News Flash

आखाडय़ातल्या मुली

महावीर फोगट समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलींना आखाडय़ात उतरवतात.

साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक मिळवलं आणि हरियाणातल्या मुली आणि कुस्ती हा विषय चर्चेत आला. त्यातच ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने फोगट भगिनीचं कर्तृत्वही अधिक ठसठशीतपणे पडद्यावर आणलं गेलं. महाराष्ट्रात काय स्थिती आहे? आजही कुस्तीकडे पारंपरिक पुरुषी नजरेनेच पाहिलं जातंय? ग्रामीण भागात सरावासाठी अनेक ठिकाणी पुरुषांबरोबर तर सोडाच पण आखाडय़ातही या मुलींना प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी खास स्त्रियांसाठीचे आखाडे तयार होताहेत, पण खरा प्रश्न आहे मानसिकतेचा. खेळातही स्त्री-पुरुष भेद असावा का? तिचं सौष्ठव नष्ट होईल, तिचं लग्नच होणार नाही, अशा पारंपरिक विचारांची खीळ आजही महाराष्ट्रातल्या मुलींच्या प्रगतीला बसते आहे. कधी बाहेर पडणार आपण यातून?

महाराष्ट्रातल्या एका नामांकित वाहिनीवरील एक मालिका. ज्यामध्ये नायक मल्ल आहे. आखाडय़ात तालीम करत असताना त्याचे उस्ताद त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात, ‘पैलवानाने मुलीकडे बघायचंपण नाय, तिच्याशी बोलायचंपण नाय, कोणतीही मुलगी आखाडय़ात येता कामा नये..’ मालिकेतील हे संवाद साऱ्यांनीच ऐकले असतील. ही मालिका कल्पनारम्य असली तरी ती महाराष्ट्राचं वास्तव दाखवणारीच आहे. आपल्या ग्रामीण भागातील आखाडय़ांची अवस्था यापेक्षा भिन्न नाही, तिथे मुलींना प्रवेशच दिला जात नाही, अगदी सरावासाठीही नाही, ही परिस्थिती देशाला विचार देणाऱ्या महाराष्ट्राची!

एकीकडे साक्षी मलिक कुस्तीत ऑलिम्पिक पदक पटकावते. महावीर फोगट समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलींना आखाडय़ात उतरवतात, आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलतात. हे सारं कुठे होतंय तर हरियाणात. जिथे एकेकाळी सर्वात जास्त स्त्री-भ्रूणहत्या व्हायच्या, पण हरियाणात ही क्रांती घडली आणि त्याची सुफळे साऱ्यांसमोर आहेत. पण महाराष्ट्रातली मानसिकता कधी बदलणार, हा कळीचा मुद्दा आहे.

‘‘मुंबई मोठ्ठं शहर आहे. इथे असमानता नाहीच. पण जेव्हा आम्ही स्पर्धासाठी कोल्हापूर, पुणे किंवा अन्य ग्रामीण भागात जातो तिथे मात्र आम्हाला कुणी खेळाडू म्हणून मानतच नाही. तिथे भेदाभेद स्त्री-पुरुष यावरून सुरू होते. आम्हाला सराव करायला आखाडय़ात प्रवेश दिला जात नाही. आखाडा हे मुलींनी जाण्याचे ठिकाण नाही, असे आम्हालाच सांगितले जाते. मुलांबरोबर सरावही करू दिला जात नाही. मुलींबरोबर सराव केला तर मुलांचे लक्ष विचलित होते, असं त्याचं म्हणणं. उलट आम्ही मुलांना सराव करताना लंगोटवरच पाहतो, तेव्हा लक्ष कुणाचे विचलित व्हायला हवे. पण तसे होत नाही. कारण ते ठिकाणच वेगळं असतं. अर्थात काही ठिकाणी मानसिकता बदलतेय, पण ती पुरेशी नाही. महाराष्ट्राकडून कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा करायची आणि मुलींना असमान वागणूक द्यायची, हा कुठला न्याय?’ राष्ट्रीय महिला कुस्तीपटू प्रियांका सणस थेट प्रश्नच विचारते.

पण जेव्हा असा अन्याय घडत असतो, तेव्हा त्याला वाचा फोडणाऱ्या व्यक्तीही असतात. पण त्यांचं कार्य लोकांपुढे फारसं येत नाही. मुलींना कुस्ती का खेळता येऊ नये, हा ध्यास घेऊन २००४-०५ मध्ये आळंदीमध्ये जोग महाराज व्यायामशाळा स्थापन केली ती दिनेश गुंड यांनी. कुस्तीसाठी त्यांनी देश पिंजून काढला आहे. त्यामुळे मुलींना या खेळात कसे वळवायचे, याचा विचार करत असताना त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. आणि त्यांनी मुलींसाठी अशी खास व्यायामशाळाच काढली. आतापर्यंत तब्बल ४५ मुली त्यांच्याकडे सराव करीत आहेत. ‘मुलींचा आखाडा’ अशी खास ओळख कुस्ती क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या व्यायामशाळेबद्दल सांगतात.

‘‘मी जेव्हा ही व्यायामशाळा सुरू करण्याचे ठरवले तेव्हा समाजाकडून मला मोठाच विरोध झाला. कुस्ती हा पुरुषांचा खेळ, त्यामध्ये स्त्रियांना कशाला आणता, मुली कशा कुस्ती खेळतील? असा सवाल मलाच विचारला गेला. पण मला काय आणि का करायचे होते हे पक्के माहीत होते त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.’’

‘‘ मुली ज्युडो खेळतात, हा खेळ जवळपास कुस्तीसारखाच. मग मुलींनी कुस्ती का खेळू नये? राहिला गणवेशाचा प्रश्न. एखादा  खेळ किंवा खेळाडू पाहताना संकुचित वृत्ती असता कामा नये. त्यांनाही केवळ एक खेळाडू म्हणून पाहता यायला हवं. कुस्तीमध्ये आता मुलींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांना नोकऱ्या मिळतात, सरकारकडून आर्थिक मदत मिळते. काही वर्षांत महाराष्ट्रातील स्त्रिया कुस्तीचे रूप नक्कीच बदलतील याची खात्री आहे, पण त्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे ग्रामीण भागातील मानसिकता बदलायला हवी.’’

खरंतर खेळांमध्ये भेदभाव येणंच चुकीचं आहे. हा खेळ फक्त पुरुषांचा, हा फक्त स्त्रियांचा, ही मानसिकता बदलायला हवी. दहीहंडी फोडणं हासुद्धा पुरुषांचा पारंपरिक खेळ होता, आता मुलीसुद्धा त्यात उत्साहाने भाग घेतातच. त्यातल्या राजकारणाकडे नको जायला, परंतु खेळ हा लिंगभेदापलीकडे जाणे ही काळाची गरज आहेच.

दिनेश गुंड यांना मुलींनीही शारीरिकदृष्टय़ा कणखर व्हावं असंच वाटतं. ‘‘कुस्तीमुळे मुलींचा बांधा सुडौल राहात नाही. अंगकाठी मजबूत होते. मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आपण ऐकतो, पण मुलगी ‘दणकट’ असेल तर असे प्रकार घडणार नाहीत. माझ्या तालमीत अशा काही मुली आहेत की ज्या एका ठोश्यात मुलाला खाली लोळवतील. अशा मुलींच्या वाटय़ाला कोणता मुलगा जाईल का? मुलींसाठी हे क्षेत्र बदलत आहे. आता असमानता राहिलेली नाही. फक्त ते टिकलं पाहिजे.’’

एकीकडे दिनेश गुंड यांनी स्त्रियांसाठी आखाडा बनवत समाजात बदल घडवण्याची सुरुवात केली असली तरी त्यांची काही मते पारंपरिक आहेत. ‘मुलींनी पुरुषांच्या मानल्या गेलेल्या आखाडय़ात येण्याची गरजच नाही. कारण मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचे असते, त्यामुळे त्यांनी आखाडय़ांऐवजी मॅटवर सराव करायला हवा. ग्रामीण भागामध्ये जत्रेच्या वेळी कुस्ती स्पर्धा होतात, ज्याला फड असे म्हटले जाते. तर या फडामध्ये मुलींनी कुस्ती करूच नये, या मताचा मी आहे. आपल्या परंपरा कुठेतरी जपायलाच हव्यात,’ असं ते स्पष्टपणे सांगतात. तर ही परिस्थिती बदलायला हवी असं मत राष्ट्रकुल पदकविजेत्या सोनाली, प्रियांका करतात. ‘‘सध्याच्या घडीला परिस्थिती बदलत आहे. पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये परिस्थिती बदलत आहे. पण काही आखाडय़ांमध्ये अजूनही मुलींना प्रवेश नाही. हरियाणामध्ये मुलींना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तिथून आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू तयार होताना दिसतात, तसे आपल्या महाराष्ट्रातही घडायला हवे. मोकळीक दिली तर अजून जास्त प्रगती आपण करू शकतो.

‘‘ ग्रामीण भागात तर परिस्थिती चिंताजनक आहे. ज्या मुली या भागांतून येतात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं, हा विचार आजही अनेकांमध्ये कायम आहे. पहिली गोष्ट समाजाने आपली मानसिकता बदलायला हवी. आपण कोणत्या शतकात जगत आहोत, ते समाजाने दाखवले पाहिजे,’’ राष्ट्रकुल पदकविजेती सोनाली तोडकर सांगते.

मुली कुस्तीमध्ये आल्या. एकीकडे त्यांचा प्रगतीचा आलेख चढता असताना, त्यांना समाजाकडूनच नाही तर घरच्यांकडूनही मागे खेचले जाते. कुस्ती खेळणाऱ्या मुलींचा बांधा पुरुषांसारखाच असतो, किंवा होतो. त्याचं स्त्रीसुलभ सौष्ठव जातं, त्यामुळे त्यांना स्त्रीच मानायचे नाहीत असेही प्रकार घडलेले आहेत. महिला आरक्षित ठिकाणावर बसल्यावर त्यांना सरळ तिथून उठवले जाते किंवा सार्वजनिक शौचालयात जाण्यावरूनही अनेकदा प्रश्न निर्माण झालेत. मुलगी कुस्ती खेळत असली, नेत्रदीपक कामगिरी करत असली तरी तिचं लग्न कसं होईल, हाही अनेक पालकांच्या काळजीचा विषय. एकीकडे साक्षी मलिकसारखा चेहरा देशाला कुस्तीसारख्या खेळातून मिळत असताना त्याच्या विरोधातले विचार आजही बऱ्याच पालकांच्या मनात आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला असून लवकरच ती बोहल्यावरही चढणार आहे. त्यामुळे पालकांनीही आपली ही मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. जर पालकच पाल्याचे पाय मागे रोखत असतील तर बाहेरच्या लोकांच्या विरोधाचा बीमोड कसा करणार?

प्रियांका एकदा स्पर्धेसाठी मुंबईबाहेर गेली होती. त्या वेळी त्यांना आखाडय़ात खेळण्यास मनाई केली गेली. पण तिचे प्रशिक्षक हनुमान जाधव यांनी लोकांना समजावत मुलींना आखाडय़ात प्रवेश मिळवून दिला होता. याबाबत जाधव म्हणाले की, ‘‘आता अधिकतर मुली मॅटवरच सराव करतात. पण एकदा स्पर्धेसाठी आम्ही मुंबईबाहेर गेलो होतो, तेव्हा माझ्या महिला कुस्तीपटूंना आखाडय़ात प्रवेश दिला जात नव्हता. त्यांना तिथे फक्त सरावच करायचा होता. पण तिथल्या लोकांनी मुलींना प्रवेश नाकारला. मी त्यांची समजूत घातली. आता साक्षी मलिकने देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे, या मुलींमधूनही काही मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाचे, महाराष्ट्राचे नाव उंचावतील, असेही समजावले तेव्हा कुठे त्यांनी मुलींना आखाडय़ात सराव करण्याची परवानगी दिली. सध्याच्या घडीला ग्रामीण भागात मुली आणि मुले फारसे एकत्र सराव करत नाहीत. मुली लहान असतील तर त्यांना मुलांबरोबर सराव करता येतो. पण एकाच वयाच्या मुलींबरोबर मुलांना सराव दिला जात नाही. हरियाणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या महिला कुस्तीपटू मात्र पुरुषांबरोबर सराव करतात, याचं कारण त्यांच्याशी थेट लढल्याने, त्या ताकदीशी सामना करण्याचं बळ येतं. पण आपल्याकडील मानसिकता अजूनही बदललेली नाही. ही मानसिकता बदलायला हवी.’’

महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावत आहे. तो म्हणाला की, ‘मुलगा असो किंवा मुलगी, त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या पाल्याला आपण नेमके कसे घडवतो, हे त्यांनी ठरवायला हवे. मुलांनी आणि मुलींनी एकत्र सराव का करू नये. आपल्याकडील आखाडय़ांमध्ये पद्धत अशी आहे की, तिथे फक्त मुलंच जातात. पण जर असे असले तरी मुलींसाठी खास तालमी तयार करण्याची गरज आहे. आखाडय़ांमध्ये मुलींबरोबर सराव करायला मुलांचा विरोध नसतो, पण काही वेळा विरोधामुळे ते शक्य होत नाही. खरं तर मुला-मुलींनी एकत्र सराव करण्यात काय समस्या आहे?  बाहेरच्या देशांमध्ये हे सर्रास होताना आपण पाहतो, हा बदल आपल्या महाराष्ट्रात घडायला हवा.’

आपल्या महाराष्ट्रातही साक्षी मलिकसारखी ऑलिम्पिक पटकावून देणारी महिला कुस्तीपटू तयार व्हावी, असे म्हणतो. पण आपली या महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याची मानसिकता कधी बदलणार, हा कळीचा मुद्दा आहे. जेव्हा त्यांना समानतेची वागणूक मिळेल, त्यानंतरच हे बदल घडू शकतात. एकीकडे मुलींना आखाडय़ात प्रवेश नाकारायचा आणि दुसरीकडे त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा करायच्या, हे सारेच अनाकलनीय. काळ बदललाय, आपल्यालाही वेगाने बदलायला हवंय.

प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:12 am

Web Title: article on women wrestling players
Next Stories
1 ‘स्व’त्व!
2 आनंदाचा शोध
3 अंतिम वास्तवाचं दर्शन
Just Now!
X