06 July 2020

News Flash

दुष्काळ हीच संधी

राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलवणाऱ्या.

(संग्रहित छायाचित्र)

प्रियदर्शिनी हिंगे

दुष्काळ आहे म्हणून हातावर हात ठेवून बसायची वेळ गेली, आता याच दुष्काळाला संधी मानत नवऱ्यांच्या हातातून शेती घेऊन ‘त्या’ स्त्रियांनी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. शेतीबरोबरच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुधव्यवसाय, गांडूळखतविक्रीसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरू केले. आणि सुरू झाला प्रवास प्रगतीचा.. आधी कुटुंबीयांची आणि मग गावातल्या इतर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भूक तर भागलीच, पण त्याही पलीकडे जात गावकऱ्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांनाच नव्हे तर गावाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या वैशाली घुगे, अर्चना माने आणि अर्चना भोसले या शेतकरी स्त्रियांच्या या यशस्वी कहाण्या.. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलवणाऱ्या.

दुष्काळ म्हटला की, जमिनीला गेलेले तडे, आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी आणि डोक्यावरून तीन-चार हंडे घेऊन मैलच्या मैल चालणाऱ्या बायका, असेच काहीसे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. शहरी, नोकरदार लोकांना त्याच्या झळा फारशा लागत नसल्या तरी ग्रामीण भागात आणि खास करून स्त्रियांना या दुष्काळचे चटके जास्त भोगावे लागतात. गेल्या ५० वर्षांत १९७२ व १९८७ चे दुष्काळ भीषण होते. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाला सामोर जावे लागत आहे. मात्र याच दुष्काळानंतर नवऱ्याने आत्महत्या केल्यावरही रडत न बसता राधाबाई घराबाहेर पडते आणि सरकारकडून मिळालेल्या शिलाई मशीनवर काम करत मुलांना शिकवते. मुलीच्या लग्नात भेटली तेव्हा सहज बोलून गेली, ‘‘या दुष्काळाने मला संधी दिली. नाही तर कशाला घराबाहेर पडले असते? आपल्या म्हणणाऱ्यांच्या, रक्ताच्या नात्यांचा खरा रंग दाखवला याच दुष्काळाने! आता कोणाची वाट बघायची गरज नाही.’’ राधाबाईंसारख्या अनेक स्त्रिया, जिथे संकट दिसते तिथे कमरेला पदर खोचून परिस्थितीशी दोन हात करण्यास तयार होतात. अशाच या काही स्त्रिया ज्यांनी दुष्काळ पचवून आपल्याबरोबर इतर गावकऱ्यांनाही संपन्नतेचे मार्ग दाखवले.

दुष्काळाच्या काळात जिथे पुरुष हतबल होताना दिसतात तिथे स्त्रिया मात्र ताकदीने उभ्या राहाताना दिसतात. आजही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी नेटाने आपले संसार चालवतात, परिस्थिती काहीही असली तरी. या दुष्काळाने अनेक स्त्रियांना कर्तृत्वाने फुलवण्यास मदत केली आहे. संकटे संधी घेऊन येतात, गरज असते ती आपल्या प्रयत्नाची, हे उस्मानाबाद तालुक्यातील काही स्त्रियांनी खरे करून दाखवले आहे. त्यातील एक वैशाली घुगे. तुळजापूरपासून ४१ कि.मी.वर असणाऱ्या अणदूर गावातल्या वैशाली. गावापर्यंत अजूनही पक्का रस्ता जात नाही. पुण्यासारख्या शहरात वाढलेल्या, शिकलेल्या वैशाली लग्न होऊन अणदूरच्या घुगे कुटुंबात सून म्हणून आल्या, तेव्हा तिथल्या ग्रामीण संस्कृतीशी जुळवून घेणे त्यांना सोपे गेले नाही. गावातल्या इतर लेकीसुनांसारखे शेत, चूल आणि मूल सांभाळण्यातच दिवस निघून जाई. निर्णयप्रक्रियेत घरातल्या स्त्रियांचा विचार घेतला जात नव्हताच, पैसे तर कुठल्याही कारणासाठी हातात मिळत नसत. अशा परिस्थितीत आपल्यालाही विचार करता येतो, हेच वैशाली विसरल्या होत्या. २००६ मध्ये कुटुंबीयांत झालेल्या मालमत्तेच्या वाटण्यांमध्ये दोन एकर जमीन वैशालींच्या वाटय़ाला आली. त्यातले घर असे की कधीही कोसळण्याची भीती, त्यामुळे त्या मुलांना पलंगाखालीच झोपवत. एक दिवस ही भीती खरीच ठरली. जोराच्या वादळात वैशालींच्या घरावरचे पत्रे उडून गेले. ती घटना वैशाली यांना बदलून गेली. ही परिस्थिती काहीही करून बदलायचीच, असा चंग त्यांनी बांधला. ‘स्वयम् शिक्षण संस्थेने’ तयार केलेल्या बचत गटात त्या जाऊ लागल्या. २०१० मध्ये सेंद्रिय पद्धतीने शेतात काही उपक्रम राबवायचे त्यांनी ठरवले. सुरुवातीला पती राजी नव्हता. त्यांना ते पटतही नव्हते, मात्र वैशाली यांनी त्याचं महत्त्व लक्षात घेऊन शेतात स्वत: उभं राहून मजुरांकडून पेरणी करायला सुरुवात केली. त्याचा फरक जाणवू लागला. त्या वर्षी घरात लागणारे सर्व सामान, शेंगादाणे, डाळी यांचे उत्पादन काढल्यामुळे त्यासाठी वेगळा खर्च करावा लागला नाही. पैसा तर वाचलाच शिवाय हातात पसा येऊ लागला. हे सर्व घडले वैशाली यांनी घेतलेल्या एका निर्णयाने. या बदलाने पतीचा होणार विरोध मावळला आणि दोघेही विचाराने शेती करू लागले. आता एका एकरातून वर्षांला एक लाख रुपयांचे उत्पन्न काढले जाते. वैशाली आता सेंद्रिय शेती तर करतातच शिवाय गांडूळखतही  तयार करत आहेत. २०१३ च्या दुष्काळात या गांडूळखताची विक्री करून त्यांनी ५० हजार रुपये कमवले. वैशाली सांगतात, ‘‘या खताला इतकी मागणी आली की, ती पूर्ण करणे मला शक्य झाले नाही. दुष्काळाच्या काळात खत विकून आलेल्या पशांतून शेतात बायोगॅस युनिट बांधून घेतले. या युनिटमधली ‘स्लरी’ गांडूळखतासाठी कामी येते.’’ म्हणजे शेती करता करता त्यांचा हा एक नवा शेतीपूरक व्यवसाय सुरू झाला. गांडूळखताच्या विक्रीतून येणारी कमाई घरात खर्च न करता त्यांनी जशी बायोगॅस युनिटसाठी वापरली तशी पुढच्या काळात पुन्हा नवनव्या निर्मितीकल्पनांमध्ये गुंतवली. त्यांनी आता गांडूळखतासाठी दगडी हौद वा बेड बांधून घेतले आहेत. एका बेडमधून वर्षांतून चार वेळा गांडूळखत काढता येते आणि त्यातून जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न येते. वैशाली यांनी सेंद्रिय शेतीच्या मार्गाने मिळवलेले यश पाहून परिसरातले शेतकरी त्यांच्याकडे ही नवी तंत्रे शिकायला येतात. वैशाली यांनी अणदूर परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना गांडूळखताचे तंत्र शिकवत, शेतात बेड्स लावायला साहाय्य्य करत सेंद्रिय शेतीची चळवळच उभी केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शिवाय जनावरांच्या चाऱ्यासाठी हॉड्रोपॉनिक्स पद्धतीने चारा आणि पौष्टिकतेसाठी अ‍ॅझोलाचे उत्पादन असे मातीविना पौष्टिक चाऱ्याच्या उत्पादनाचे प्रयोगही त्यांनी यशस्वी केले आहेत. ‘‘संयुक्त कुटुंब विभागले गेले तेव्हा सासऱ्यांनी एक म्हैस दिली होती. पण आता माझ्याकडे दहा म्हशी आहेत, गायी आहेत. तीव्र दुष्काळातदेखील मी माझे एक जनावर विकू दिले नाही. मिळेल ते काडीगवत आणून, त्याला माझ्या शेतात पिकवलेल्या चाऱ्याची जोड देऊन मी माझी जनावरे जगवली. या पौष्टिक चाऱ्यामुळे माझी जनावरे धडधाकट झाली, आता दुग्ध व्यवसायही जोरात आहे.’’ वैशाली समाधानाने सांगतात. अशा पद्धतीने भाजीपाला, सेंद्रिय शेती, शेतिपूरक व्यवसाय करून दुष्काळी भागात आणि परिस्थितीत वैशाली वर्षांला लाखो रुपयांचे उत्पन्न काढते आहे. दुष्काळाची भीती आता वाटेनाशी झाली आहे. जी स्त्री सर्वासमोर बोलायला घाबरायची ती आज एक प्रगतिशील व्यावसायिक, प्रशिक्षक तर झाली आहेच शिवाय सभाधीट वक्ता झाली आहे. उस्मानाबाद हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा अप्रगत, मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गावातील स्त्रियांनी आपल्यासारखे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हावे, असे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी झटण्याची त्यांची तयारी आहे.

देवशिगे गावच्या अर्चना भोसलेची कहाणीही अशीच. लग्न होऊन सासरी आल्यावर निर्णयप्रक्रियेत त्यांचा कुठलाच सहभाग नसे. घरचे काम करत संसाराचा गाडा हाकायचा हेच रोजचे जगणे. जुजबी शिक्षण झालेले असले तरी विचारते कोण त्याला? अशी स्थिती. गावही असे की, जिथे स्त्रिया उंबऱ्याबाहेर फारशा कधी दिसणारच नाहीत. या गावाचा कायापालट केला तो अर्चना यांनी, बचत गट तयार करून. कर्ज घेऊन स्त्रियांचे काम सुरू होतेच पण २०११ ला पाऊस कमी होऊ लागला आणि जुजबी काही करत बसणे उपयोगाचे नाही, हे अर्चना यांच्या लक्षात आले. त्याच दरम्यान सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने त्याचा उपयोग करू या, असे अर्चना पतीला सुचवत होत्या. त्यांच्या सततच्या आग्रहाचा उपयोग एवढाच झाला की त्यांच्या पतीने त्यांच्या हट्टासाठी त्यांना अर्धा एकर शेत दिले. ‘‘काय करायचं ते त्यात कर,’’ असे म्हणत त्यातून अंग काढून घेतले. मात्र मिळालेल्या संधीचे सोने करायचे अर्चना यांनी ठरवले. त्या अर्ध्या एकरात वर्षभरासाठी लागेल इतके अन्न त्यांनी घरीच पिकवले. दुष्काळात जेव्हा इतर लोकांकडे काहीच उत्पन्न नव्हते तेव्हा अर्चना यांच्या घरी मात्र वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य होते. मुलांचे आजारपणही कमी झाले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. २०१२-१३ च्या कडक दुष्काळात तुरी, ज्वारी यांची पेरणी करत एक लाख रुपयांचे उत्पन्न अर्चना यांनी काढले. यात पाण्याचे नियोजन कसे करावे, कुठली पिके घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी तसेच ‘स्वयंम् शिक्षण संस्थे’ची मदत घेतली. घराबरोबरच गावाचेही सहकार्य अर्चना यांना मिळू लागले. आता गावकरी अर्चनासोबत सेंद्रिय शेती करतात. अर्चना यांनी केवळ घरचीच शेती केली नाही तर बी-बियाणांचे संवर्धन करण्यावर भर दिला. बी कीटकनाशके, खते विकत न आणता आपणच तयार करू शकतो हे गावकऱ्यांना पटवून दिले. त्यासाठी गांडूळखत, कीटकनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आणि गावकऱ्यांनाही दिले. याबरोबरच आपले बीसंवर्धनाचे महत्त्व पटवून बियाणे बँकही करण्यास सुरुवात केली. आपल्या दोन्ही मुलींना अर्चना यांनी उच्चशिक्षण दिले आहे. ‘‘परिस्थितीशी झगडण्याची ताकद मला मिळाली म्हणूनच मी दुष्काळतही दीड लाख रुपयांचे उत्पन्न काढू शकले. त्यामुळेच घरच्यांबरोबरच गावकऱ्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे, आता अनेक लोक घरी येऊन मी माझ्या शेतात काय पेरू? अशा प्रश्नांबरोबरच आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. तेव्हा शक्य तितकी उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करते,’’ असे अर्चना आत्मविश्वासाने सांगतात.

अर्चना यांनी गावातील अनेक स्त्रियांना त्यांची जमीन त्यांच्यात नावे करण्यास प्रोत्साहित करत अनेक कुटुंबांचा पािठबाही मिळवला आहे. याबरोबरच स्त्रियांना एकत्र करत ‘विजयलक्ष्मी सखी प्रोडय़ुसर कंपनी’ स्थापन केली आहे. नऊ वर्षांची असताना लग्न करून आलेली अर्चना कधीही संकटांना घाबरली नाही, आताही त्या केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही मार्गदर्शन करत आहेत. अनेक पुरस्काराने सन्मानित अर्चना आपल्यासारख्या स्त्रियांना शेतकरी म्हणून कधी ओळख मिळणार याची वाट बघत आहेत, कारण शेतकरी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

अनसुर्डा येथील अर्चना माने ही महिला शेतकरी. उस्मानाबादपासून अठरा किमी अंतरावरील जवळपास चारशे घरे आणि दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असणारे हे गाव, पण या गावाला आजही जवळपासच्या उस्मानाबाद आणि तुळजापूरला जोडणारे रस्ते आणि दळवळणाची साधने उपलब्ध नाहीत. आपले गाव जवळच्या शहरांशी जोडले जाऊन त्यातून प्रगती आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात म्हणून आज अर्चना माने यांची लढाई सुरू आहे. पण त्यांचा हा प्रवास अत्यंत दु:खद कारणातून सुरू झाला आहे. अनसुर्डा हे एक छोटे, मागासलेले गाव. या गावामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अर्चना यांच्यावर बिकट प्रसंग ओढवला होता. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या असताना त्यांना पतीच्या मोटरसायकलवरून कच्च्या रस्त्याने रुग्णालयात न्यावे लागले होते. त्यावेळी बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला होताच शिवाय हे बाळंतपण अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडले होते. ‘‘सुदृढ बाळाला जन्म देऊन देखील मी दु:खी होते. कारण गावातील इतर स्त्रियांवर असा प्रसंग ओढवला तर कदाचित त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागतील अशी शंका मला भेडसावू लागली होती.’’ यातूनच गावासाठी काही विधायक काम करण्याची ऊर्मी त्यांच्या मनात जागी झाली.

आज अर्चना यांनी मोठा पल्ला गाठला आहे, पण एक वेळ अशी होती की, बाळाच्या उपचारांसाठी पैसे उभे करणे त्यांना शक्य नव्हते पण त्यातून मार्ग काढत आज त्या पाच व्यवसायांची मालक असून कृषी उत्पादक संस्थेच्या संचालिका आहेत. २०१३-१४ च्या काळात एक एकर शेतीत त्यांनी पंचवीस प्रकारच्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या. त्याचबरोबर शेळीपालन, कुक्कुटपालन, दुधव्यवसाय, गांडूळखतविक्री असे कृषीपूरक व्यवसायही केले. ‘‘काही करावेसे वाटे पण संधी मिळत नसे. दुष्काळ काळात सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्या दहा गुंठे शेतात मी पंचवीस प्रकारच्या भाज्या लावू लागले.’’ आज त्यांच्या शेतात कारली, दोडके, दुधी, मिरच्या, कोिथबीर अशा विविध भाज्या लावलेल्या दिसतात. त्या सांगतात, ‘‘पेरणीचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे शेतातले उत्पादनाचे चक्र सतत सुरू राहते. त्यामुळे हातात पसा येत राहतो. गांडूळखताचे मी नऊ बेडसही तयार केले आहेत. मुबलक चारा उपलब्ध आहे हे बघून मी शेळीपालनाकडे वळले. पुढे कुक्कुटपालनही सुरू केले, असा व्यवसाय वाढवत नेला. घरातल्या मंडळींचा रासायनिक खते, फवारण्या यावर विश्वास होता. सेंद्रिय शेती कधी यशस्वी होणार नाही, असे ते म्हणत. पण जेव्हा मी दहा गुंठय़ात भरपूर उत्पन्न काढून दाखवले तेव्हा त्यांचे मन बदलले. आज माझ्या पतीने मला साथ दिली आहे आणि आम्ही दोघे मिळून या एक एकर मॉडेल शेतात महिन्याला कमीत कमी पंचवीस हजारांपर्यंत उत्पन्न घेतो.’’ तीन एकर शेतीत आता अर्चना एक लाख रुपयांचे उत्पन्न काढतात तेही पाण्याची कमतरता असलेल्या भागात.

आता त्यांच्या गावातल्या पन्नास स्त्रियांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यात त्यांना यश आले असून यातल्या सतरा जणी ‘एक एकर सेंद्रिय शेती मॉडेल’नुसार शेती करत, दोन-तीन शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. गांडूळखताचे सत्तेचाळीस बेड्सही लावण्यात आले आहेत. ‘‘स्त्रियांनी फक्त शेतात मजूर बनून राहू नये, तर भाजीबरोबर मका, मूग, उडीद, सोयाबीन अशी वेगवेगळी पिके घेण्याचा निर्णय घ्यावा. कुटुंबासाठी विषमुक्त आहार निर्माण करावा. अतिरिक्त उत्पादन सामूहिक पद्धतीने बाजारपेठेत नेऊन विकावे, त्यातून स्वत:ची कुशल शेतकरी आणि व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण करावी’’ असा त्यांचा आग्रह आहे. शेतीचा कोणताही पूर्वानुभव नसलेली अर्चना आता उत्तम शेती आणि व्यवसाय करता करता पदवीचे पुढचे शिक्षण घेत आहेत हे विशेष.

कृषी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकरी स्त्रियांना एकत्र आणून त्यांना कंपनीचे सभासद करून त्यांना सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन करणे, पन्नास शेतकरी स्त्रियांचा गट करून सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी गट ‘आत्मा’ संस्थेशी जोडून घेणे, शेतकरी स्त्रियांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे आणि गावपातळीवर त्यांचा माल खरेदी करून त्यांचा वेळ वाचवून योग्य फायदा त्याच्या पदरात पडेल याकडे लक्ष देणे अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे. शिवाय उद्योजकतेची मूल्ये केवळ स्वत:पुरती मर्यादित न ठेवता परिसरातल्या जवळपास अडीचशे महिला उद्योजिकांच्या समूहाला त्या मार्गदर्शन करत असतात. स्त्रीने कोणता व्यवसाय निवडावा त्याविषयी माहिती देणे, व्यवसाय निवडीसाठी स्त्रियांना मदत व्हावी यासाठी अभ्याससहल घेऊन जाणे, गावातील आणि गावाबाहेरील स्त्रियांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, व्यवसाय प्रात्यक्षिकातून स्त्रियांना व्यवसायाचे महत्त्व पटवून देणे अशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरू आहे. एखाद्या वेळी शेतीत नुकसान झाले तर ती कमतरता इतर व्यवसायातून भरून काढता येते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे म्हणून त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येणाऱ्या सर्वानाच त्या हाच गुरुमंत्र देत असतात.

त्यांच्या कामाचा आवाका आणि भविष्यकालीन योजना पाहून ‘स्वयम शिक्षण प्रयोगा’ने ‘उन्नती फेलोशिप ’साठी ज्या वीस धडपडय़ा कार्यकर्त्यांची निवड केली त्यात अर्चना यांचा समावेश केला. पुण्यात झालेल्या ‘उन्नती ग्लोबल फोरम अँड अवॉर्डस’ या परिषदेत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. फेलोशिपच्या काळात ‘‘गावातील प्रत्येक स्त्री ही व्यवसायिक झाली पाहिजे, तिच्या हाताला काम मिळाले पहिजे, प्रत्येकाने सेंद्रिय शेती केलीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणार तसेच सामूहिक व्यवसायाच्या माध्यमातून स्त्रियांना एकत्र आणून स्त्रियांना सक्षम व स्वावलंबी बनवणार, स्त्रियांच्या व्यवसायामधून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणार’’ असे अर्चना सांगतात.  गावाला जोडणारा चांगला रस्ता होण्यासाठी आजही त्यांचा लढा चालू असून, रस्ता झाल्याशिवाय त्या स्वस्थ बसणार नाहीत. त्यासाठी स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी रस्ता मंजुरीचे काम पूर्ण करत आणले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये तो रस्ता पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. अर्चना गावातल्या स्त्रियांसोबत त्याचा पाठपुरावा करत राहणार आहेत हे नक्की.

अशाच प्रियंका पासले. हिंग्ल्जवाडीच्या कमल कुंभार, तेरच्या सुमित्रा शिराळ या स्त्रियांची नावे जरी वेगवेगळी असली तरी कहाणी थोडय़ाफार फरकाने सारखीच. पुरुषप्रधान संस्कृतीत वावरताना घरच्यांचा पािठबा मिळवत या स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केले. आपल्यालाही विचार आहे व कृती करण्याची संधी दिली तर आपण काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. दुष्काळाच्या झळा सोसत त्यांनी स्वत:चे कर्तृत्व दाखवून दिले. संकटांना त्यांनी संधीत रूपांतरित करणाऱ्या या परिसांची आठवण दुष्काळातही बळ देऊन जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या स्फूर्ती प्रेरणांची आपल्या सर्वानाच गरज आहे.

राज्य शासनाने नुकतेच १५१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. राज्यात एकूण ३५८ तालुके असून, यापैकी आतापर्यंत १५१ म्हणजे४० टक्के भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. १५१ पैकी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांची संख्या ११२ असून, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांची संख्या ३९ आहे. गेली काही वर्षे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ वा टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तालुक्यांचा

समावेश आहे.

n priya.dhole@gmail.com

n chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2018 3:19 am

Web Title: article about successful stories of farmers women
Next Stories
1 किशोरी स्नेही आरोग्य सेवा
2 मासिक पाळीवर बोलू काही..
3 आजची तीच तू.. तीच तू..
Just Now!
X