News Flash

अंतिम वास्तवाचं दर्शन

‘ तू स्पष्टपणे वागण्याचा प्रयत्न करतो..’ स्पष्टपणे म्हणजे नक्की काय?

| January 14, 2017 01:55 am

बुद्धिमत्ता आणि जागरूकतेला संधी हवी असते. धोके हवे असतात, आव्हानं हवी असतात. तरच त्या धारदार बनतात. म्हणून गहनतेकडे बुद्धिमत्ता नेहमीच एखाद्या चुंबकीय आकर्षणानं खेचली जात असते, कारण तिथं शोधण्यासारखं काही तरी असतं.

प्रेमतरंगा,

तू म्हणतोस, ‘‘माझ्या मनात संघर्ष चालू आहे. इतरांबरोबर साधारणत: स्पष्टपणे तसंच बुद्धिमतेनं वागण्याचा माझा प्रयत्न असतो आणि दुसऱ्या बाजूला अतिशय भावनिक, संदिग्ध, अस्पष्ट जणू बेसावध; परंतु कदाचित जास्त सच्चेपणा असलेला असा वागतो.’’ हे पहा.. खरं जे काही असेल त्याप्रमाणे वागणूक ठेव. ते संदिग्ध का असेना. धोकादायक का असेना.. परंतु ते सत्य असेल त्याच्याप्रमाणे आचरण ठेवा. ते कदाचित तर्कशुद्ध नसेलही, ते कदाचित जास्त भावनिक असेल.. तरीही सत्याची कास धर कारण शेवटी सत्य जे असेल तेच तुला खरंखुरं जीवन जगण्यासाठी आधार देईल; तुझ्यासाठी खरंखुरं अवकाश निर्माण करेल आणि अंतिम वास्तवाचं दर्शन घडवेल.

‘ तू स्पष्टपणे वागण्याचा प्रयत्न करतो..’ स्पष्टपणे म्हणजे नक्की काय? ‘स्पष्ट’ म्हणजे दुसरा तसं सांगतो म्हणून तो स्पष्ट मार्ग. म्हणजे तो मार्ग उसना आहे.. तू आणखीन एक शब्द वापरला आहेस. ‘बुद्धिमत्ता! हा शब्द चुकीचा आहे.. याला बुद्धिमत्ता म्हणता येणार नाही. जे ‘स्पष्ट’ असतं ते तर्कनिष्ठ असू शकतं परंतु ते बुद्धिनिष्ठ नसतं. त्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत.

बुद्धिमत्ता ही नेहमीच अज्ञात गोष्टींचा शोध घेत असते आणि तो शोध नेहमी संदिग्ध असतो. तो कधीही स्पष्ट नसतो. शोधणारा मनुष्य नेहमीच अस्पष्ट अशा वातावरणातून, गोंधळातून निश्चित काय ते शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.. आणि ज्यांचा शोध संपलेला आहे, तेही एका गोष्टीबाबत निश्चितपणे मान्य करतात की संदिग्ध अशा गोंधळाच्या अवस्थेतूनच ग्रह-ताऱ्यांचा जन्म झालेला आहे. सगळं अस्पष्ट, संदिग्ध, काही तरी तिथं आहे परंतु दिसत नाहीये, पहाटेच्या धुक्यात लपलेलं असावं तसं हे सगळं म्हणजे आता पहाट होते आहे हे दर्शवणाऱ्या या सगळ्या खुणाच जणू! काही तरी अद्भुत घडणार आहे याची ही पूर्वसूचनाच म्हणावी लागेल आणि अद्भुत गोष्टीमध्ये स्पष्टपणा नसतो. जीवन असंच असतं ते अद्भुततेनं भरलेलं असल्यानंच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. बुद्धिमान मनुष्य नेहमीच वास्तवाकडे धाव घेतो.. धोके पत्करतो, संदिग्ध का असेना परंतु मार्गक्रमणा करतो, प्रकृतीचं रहस्य जाणून घेण्यासाठी कितीही खोलवर उतरायचं धाडस दाखवतो.. आणि ज्या मंडळींना निश्चित अशा स्पष्ट गोष्टी हव्या असतात, अगदी आखीव-रेखीव जीवनाचा ध्यास असतो, तर्कनिष्ठ जगणं हवं असतं ते लोक कायम सांसारिक जगातच वावरत असतात. ही मंडळी कधीही एकटेपणानं निर्णय घेत नाहीत तर ती सतत समूहाबरोबर वाटचाल करतात. स्वत:च्या बुद्धीचा वापर करून नवीन नवीन धोके पत्करण्यासाठी ती तयार नसतात. जीवनात आव्हानं स्वीकारली नाहीत तर बुद्धीला शैथिल्य येतं.. आव्हानं स्वीकारणं हे बुद्धीचं खाद्य आहे. ती जागी ठेवण्यासाठी ते एक प्रकारचं पोषण आहे.

समजा, एखादे दिवशी तुमच्या घराला आग लागली तर, एकाएकी तुम्हाला तुमच्यातल्या शक्तीचा, बुद्धिमत्तेचा प्रयत्न येतो. आग लागण्यापूवीं कदाचित तुम्ही थकलेले असता, इतके थकलेले असता की एकही काम न करता झोपायला जाण्याचा तुमचा विचार असतो.. परंतु ज्या क्षणी आग लागते, त्याक्षणी सगळा थकवा नाहीसा होतो; तुमच्या अंगात इतकी शक्ती संचारते की असा अनुभव पूर्वी कधीच आलेला नसतो. याक्षणी तुम्ही म्हातारे नसता. तुम्ही एकदम तरुण होऊन जाता..

अशा घटना घडलेल्या आहेत. एक घटना तर मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेली आहे. एका घरामध्ये जवळजवळ दहा र्वष एक स्त्री विकलांग अवस्थेत अंथरुणाला खिळून होती. पक्षाघाताच्या झटक्यानं तिचे अवयव निकामी झालेले होते. एक दिवस घराला आग लागली. प्रत्येक जण जीवाच्या भीतीनं घराच्या बाहेर पळाला.. अर्थातच प्रत्येकाला स्वत:चा जीव प्याराच! त्या स्त्रीची कोणाला आठवणच झाली नाही.. सगळे जण बाहेर आल्यानंतर मग सर्वाना आठवण आली आणि मग ते विचार करायला लागले.. कसं काय त्या स्त्रीला बाहेर काढायचं? ती कोणाची तरी बायको होती, कुणाची तरी आई होती, ती अनेकांची कोणी तरी होतीच. परंतु तरीही जमलेले.. आणि एवढय़ात आश्चर्य घडलं.. पक्षाघातानं १० र्वष विकलांग झालेली ती स्त्री सर्वाच्या डोळ्यादेखत घरातून बाहेर धावत धावत आली. डॉक्टरांनी निर्वाणीचं सांगून टाकलं होतं. परंतु ती धावत येताना पाहून अक्षरश: सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला.. लोकांनी तिला विचारलं? गेली दहा र्वष तू विकलांग झालेली आहेस. मग हे असं कसं घडलं?.. ती उत्तरली, ‘‘अरेच्चा.. मी विसरलेच.’’ असं म्हणून त्या क्षणी ती पुन्हा पक्षाघातानं पूर्वी होती तशी विकलांग झाली.. मी तिला म्हणालो, ‘‘आपल्याला अर्धागवायू झालाय हे आता तरी विसरून जा. तुला तो आजार नाही हे तू सिद्ध केलं आहेस. तुझ्या मनाच्या विलक्षण शक्तीनं ती कल्पना घट्ट धरून आत्तापर्यंत तू दहा र्वष अंथरुणाला खिळून राहिलीस. दहा र्वष ती कल्पना जास्त घट्ट होत गेली आहे. तुझ्या जाणीवरहित मनामध्ये ती खोलवर ठसत गेली.. पण आग लागली आणि अकस्मात ही घट्ट रुतलेली कल्पना विरघळून गेली. तेव्हा आता पुन्हा एकदा त्या झटक्यानं खाली पडण्याचं कारणच नाही. उठ! पुन्हा एकदा उठून उभी राहा.. माझं म्हणणं पटल्यामुळे म्हणा हो नाही करता करता ती स्त्री पुन्हा उठली हे खरं! मी म्हणालो, ‘‘आता यापुढे पुन्हा अर्धागवायूचा विचारही मनात आणायचा नाही. घराला आग लागली ही गोष्ट फारच चांगली झाली कारण त्यातून तुम्ही ‘वाचलात’!  तुम्ही बऱ्या झालात. आता मी तुमच्या डॉक्टरांना भेटेन. सर्व डॉक्टरांना तुम्ही खोटं ठरवलेलं आहे.’’

बुद्धिमत्ता आणि जागरूकतेला संधी हवी असते. धोके हवे असतात, आव्हानं हवी असतात. तरच त्या धारदार बनतात. बुद्धिमत्ता, जागरूकता.. या गोष्टी अज्ञानात जास्त कार्यरत होतात. कारण तिथं धोका पत्करणं असल्यामुळे गोष्टी सुरळीत करण्यासाठी बुद्धीला काम करायला वाव असतो. म्हणून गहनतेकडे बुद्धिमत्ता नेहमीच एखाद्या चुंबकीय आकर्षणानं खेचली जात असते, कारण तिथं शोधण्यासारखं काही तरी असतं.

तू म्हणतोस, ‘खरेपणाची कास धरायची. हे मी मनाला बजावतो.’ मनाला बजावण्याचा प्रश्नच नाही.. तर प्रत्यक्ष वागण्याचा आहे. खरेपणानं वागायलाच हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बजावता याचा अर्थ असा असतो की कुठे तरी तुम्ही तसं खरं वागत नसता.. अन्यथा मनाला बजावण्याचं कारणच काय?..’

(उत्तरार्ध)

(‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केलेल्या ‘स्वत:चा शोध’ या प्रज्ञा ओक यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील संपादित भाग)

ओशो

chaturang@expressindia.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:54 am

Web Title: article on success stories
Next Stories
1 जीवनावर विश्वास
2 गीताभ्यास – शेवटचा दिस
3 बोधिवृक्ष : निश्चयाचा महामेरू
Just Now!
X