पाहावं तसं आयुष्य दिसतं. प्रत्येक क्षण रसरसून जगायचा ठरवला तर खरोखर तसा छान अनुभव यायला लागतो. सकाळी उठल्याबरोबर, डोळे उघडले की आजूबाजूला जे जे म्हणून दिसेल, सजीव, निर्जीव वस्तू, परिसर त्याला मनातल्या मनात ‘गुड मॉर्निग’ म्हणायचं. आज दिवस छान जाणार असं बिछान्यात असतानाच ठरवून उठायचं. बेसिनपाशी आलो की समोर आरशात पाहून स्माइल करायचं. मनातल्या मनात स्वत:लाच ‘गुड मॉर्निग’ म्हणायचं. अशानं एक सकारात्मकतेची भावना आपोआपच मनातून शरीरभर झिरपत जाईल.. ताजंतवानं वाटायला लागेल..

असं जाणिवपूर्वक करणं गरजेचं आहे. उठल्यापासूनच सकारात्मक विचार करायला सुरुवात करायची. मग दिवसभरात कशीही परिस्थिती, आव्हानं समोर असो. आत्ता ‘या’ क्षणांतला आनंद टिपायचा. म्हणजे ‘माइंडफुल’ राहायचं. तो क्षण जगायचा. चहाच्या कपाचा ओठांना होणारा पहिला स्पर्श असो, चहाच्या पहिल्या घोटाची चव असो. मस्त एन्जॉय करायची. पुढे घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेतला चांगला भाग शोधायचा. तशी मनाला सवयच लावायची. विपरीत, प्रतिकूल परिस्थितीतही हे धोरण ठेवायचं. तशा परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच असतं. ते शोधायची मनाची धाटणी बनवायची. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्या विनाअट शांतपणे स्वीकारायच्या आणि शांतपणे पुढे जायचं.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

आनंदी राहणं ही एक कला आहे. मुख्य म्हणजे ज्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे, क्षणांमुळे आनंद मिळतोय त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं.

हे सगळं कसं जमवायचं?

आनंदी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना पीस आणि ब्लिस, आनंद, मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं ‘रिप्रोग्रॅमिंग’ असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक आनंदाची निरंतर शक्यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.

पहिली भावना आहे कृतज्ञतेची. एक गोष्ट सांगतो, माझ्या घराजवळ एक पंचतारांकित हॉटेल आहे. अतिश्रीमंत लोकांची, आलिशान गाडय़ांची वर्दळ सुरू असते. आतलं भपकेबाज वातावरण बाहेरूनही जाणवतं. हॉटेलच्या बाजूच्या कम्पाऊंड वॉलच्या आडोशाला एक वृद्ध, चपला शिवायचं काम काम करीत असतो. नारायणकाका म्हणतात त्यांना. तेथेच भाकर खातात. अंधार पडायला लागला की आपलं सामान घेऊन चालू पडतात. अतिशय आनंदी, उत्साही असतात. प्रत्येकाशी प्रेमाने बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावर मी कधीही दु:ख, निराशा अशा भावना पाहिल्याच नाहीत. माझी नि त्यांची दोस्तीच आहे. फिरायला जाताना मी पाच मिनिटं तरी त्यांच्याशी बोलतो. खूप छान वाटतं. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलिशान गाडय़ांमधून येणाऱ्या चेहऱ्यावरचं गांभीर्य, कधी श्रीमंतीची मस्ती वागवत येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि यांच्या चेहऱ्यावरचे शांत, तृप्त भाव यातला विरोधाभास मला नेहमी जाणवतो. त्या दिवशीची गोष्ट. एका कॉन्फरन्सनंतर दुपारचं चमचमीत बुफे जेवून मी आलो होतो. पाय मोकळे करण्यासाठी आणि जेवणानंतर हलकं वाटावं म्हणून चक्कर मारायला निघालो. सवयीप्रमाणे नारायणकाकांजवळ थांबलो. तेही नुकताच भाकरतुकडा खाऊन बसले होते. मला बघून प्रसन्न हसले. निवांत होते म्हणून विषय काढला. ‘‘काका, नेहमी इतके आनंदी कसे असता हो.?’’ ते पुन्हा हसले म्हणाले, ‘‘साहेब आनंद मानण्यावर असतो. आणि या मानण्याची मनाला सवय लावावी लागते. प्रत्येक क्षणाला आपल्याला आनंद मिळत असतो कुठल्या ना कुठल्या रूपात. आपण तो जाणवून घेऊन त्याबद्दल कृतज्ञ असायला हवं. आता आपलं पोट भरलंय त्याबद्दल नशिबाचे आभार मानायला हवेत. मला या भिंतीला टेकायला मिळतंय, आभार मनात यायला हवेत. वर तरटाचं छप्पर आहे. र्अध शरीर का होईना सावलीत आहे. कृतज्ञता मनात यायला हवी. तुम्ही आपुलकीनं बोलायला थांबला, तुमच्याबद्दल कृतज्ञता वाटली. माझं हे सकाळपासून रात्रीपर्यंत असंच मनात सुरू असतं. या क्षणी काय काय छान घडतंय ते जाणवायला हवं अन् त्याची जाणीव ठेवायला हवी. आतून आनंद वाटत राहतो सारखा. आणि प्रत्येक क्षणी काहीतरी चांगलं घडत असतंच. असतं की नाही? त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आता माझ्या अंगावर वाहनांचा धूर येतो, धूळ उडते. मी तिकडे लक्ष देत नाही. इथून वर जो आकाशाचा निळाशार तुकडा दिसत राहतो ना, एखादा पक्षी दिसतो, रस्त्यावरचं एखादं मूल आपल्याच नादात मस्त चालत जातं याच्याकडे पाहत राहतो. आणि हे सगळं दिसतं त्याने मनाला आनंद होतो याबद्दल नशिबाचे आभार मानतो. आणि चपला, बूट शिवताना, मनापासून शंभर टक्के त्यातच लक्ष देतो आणि पुन्हा मनातल्या मनात त्या लोकांचे आभार मानतो, की यांनी काम दिलंय म्हणून आपल्याला पोटाला मिळतंय. मनाला सवयच झालीय.’’ नारायणकाकांना काय म्हणायचं होतं ते माझ्या लक्षात आलं होतं. अनेक तज्ज्ञांनी अनेक युगं जे सांगितलं होतं ते नारायणकाका क्षणोक्षणी जगत आले होते. सुखाच्या, आनंदाच्या प्राप्तीच्या वाटेवरचं पहिलं सूत्र जणू सांगितलं होतं. कृतज्ञता बाळगा प्रत्येक क्षणी, आपल्या आसपास काहीतरी चांगलं घडत असतंच त्याबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगा. कृतज्ञतेच्या भावनेत विलक्षण ताकद असते.

नेहमी आनंदी व्हायचं आणि राहायचं असेल, खऱ्या अर्थाने समाधानी व्हायचं असेल तर मनात काही बीजं पेरायला हवीत. सकारात्मक विचारसरणी नुसता सकारात्मक विचार करून अमलात आणता येत नाही. कारण मग ती फार काळ टिकत नाही त्यासाठी आपल्या आत काही गुणवत्ता निर्माण करायला हव्यात. त्यातली पहिली गुणवत्ता म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेची भावना अंत:करणात रुजवायची असेल तर आपल्याला प्रथम आत्ता या क्षणी घडत असलेल्या सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं. फोकस करायला हवं. आणि नकारात्मक गोष्टी दुर्लक्षित करायला हव्यात. म्हणजेच ग्लास अर्धा भरलेला आहे यावर लक्ष द्यायला हवं. अर्धा रिकामा आहे याकडे दुर्लक्ष करायला हवं. जे घडतंय त्यात चांगलं काय आहे ते पाहायला हवं. हे एकदा जमलं की कृतज्ञ कशाबद्दल राहायचं हे कळू शकेल. नारायणकाकांनी अंगावर येणारा धूर आणि धूळ याकडे लक्ष न देता, दिसणारा आकाशाचा निळाशार तुकडा, टेकायला मिळालेली भिंत, रस्त्यातून चाललेली निष्पाप मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य यावर लक्ष केंद्रित केलं. एकदा हे जमलं की कृतज्ञ नेमकं कशाबद्दल राहायचं हे कळू लागतं.

कृतज्ञतेच्या सरावासाठी – काही प्रश्न स्वत:ला रोज सकाळी विचारू या – माझ्या आयुष्यात सध्या काय चांगलं चाललंय?

आजचा दिवस आनंदी जावा यासाठी मी काय काय करू शकतो? मी अशा काही गोष्टी आज करू शकतो का की ज्यायोगे मला आनंद मिळेल आणि दुसऱ्यालाही मदत होईल?  आसपास जे घडतंय त्यात चांगलं काय घडतंय हे वेचण्याची, पाहण्याची मनाला सवय लावणं.  आयुष्यात जे चांगलं घडेल त्याचं मनापासून स्वागत करणं. त्याचा असोशीने आनंद घेणं. आयुष्य हा एक आनंदमय चमत्कार आहे एकूणच सगळं यच्चयावत सजीव निर्जीवाचं ‘अस्तित्व’ ही एक वैश्विक प्रक्रिया आहे आणि आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत याचा आनंद वाटायला हवा. अल्बर्ट आईन्स्टाईननं म्हटल्याप्रमाणे ‘There are two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle.’ आपण हा आनंदमय चमत्कार मानायला हवा.  लहान लहान गोष्टींमध्ये, यशामध्ये भरपूर आनंद मानणं- घर घेतलं, पगार वाढला, मुलगा इंजिनीअर झाला, भौतिक समृद्धी आली या आनंद देणाऱ्या मोठय़ा गोष्टींमध्ये आनंद मानावाच परंतु रोज सहज घडणाऱ्या लहान लहान गोष्टी एन्जॉय करायला शिकाव्यात. उदाहरणार्थ बदलणारे निसर्गाचे रंग, वाऱ्याची मंद झुळूक, आपल्या आसपासची माणसं, त्यांच्या आयुष्यातले छोटे मोठे आनंद.

दु:ख, निराशा, अपयश येणार आहेतच पण तोही आपल्या वाढण्याचाच भाग आहे, एक दार बंद झालं तरी दुसरं उघडेलच असा ठाम विश्वास असला की आयुष्य सोपं होतं.  आयुष्य छोटं आहे, कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. हे कटू सत्य आहे. त्यातील लक्षार्थ लक्षात घेतला तर हे वाक्य अशुभ वाटणार नाही. आता या लहान आयुष्यातला पहिला महत्त्वाचा क्षण म्हणजे आपला जन्म तर घडून गेला आहे. दुसरा महत्त्वाचा क्षण म्हणजे शेवटाचा. जन्म आणि मृत्यू या दोन महत्त्वाच्या क्षणांमधलं आपलं आयुष्य आनंदी घालवायचं तर मिळणारा प्रत्येक क्षण साजरा करायला हवा. हे समजून घेतलं की कृतज्ञतेनं मन भरून येईल.

आयुष्य आनंदी होण्यासाठी जे गुण, ज्या भावना आपल्यात रुजायला हव्यात त्यात अस्तित्वाप्रति, जे जे मिळतंय त्याप्रति कृतज्ञता वाटणं हे प्रथम आहे. त्यानंतर या मार्गावर साक्षीभाव जोपासणं, माइंडफुलनेस, अहंकाराचं निर्मूलन, सकारात्मक दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थाने विकास, इच्छाशक्तीचा विकास, स्वत:वर प्रेम करणं वगैरे बरेच सोपान आहेत.

व्यक्तीमध्ये संपूर्ण सकारात्मक परिवर्तन घडू शकतं. Neuroplasticity concept याला दुजोरा देते. फक्त हे करण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. फक्त लक्षात घ्या… Happiness cannot be traveled to, owned, earned, worn or consumed. Happiness is the spiritual experience of living every minute with love, grace, and gratitude. – Denis Waitley

– डॉ. विद्याधर बापट

vidyadharbapat2002@gmail.com

chaturang@expressindia.com

(लेखक मानसतज्ज्ञ/ ताणतणाव नियोजनतज्ज्ञ आहेत.)