23 February 2019

News Flash

आनंदाचा शोध

फक्त त्याचा तो आनंद मिळवण्याचा मार्ग चुकलेला आहे, असे आपण म्हणतो.

‘‘माणसांचे प्रकार काय किंवा त्यांच्या कर्माचे – धडपडीचे प्रकार काय आणि त्यामागे असलेल्या हेतूंचे प्रकार काय – ते सारे अगणित दिसले, तरी त्याचे एकच एक समान सूत्र, समान उद्दिष्ट – समान हेतू आहे आणि तो म्हणजे आनंद मिळवणे! कधी त्याला माणूस सुख म्हणेल, कधी समाधान म्हणेल, कधी त्यासाठी वाईट गोष्टींचा अवलंबही नकळतपणे करेल, या साऱ्या धडपडीमागे त्याला हवा असतो तो म्हणजे आनंद!’’ मानवी स्वभावाच्या उभ्याआडव्या वृत्ती-प्रवृत्तीचे प्रांजळ कथन दर पंधरवडय़ाने.

साताऱ्यातील सुहास पेठे ऊर्फ पेठेकाका. ज्ञानेश्वर महाराजांपासून अलीकडच्या जे. कृष्णमूर्तीपर्यंत विविध धर्माच्या, पंथांच्या उपासनेचे सार स्वत: आचरून सामान्य साधकांना सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न काकांनी केला. लौकिक अर्थाने काका एक सामान्य प्रापंचिक असून प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा याचे ते स्वत:च एक उत्तम उदाहरण आहेत.  पेठेकाकांनी सुमारे पन्नास पुस्तकं लिहिली असून जगण्यासाठीचं आत्मिक समाधान कसं मिळवाल हाच त्यांच्या लेखनाचा मुख्य गाभा असतो.

माणसाची अखंड धडपड चालू असते. जगाच्या पाठीवर कुठेही जा, ही धडपड अविरतपणे सुरू असलेली आपल्याला दिसून येईल. नाइलाज म्हणून म्हणा किंवा क्षणभरासाठी विसावा म्हणून म्हणा, जरा तास-दोन तासांसाठी स्वस्थ बसलेला माणूस जरी आपल्याला आढळला, तरी त्या तास-दोन तासांतसुद्धा तो मनाने स्वस्थ बसलेला आढळणार नाही. बसल्या जागीसुद्धा तो काय काय घडले, कसकसे घडले, पुढे काय काय करायचे याचे नियोजन मनाने करीत बसलेला दिसेल- एकूण त्याच्या धडपडीला तसा विसावा नाही.

बरे, यात मोठमोठी माणसे व्यापात असावी हे पटते, पण अगदी सर्वसामान्य माणूस तरी स्वस्थ असावा! तर तसेही आढळणार नाही. मोठे आपापल्या परीने व्यापात असतील तर, तोही आपल्या परीने या धडपडीत आहे, असे दिसेल. बरे मोठय़ा माणसांना म्हणजे सगळ्याच मोठय़ा माणसांना – गरीब किंवा श्रीमंत – सगळ्यांना धडपड आणि व्याप असतात, पण लहानसहान मुलाबाळांना ते असायचे काय कारण? पण तीही रिकामी नाहीत. तीही आपापल्या परीने सतत धडपडत आहेत, कामात आहेत.

इतक्या पातळीवर ही धडपड आढळते आहे, तर तिच्यात स्वाभाविकपणे खूप प्रकार आढळणार. तसे ते दिसतातही. शाळकरी मुलांच्या शाळा- अभ्यास- खेळ- छंद- शिकवण्या असतील, तर मोठय़ांच्या बाबतीत नोकरीसाठी धडपडी- अर्ज- विनंत्या- मुलाखती- तयारी- परीक्षा- स्पर्धा अशा अनेक बाबी. इतर मोठय़ांच्या बाबतीत उद्योग- व्यवसाय- शेती- त्यातल्या रोजच्या उलाढाली- संपर्क- हेवेदावे- व्यक्तिगत प्रपंच- लग्न- मुलेबाळे- सामाजिक कार्य- संस्था- राजकारण- सैन्य- युद्ध- डावपेच- या यादीला अंतच नाही.  पण यावरून असे वाटते की, या साऱ्या धडपडीमागचे हेतूसुद्धा किती वेगवेगळे असतील! अभ्यासामागे नंबर मिळवणे, पास होणे, नोकरी, उद्योगात तज्ज्ञता मिळवणे, कौशल्य मिळवणे, पैसा मिळवणे, घर बांधण्यात हक्काच्या, सत्तेच्या घरात राहायला मिळणे, सत्ता मिळवण्यात मानमान्यता मिळणे, परिस्थितीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करणे- असे हेतूसुद्धा किती तरी प्रकारचे असल्याचे दिसेल! पण या साऱ्यामागे विचार करण्यासाठी आश्चर्याची एकच गोष्ट आढळेल आणि ती म्हणजे माणसांचे प्रकार काय किंवा त्यांच्या कर्माचे – धडपडीचे प्रकार काय आणि त्यामागे असलेल्या हेतूंचे प्रकार काय – ते सारे अगणित दिसले, तरी त्याचे एकच एक समान सूत्र, समान उद्दिष्ट – समान हेतू आहे आणि तो म्हणजे आनंद मिळवणे! कधी त्याला माणूस सुख म्हणेल, कधी समाधान म्हणेल! पण या साऱ्या धडपडीमागे त्याला हवा असतो तो म्हणजे आनंद!

अर्थात वरवर पाहिले तर, व्यवसाय करणारा किंवा नोकरी करणारा माणूस ती करतो, ती त्यातून मिळणाऱ्या फायद्यासाठी किंवा पगारासाठी करतो, असे दिसते. शेतकरी एवढे कष्ट करतो, उन्हातान्हात राबतो तो, ते – ते पीक मिळावे, तेही चांगल्या दर्जाचे, भरपूर मिळावे – यासाठी! एखादा डॉक्टर वेळअवेळ न पाहाता कष्ट करतो आहे तो रुग्ण बरा व्हावा, त्याचा आजार दूर व्हावा – यासाठी असे दिसते खरे! त्यांची प्रत्येकाची उद्दिष्टे वेगवेगळी दिसतात; पण विचार केला तर लक्षात येईल की, उद्दिष्ट हे फायदा, पगार, पीक असे काहीही असो, जर तेच उद्दिष्ट हे आपले खरे आणि अंतिम उद्दिष्ट असेल तर ते उद्दिष्ट पूर्ण झाले की, आपण थांबले पाहिजे! हातात पगार पडला किंवा पीक आले की, ते घेऊन थांबले पाहिजे; पण तसे होत नाही. त्या नोटांचा किंवा धान्याचा तसा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. त्या नोटा देऊन तो बाजारातून धान्य आणील, ते दळून-कांडून शिजवून खाईल. बरे, ते खायला मिळावे यासाठी त्याने नोकरी केली म्हणावे, तर निदान ते तरी त्याचे अंतिम उद्दिष्ट ठरेल, पण तसेही घडत नाही. ते खाल्ल्यावरसुद्धा त्याला त्याचा अखेर आनंद व्हायला हवा असतो नाही का? कारण जर हेच खाणे आनंदाचे ठरत नसेल, तर तो माणूस ते अन्न न खायलाही तयार होतो ना? तो उपाशी राहायलाही तयार होतो. मग खाणे हेसुद्धा अंतिम ध्येय म्हणता येत नाही. यावरून एक महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येईल की, अनंत माणसे आणि त्यांचे जगण्याचे अनंत प्रकार दिसले तरी ‘आनंद मिळवणे किंवा आनंदाचा शोध घेणे’ हे त्यांचे एकमेव आणि निदान प्रधान तरी उद्दिष्ट आहे! हे किती लागू आहे पाहा! या आनंदासाठी माणूस इतक्या खटपटी – लटपटी करतो आहे, हे तर दिसतेच. त्यात तो सारी चांगली कृत्ये आनंदासाठी करतोच, पण वेळी निषिद्ध – वाईट कृत्येसुद्धा तो कुठे तरी याच आनंदाच्या ओढीपोटी करतो आहे, असे लक्षात येईल. माणूस जेवतो-खातो ते आनंदासाठी हे आता लक्षात येते आणि पटतेही, पण तो खोटे बोलतो, व्यसने करतो तेसुद्धा मुळात या आनंदाच्या प्राप्तीसाठी, हेही आपल्या लक्षात येईल. जेवण सुखाचे होत नसेल तर माणूस उपाशी राहायला तयार आहे, फक्त ते तरी आनंदाचे व्हावे, ही त्याची ओढ आहे. तीच गोष्ट वाईट करण्याची किंवा खाण्याची आहे. चांगले – शुद्ध खाण्यापेक्षा वाईट खाण्याने, वाईट बोलण्याने आनंद अधिक मिळेल असे त्याला वाटते. म्हणून तो ते करायला तयार आहे.

समजा, त्याला त्या वाईट खाण्याने, बोलण्याने दु:ख होत आहे, हे कळले किंवा त्यापेक्षा शुद्ध, चांगले खाण्या-बोलण्यानं अधिक आनंद होतो आहे असे आढळले, तर तो चांगले खायला, बोलायला तयार होईल, यात नवल नाही, कारण मुळात त्याचा उद्देश आनंद मिळवणे – हा आहे. ती विशिष्ट गोष्ट करणे हा नाही! अर्थात यावरून वाईट गोष्ट करणे हे जरी समर्थनीय ठरत नसले, तरी आपल्या कृतींच्या मागची मूळ प्रेरणा आनंदाचा शोध घेण्याचीच आहे.

यावरून आणखीही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येऊ शकेल. तो म्हणजे एखादे व्यसन करणाऱ्याचे मूळ प्रेम, हे त्या आनंदावरच आहे. फक्त त्याचा तो आनंद मिळवण्याचा मार्ग चुकलेला आहे, असे आपण म्हणतो. म्हणजेच असे की, व्यसन करताना जरी त्याला आनंद मिळाल्यासारखे वाटले, तरी पुढे तोच आनंद अनेक दु:खांना आमंत्रण देणारा ठरतो, असे आपल्याला आढळते. त्यातही जो आनंद या क्षणी मिळाल्यासारखा वाटतो तो तरी कितपत खरा आहे? टिकाऊ आहे? कारण एखाद्या कुत्र्यालासुद्धा कठीण, टोचणारा हाडकाचा तुकडा चघळताना आनंद मिळाल्यासारखा वाटतो आहे, असे आपण पाहतो; पण आपण हे थोडे ओळखून असतो की, त्याला यातून खरे काहीच मिळत नाहीये. त्या हाडकातही काही नाहीये. भ्रम असा आहे की, यातून काही मिळते आहे, पोट भरते आहे, आनंद होतो आहे! पण हे कुणाला? ज्याला हा सारा भ्रमाचा घोटाळा आहे, हे कळते त्याला!

यावरून हाही एक मुद्दा आपल्या ध्यानी येऊ शकतो की, स्वत:च्या बाबतीत काय किंवा जगाच्या बाबतीत काय, जितके जितके आपल्याला कळत जाईल तितके तितके आपण खोटय़ा आनंदाकडून खऱ्या आनंदाकडं जाऊ शकू. म्हणजे आपल्या लक्षात येईल की, शोध आनंदाचाच असला तरी त्यातसुद्धा आनंदाचे तीन तरी प्रकार अगदी सहज दिसून येत आहेत. एक फसवा आहे, खोटा आहे, आनंदाचे मायावी रूप आहे, भ्रमाचा आहे. दुसरा आनंदच आहे, पण क्षणिक आहे, वरवरचा आहे, इंद्रियांपुरता आहे, न टिकणारा आहे आणि तिसरा आहे तो इंद्रियांपलीकडे आहे, शाश्वत आहे. परिस्थितीत किंवा कशातही काहीही बदल झाला तरीही न बिघडणारा, न संपणारा असा आहे.

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

First Published on January 14, 2017 2:01 am

Web Title: article on human behavior