पूर्वीच्या तुलनेत आता उतारवयातही घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. का होतंय असं? साठीनंतरचं सहजीवन आनंदानं, समाधानानं घालवण्याऐवजी जोडप्याला विभक्त व्हावंसं वाटू लागलंय याचं कारण त्याचा आधीपासून विचारच केलेला नसतो. भूतकाळात अडकून न पडता, ‘तुझं आयुष्य’, ‘माझं आयुष्य’ आणि ‘आपल्या दोघांचं मिळून असलेलं आयुष्य’ याचा समतोल साधता आला तर कोणत्याही वयात माणूस भावनिकदृष्टय़ा एकाकी पडत नाही.

‘‘खूप सोसलं आत्तापर्यंत. साधा बिस्किटाचा पुडा आणायचा अधिकार नाही मला. तेवढेही पैसे नसतात माझ्याकडे. मला घटस्फोट घ्यायचा आहे.’’ संगीता म्हणाली. संगीता वय र्वष पासष्ट. एका निवृत्त उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची बायको. समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करताना ‘घटस्फोट’ या शब्दानं धक्का बसावा असं काही नव्हतं, कारण अधूनमधून कुणी ना कुणी असं बोलणारं भेटतंच. तरीही धक्का बसला तो संगीताचं वय बघून. आत्तापर्यंतचा अनुभव असा होता की, या वयातील स्त्रिया समुपदेशनासाठी यायच्या तेव्हा त्यांची गरज आपले दु:ख दुसऱ्यापाशी बोलून दाखविणे ही असायची. त्यांच्याशी बोलताना जाणवायचं की, आहे या परिस्थितीत बदल होणार नाही हे त्यांनी जाणलेलं असायचं आणि स्वीकारलेलंही. नवऱ्याचा अतितापट वा संशयी स्वभाव, त्यानं केलेला दुसरा घरोबा वा एक पैसासुद्धा खर्च करण्याचं स्वातंत्र्य नसणं अशा त्यांच्या अनेक तक्रारी असल्या तरी त्यांची मूळ समस्या असायची ती त्यांचा एकाकीपणा.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?

उतारवयातही साध्यासाध्या गोष्टींसाठी मन मारायला लागल्यामुळे वाटय़ाला आलेलं वैफल्य आणि आपण आपल्या सांसारिक स्थितीत बदल करू शकत नाही या जाणिवेमुळे आलेली अगतिकता. यातून बाहेर पडण्यासाठी नवऱ्यापासून वेगळं राहावं वा न्यायालयात जाऊन घटस्फोट मिळवावा, असं सांगणारी व्यक्ती अगदी तुरळक असायची. गेल्या काही वर्षांत मात्र घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. ते फक्त तरुणांमध्ये नाही, तर उतारवयातील जोडपीही कायदेशीररीत्या विभक्त होण्यासाठी पुढे येत आहेत. फक्त पुण्यातील कुटुंब न्यायालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत प्रौढ वयातील एकूण १६४ जणांनी घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला आहे. २९ जणांना परस्परसंमतीने घटस्फोट मिळाला आहे, तर ४० जणांना ‘मेंटेनन्स’ देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. एकदा या संदर्भात कुटुंब न्यायालयातील न्यायाधीशांशी बोलायची संधी मिळाली असता ते म्हणाले, ‘‘अगदी सत्तरी उलटलेले पती-पत्नी एकमेकांवर हिरिरीने आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यांची मुलेच येऊन सांगतात की, आमचे आईबाबा घरात एकेका कपाटावरून भांडतात. त्यांना एकदाचा घटस्फोट देऊन मोकळे करा.’’ ऐकून धक्का बसला खरा, परंतु जरा डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं, की काही घरांतून प्रौढ वयातील पती-पत्नींमध्ये उमटणारे विसंवादाचे सूर जाणवायला लागतात. पती-पत्नींमधील नातंच असं आहे, की वादसंवाद, मतेमतांतरे सततच होत असतात. त्यातही गंमत असते. त्यामुळे संसाराची रंगत वाढत असते; पण हे कुठवर? जोवर या वादातही संवाद असतो आणि मतभेदांमध्ये कडवटपणा नसतो तोवर. तोवर कितीही भांडणं झाली तरी जुळवून घ्यायची इच्छा असते. ‘‘आयुष्यभर फक्त मी आणि मीच तडजोड करत आले आहे,’’ असं जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून म्हणत असते तेव्हा या विधानामागे वेदना असते आणि नातं मुळापासून उस्कटत चाललं असल्याची भावना असते. हे असं का घडतं, केव्हापासून घडतं, किती जणांबाबत घडतं, याचं एकच एक उत्तर शोधणं वा देणं अवघड असलं तरी या विषयावर अनेक जणांशी चर्चा करताना असं लक्षात येतं की, या वयात न्यायालयाकडे धाव घेणारे संख्येने खूप नसले तरी सहजीवनातील आनंद हरवून बसलेले अनेक जण आहेत.

कोणकोणत्या कारणांनी सहजीवनातील ताण वाढत आहे त्याचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राने ‘साठीनंतरचे सहजीवन’ या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली. त्यापूर्वी पाहणी करण्याच्या उद्देशाने एक प्रश्नावली तयार करून पंचावन्न ते साठ वर्षांच्या पुढील एकंदर तीनशे जणांकडून ती भरून घेतली. त्यामध्ये किती जणांना सहजीवनात ताण जाणवतो, ताण निर्माण होण्यामागची कारणे काय असतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी २३ टक्के व्यक्तींना ताण जाणवत नसल्याचे लक्षात आले. ताण जाणवत असलेल्या व्यक्तींपैकी ९८ जणांचे ताणाचे कारण मुले आहेत असे आढळून आले. एकूण ४२ जणांना मुलांसोबत राहिल्यामुळे ताण जाणवत आहे. एकीकडे या वयात घ्यावी लागलेली नातवंडांची जबाबदारी, नातवंडे वाढवताना होणारे मतभेद, मुलांसोबत राहत असताना त्यांच्याकडून गृहीत धरले जाणे, प्रायव्हसीचा अभाव या सगळ्याचा परिणाम सहजीवनावर होत असतो, तर दुसरीकडे ५६ जणांना मुले जवळ राहत नसल्यामुळे कमालीचे वैषम्य जाणवत असल्याचे आढळून आले. याशिवाय काहींना मुला-मुलींचे लग्न वेळेवर न होणे, त्यांचे घटस्फोट, सून वा जावयाशी होणारे मतभेद याचा परिणाम एकमेकांतील मतभेद अधिक धारदार होण्यात होत असतो असे वाटते.

‘मुले आणि सहजीवन’ या विषयाचा विचार करताना जाणवतं की, आज ज्या व्यक्ती पन्नाशीच्या पुढे आहेत त्यांच्या आयुष्यात लग्नानंतर मुले होणे ही घटना स्वाभाविकपणे घडणारी होती आणि महत्त्वपूर्णही. ते तरुण असताना ‘डिंक्स’ म्हणजे  ‘डबल इन्कम नो किड्स’ ही संकल्पना बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता रुजलेली नव्हती. साहजिकच मुलांना वाढविताना आयुष्याला एक प्रचंड वेग आलेला असायचा. एकमेकांच्या स्वभावातील छोटय़ामोठय़ा गोष्टी खटकत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. कधी मुलांसमोर तमाशे नकोत म्हणून, तर कधी त्यांची करिअर वा लग्न यामध्ये व्यत्यय यायला नको म्हणून. कधीकधी मुलांचा बफरसारखा उपयोग करून घेऊन कटू प्रसंग टाळले जायचे. सहजीवनात मुले असणे या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिले असल्यामुळे साठी उलटल्यावर अनेक जणांमध्ये ‘मुलाचं सोबत असणं आणि नसणं’ या दोन्ही गोष्टी नकारात्मक परिणाम करणाऱ्या ठरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.   मुले ही जशी वैवाहिक जीवनात ताण निर्माण व्हायला कारणीभूत ठरत आहेत त्याप्रमाणेच आर्थिक विवंचना, वाढती महागाई आणि पैशांचे झालेले अवमूल्यन, पैसे असून खर्च करण्याचे स्वातंत्र्य नसणे, शारीरिक वा मानसिक आजार, स्वभाववैचित्र्य अशा अनेक कारणांमुळे सहजीवन तणावग्रस्त झाले असल्याचे आढळून आले. तसं पाहिलं तर हे सगळे घटक आजघडीला नव्याने निर्माण झाले आहेत अशातला भाग नाही. आपल्या मागच्या पिढीतही ते अस्तित्वात होतेच. बदल झाला आहे तो एवढाच की, प्रश्न आहेत आणि ते सोडवायचे असतात, ही जाणीव निर्माण झाली आहे. स्वत:कडे, स्वत:च्या मानसिक स्वास्थ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

‘लग्न’ या संकल्पनेबाबतच्या अपेक्षा आता पूर्वीपेक्षा निराळ्या आहेत. आजची तरुण पिढी आम्ही तरुण होतो त्यापेक्षा अधिक व्यक्तिवादी व स्वकेंद्रित आहे असा शिक्का पटकन मारला जातो; परंतु त्या वेळी आपण हे सोयीस्करपणे विसरतो का, की आपले आईवडील होते त्यापेक्षा आपणही अधिक व्यक्तिवादी व स्वकेंद्रित झालो आहोत. २०/२५ वर्षांपूर्वी लग्नामुळे आयुष्यात स्थैर्य येते, अशी भावना असायची. आज मात्र स्थैर्याच्या बरोबरीने आनंद आणि समाधान मिळावे, अशी अपेक्षा असते. या दोन गोष्टी मिळत नसतील, तर लग्न संपविण्याचा विचार फक्त तरुणच नाहीत तर प्रौढही करत आहेत. प्रौढ वयातील अनेक जणांशी संवाद साधताना लक्षात येतं की, तरुण आणि मध्यम वयात कधी समजून-उमजून, तर कधी नाइलाज म्हणून दुर्लक्ष केलेले एकमेकांचे स्वभावदोष, खपवून घेतलेले इगो प्रॉब्लेम आयुष्याच्या या वळणावर नागासारखे फणा काढून वर येतात. अनेक वेळा भांडणं करायची नसतात, मागच्या गोष्टी उकरून काढायच्या नसतात; पण या गोष्टींवर संयम राहत नाही. नातेसंबंधात तिढे पडत जातात, वाढत जातात आणि निवृत्तीनंतरच्या निरामय आणि स्वस्थ आयुष्याच्या कल्पनांना तडे जातात. मनात घटस्फोटाचे, निदान एकमेकांपासून वेगळे राहण्याचे विचार यायला लागतात. कधी लोकलाजेस्तव, तर कधी मुलांच्या धाकामुळे न्यायालयाची पायरी चढायची हिंमत होत नाही. दुभंगलेली मनं घेऊन आयुष्य रेटावं लागतं.

आजूबाजूला जेव्हा अशी जोडपी दिसतात तेव्हा मनात आलं, साठीनंतरचं सहजीवन फक्त सुसहय़ नाही, तर आनंददायी होण्यासाठी काही करता येईल का? त्यासाठी परस्परांकडूनच्या अपेक्षा आणि एकंदरच विचारप्रक्रिया यामध्ये बदल व्हायला हवा आणि या बदलांची सुरुवात, निदान त्याविषयीची जागरूकता पन्नास-पंचावन्नाव्या वर्षांपासून व्हायला हवी. या वयातील प्रश्न, समज-गैरसमज भावनिक असतात, व्यावहारिक असतात आणि लैंगिकही असतात, ज्याविषयी तर कधीच बोलले जात नाही. म्हणूनच या तिन्ही विषयांचा समावेश ‘साठीनंतरचे सहजीवन’ या कार्यशाळेत केला होता. या विषयांवर अनुक्रमे मी, स्मिता जोशी आणि डॉ. सागर पाठक यांनी संवाद साधला.

हा संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली की, पन्नाशी उलटल्यावर आपली शरीरमनाची ताकद कमी होत चालली आहे हे जाणवत असलं तरी सहजासहजी स्वीकारलं जात नाही. केस रंगविले आणि बांधा टिकवला म्हणून आपण तरुण दिसलो तरी वयानुरूप आपल्या मानसिकतेमध्ये बदल करायला पाहिजेत हे लक्षात येत नाही. शाळेत असताना आपण शिकलेलो असतो की, वयाच्या पंचवीस ते पन्नास वर्षांपर्यंत गृहस्थाश्रम असतो आणि पन्नास ते पंचाहत्तर वानप्रस्थाश्रम; परंतु पन्नाशी आल्यावर आपण आता वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल करायला हवी, निदान पन्नास ते साठ या वयात त्या दृष्टीने पुढील आयुष्याचे नियोजन करायला हवे, ही गोष्ट विसरली जाते, तर कधी जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही गोष्ट न स्वीकारण्यामागे किती काळ आपण अर्थपूर्ण आयुष्य जगू शकणार आहोत याबाबतची अनिश्चितता असते, आहे ते धरून ठेवण्याची जीवेच्छा असते आणि कधी मृत्यूचे भय असते. हे सगळं असणं/ वाटणं हे पूर्णपणे अस्वाभाविक आहे असंही नसतं; पण निरोगी सहजीवनासाठी आणि स्वत:साठी वाढत्या वयाचा स्वीकार जेवढा सहजपणे करता येतो तेवढं पुढील आयुष्याचं नियोजन करणं सुकर होतं. आपल्याकडे अजूनही मुलामुलींची लग्न वेळेवर होणं, झालेली लग्नं टिकणं याला आईवडील जबाबदार आहेत, असं समजलं जातं. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता आली नाही तर पती-पत्नी एकमेकांवर दोषारोप करत राहतात किंवा मुलांना वाढविण्यात आपण कमी पडलो, अशा भावनेने स्वत:ला अपराधी समजत राहतात. मुलांनी नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक आयुष्यात स्थिरावणं या संदर्भात आपल्या अपेक्षा आणि मर्यादा यांचा स्वीकार न करता आल्यामुळे सहजीवनातील अस्वस्थता वाढत असते. पूर्वीपेक्षा अधिक भांडणे होतात का? या प्रश्नाचे उत्तर ३०.३ टक्के लोकांनी ‘हो’ असे दिले आहे, तर ५३.६ टक्के लोकांनी ‘नाही’ असे. १६ टक्के लोकांना ‘सांगता येत नाही’ असं वाटतं. भांडणे मिटविण्यासाठी काय करता यावर चर्चा करताना जे पर्याय सांगितले गेले ते म्हणजे तो विषय न काढणे, चूक मान्य करणे, दुसऱ्याला आवडती अशी गोष्ट करणे, अबोला, स्वत:च्या छंदात रमणे, नाम:स्मरण, समोरासमोर चर्चा इत्यादी.

एकंदरच ‘सहजीवन’ या संकल्पनेचा विचार करताना असं लक्षात येतं की, एकत्र जगत असताना आपलं आपलं स्वतंत्र अवकाश असण्याची नितांत आवश्यकता असते. खूप वेळा असं अवकाश हवं याची जाणीव आयुष्यात फुरसत सापडली की व्हायला लागते. अशा वेळी ‘वेळ आहे तर तुझा तुझा छंद जोपास, समाजकार्य कर.. वगैरे सल्ले दिले जातात; परंतु या गोष्टी वेळ आहे म्हणून करता येण्यासारख्या नसतात, तर जेव्हा वेळात वेळ काढून माणूस त्या करत असतो तेव्हाच त्या अंगवळणी पडतात, उतारवयात करणे शक्य होतात. त्यासाठी दैनंदिन कामे वा नोकरी करत असतानाही स्वत:ला नेमकं काय करायला आवडतं, काय आवडत नाही याचा शोध घेऊन त्यासाठीचा वेळ बाजूला काढून ठेवता आला पाहिजे. ‘तुझं आयुष्य’, ‘माझं आयुष्य’ आणि ‘आपल्या दोघांचं मिळून असलेलं आयुष्य’ याचा समतोल साधता आला तर कोणत्याही वयात माणूस भावनिकदृष्टय़ा एकाकी पडत नाही.

सहजीवनात एकमेकांना बांधून ठेवणारा अजून एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे लैंगिक संबंध. कुणीही व्यक्ती वयात आल्यापासून मरेपर्यंत त्याच्या मनात लैंगिक भावना जागृत असते, असे या विषयातील तज्ज्ञ लोकांचे मत आहे. अर्थात त्याची तीव्रता वय आणि व्यक्तिसापेक्ष असते. तरुण वयात परस्परांविषयी शारीरिक ओढ सर्वात जास्त असते. त्यामुळे मतभेद विसरून नातं टिकविण्याची मानसिकता असते. पन्नाशीनंतर रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार आणि वयोपरत्वे झालेले एकंदरच शारीरिक बदल यामुळे थकवा जाणवत असतो. याचाही परिणाम लैंगिक संबंधावर होत असतो. स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर होणारे बदल दृश्य स्वरूपात असतात; परंतु पुरुषांमध्येही अ‍ॅण्डरोपॉजमुळे काही बदल होत असतात याची स्त्रियांनाच नाही, तर पुरुषांनाही जाणीव नसते. या संदर्भात बोलताना

डॉ. सागर पाठक म्हणाले की, मेनोपॉज किंवा अ‍ॅण्डरोपॉज नंतर अनेकांबाबत लैंगिक इच्छा कमी झालेली असते. याचा अर्थ ती अजिबात नसते असं नाही. प्रत्येकाच्या बाबत याचा आलेख वेगळा असतो; परंतु हे सहसा समजून घेतले जात नाही. या वयात लैंगिक सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदललेली असते. मानसिक आधारासाठी शारीरिक जवळीक हवीशी वाटते. प्रेमळ कटाक्ष, शारीरिक ओढीतून होणारे स्पर्श, एकमेकांना बिलगून बसणे अशा साध्यासाध्या गोष्टींबाबतची उत्कट इच्छा ‘बिइंग टुगेदर’ची भावना देत असते. यासाठी पती-पत्नींनी एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता असते तेवढीच मुलाबाळांनी आईवडिलांना असलेली एकांताची गरज ओळखण्याची. अनेक वेळा आईवडिलांना गृहीत धरून नातवंडांची झोपायची व्यवस्था कायमच आजीआजोबांसोबत केली जाते किंवा आजीआजोबांची झोपायची खोली नातवंडांना देऊन त्यांची सोय दिवाणखान्यात केली जाते. याबाबत साठीला पोहोचलेल्या व्यक्ती कधी संकोचापायी बोलू शकत नाहीत, तर कधीकधी त्यांची स्वत:ची वा त्यांच्या जोडीदाराची गरज ओळखू शकत नाहीत. आपल्याकडे कोणत्याही वयातील लैंगिक बाबींविषयी उघडपणे चर्चा क्वचितच घडते. साठीनंतरच्या सहजीवनात तर या गोष्टीला स्थान नसतेच असं वाटण्याची शक्यता अधिक आहे, असा अंदाज असूनही त्याचे नेमके स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रश्नावलीमध्ये पुढील प्रश्न उद्धृत केले होते. ‘लैंगिक संबंधाबाबत परस्परांच्या अपेक्षा समान आहेत का? नसल्यास त्यावरून वाद होतात का? यासंबंधी अधिक माहिती हवी असे वाटते का? वाटत असल्यास ती मिळविण्याचा प्रयत्न केला का?’ अपेक्षेप्रमाणे १/३ लोकांनी या माहितीसंबंधीचे रकाने कोरे सोडले होते. या संदर्भात आमच्याकडे आलेली लिखित कॉमेंट अशी आहे की, ‘अशा प्रकारचे प्रश्न (लैंगिक) समवयस्कांबरोबर बोलले जातात, पण अशा वेळी एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय मदत करणार, असा प्रश्न पडतो. अशा समस्यांवर स्पष्टपणे बोलले वा लिहिले जावे.’ लैंगिक संबंध असावेत असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर १४३ जणांनी असू नयेत असे दिले. ७ टक्के लोकांना नेहमी असावेत असे वाटते, तर १० टक्के लोकांना बऱ्याचदा व ३३ टक्के लोकांना कधीकधी असे वाटते. २ टक्के लोकांनी रकाना कोरा सोडला होता. याविषयीच्या अपेक्षा नेहमीच समान असतात, असे सांगणाऱ्या व्यक्ती ६ टक्के आहेत, तर कधीच समान नसतात, असे सांगणाऱ्या व्यक्ती ४४ टक्के. या विषयाची व्याप्ती इतकी प्रचंड मोठी आहे आणि त्याविषयी बोलणे हासुद्धा एक टाबू असल्यामुळे परस्परविरोधी अशी मते मांडली गेली; परंतु यानिमित्ताने या विषयाला वाचा फुटली हेसुद्धा कमी महत्त्वाचे नाही. थोडक्यात म्हणजे याबाबतची जोडीदाराची मते समजून घेणे, परस्परांच्या गरजा ओळखणे आणि त्या पुऱ्या होत नसतील तर तज्ज्ञांची मदत घेणे या गोष्टींची आवश्यकता असते. याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आणि स्पष्टपणे बोलण्याचे धाडस नसल्यामुळे भलतेच मतभेद उफाळून येण्याची शक्यता असते.

या संदर्भात बोलताना समुपदेशक स्मिता जोशी म्हणाल्या की, ‘‘प्रौढ वयात लैंगिक संबंध नाकारले गेल्यामुळे विवाहबाहय़ संबंध प्रस्थापित करणारे पुरुष आणि ही गोष्ट घरात समजल्यावर मुलाबाळांनी केलेली नाचक्की, पणाला लागलेली सामाजिक प्रतिष्ठा अशा प्रकारच्या केसेस समुपदेशनासाठी येत आहेत. एकदा त्यांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर व्याख्यान द्यायला बोलाविले असता ऐकायला आलेल्यांमध्ये पन्नाशी ओलांडलेल्या प्रौढ व्यक्ती संख्येने जास्त होत्या. त्यामध्ये विधुर-विधवा, घटस्फोटित याबरोबरच लौकिकदृष्टय़ा ज्यांचे लग्नबंधन टिकून आहेत अशाही व्यक्ती होत्या.’’

सहजीवन म्हटलं की, तरुण-तरुणी, मध्यमवयीन जोडपी डोळ्यांसमोर येतात. त्यांच्या प्रश्नांविषयी जसं आणि जेवढं बोललं जातं तसं साठी उलटलेल्या जोडप्यांविषयी बोललं जात नाही. कारण ज्या अर्थी या व्यक्ती इतके र्वष एकत्र राहत आहेत त्याअर्थी त्यांचं आयुष्य सफळ-संपूर्ण असणार असं गृहीत धरलं जातं. जेव्हा एखाद्याच्या घरातील कुरबुरी कानावर येतात किंवा संगीतासारखी स्त्री न्यायालयात धाव घेते, तेव्हा मात्र ती ‘बातमी’ होऊन राहते. साठीनंतरही दोघांचं एकत्रित भावविश्व परस्परांच्या मदतीनं भक्कम पायावर उभं करण्याची, फुलविण्याची आणि ताजंतवानं ठेवण्याची किती आवश्यकता असते याचा शोध घेण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे झालेल्या चर्चेमधून आणि प्रश्नावलीमधून या संकल्पनेचा अनेक अंगांनी वेध घेता आला हे निश्चित.

– मृणालिनी चितळे
chitale.mrinalini@gmail.com