारामुळे, हिंसकतेमागे असणारा ‘एकांडय़ा’ पुरुषाचा अविचार, पिता-पुरुषामध्ये तुलनेने कमी झालेला आढळतो. पुरुष जास्त जबाबदार झालेला दिसतो. हे अर्थात १०० टक्के पुरुषांबाबत आहे असं नाही म्हणता येणार, हे खरं असलं, तरी अलीकडील संशोधनाप्रमाणे, अपत्यांशी असणाऱ्या जवळिकीमुळे, जे ममत्वाचे ऑक्सिटोसीन हार्मोन माता व अपत्यामध्ये वाढत असते, त्याप्रमाणे पिता-पुरुषामध्येसुद्धा अपत्यांच्या सहवासामुळे ऑक्सिटोसीन हे हार्मोन, एकांडय़ा किंवा पितृत्व न लाभलेल्या पुरुषापेक्षा जास्त प्रमाणात असते, असे आढळलेले आहे. याचा अर्थ पुरुषांमध्ये आलेला हा हार्मोनल बदल म्हणजे, काही प्राचीन जमातींनी, ‘पितृत्वास’ असणारा अनेक जमातींचा व स्त्री-पुरुषांचा विरोध मोडून आणि त्या बदलाच्या वेदना सोसून, कुळातून ‘पितृत्वास’ स्थैर्य देण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा हा सुखद परिणाम म्हणावा लागेल. मातेनंतर पुरुषाचा ‘पिता’ म्हणून मानवी जीवनात अशा रीतीने प्रवेश झाला आणि त्यानंतर त्या पिता-पूर्वजाची आठवण आपण, पितृ-पंधरवडय़ातून ठेवू लागलो.

भूतकाळाच्या पोटात, कितीही काही दडलेले असले, तरी अनेक हजार वर्षांपूर्वी, जेव्हा विज्ञान प्रगत नव्हते, तेव्हा निव्वळ बौद्धिक तर्काने व अनुभवाने, समाजात आलेली पितृत्व भावना आणि त्यानंतर पित्याचे मातृकुलात स्थान निर्माण करण्याचा मातृ-जमातींकडून जगभर केला गेलेला प्रयास, हे एकूणच सस्तन प्राणी जगतातील मोठे आश्चर्य मानावे लागेल.

mangalasamant20@gmail.com

chaturang@expressindia.com