पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा स्वतंत्र व्हावा, गोवा भारतात विलीन व्हावा म्हणून ‘गोवा काँग्रेस’ने सत्याग्रह सुरू केला. त्यातलं एक अग्रणी नाव होतं, पं. महादेव शास्त्री जोशी. मात्र आपल्या आजारी पतीला गोव्यात न पाठवता स्वत: जायचा निर्णय घेतला तो एका सामान्य स्त्रीने, त्यांच्या पत्नी सुधा जोशी यांनी. अडचणींवर मात करत त्यांनी गोवा काँग्रेसचं अधिवेशन भरवत भारताचा झेंडा फडकावला. पोलिसांचा छडीमार सहन केला. असह्य़ तुरुंगवास सहन करतानाच त्यांनी उपोषणाला प्रारंभ करून सरकारची झोप उडवली. चार वर्षांच्या कारावासानंतर त्यांची अखेर सुटका झाली.  त्या असामान्य  ठरलेल्या सुधाताई जोशी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष, त्यानिमित्ताने .. त्यांच्याविषयी..

आपला देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तरी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तो स्वतंत्र व्हावा म्हणून गोव्यातच ‘गोवा काँग्रेस’ ही गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी स्थापन झालेली लढाऊ संस्था; पण पोर्तुगीजांच्या दडपशाहीमुळे मुंबईत त्या पक्षाचं मुख्य कार्यालय उघडलं ते समाजवादी पुढारी पीटर अलवारीस यांनी. मुंबईत त्यासाठी अधिवेशनं भरू लागली. पुण्यातही शाखा स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष होते पं. महादेव शास्त्री जोशी; लेखक आणि कोशकार (संस्कृती कोश त्यांनी निर्माण केला). त्या शाखेचं कार्यालय शास्त्रीबुवांच्या घरीच होतं, कारण शास्त्रीबुवा गोव्याचे. त्यांची पत्नी सुधा याही गोव्याच्या. त्यामुळे घरात होणाऱ्या चर्चा, बैठका याबद्दल सुधाताईंना आस्था आणि आपुलकी होती. त्यांचं काम; आलेल्यांचं जेवण, चहा-पाणी करणं. शास्त्रीबुवा पीटरबरोबर गोव्याच्या सरहद्दीवर जात तिथे गोव्यातल्या स्वातंत्र्यानं भारलेल्या तरुणांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून कामं नेमून देत.

controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
congress leader on tax notice
‘हा तर भाजपाचा कर दहशतवाद’, १७०० कोटींची प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस संतप्त

नंतर गोवा काँग्रेसने गोवा भारतात विलीन व्हावा म्हणून सत्याग्रह पर्व सुरू केलं. गोव्यातल्या तरुणांनी मग शास्त्रीबुवांना निरोप पाठवला. ‘तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही संग्रामात उडी घेतली. आता तुमचं कर्तव्य जे असेल ते तुम्ही करा.’ शास्त्रीबुवा बेचैन झाले. त्यांना वाटलं ते तरुण तुरुंगात गेलेत, मी तिथे असायला हवं त्यांच्याबरोबर. घरात भरलेल्या बैठकीत अस्वस्थ शास्त्रीबुवा म्हणाले, ‘आता सत्याग्रहाला मी जाणार. कोणी बरोबर असेल तर ठीक, नाही तर एकटा. तुम्ही तारीख ठरवा.’ जमलेल्या मंडळींत उत्साह संचारला, कारण लेखक म्हणून महादेवशास्त्री जोशी प्रसिद्ध होते. त्यांचं जाणं नक्की झालं. बैठक संपल्यावर सर्व निघून गेले आणि शास्त्रीबुवांना सुधाताईंच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली-  सुधाताई – एवढा क्रांतिकारक निर्णय तुम्ही मला न विचारता कसा घेतला?

शास्त्रीबुवा – आपल्या गावच्या पंचक्रोशीतले आंबेडय़ाचे शेजारी, माझा आदेश मानून तुरुंगात गेलेले तरुण, त्यांचा मी विश्वासघात करणार नाही. मी जाणार.

सुधाताई – मी कुठे विश्वासघात करायला सांगतेय. माझा विरोध नाहीच, पण मी एक पर्याय शोधलाय. तुमच्याऐवजी मी जाते.

शास्त्रीबुवा – काय बोलतेस? तू सत्याग्रहाला जाणार? वेडी की काय?

सुधाताई – मी पूर्ण विचार केलाय. पत्नीही पतीची सहधर्मचारिणी असते. हे पुराण-प्रवचनातून तुम्हीच सांगत आलात ना? तुम्हाला पटत नसलं तरी पटवून घ्यावं लागेल. तुमची हार्नियाची शस्त्रक्रिया दोन महिन्यांपूर्वीच झालेली आहे. जड उचलायला, सायकलवर बसायला डॉक्टरांनी मनाई केलीय. कुठे वर्मी मार लागला तर, आपला संसार ओढग्रस्तीचा. तुम्ही आणाल ते मुलांना कोणीही शिजवून घालील आणि पोलिसांचा मार खायला मी धाटीमुटी आहे.

यानंतर शास्त्रीबुवांना सुधाताईंनी बोलूच दिलं नाही. पीटर अलवारीसना मुंबईला निरोप गेला. ते आले. म्हणाले, ‘‘सुधाताई, तुमचा निर्णय माझ्यासह सर्वाना आवडला. तुमच्या सत्याग्रहाने उभ्या भारताचं लक्ष गोव्याकडे वळेल. चळवळीला एक नैतिक बळ मिळेल.’’ सुधाताई हसल्या. म्हणाल्या, ‘‘नैतिक बळ वगैरे मला ठाऊक नाही, पण माझं कर्तव्य मी माझ्यापुरतं बजावीन.’’ मग सुधाताईंना सत्याग्रही म्हणून न पाठवता गोवा काँग्रेसची अध्यक्ष आणि त्यांनी गोव्यात काँग्रेसचं अधिवेशन भरवायचं असं पीटरनी सांगितलं. तारीख ठरली. ६ एप्रिल १९५५ दुपारी चार वाजता हे अधिवेशन पोर्तुगीज सरकारचा बंदी हुकूम मोडून भरवायचं होतं. भरभरून बातम्या, अग्रलेख आले; परंतु सुधाताई म्हणाल्या, ‘‘मला ही आगाऊ प्रसिद्धी रुचली नाही. मी जे करायला निघाले होते. ते तर अजून पुढेच होतं. हे सगळं ‘ताकाआधीच मीठ खाणं’ असं मला वाटलं, पण मी कोणाला, कशी अडवणार?’’

सुधाताई १ मार्च १९५५ला गोव्याला जायला निघाल्या होत्या. तर आदल्या रात्री दहा वाजता पुण्यातल्या वार्ताहरांनी येऊन सुधाताईंना सांगितलं, ‘‘सुधाताई, एक गंभीर बातमी आहे. टोनी डिसूझा या कार्यकर्त्यांला पोर्तुगीजांनी २६ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.’’ त्याचा परिणाम सुधाताईंवर काहीच झाला नाही. त्या सहज बोलून गेल्या, ‘‘२६ वर्षे पाठवताहेत तुरुंगात, २६ महिने तरी पोर्तुगीज गोव्यात राहतील का?’’ शास्त्रीबुवा पोचवायला गोव्याच्या हद्दीपर्यंत होतेच. ५ एप्रिलच्या पहाटे सगळे जण गोवा हद्दीपाशी जीपने गेले. अंधार होता. तो वियोगाचा क्षण होता. सुधाताईंनी गाठोडं उचललं. एक भूमिगत कार्यकर्ता त्यांचा वाटाडय़ा झाला. टेकडी चढून त्या खाली उतरल्या तर गोव्याची मणेरीची नदी लागली. नदीतून जाताना पाणी मांडय़ांपर्यंत आलं तरी चालणं चालू होतं. वाटाडय़ाने अस्नोडय़ाजवळच्या आडवळणी भागात एका शेतकऱ्याच्या दारात नेऊन बसवलं. चहापाणी झालं. त्या वाटाडय़ाबरोबर अस्नोडा बस स्टँडवर आल्या. साखळीला जत्रा होती म्हणून खूप गर्दी होती. एका बसमध्ये जागा मिळाली. प्रत्येक बसमध्ये पोलीस होते. सुधाताई काँग्रेसचं अधिवेशन घेणार हे पोर्तुगीजांना कळलं होतं. त्यांना पकडून देण्यासाठी सरकारने पाच हजार रुपयांचं बक्षीस लावलं होतं. पोलीस सर्वत्र विचारीत होते, ‘‘ती भटीण आली का तिकडे?’’ एक बाई सरकारी हुकमाचा भंग करायला आली म्हणजे काय?

दुसरा दिवस ६ एप्रिल १९५५. हनुमान जयंती. म्हापशाचं मारुती मंदिर प्रसिद्ध – देवळापुढे बरीच गर्दी होती. चारच्या सुमारास सुधाताई सर्वासह देवळापाशी आल्या. लोकांचा मोठा समुदाय होता. मंदिरातल्या घडय़ाळात चारचे टोले पडले आणि गर्दीच्या मधोमध स्टुलावर सुधाताई उभ्या राहिल्या. म्हणाल्या, ‘‘आता गोवा काँग्रेसचं अधिवेशन भरत आहे.’’ लगेच त्यांनी भाषणाला सुरुवात केली. सत्याग्रहींनी भारताचा झेंडा फडकावला आणि पोलीस आले. पिस्तूल सुधाताईंवर रोखून ओरडले, ‘‘भाषण थांबव.’’ पण त्या थांबल्या नाहीत. पोलिसांनी ती भाषणाची प्रत ओढून घेतली. सगळे ओरडले, ‘जय हिंद, जय हिंद!’ लगेचच पोलिसांनी सर्वाना पकडलं. पोलिसांनी लाठीमार करून सत्याग्रहींना अटक होताच सगळी गर्दी पांगली. सत्याग्रही घोषणा देत होते आणि पोलीस त्यांना मारीत होते; पण छडीमाराचं दु:ख सुधाताईंना नव्हतं. एक धुंदी चढली होती. ‘मी काँग्रेसचं अधिवेशन भरवलं, कामगिरी चोख पार पाडली.’ असं सुधाताईंना जाणवलं. मी एक सामान्य गृहिणी, आता माझं काहीही होवो. रात्री बारा वाजता सर्वाना दुसऱ्या तुरुंगात नेण्यात आलं. त्या वेळी गाडीत दंडुकेधारी पोलीस काही तरी निमित्त काढून सर्वाना दंडुक्याने मारीत होते. पणजीजवळ क्वार्तेल हे मुख्य पोलीस ठाणं होतं तिथे आणून कोठडीत बंद केलं. तिथे काही ओळखीचे स्त्री-पुरुष सत्याग्रही म्हणून आलेले होतेच. तिथल्या कोठडय़ा म्हणजे सर्कशीतल्या वाघसिंहाच्या पिंजऱ्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा होत्या. जेमतेम चार माणसं दाटीवाटीने झोपत. वर अहोरात्र जळणारा दिवा. तिथे कशाबशा या स्त्रिया राहू लगल्या.

नंतर सुधाताईंची जबानी झाली. एक गोरा सरजट आणि बरोबर दुभाषा – नाव, गाव, पत्ता विचारून झाल्यावर सरजटने विचारलं – म्हापशाला पोचेपर्यंत तू कोणाकडे राहिलीस?

सुधाताई – कुणाकडे नाही. एका वाटाडय़ाने अस्नोडय़ाला आणून सोडलं.

सरजट – तो वाटाडय़ा कोण होता?

सुधाताई – माहीत नाही.

अशी परत परत तीच तीच प्रश्नोत्तरे तीन दिवस चालू होती. पण सुधाताईंनी कुणाचंच नाव सांगितलं नाही. त्या सरजटने सुधाताईंना धमकावलं, पण मारलं नाही. खुद्द पोर्तुगीज हे सत्याग्रहींना मारत नसत. तर मिस्तीस नावाचे पोलीस मारीत. हे मिस्तीस म्हणजे आई गोव्याची आणि बाप पोर्तुगीज असा त्यांचा जन्म झालेला. त्यामुळे ते जास्त क्रूर होते. त्यांचा मुख्य होता माँतेरो.  एक दिवस माँतेरो सुधाताईंच्या कोठडीपुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘हा तुझा फोटो का?’’ ‘‘हो, पण तुला कसा मिळाला?’’- सुधाताई. तो आढय़तेने म्हणाला, ‘‘मी पोलीस खात्याचा आजेन्त आहे.’’ ‘‘अरे, मग मी म्हापशाला स्टँडवर अर्धा तास तरी होते. तुझ्या बावळट पोलिसांना दिसले नाही. ते ज्याला त्याला  विचारीत, ‘ती भटीण कुठे आहे?’’ तो खाली मान घालून निघून गेला, कारण सुधाताई पोर्तुगीज कमांडंटच्या ताब्यात होत्या. तिथे सुधाताईंना माणसांचा त्रास नव्हता; होता तो कोठडय़ांचा. त्या अगदीच गैरसोयीच्या होत्या. सकाळ व संध्याकाळ एकदाच कोठडीबाहेर या स्त्रियांना काढीत. १२/१२ तास या स्त्रियांना इंद्रियनिग्रह करावा लागे. त्याचा परिणाम पचनावर व्हायचा. पण सगळ्या जणी हसूनखेळून राहत होत्या.

मग मिलिटरी कोर्टात सुधाताईंना उभं केलं. एक वकील गोवा विमोचन समितीनं नेमले होते, श्री. कैसरे. एक धिप्पाड फिरंगी अधिकारी न्यायासनावर बसला होता. नाव, गाव विचारल्यावर त्यांनी म्हटलं, ‘‘तू काय गोवा इंडियात घालायला बघतेस?’’

सुधाताई शांतपणे म्हणाल्या, ‘‘गोवा इंडियातच आहे. फक्त तुमच्या सत्तेचा अडसर मधे आहे.’’ मग अधिकारी सहानुभूतीने म्हणाला, ‘‘तू कुटुंबवत्सल बाई. मुलंबाळं, नवरा आहे. तू कशाला यात पडतेस? तुला शिक्षा होईल. मुलं पोरकी होतील. तू फक्त एवढं सांग, मी पुन्हा गोव्यात येणार नाही.’’

सुधाताईंना त्याचा कावा लक्षात आला. त्या मनाशी म्हणाल्या, ‘मी सुधा जोशी नाही; साक्षात गोवा काँग्रेस आहे.’ त्यांनी उत्तर दिलं, ‘‘गोवा माझा आहे. मी कधीही येईन जाईन. इथे माझं माहेर, सासर दोन्ही आहे. कौटुंबिक धर्मापेक्षा राष्ट्रधर्म श्रेष्ठ. मुलं वाढवायला माझा नवरा समर्थ आहे. तुम्हाला द्यायची असेल तेवढी शिक्षा द्या.’’ त्यानं मग वकिलांना सुधाताईंना समजवायला सांगितलं, पण त्यांचा निर्धार कायम होता. त्याने शिक्षा सुनावली – बारा वर्ष!

पक्क्या जेलमध्ये पाठवणार म्हणून त्या वाट पाहत होत्या; पण सहा महिने झाले तरी तिथेच! मग सुधाताईंनी उपोषण आरंभलं. शास्त्रीबुवांना कळवलं, ‘तूर्त मी जीवनावर जगत आहे.’ शास्त्रीबुवांना अर्थ समजला. त्यांनी गोवा विमोचन समितीला उपोषणाबद्दल कळवलं.

अर्थात, मग आकाशवाणी, वृत्तपत्र सगळीकडे बातमी झळकली, ‘सुधाताईंचा गोव्यात तुरुंगात अन्न सत्याग्रह.’ मग पोलीस स्टेशनमध्ये हाहाकार उडाला. बातमी बाहेर गेली कशी, हे पोलिसांना समजेना. पत्र सेन्सॉर होत असताना सुधाताईंनी ‘जीवन’ शब्द वापरून पोलिसांना चकवलं होतं. मग त्यांना केपे जेलमध्ये पाठवलं. पुन्हा एक वर्षांने त्यांना परत मडगावला आणलं. तुरुंगातलं जिणं हाच त्रास. अशात दोन वर्ष उलटली. तिथले सोल्जर त्यांना सहानुभूती दाखवत. ते सांगत, ‘‘ताई, तुम्ही इथे किती खितपत पडणार? आम्ही पाठ करून उभे राहतो. तुम्ही इथून पळा.’’ सुधाताई म्हणाल्या, ‘‘आम्ही तुमचे आभारी आहोत, पण पळून जाणं आमच्या सत्याग्रहात बसत नाही. सरकार सोडेल तेव्हा जाऊ.’’ एक दिवस विनोबा भावे यांचं पत्र त्यांना आलं. ‘तुला तुरुंगवास लाभला हे तुझं भाग्य समज. वेळेचा उपयोग कर. वाच, लिही, चिंतन कर.’ सुधाताईंना विनोबांचे शब्द म्हणजे प्रेमाचा आधार वाटला. एक दिवस लोकसभेत खासदारांनी पंतप्रधान नेहरूंना प्रश्न केला. ‘‘सुधा जोशींच्या सुटकेचं काय?’’ ते म्हणाले, ‘‘आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ त्या वेळी पोर्तुगीज भारत संबंध तुटले होते. पोर्तुगाल ब्राझीलतर्फे तर भारत इजिप्तमार्फत व्यवहार पाहत होता. नेहरूंनी एका इजिप्शियन अधिकाऱ्याला गोव्यात सुधाताईंसाठी पाठवलं. दुभाषातर्फे तो सुधाताईंना भेटला. त्याने नेहरूंना परत गेल्यावर सांगितलं, ‘सुधा जोशी भलतीच कणखर स्त्री आहे. तिनं कोणतीच अपेक्षा व्यक्त केली नाही.’ अशी चार वर्ष संपली. एक दिवस जेलर आला, म्हणाला, ‘आज आम्ही तुला सोडणार. सामान बांध.’ तिथेही सुधाताईंनी अट घातली, ‘मी लगेच जाणार नाही. प्रियोळला जाऊन माहेरच्यांना भेटेन. मग परत येऊन चौकीवर हजेरी लावीन.’ अट मान्य होताच त्या माहेरी गेल्या. त्या लिहितात, ‘आईच्या हातचा अमृतघास जेवले व ठरवल्या दिवशी फोंडय़ाच्या चौकीवर हजर झाले.’ त्यांना माजाळीच्या भारतीय नाक्यावर सोडण्यात आलं. पुण्यात पोचल्यावर सुधाताईंनी म्हटलंय, ‘पुऱ्या चार वर्षांनी पतीची भेट. त्यात ‘घणावली भावाद्र्रता होती.’ सुधाताईंचे पाय सुजलेले. अ‍ॅनिमिया जडलेला. शास्त्रींचे डोळे पाणावले. इतक्यात पंडित नेहरूंचं पत्र सुधाताईंना मिळालं. ‘प्रिय सुधाताई, तुझ्या सुटकेचा मला फार आनंद झाला. तू खूप कष्ट भोगलेस. आता प्रकृतीची काळजी घे. काही दिवस पूर्ण विश्रांती घे.’ पत्र इंग्रजीत होतं. खाली नेहरूंची सही होती. पुण्याच्या पत्रकारांनी सुधाताईंना विचारलं, ‘‘पुढे काय करणार?’’ सुधाताई  म्हणाल्या, ‘‘काय करणार म्हणजे? संसार करणार.’’ पत्रकाराने सांगितले,  ‘‘अहो, लोकसभेची एक जागा रिकामी आहे. त्या जागी तुम्हाला उभं करायचे मनसुबे चालू आहेत.’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी शास्त्रीबुवांच्या संसारात सदैव उभीच आहे. मला कुणी उभं करायला नको. युगानुयुगाची मी स्वयंपाकीण.’’

चार वर्षांच्या तुरुंगवासाने सुधाताई मुंबईत खूप आजारी झाल्या. सरकारी अधिकारी घरी येऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणार होते; पण सुधाताईंनी नकार दिला. घरच्या डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने त्या बऱ्या झाल्या.

सुधाताईंचा जन्म १० जानेवारी १९१९चा, गोव्याचा. १९३३ मध्ये शास्त्रीबुवांशी १४व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. गोवा सोडून शास्त्रीबुवा पुण्यात आले तेव्हा आर्थिक परिस्थिती बेताची. सुधाताईंना दोन मुलगे झाले. अशोक आणि यदुनाथ. घरखर्च चालावा म्हणून सुधाताई बांगडय़ा, कुंकू आणि तत्सम गोष्टी पुण्यात पेठेत घरोघरी जाऊन विकून चार पैसे मिळवीत. घरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी असत. त्या परिस्थितीत त्या संसार करीत. पुढे परिस्थिती पालटली.

२६ ऑक्टोबर १९९२ला त्या गेल्या. पाठोपाठ महिन्याभरात शास्त्रीबुवाही गेले. एक सामान्य गृहिणी, बेताचं शिक्षण असलेली काय करू शकते, किती उंचीवर वैचारिकदृष्टय़ा पोचू शकते, त्याचा हा लेखाजोखा.

(संदर्भ – आत्मपुराण – लेखक- महादेवशास्त्री जोशी)

मधुवंती सप्रे madhuvanti.sapre@yahoo.com

chaturang@expressindia.com