म्हातारपणी विस्मरण होणारच, असे न म्हणता तशी लक्षणे दिसताच ताबडतोब पावले उचलायला हवीत. विस्मरण हे वृद्धापकाळातील दुखण्यांपैकी दुखणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे.  तसेच या रुग्णांना सांभाळणाऱ्या त्यांच्या काळजीवाहकांना आधार दिल्याशिवाय रुग्णाची काळजी अशक्य आहे हेही तितकेच महत्वाचे आहे. जितका मोठा आधार तितकी चांगली काळजी हे लक्षात घेऊन कुटुंबीयांना भक्कम पाठिंबा देणारे समाजभान आपल्याकडून अपेक्षित आहे. आजमितीला जगात ५ कोटी लोक विस्मृतीग्रस्त आहेत. पुढील पन्नास वर्षांत ही संख्या तिप्पट होईल असा अंदाज आहे. त्यानिमित्ताने..

गेल्या आठवडय़ात मेमरी क्लिनिकमध्ये आलेले आजोबा ऐंशीच्या पुढचे. महाविद्यालयात प्रोफेसर. त्यांच्या विषयातील तज्ज्ञ. त्यांनी दोन-चार पुस्तके लिहिली होती. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या बोलण्यात डोकावत होता. घरी बायको. तीसुद्धा ऐंशीच्या आसपास. मुले बाहेरगावी. आजोबांना फिरायला आवडत होते, परंतु दोन-तीन वेळा घर न सापडल्याने विचारत, विचारत यायला लागलं होतं. त्यामुळे सतत धास्ती. आजींना आजोबांकडे सतत लक्ष ठेवावे लागत होते. मध्यरात्री केव्हाही उठून चहा करतात. कधी उजाडले असे वाटून पेपरवाल्याची वाट बघत बाहेर थांबतात. जेवायची वेळ न पाहता केव्हाही खायला लागतात. आंघोळीचा कंटाळा करतात इत्यादी..

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?

६५ वर्षांचे गृहस्थ. शेतकरी. गावातले सरपंच होते. सकाळ-संध्याकाळ एक-दीड तास फिरायला जातात. रस्ता सापडला नसल्याच्या घटना अनेकदा घडतात, परंतु छोटे गाव असल्याने कोणी तरी भेटते, घरी पोचवते. उरलेला बहुतेक वेळ झोपलेले असतात. अत्यंत हट्टीपणा, काहीही सांगितले तरी न पटणे, बायकोला घालून पाडून बोलणे, खायला दिलेले विसरणे, मग घरातल्या मुला-सुनांना काही तरी सुनावणे असे सध्याचे प्रश्न..

नलिनीताई एक करारी बाई. आयुष्यात बरेच काही स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या, ताई तशा एकांडय़ाच, आत्तापर्यंत स्वावलंबनाने जगलेल्या. अलीकडेच स्मृतिभ्रंशाची सुरुवात झाली. ताईंना छोटय़ा छोटय़ा गोष्टी करायला जमेनात, निर्णय घेता येईनात. मुलाला वेळ नाही म्हणून सुनेला त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागत होते. ताईंचे आणि सुनेचे कधीच पटले नव्हते. सून पहिले सगळे विसरून त्यांच्यासाठी रोज यायला लागली. त्यांचे हवे नको बघणे, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांची बँकेची कामे, सगळे करू लागली. ताई प्रत्येक ठिकाणी खोडय़ा काढू लागल्या. दिवसातून तिला दहा वेळा फोन करून काहीबाही विचारीत, तिला यायला थोडा उशीर झाला तर तिची खरडपट्टी काढत, माझे पैसे तुम्ही वापरता असा तिच्यावर ठपका ठेवत. सून मेमरी क्लिनिकमध्ये आली तेव्हा सासूच्या वागण्यामुळे वैतागून गेलेली होती..

डिमेंशिया अर्थात स्मृतिभ्रंश या आजाराचा प्रत्येक रुग्ण असा वेगळा, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. ११० वर्षांपूर्वी डॉ. अल्झायमर्सनी डिमेंशिया अर्थात स्मृतिभ्रंश या आजाराची लक्षणे सांगितली. तेव्हापासून आजपर्यंत या आजाराबद्दल सर्व नाही तरी बरीच माहिती आपल्याला मिळाली आहे. स्मृतिभ्रंश हा एकविसाव्या शतकातील मोठा आरोग्य आणि सामाजिक प्रश्न समजला जातो. आजमितीला जगात ५ कोटी लोक स्मृतिभ्रंशग्रस्त आहेत. पुढील पन्नास वर्षांत ही संख्या तिप्पट होईल या अंदाजामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले जात आहे. हा प्रश्न प्रामुख्याने ६५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये दिसून येतो. जगभर जोमाने चाललेल्या संशोधनांमधून या आजारावर आपण लवकरच मात करू शकू हा आशावाद शास्त्रज्ञांमध्ये आहे. मेंदूच्या क्षमतांवर कितीही आघात झाला तरी रुग्ण ही एक व्यक्ती आहे, तिला व्यक्ती म्हणून आदरानेच वागवायला हवे हे सूत्र आज डिमेंशिया संबंधातील कामाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. काळजीवाहकांना आधार दिल्याशिवाय रुग्णाची काळजी अशक्य आहे हे सर्वमान्य आहे. जितका मोठा आधार तितकी चांगली काळजी हे लक्षात घेऊन कुटुंबीयांना भक्कम पाठिंबा देणारे समाजभान आपल्याकडून अपेक्षित आहे.

वयपरत्वे होणारे आणि गंभीर विस्मरण

डिमेंशियाबद्दल अधिक माहिती घेण्याअगोदर वयपरत्वे होणारे विस्मरण आणि गंभीर विस्मरण यातील फरक समजून घ्यायला हवा. ऐनवेळी गोष्ट न सापडणे, एखादी गोष्ट हरवणे, निरोप सांगायचा विसरणे, बाजारात गेल्यावर एखादी गोष्ट आणायची राहून जाणे असे अनुभव अगदी प्रत्येकालाच दिवसागणिक येत असतात. वाढत्या वयात अशा प्रसंगांची संख्या जरा वाढलेलीच दिसते. त्यात तीन, तीनदा आवर्जून पाहिलेल्या चित्रपटातल्या अभिनेत्रीचे नाव न स्मरणे, असे जरा वेगळे आत्तापर्यंत न आलेले अनुभवसुद्धा यायला लागलेले असतात. नाही म्हटले तरी वयपरत्वे मेंदूत थोडेफार बदल होतात. त्यामुळे विसरभोळेपणाचे अनुभव थोडे जास्तच येऊ लागतात इतकेच. पण तरीही मेंदू आपल्याला आयुष्यभर योग्य साथ द्यायला समर्थ असतो.

गंभीर विस्मरण ओळखण्यासाठी एक, दोन उदाहरणे घेऊ या. एखादेवेळी चीजवस्तू हरवली तर दु:ख होतेच पण कालांतराने आपण ते विसरून जातो. परंतु मौल्यवान वस्तू अनेक वेळा हरवल्या तर मात्र आपली शांतता पूर्णपणे हरवून जाते. जो फरक एखादे वेळी दागिना हरवणे आणि अनेक वेळा किमती वस्तू हरवणे यात आहे अगदी तसाच फरक साधे विस्मरण आणि विस्मृतीच्या आजारात (डिमेंशिया) आहे. अकाऊंटंट म्हणून निवृत्त झालेल्या व्यक्तीला भाजी घेतल्यावर हिशेब करताना अडचण आली तर स्मरणशक्ती बिनसली आहे असे तुम्ही म्हणाल ना? आयुष्यभर ज्या बाईने स्वयंपाक करून सर्वाना प्रेमाने खाऊ घातले त्या बाईला चहा कसा करायचा हे उमजले नाही तर काहीतरी बिनसले आहे हे नक्कीच.

डिमेंशिया म्हणजे काय?

ज्या व्याधींमुळे मेंदूच्या क्षमता क्षीण होत जातात अशा विविध प्रकारच्या व्याधींच्या लक्षणांना आणि त्यांच्या परिणामांना एकत्रितपणे मिळून  डिमेंशिया (Neurocognitive disorder) असे म्हटले जाते. या आजारामुळे आजारी व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचारशक्तीवर, वागण्यात, स्वभावात आणि त्यामुळे स्वावलंबनावर परिणाम होत जातो. एकदा आजार झाल्यावर या आजाराची लक्षणे वाढत जाताना दिसतात त्यामुळे या आजाराला प्रोग्रेसिव्ह आजार म्हटले जाते. लक्षणे वाढत, वाढत मेंदूच्या सर्वच कामांवर हळूहळू मळभ येत जाते. पुढच्या सात-आठ वर्षांच्या काळात हे मळभ अधिकाधिक गडद होत होत शेवटी आजारी व्यक्ती पूर्णपणे परावलंबी होते.

डिमेंशिया होण्याची विविध कारणे आहेत. अल्झायमर्स हे त्यामधील एक प्रमुख कारण आहे.  डिमेंशिया झालेल्या जवळपास सत्तर टक्के व्यक्तींना अल्झायमर्स झालेला असतो. अल्झायमर्सच्या आजारात मेंदूतील पेशींमध्ये आणि त्यांच्या अवतीभवती नको असलेल्या पदार्थाच्या (प्रोटिन्सच्या) गाठी आणि गुंता होतो. यामुळे पेशी आपले कार्य करायला असमर्थ होतात आणि हळूहळू मृत्युपंथाला लागतात. यामुळे पेशींच्या संवादक्षमतेवर परिणाम होतो. मेंदूचा कारभार पेशींमधील संवादावरच अवलंबून असतो. संवादक्षमता गमावलेला मेंदूचा भाग त्याला नेमून दिलेले काम करू शकत नाही.

तात्पुरत्या स्मरणशक्तीचा ऱ्हास

डिमेंशियाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे या आजाराची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत एकसारखी नसतात, कारण व्यक्तिगणिक विस्मरणाच्या छटा भिन्न असतात. त्यामुळे  डिमेंशियाचे निदान सहजासहजी करता येत नाही. पूर्ण परीक्षेअंतीच ते ठरवले जाऊ शकते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तात्पुरती स्मरणशक्ती (शॉर्ट टर्म मेमरी) दुबळी होताना दिसते. तात्पुरती स्मरणशक्ती म्हणजे अशी स्मरणशक्ती जिचा वापर थोडय़ाच काळापुरता केला जातो. उदाहरणार्थ- औषध आणून झाले की केमिस्टकडे जायचे आहे हे लक्षात ठेवायला लागत नाही. तात्पुरती स्मरणशक्ती अल्प कालावधीपुरतीच असली तरी आपल्या रोजच्या जीवनात तिचे स्थान महत्त्वाचेच असते. आज तारीख काय आहे, हा प्रश्न दिवसातून सतरा वेळा विचारणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणाऱ्याला तात्पुरती स्मरणशक्ती किती मोलाची आहे हे लगेच कळून येईल.

कुटुंबाचे निरीक्षण मोलाचे

विस्मृतीच्या आजाराचे निदान करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींच्या निरीक्षणाला फार महत्त्व असते. जेव्हा कुटुंबीयांच्या मनात एखाद्या व्यक्तीच्या विस्मरणाबाबत ‘नक्कीच काहीतरी झालंय’ अशी धोक्याची घंटा वाजू लागते त्या वेळी म्हातारपणी विस्मरण होणारच असे न म्हणता ताबडतोब पावले उचलायला हवीत. विस्मरण हे वृद्धापकाळातील दुखण्यांपैकी दुखणे नव्हे हे पक्के लक्षात घ्या. विस्मृतीच्या आजाराच्या पहिल्या टप्प्यात तात्पुरती स्मरणशक्ती गोठायला लागली तरी कायमस्वरूपी स्मरणशक्ती शाबूत असते. त्यामुळे ज्या व्यक्तीला जेवण झाले की नाही हे आठवत नाही, ती व्यक्ती भूतकाळातील आठवणी खडान्खडा सांगते. या विसंगतीमुळे कुटुंबीयांना प्रश्नाच्या गांभीर्याची पुसटशी शंकादेखील येत नाही. म्हणूनच विस्मरणाच्या विकारांना छुपे हल्लेखोर असेही म्हटले जाते.

गंभीर विस्मरण ओळखण्याची लक्षणे वेगाने वाढत जाणारे विस्मरण, परिचयाची कामे करण्यात अडचणी, रोजचे जीवन जगण्यात अडचणी, नवीन माहिती लक्षात ठेवणे अवघड,  नवीन शिकणे अवघड, तात्पुरत्या स्मरणशक्तीत घसरण, भाषा ज्ञानात उणिवा, संभाषणाचे कौशल्य कमी होणे, स्थळकाळाचे भान नसणे, नियोजन करणे हे न पेलणारे आव्हान, सारासारविचारशक्तीत उतरण, समाजात मिसळणे नको वाटते, दृष्टिदोषात वाढ (वस्तूंमधील अंतर न समजणे, रंग न समजणे इत्यादी). मेंदू आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे.  मन, बुद्धी, डोके, अक्कल, स्मरणशक्ती अशा शब्दांमधून आपण मेंदूची कामे सूचित करतो. खरोखर सकाळी उठल्यापासून आपला मनोव्यापार, क्षणाक्षणाला मेंदू करणारी कामे याची नोंद ठेवणे केवळ अशक्य आहे. पण मेंदू जेव्हा संपावर जातो तेव्हाच तो आपल्यासाठी करत असणाऱ्या शेकडो, हजारो बाबी लक्षात येऊ लागतात.

आजाराचा वागण्यावरील परिणाम

डिमेंशिया असणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास होतो तो त्यांच्या स्वभावातील तसेच वागण्यामधील बदलांचा. या बदलांना सामावून घेत काळजी घेण्याचे आव्हान मोठे असते. प्रत्येक रुग्णाचे प्रश्न वेगळे असतात (लेखाच्या सुरुवातीची काही उदाहरणे). या प्रश्नांचे वर्गीकरण वेगवेगळ्या गटांत केले जाते. मेंदूवर झालेल्या आजाराच्या परिणामांमुळे, रुग्ण वेगळ्या रीतीने व्यक्त होतात. त्याच्या मुळाशी त्यांच्या गरजा आहेत असे मानले जाते. या प्रश्नांना एकत्रितपणे बिहेवियर अ‍ॅण्ड सायकॉलॉजिकल सीम्पटम्स इन डिमेंशिया (बीबीएसडी) असे संबोधले जाते.

काळजीवाहक महत्त्वाचा

इतर आरोग्यप्रश्नांच्या तुलनेत स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णाची काळजी घेणे जास्त अवघड समजले जाते. कारण ही काळजी चोवीस तासांची आहे, अनेक वर्षे करावी लागणारी आहे. एवढेच नव्हे तर आव्हानात्मक आहे, वैफल्य आणणारी आहे. विशेषत: काळजी घेताना वाढत जाणारे परावलंबित्व तसेच व्यक्तिमत्त्व आणि वागणुकीतील बदल याचा साक्षीदार होणे मानसिक कस बघणारे ठरते. अभ्यासातून असे दिसते की, ‘विस्मृतीग्रस्त रुग्णांचे काळजीवाहक तणावपूर्ण स्थितीमध्ये जगतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो’. म्हणूनच काळजीवाहकाची तब्येत ठीक राहण्यासाठी विशेष प्रयत्न अगदी सुरुवातीपासून करायला हवेत. त्यामध्ये आहार, व्यायाम, विरंगुळा, वैद्यकीय तपासण्या अशा सर्व बाबींकडे लक्ष द्यायला हवे. रुग्णाच्या जीवनातील काळजीवाहकाची भूमिका मध्यवर्ती आहे. किंबहुना काळजीवाहकामार्फतच, त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहूनच रुग्ण आपले जीवन जगत असतात. त्यामुळे काळजीवाहकाच्या मानसिक, शारीरिक स्थितीवर, त्यांच्या व रुग्णाच्या भावबंधावर, त्यांच्या प्रयत्नावर रुग्णाची स्थिती, त्यांचे जीवनमान अवलंबून असते.

बदलता समाज, बदलते प्रश्न

डिमेंशिया असो, पार्किनसन्स असो अशा नवीन आजारांची परिमाणं वेगळी असली तरी काळजी घेणे किंवा केअर गिव्हिंग ही सामाजिक समस्या म्हणून पुढे येण्यापाठीमागे विविध कारणे आहेत. त्यामध्ये वाढते वयोमान, एकत्र कुटुंब संस्थेचे विभाजन, स्त्री-पुरुषांनी अधिकाधिक जबाबदारीच्या नोकऱ्यांची स्वीकारलेली जबाबदारी, कामावरील वाढता ताण, ज्येष्ठांचे एकटे पडणे, त्यांच्या मानसिकतेवर त्याचा होणारा परिणाम अशी कितीतरी कारणे सांगता येतील.

या प्रश्नावर काम करताना प्रश्नाचे जे विविध प्रकार जाणवले त्याबद्दल थोडे विवेचन करायचे तर हे सांगायला हवे की बहुतेक स्त्रियाच प्रमुख काळजीवाहक असतात. बहुतांशी त्यांचे वय साठीच्या पुढचे असते. काळजीवाहक आपले आरोग्यप्रश्न सांभाळत काळजी घेण्याची जबाबदारी पार पडत असतात. ज्येष्ठांची काळजी ज्येष्ठच घेत असतात असेही दिसते. ऐंशी वर्षांवरील अनेक काळजीवाहक मला माहीत आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त रुग्णांची काळजी घ्यावी लागते. सध्या माझ्या माहितीतील एक काळजीवाहक आपले स्वत:चे आई-वडील आणि नवरा यांची काळजी घेण्याची जबाबदारी मोठय़ा सोशिकतेने पार पाडताना दिसत आहेत. एवढेच नाही तर स्वत: मोठय़ा आजाराशी झगडत असताना आपल्या बायकोची वा नवऱ्याची काळजी घेणारे काळजीवाहकही आहेत. अपंग किंवा लग्न न केलेली मुले आपल्या आई-वडिलांची जबाबदारी घेताना दिसत आहेत. काळजीवाहकांसाठी आधार केंद्रांचे महत्त्व यातून अधोरेखित व्हावे.

मेमरी क्लिनिक

दीनानाथ हॉस्पिटलचे मेमरी क्लिनिक गेले सात-आठ वर्षे डिमेंशियाचे रुग्ण, त्यांचे काळजीवाहक आणि कुटुंबीय यांच्यासाठी एक इंटिग्रेटेड कार्यक्रम राबवत आहे. रुग्णाची योग्य काळजी घेतली जावी हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.  स्मरणशक्तीचे प्रश्न वेळीच समजून यावेत आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न वेळीच व्हावेत असा हेतू त्यामागे होता. डिमेंशिया असणाऱ्या रुग्णांची सोय करणाऱ्या संस्था कितीही वाढल्या तरी ९०-९५ टक्के रुग्णांची काळजी घरीच घेतली जात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन तसेच आधार देण्याचे महत्त्वाचे काम मेमरी क्लिनिक करते.

मेमरी क्लिनिकला आलेल्यांमध्ये चांगला फरक जाणवू लागला आहे. उदाहरण द्यायचं तर एका आजोबांचं देता येईल त्यांना स्मृतिभ्रंश असावा अशी शंका येत होती. त्यांची चिडचिड खूप वाढली होती. त्यांना काही सांगणे, पटवून देणे अशक्य झाले होते. बाजारात जाऊन नको त्या गोष्टी घेऊन यायचे. सकाळी पेपरवाला दहा मिनिटे उशिरा आला तरी त्याला फैलावर घ्यायचे. डिमेंशियाचे निदान झाले. घरचे खूप निराश झाले. पण त्यांनी ठरविले की आल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायचे. त्यांच्याशी कसे बोलले म्हणजे ते चिडणार नाहीत हे जाणून घेतलं. कुटुंबीयांनुसार, ‘‘कालच आम्ही दिवसभर बाहेर गेलो होतो. आमच्या बरोबर तेसुद्धा आनंदात होते.’’

या मेमरी क्लिनिकतर्फे रुग्ण कुटुंबीयांसाठी सर्वागीण प्रयत्न केले जातात. डमेंशियाबरोबरच्या प्रवासात आपण एकटे नाही ही जाणीव काळजीवाहकांचे मनोबल वाढवणारी असते. आज बरेच वर्षे या क्षेत्रात काम केल्यामुळे कुटुंबीयांच्या वाटचालीसाठी काही सूचना कराव्याशा वाटतात.

काही सूचना

वैद्यकीय उपचार वेळचे वेळी चालू करून त्यामध्ये सातत्य राखणे आवश्यक असते, आजाराचा स्वीकार जितका लवकर तितकी उपाययोजना लवकर होते, रुग्णाच्या वागण्यामधील बदल आजारामुळे आहेत, मुद्दाम केलेले नाहीत हे स्वीकारायला हवं, आजाराची माहिती घ्या. त्यानुसार जबाबदारीचे नियोजन करा, कुटुंबातील सर्वानी मिळून जबाबदारी घ्यायला हवी. या विषयावर काम करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमांमध्ये विश्वासाने सहभागी व्हायला हवे. रुग्णाचे स्वावलंबन टिकवा, त्याला उद्योगात ठेवा. रुटीन पाळायला हवे. या आजारात अवैद्यकीय प्रोफेशनल्सची फार मोठी मदत होते. उदाहरणार्थ, सोशल वर्कर, समुपदेशक, ती घ्या.

यावर उपाय आहे?

डिमेंशिया हे एक न उलगडणारे कोडे असले तरी संशोधनातून आजार कसा टाळावा याचा अंदाज येऊ लागला आहे. ‘लॅन्सेट’ नावाच्या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याबरोबर व्यायाम, सामाजिक जीवनातील सहभाग, धूम्रपान टाळणे, मधुमेह असल्यास साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, नीट ऐकू येत नसल्यास त्याबद्दल योग्य ते उपाय करणे, नैराश्याला दूर ठेवणे, वजन कमी ठेवणे, यामधून डिमेंशियाच्या एकतृतीयांश संख्येला आळा घालता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी प्रकट केला आहे.

सपोर्ट ग्रुप

मेमरी क्लिनिकच्या जोडीने सपोर्ट ग्रुपही काळजीवाहकांसाठी महत्त्वाचे आधारस्थान ठरतो. प्रदीर्घ आजारात काळजी घेताना काळजीवाहक एकाकी पडताना दिसतात. नातलग आणि इतरांशी आजाराबाबत कसे आणि काय बोलावे याबद्दल साशंकता निर्माण होते. सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेणे अशक्य होत जाते आणि काळजीवाहक मानसिक आणि शारीरिक ताणाखाली गुदमरून जाण्यासारखी परिस्थिती अनेकदा दिसते. सपोर्ट ग्रुप त्याचे दुसरे कुटुंब होते.

मेमरी क्लब

मेमरी क्लब हीसुद्धा एक अनोखी संकल्पना आहे. डिमेंशियाच्या रुग्णांबरोबर काम करता करता तो टाळण्यासाठी आपण काय करू शकतो या विचारातून मेमरी क्लबची कल्पना समोर आली. मेमरी क्लब म्हणजे एक असे ठिकाण जिथे मेंदू सक्षम ठेवण्यासाठी प्रचलित माहितीनुसार सजगपणाने प्रयत्न केले जातात. स्मरणशक्तीची धार बोथट झालेली जाणवणाऱ्या सर्वासाठी हा उपक्रम आहे. स्मरणशक्तीला तल्लख ठेवण्यासाठी अनेक गोष्टी क्लबमध्ये अंतर्भूत केल्या जातात. मुख्य म्हणजे यी सगळ्या गोष्टी हसतखेळत, मनोरंजनातून होतात त्यामुळे मनाचा ताणही कमी होण्यास मदत होते. इथे येणारे सभासद म्हणतात की, ‘‘अनेक वेळेला क्लबमध्ये केलेल्या गोष्टी मनात घोळवतच आम्ही घरी येतो त्यामुळे पुढचे चार दिवस न सुटलेल्या कोडय़ांची उत्तरे किंवा दिलेले शब्द आठवण्याचे विचार मनात रेंगाळत असतात. नको असलेले विचार मनातून हद्दपार करण्यासाठी याचा फार फायदा होतो.’’ असे दोन क्लब एक पुण्यात आणि एक नाशिकमध्ये सध्या चालू आहेत. दर वेळेला नवीन आव्हानांमधून आपले नावीन्य जपत या क्लबनी आता तीन-चार वर्षे सभासदांना तल्लख ठेवण्याचे उद्दिष्ट चालू ठेवले आहे.

त्यामुळे समस्या आहे म्हणून निराश न होता त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मेमरी क्लिनिक www.alzsupportpune.org

आजकाल तरुणांमधील स्मरणशक्तीचे प्रश्न वाढत चालले आहेत. एकदा सकाळीच एका मुलीचा फोन आला. सहसा फोन घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींबद्दल असतो. चौकशी केल्यावर म्हणाली, ‘‘मला माझ्यासाठीच भेटायचे आहे.’’ भेटीत असे कळले की तिची स्मरणशक्ती मुळातच चांगली नसली तरी सध्या प्रश्न वाढल्यासारखे वाटत होते. तात्पुरत्या स्मरणशक्तीवर परिणाम, रस्ते लक्षात न राहणे, कामावर याद्यांचा वापर वाढल्याच्या गोष्टींचा तिने उल्लेख केला. माझ्याकडे येताना गुगलवर बघूनदेखील रस्ता लक्षात राहिला नव्हता. यावरून, विस्मरणाच्या समस्येचा प्रारंभ ऐन तरुण वयातच होताना दिसतो आहे आणि ती चिंतेची बाब आहे. तरुण व्यक्ती जेव्हा स्मरणशक्तीचे प्रश्न घेऊन येते तेव्हा बहुतेक वेळा त्याचा संबंध वाढत्या ताणाशी, अपुऱ्या झोपेशी, दगदगीशी असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे जे विविध प्रश्न समोर येत आहेत त्यातील हा एक प्रश्न आहे.

mangal.joglekar@gmail.com

chaturang@expressindia.com