‘‘भीमसेन जोशी यांच्या आमंत्रणावरून सवाई गंधर्व महोत्सवासाठी मी पहिल्यांदा महाराष्ट्रात आले होते. भीमसेनजींनी स्वत: वत्सलाबाईंचा तानपुरा घरून मागवला, सुरात लावून दिला आणि मी मनसोक्त गायले. पुढच्या वर्षी पंडितजी म्हणाले, ‘तू एखादे मराठी गाणे गा.’ त्यांच्या विनंतीवरून कवी गंगाधर महांबरे यांनी ‘रसिका, तुझ्याचसाठी मी एक गीत गाते’ लिहिलं. राम फाटक यांनी चाल बांधली. आसाममधून आलेल्या माझ्यासाठी एक खास कडवं लिहिलं होतं, ‘आले दुरूनी येथे घेऊन सूर कंठी, जणू विठ्ठलाघरी ये दिंडीच वाळवंटी, रसिकात देव माझा, दिनरात मी पहाते.’ आज माझ्या मनात याच भावना आहेत..’’

वळणवाटा पद्मभूषण परवीन सुलताना राष्ट्रपती भवन. भारतातले दिग्गज तिथे जमले आहेत. अत्यंत धीरगंभीर वातावरण. त्या वातावरणाची एक वेगळीच शान आहे. नावाची उद्घोषणा होते. ते माझंच नाव असतं. भारताचे राष्ट्रपती

प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मला ‘पद्मभूषण’ प्रदान होतं. त्यांच्या समोर झुकताना मनात दाटत होतं की अवघ्या भारतवर्षांसमोर मी झुकते आहे. एक एक पाऊल उचलताना आठवत होतं आसामातलं नवगाव, अवतीभवतीची वनराई, डोंगर, चहाचे मळे, डोळ्यात फक्त संगीताचीच स्वप्नं तरळणारे अब्बाहुजूर आणि अम्मी, माझी भावंडं, गुरू संगीताचार्य चिन्मय लाहिरी आणि माझे जीवनसाथी उस्ताद दिलशादखाँसाहेब!

आसाममधल्या छोटय़ाशा नवगावातली मी. कालपरवा तेथे खेळत होते. आणि आज थेट इथं! अचंबितच झाले. पण खरं तर ते माझ्या भाग्यातच लिहिलेलं होतं. माझा जन्म, संगीतावरील निस्सीम प्रेमानं भारलेल्या जनाब इकरामुल माजिद आणि मारुफा माजिद यांच्याच पोटी का व्हावा? हा दैवी संकेत होता. आम्ही मूळचे अफगाणिस्तानचे. आयुष्यानं आमच्या पूर्वजांना आसाममध्ये आणलं. माझ्या दादाजींचा-जनाब मोहंमद नजीबसाब यांचा लाकडाचा आणि हस्तिदंताचा व्यापार होता. मोठमोठय़ा संस्थानिकांना ते हत्ती आणि हस्तिदंत पुरवत. ते उत्कृष्ट बासरी वाजवत. रूद आणि रुवाब ही अफगाण वाद्यं ते सुंदर वाजवत. त्यांच्या हृदयात संगीत होतं. माझे अब्बाजी ही त्यांची एकुलती एक संतान. संगीताचं वेड त्यांच्यातही पाझरलं होतं. आपल्या मुलावर उत्तमोत्तम संस्कार व्हावेत ही त्यांची धारणा होती. म्हणून दादाजींनी अब्बाजींना कोलकत्याला उच्च शिक्षणासाठी पाठवलं. पदवीबरोबरच त्यांना शास्त्रीय संगीताचं नवं दालन गवसलं. त्यावेळी कोलकता म्हणजे शास्त्रीय संगीताची मक्काच होती. अमानत खाँसाहेब, अमानअली खाँसाहेब, गुल महंमद खाँसाहेब यांच्याबरोबरीने तारुण्याच्या ऐन बहरात असणारे आमीर खाँसाहेब आणि बडे गुलामअली खाँसाहेब! एकेक व्यक्ती म्हणजे संगीताचं विद्यापीठ. त्याकाळात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरही शास्त्रीय संगीत शिकत होते. सारं अद्भुत वातावरण! या वातावरणाचा अब्बाजींवर योग्य तो परिणाम झाला. ते गुल मोहंमद खांसाहेबांचे शागीर्द झाले. सोळा वर्षे ते कोलकत्यात होते. अब्बाजी सैन्यात होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला होता, आणि इथं दादाजींचं वय होत होतं. त्यांनी अब्बाजींना नवगावला परत बोलावलं. अब्बाजी वडिलांच्या इच्छेनुसार नवगावला परतले. पण व्यवसायात त्यांचं मन रमेना. दादाजींनी त्यांना हवं ते करण्याची मुभा दिली आणि आसामातली शास्त्रीय संगीताची परंपरा नव्याने घडण्यास सुरुवात झाली.

गौहाती रेडिओ स्टेशनची सुरुवात अब्बाजींच्या गाण्यानं झाली. त्यांना रेडिओनं ऑडिशन न घेता थेट गायला बोलावलं होतं. अब्बाजींवर रेडिओ सेंटरच्या संगीत विभागाच्या समन्वयाची अनौपचारिक जबाबदारी आली. ती त्यांनी लीलया पेलली. आवडीची गोष्ट होती ती. त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसाराचं आव्हान स्वीकारलं. ते गावागावांत, घराघरांत जात. तेथे कोणी प्रतिभावंत गायक, वादक, कलाकार आहे का ते शोधत आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देत. आमच्या घरात ते दर शनिवारी गाण्याची बैठक आयोजित करत. त्या वेळी ते रेकॉर्ड प्लेअरवर एखाद्या मान्यवर गायकाचं गाणं ऐकवत, त्यातील राग कोणता, त्याचे आरोह – अवरोह काय आहेत आदी गोष्टी समजावून सांगत आणि नंतर ते स्वत: गाऊन दाखवत. प्रारंभी जेमतेम १५-२० जण होते, नंतर ती संख्या ३०० पेक्षा अधिक झाली. अब्बाजींनी मग नवगावासोबत गोहाती, शिलाँग, दिब्रुगड आदी ठिकाणी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले आणि यानंतर त्यांनी ‘ऑल आसाम संगीत परिषद’ भरवायला सुरुवात केली. त्यांच्या एका शब्दावर अमानत खाँसाहेब, अमानअली खाँसाहेब, गुल महंमद खाँ साहेब, आमीर खाँसाहेब, बडे गुलामअली खाँसाहेब, काननसाहेब, व्ही. जी. जोग, पं. रविशंकर असे भारतातले नामी कलावंत येत असत. त्यांच्या मैफिली आमच्याही घरी होत असत. अशा संगीतसमृद्ध वातावरणातल्या घरात माझा जन्म झाला.

माझी अम्मी मारुफाबेगम ही इराणी होती. अत्यंत देखणी. मधुर आवाजाची आणि अल्लावर श्रद्धा असणारी. अम्मी माझ्या वेळी जेव्हा गरोदर होती, तेव्हा अब्बाजींनी तिला उत्तमोत्तम शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्डस ऐकवल्या. ते स्वत: तिच्याजवळ बसून गात असत. (माझ्या लेकीच्या जन्माच्या पूर्वीही दिलशाद खाँसाहेबांनी माझी अशीच काळजी घेतली.) अम्मीची श्रद्धा आलम फकीर यांच्यावर होती. ती त्यांची पदे आर्ततेने गाई. २४ मे १९५० रोजी बुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळी चंद्र उगवल्यावर मिनिटभराने माझा जन्म झाला. मी बुद्धांना मानते. माझा जन्म झाला त्या जागेचं नाव होतं, पुरानी गुदाम. धान्याचा संचय करण्याची जागा. त्या जागी संगीताचा संचय करण्याचं जणू बाळकडू मला मिळालं. अब्बाजींच्या पाच मुलांतली मी सर्वात मोठी. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. ते दररोज मला कडेवर घेऊन थोपटत थोपटत अंगाई गीत गायचे. ती सवय एवढी लागली की त्याशिवाय मी निजत नसे.

मी दोन-अडीच वर्षांची असेन. अब्बाजी संगीताच्या खोलीत बसून कुठलीशी धून बांधत होते. कुणीतरी बोलवलं म्हणून ते उठले. मी हळूच त्यांच्या हार्मोनिअमजवळ गेले, भाता हलवता येईना तेव्हा हार्मोनिअमवर बसून भाता हलवू लागले व अब्बाजींसारखं गायचा प्रयत्न करू लागले. ही सारी धडपड अब्बाजी दाराआडून पहात होते. ते माझ्याजवळ आले व म्हणाले, ‘आपको इसे बजाना है? आप गाओगी?’ मी मान हलवली. ते हसले. पुढे दोन-अडीच वर्षांनी माझा कल पाहून अब्बाजींनी मला एक आवर्तन गाऊन दाखवलं व तसंच म्हणायला सांगितलं. मी जसंच्या तसं गायले, बहुधा माझ्या आवाजाचा पोत ऐकून ते स्तिमित झाले. त्यांनी अम्मीला बोलावलं व माझ्याबद्दल सांगितलं. त्यांनी खूप चर्चा केली व मला गाणं शिकवण्याचा निर्णय घेतला. त्या काळात तो एक क्रांतिकारक निर्णय असावा. अब्बाजींनी एक अंतरा बनवला व माझ्याकडून गाऊन घेतला. त्यांनी लगेच मला गाणं शिकवण्याचा निर्णय घेतला. ‘चल उद्यापासून तुला गाणं शिकवतो.’ आजही मला ते क्षण आठवताहेत. भल्या पहाटे चार वाजता अब्बाजींनी मला उठवलं. सारं आवरून मी दूध पिऊन त्यांच्यासमोर बसले व त्यांनी मला ‘सा रे ग म’ शिकवलं.

आजही माझा दिवस पहाटे चार वाजताच सुरू होतो. रात्री मैफलीहून आल्यावर दोन वाजता झोपले तरी शरीराचं घडय़ाळ व अब्बाजींची शिकवण चार वाजता उठवतेच. रियाज महत्त्वाचा. त्या दिवसानंतर आमच्या घरातलं मैफलींचं प्रमाण लक्षणीय वाढलं. माझ्या गळ्यातलं सप्तसुरांचं अस्तित्व अधिक व्यापक व्हायला लागलं.

गाण्याबरोबरच अब्बा-अम्मीनं कुटुंब संस्कारही दिला. आम्ही घरातली सर्व मंडळी, कशीही रोटी असो वा गूळ, ती खायला एकत्रच जेवायला बसत असू. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची सवय जडली. आमच्या आहारात कस्तुरी हळद आणि गूळ असेच. त्यामुळे त्वचा निरोगी राहते. आजही मी फारसं कोणतंही सौंदर्यप्रसाधन लावत नाही. आसामच्या मातीचा तो वारसा आहे.

तर पाच वर्षांची असताना माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं. माझी तयारी पाहून शिकवता शिकवता एक दिवस अब्बाजी म्हणाले, ‘तुला शिकवायला मी पुरेसा ठरणार नाही. आपण कोलकत्याला जाऊ.’ तिथे आम्ही संगीताचार्य

पं. चिन्मय लाहिरी यांच्याकडे गेलो. गुरुवर्य लाहिरी म्हणजे परमात्म्याचं रूप. मूळच्या लखनौच्या लाहिरींचे सात-आठ गुरू होते. त्यामुळे वेगवेगळी घराणी त्यांच्यात संमिलित झाली होती. ते विद्वान तर होतेच, पण त्याबरोबर ते सादरीकरणाची तंत्रे अवगत असणारेही होते. त्या दिवशी माझ्या सांगीतिक जीवनाला एक निर्णायक वळण मिळालं. दर शुक्रवारी आमच्या अमेरिकन मिशनरी गर्ल्स स्कूलमधून खास परवानगी मिळवून, मला घेऊन अब्बाजी विमानाने गोहातीहून कोलकत्त्याला जायचे. जुनी विमानं, कावळ्यासारखी उडायची. मी उलटय़ा करून हैराण व्हायचे. मग संध्याकाळी विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मी गुरुवर्याकडे जायचे. दोन दिवस त्यांच्याकडे राहून शिकायचे. त्यांना मुलगी नव्हती, त्यांनी मलाच मुलगी मानले होते. तेव्हा नुकताच फिलिप्स कंपनीचा टेप रेकॉर्डर आला होता. अब्बाजी, गुरुजींचं शिकवणं रेकॉर्ड करून घ्यायचे व पुढच्या शुक्रवापर्यंत मी ते ऐकत राहायचे. तेव्हापासून मी एकही क्षण वाया घालवायचा नाही हे शिकले. देवानं एवढं सुंदर आयुष्य का दिलंय? वाया घालवण्यासाठी?

गुरुजींनी मला वयाच्या बाराव्या वर्षी, १९६२ साली सदारंग संमेलनात गाण्याची आज्ञा केली, आणि मी गायले. समोर कोण बसलंय वगैरे काही माहिती नव्हतं. फक्त गायचं! अब्बाजी म्हणायचे, ‘परवीन, समोर कोण बसलंय ते पाहू नकोस, तू गा, स्वत:साठी गा. आपोआप सारे तुझ्यासोबत येतील.’ त्या दिवशी पं. रविशंकर, अनोखेलालजी, हनुमानप्रसादजी, फतेह अलीखाँसाहेब असे बुजुर्ग होते. मला काय माहीत? मी जमून गायले. तो संगीत विश्वातला एक ‘धमाका’ ठरला. नंतर सर्व आशीर्वाद द्यायला आले, तेव्हा गुरुजी व अब्बा सांगतील त्याप्रमाणे नमस्कार करत गेले. त्यावेळी झुनझुनवाला नावाचे एक सज्जन होते, त्यांनी मला सुवर्णपदक प्रदान केले. ते मी अद्याप जपून ठेवलं आहे.

गुरुजींनी मला जेमतेम आठ वर्ष शिकवलं. पण त्यांनी जी दृष्टी दिली ती जन्मभर पुरलीय. ते आजारी पडू लागले. तेव्हा मला कोणाकडे सोपवायचे असा प्रश्न पडला. गुरुजींनी दिलशादचं नाव सुचवलं. एक दिवस आम्ही गुरुजींच्या घरी भेटलो. गुरुजींनी दिलशादना माझं गुरुत्व घ्यायला सांगितलं. ते म्हणाले, ‘ती आधीच नावलौकिक मिळवून आहे, तिला मी काय शिकवणार.’ पण गुरुजींच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत. पुढे गुरुजींच्या निधनानंतर, त्यांनी मला शिष्या म्हणून स्वीकारलं. गुरुजींच्या आशीर्वादाने माझ्या देशभरात मैफिली होऊ  लागल्या.

तत्पूर्वीची एक आठवण सांगते, मी तेरा वर्षांची असताना मला घेऊन अब्बाजी रेडिओ संगीत स्पर्धेसाठी गेले. तिथे फॉर्म भरताना मी वय तेरा वर्षे लिहिलं. तर मला त्यात भाग घेण्यापासून थांबवलं गेलं, कारण ती स्पर्धा १८ वर्षांपुढील लोकांसाठी असते. अब्बाजी हिरमुसले, माझाही हिरमोड झाला. तेवढय़ात, माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला. त्या व्यक्तीनं मला विचारलं, ‘एवढीशी चिमुरडी तू. तू गाणार?’ तिथे साबीर खाँसाहेब साथीला आले होते. ते म्हणाले, ‘जबरदस्त गाते.’ ती व्यक्ती आम्हाला घेऊन कार्यालयात गेली, अब्बाजींना म्हणाली, ‘तुम्ही मला २५ रुपये खर्च करून एक दस्तैवज करून द्या, मी बाकी सांभाळतो.’ मी गायले. त्या व्यक्तीने सांगितलं, ‘मी पळवाट काढली याचा मला पश्चात्ताप कधीही होणार नाही. याची खात्री आहे.’ त्या मान्यवर व्यक्तीनं नंतर अनेक कार्यक्रमांत माझी ओळख करून दिली. ते होते महान लेखक कमलेश्वर!

अश्विनीकुमार हे आय. पी. एस. अधिकारी होते. त्यांनी मला जालंधरला बोलावलं. मग मी तिथे नियमितपणे गाऊ  लागले. अशाच एका मैफिलीत

पं. भीमसेन जोशीजींनी माझं गाणं ऐकलं. ते अब्बाजींना म्हणाले, ‘‘आजपासून मी हिला माझी बहीण मानलंय, हिला सवाई गंधर्व महोत्सवात गाऊ  द्या.’’  १९६९च्या महोत्सवात मी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले. भीमसेनजींनी स्वत: वत्सलाबाईंचा तानपुरा घरून मागवला, ग्रीनरूममध्ये तो त्यांनी स्वत: लावून दिला, मला स्टेजवर घेऊन आले, त्यांनी पुन्हा एकदा तानपुरा सुरात लावून दिला आणि मी मनसोक्त गायले. त्यांची ही उदार कृती कायम लक्षात राहिली. पुढच्या वर्षी मी गायला आले तर पंडितजी म्हणाले, ‘‘तू एखादं मराठी गाणे गा.’’ त्यांच्या विनंतीवरून कवी गंगाधर महांबरे यांनी ‘रसिका, तुझ्याचसाठी मी एक गीत गाते’ लिहिलं. राम फाटक यांनी चाल बांधली. त्यांनी आसामातून आलेल्या माझ्यासाठी एक खास कडवं लिहिलं होतं, ‘आले दुरूनी येथे घेऊन सूर कंठी, जणू विठ्ठलाघरी ये दिंडीच वाळवंटी, रसिकात देव माझा, दिनरात मी पहाते.’’ आज माझ्या मनात याच भावना आहेत.

पुण्यातून मला मुंबईत गाण्यासाठी कमल सिंगजींनी बोलावलं. तीही मैफल गाजली. त्यावेळी ‘फेमिना’च्या संपादिका विमला पाटील यांची भेट झाली. त्यांनी माझी व उस्ताद झाकीर हुसेनची मैफल आयोजित केली. झाकीर माझ्यापेक्षा थोडा लहान, पण आम्ही समवयस्क. अल्लारखाँसाहेबांच्या मुळे आम्ही एकमेकांना छान ओळखत होतो. आमची धमाल चालायची. चेष्टामस्करी वगैरे! ती आम्हा उभयतांची पहिली मैफिल. त्याचं नाव खूप मोठं झालं होतं. सोलो कार्यक्रमांबरोबरच विविध वादकांनाही त्यानं साथ केली होती. पण एखाद्या गायकाबरोबर वाजवण्याचा तो पहिलाच प्रसंग. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या वेळी, ‘मी सुरुवातीला एक राग गाईन व मग ठुमरी गाईन.’ असं म्हणाले. तो पटकन म्हणाला, ‘मी ठुमरीसाठी लागणारा दीपचंदी कधी वाजवला नाहिये.’ मग आम्ही भजन गायचं ठरवलं. अशी आमची दोस्ती. अल्लारखाँसाहेबांसारखाच तो हळुवार आणि अत्यंत प्रेमळ व नम्र. अल्लारखाँसाहेबांनी मी तेरा वर्षांची असताना माझ्यासोबत तबला वाजवला होता. मी खूप घाबरले होते, तेव्हा त्यांनी प्रेमानं माझी समजूत काढली व म्हणाले, ‘गा, तू जशी गाशील तसंच मी वाजवेन हं.’ अखेपर्यंत त्यांनी तसाच लोभ माझ्यावर ठेवला. त्यांनी एकदा त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ ‘रंगभवन’मध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी मी व दिलशादखाँसाहेब गायलो. कार्यक्रम झाल्यानंतर, त्यांनी मला जवळ घेतलं. आशीर्वाद दिला व म्हणाले, ‘आजवर तू माझ्याकडे काही मागितलं नाहीस. पण मी आज जे देतो, ते घे.’ त्यांनी मला त्या काळात साडेतीन लाख रुपयांची थैली दिली. ती थैली त्यांचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवलीय.

त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका थोर माणसाची भेट झाली- सोली बाटलीवाला यांची. त्यांची व अब्बाजींची घट्ट मैत्री झाली. ते अब्बाजींना म्हणाले, ‘हिला मुंबईत आणा. मी हिचा इथला पालक होतो. सीझनमध्ये परवीन इथे राहील.’ आणि मी नोव्हेंबर ते मार्च मुंबईत राहू लागले. एकदा आकाशवाणीवर मी व अब्बाजींनी दिलशादखान यांनी गायलेला मारवा ऐकला. आमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. गुरुजी हयात नव्हते. पण त्यांनी सुचवलेला दिलशाद ध्यानात होता. त्यांचं शिष्यत्व घ्यायचं होतं त्यानुसार आमची एक मैत्रीण अनिमा रॉय हिच्या घरी आम्ही दिलशादना भेटलो. ती त्यांच्याकडे शिकत होती. नंतर काही दिवस मी अनिमाच्या घरी तिची शिकवणी ऐकायला जात होते. एक दिवस मी मनाचा हिय्या करून दिलशादना मला शिष्य करून घेण्याची गुरुजींच्या विनंतीची आठवण करून दिली आणि ती त्यांनी मान्य केली. माझं जीवन पुन्हा एकदा बदललं. ते अत्यंत देखणे होते, उंचेपुरे होते; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते संगीताचे तत्त्वचिंतक व अभ्यासक आहेत. त्यांनी संगीताकडे पाहण्याची एक मर्मदृष्टी मला दिली. ते म्हणतात, ‘नमाज आणि रियाज दोन्ही महत्त्वाचे. दोन्हीमधून आपण अल्लाची इबादत करतो. आपण त्याचेच तर सेवक आहोत. आपण सतत परिपूर्णतेकडे जाण्याचा ध्यास घेतला पाहिजे, कोणीही परिपूर्ण होत नाही. तसा फक्त परमेश्वरच असतो.’ ते जीवनसाथी बनून माझ्या आयुष्यात आले आणि दुहेरी लाभ झाला. त्याच वेळी मला भारत सरकारची ‘पद्मश्री’ मिळाली.

मी जेव्हा जेव्हा गायला बसते, तेव्हा तेव्हा ‘त्या’ वरच्याला प्रार्थना करते, त्याला आवाहन करते, आज तुझ्यामुळे मी आहे. ये माझ्या गळ्यात विराजमान हो आणि गा. मला आशीर्वाद दे. मी जेव्हा जेव्हा गाते, तेव्हा मी माझी नसतेच, तो त्यातून प्रकटत असतो, मी त्याची फक्त वाहक असते. प्रत्येक मैफल हे स्वतंत्र आव्हान असतं. असं आव्हान की ज्याच्यामुळे तुमची गुणवत्ता, तुमचं आयुष्य पणाला लागतं. रियाज आणि त्याचा आशीर्वाद यामुळे तुम्ही तरता. गाण्यांमुळे केवढी माणसं जोडली गेली.

मी महाराष्ट्रात आले. शास्त्रीय संगीताचे जाणकार येथे मोठय़ा संख्येने आहेत. विदर्भात मी खूप कार्यक्रम केले. लोक मला पाहायला व ऐकायला यायचे. एवढीशी मुलगी दणदणीत गाणं गाते, ‘भवानी’सारखं पद म्हणते. त्यांना मला भेटायचं असायचं, माझ्या पायावर डोकं ठेवायचं असायचं. मी अचंबित होऊन जाते.

खूप चांगल्या आठवणी आहेत माझ्याकडे. धुळ्यात डॉक्टरांचं संमेलन होतं. माझ्या कार्यक्रमाचा प्रारंभ

पु. ल. देशपांडे यांनी करून दिला. ते काय म्हणत होते ते मला नीट समजत नव्हतं. पण तबल्यावर असणाऱ्या भास्कर तिवसकरांनी डोळ्यातलं पाणी पुसलं. ते नंतर मला म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या संगीताच्या देवानं, खुद्द पुलंनी तुम्हाला सरस्वतीचं रूप म्हटलं. भारतरत्नापेक्षा मोठी दाद मिळाली.’ माझी जबाबदारी खूप वाढली.

नागपुरात कार्यक्रमाची एक आठवण आहे. कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. त्याच वेळी त्याच दिवशी किशोरकुमार यांचाही कार्यक्रम होता. पण त्याची तिकीट विक्री फारशी झाली नव्हती. त्यांना आश्चर्य वाटलं. ते मला शोधत दुपारी तीनच्या सुमारास जिथे आम्ही उतरलो होतो तिथे आले. पण मी नुकतीच हॉलवर गेले होते. गायनाची तयारी करायला मी एवढय़ा आधी गेले, म्हणून त्यांना कौतुक वाटलं. पुढे आम्ही दोघे एकाच विमानानं कोलकत्याला चाललो होतो. (त्यावेळी ‘कुदरत’ चित्रपटातील ‘हमें तुमसे प्यार कितना’ हे माझं गाणं लोकप्रिय झालं होतं.) ते माझ्याजवळ आले, माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ‘छान गातेस, अखेपर्यंत गात राहा. माझा आशीर्वाद आहे तुला.’ आज ते नाहीत, पण त्यांचा आशीर्वाद आहे.

मी  जगभर फिरलेय. पण फ्रान्समध्ये मी दिलशादखाँ साहेबांबरोबर पहिल्यांदा जेव्हा गायले, तेव्हा सारे ऑडिटोरियम उठून उभं राहिलेलं पाहिलं. अब्बाजींचे शब्द आठवले, ‘सातच सूर आहेत, पण ते जगाला बांधून ठेवतात.’ त्यावेळची एक गंमत आठवतेय. फ्रान्समध्ये भारत महोत्सव होता. त्या सरकारच्या वतीने आम्हाला निमंत्रण होतं. त्यावेळी मुंबई विमानतळावर भारतीय दूतावासातून निरोप आला, की बिस्मिल्लाखाँसाहेबांना मला भेटायचं आहे. पॅरिसला उतरल्यावर विमानतळावर खुद्द बिस्मिल्लाखाँ साहेब आलेले. मी धावत त्यांच्याजवळ गेले तर ते म्हणाले, ‘‘बेटी मी इथे बटर रोटी खाऊन खाऊन कंटाळलोय, काहीतरी बनव, मला इथे खायची भीती वाटते.’’ मग लगेच मी माझ्या मैत्रिणीबरोबर जाऊन मटण वगैरे आणलं, शिजवलं, उस्तादजींना दिलं. त्यावेळी तीन तासांत राजदूतांसह ३५ जणांसाठी जेवण बनवलं. राजदूतांनी व बिस्मिल्लाखाँ साहेबांनी हा किस्सा कार्यक्रमात सांगितला. लोकांना खूप आश्चर्य वाटलं. फ्रेंच वर्तमानपत्रांची ती त्या दिवशीची मुख्य बातमी होती. मी म्हटलं, ‘मी भारतीय स्त्री आहे. मला सारं यायलाच हवं.’ मी अत्यंत आनंदानं जेवण बनवते. जेवण बनवताना आवडीच्या रेकॉर्डस लावते. त्यामुळे कदाचित ते अधिक चवदार होत असावं.

मला लता मंगेशकरांची गाणी आवडतात. मदनमोहनचं ‘लग जा गले’ आणि जयदेवचं ‘अल्ला तेरो नाम’ ही माझ्या खास आवडीची गाणी. मी मेंहदी हसन आणि गुलाम अली यांच्या गझला गुणगुणते. माझी एकुलती एक लेक शादाब, ही माझं शास्त्रीय संगीताबरोबरचं सर्वस्व. ती उत्तम गाते, टीव्हीवर ती गायलीय. ती अर्थशास्त्रात पदवीधर आहे, एम.बी.ए. केलंय. तिला अभिनयाची आवड आहे, त्यातच कारकीर्द करायची इच्छा आहे तिला.

आमच्या मुंबईच्या घरात आम्ही तिघंच असतो. पण तिथं असतात आम्हाला मिळालेली पारितोषिकं, स्मृतिचिन्हं! त्यांच्या माध्यमातून जगभरातले रसिक माझ्या घरात विसावले आहेत, असं वाटतं. आमच्या घरात सप्तसुरांचा निवास असतो. त्या सप्तसुरांनी भिंती नादावत असतात. हा नादच जीवनाची ईद असतो, दिवाळीही असतो..

या दिवाळीत, उद्याच आम्ही गोव्यातल्या आमच्या घरी जाणार आहोत, फटाके उडवणार आहोत, मला रांगोळी काढता येत नाही नीटशी, पण उंबरठय़ाबाहेर छापील रांगोळी चिकटवणार आणि पुन्हा एकदा सप्तसुरांच्या सागरात आकंठ न्हायला तयार होणार..

शब्दांकन : प्रा. नितीन आरेकर

nitinarekar@gmail.com