मराठी भाषा दिन आपण नुकताच साजरा केला.. आपल्याला खूप खूप शुभेच्छा, थोडय़ा उशिरा पण तरीही..! २७ फेब्रुवारीच्या सकाळपासूनच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आणि ‘फेसबुक’वर एवढे शुभेच्छा संदेश आले की बापरेच (उगाच असंही वाटलं की, प्रत्येक मेसेजमध्ये कुसुमाग्रजांची एक एक कविता असती तर किती मज्जा आली असती.. असो.) पण इतक्या मेसेजेस आणि पोस्ट्सवर आपल्या ‘माय’ मराठीचा अभिमान आणि ‘त्या’ इंग्रजीचा तिरस्कार बघून वाईट वाटलं..

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना तर रीतसर ‘टारगेट’ केलं गेलं. गंमत अशी की, मी स्वत: इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहे, पण शिशू वर्गापासूनच घरात मराठी मुळाक्षरांचा तक्ता असल्यामुळे मराठी आपोआप (आणि मातृ मेहनतीमुळे अर्थात!) कधी शिकले ते कळलंच नाही- लिहायला आणि वाचायला. बोलत तर होतोच ना! घरात आपण मराठीच बोलतो, आजी-आजोबा, काका-काकू गाणी, गोष्टी बहुतेक वेळा मराठीतच सांगतात. शिवाय भरपूर पुस्तकं वाचायला मिळाल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन मराठीत मागे राहिले असं कधीच झालं नाही. ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘ठकठक’वरून यथासांग ‘ययाती’पर्यंत नीट प्रवास झाला. कुठल्या भाषेत मुळाक्षरं किती आणि उच्चार कोणाचे सोपे असा वाद न घालता शेरलॉक होम्सचा मराठी भा. रा. तांब्यांचा अनुवाद आणि भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेमध्ये गुंतून गेले.

supriya sule ajit pawar baramati latest news
“…तर अजित पवार मलाच मतदान करतील”, सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, “माझा मराठीतला कार्यअहवाल…!”
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

फरक एवढाच की, हे सगळं इतकं सहज होत असताना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा शाळेत बऱ्यापैकी शिकता आल्या. (तसं मराठमोळ्या घरी मराठीची गोडी लावणं हे ओढूनताणून इंग्लिश शिकवण्यापेक्षा सोपं असेल ना?) जरी बोलायचा आत्मविश्वास यायला थोडा वेळ लागला तरी पुढच्या आयुष्यात- उच्चशिक्षण, नोकऱ्या इत्यादीमुळे नवी शहरं, देश बदलताना, नवे मित्र-मैत्रिणी करताना आणि अनेक गडबड प्रसंगांना तोंड देताना या दोन भाषा येण्याचा फायदा झाला. (भले दिल्लीत माझ्या हिंदीची खिल्ली उडवली असेल किंवा लंडनमध्ये इंडियन इंग्लिश बोलताना सुरुवातीला अवघडल्यासारखं होतं, पण समोरच्यापर्यंत आपण पोहोचतो हे किती छान असतं.) पुढे जाऊन थोडं फ्रेंच आणि जुजबी मल्याळम (हां तेच, ज्याला आपण बिन्धास उपहासाने केरळी किंवा आंडू गुंडू म्हणतो, पण खरं तर धमालच भाषा आहे) पण जमवलं.

हे एवढं पाल्हाळ लावण्याचा मुद्दा एवढाच की, दुसऱ्या भाषांचा तिरस्कार व द्वेष करून आपली भाषा पुढे जाईल हा विचारच पटत नाही. मराठीला ‘रेटण्यासाठी’ इंग्लिशला ‘खेचून’ उपयोग नाही. शाळा कुठल्याच बंद व्हायला नकोत- ना हिंदी, ना मराठी, ना उर्दू आणि ना इंग्रजी. पण कदाचित त्याहून जास्त महत्त्वाचं आहे त्या शाळांमध्ये दिलेलं शिक्षण, त्याचा दर्जा, तिथं तयार होणारे विद्यार्थी आणि घडणारे देशाचे नागरिक. सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे की, वेगवेगळ्या संशोधन अहवालानुसार आपल्या विद्यार्थ्यांना ना इंग्रजी धड येतंय, ना मराठी. अगदी ५ वी-६ वीपासून ते पदवीपर्यंत त्या त्या पातळीचे मुलांना लेखन-वाचन जमत नाहीये. त्यामुळे आधी शिक्षणाचा दर्जा, मग तो कुठल्याही भाषेत असो, सुधारल्याशिवाय अभिजात संस्कृतीचं रक्षण, संवर्धन वगैरे होणं खूपच कठीण. आणि प्रश्न फक्त महापालिका वा जिल्हा परिषद शाळांचा नाहीये. उच्चभ्रू शाळांमध्ये मराठी ‘कम्पलसरी’ केल्यानंतर किती विद्यार्थी मोजून ५ मिनिटं तरी मराठी बोलू शकतात? किंवा पानभर मराठी लिहू शकतात? म्हणून मराठीला बाद करा, असं नाही पण खरंच शिकवल्या आणि शिकल्याशिवाय त्या उद्योगाला फारसा अर्थ नाही, आणि तसं करून ती टिकेल असं तर नक्कीच वाटत नाही.

भाषेचा मूळ उद्देश आपले विचार व भावना समोरच्यापर्यंत पोचते करणे (आणि क्वचित स्वत:पर्यंत सुद्धा!). व्यक्त होण्याकरिता माणसाला भाषेचा खूप उपयोग करता येतो. त्या अनुषंगाने विचार केला तर जेवढय़ा भाषा येतील तेवढं चांगलंच. ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात इरफान खानचं कॅरेक्टर समोर कोण आहे त्याप्रमाणे अत्यंत नैसर्गिक बंगाली, पंजाबी आणि हिंदी बोलतो. कोंकना सेनप्रमाणे आपल्यालाही त्याचं कौतुकच वाटतं आणि त्यात काही गैर तर नक्कीच वाटत नाही. याच्याविरोधात असाही युक्तिवाद दामटला जातो की, युरोपमधले अनेक देश, जपान, चीन आणि अनेक यशस्वी माणसांनी कधी ‘आपली’ भाषा सोडली नाही आणि त्यांचं कधी कुठे अडलं नाही. ते खरंही असेल आणि त्याची कारणमीमांसा करावी लागेल, पण एखादी भाषा जास्त येण्यामुळे कोणाचं अडलं हे तर नक्कीच कुठे ऐकलं नाहीये. शिवाय इंग्रजी (आणि आता फ्रेंच आणि जर्मनसुद्धा) बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये जाऊन आपले डॉक्टर, इंजिनीयर, बँकर, नाव आणि पैसा कमवतच आहेत. आपल्याला त्यांचं, (ब्रेन ड्रेनला reverse colonisation म्हणून) कौतुकच वाटतं. तिथं चांगलं इंग्रजी येण्याचे फायदे आपले असंख्य हुशार विद्यार्थी सांगू शकतील- भारतीयांना टीचभर जास्त भाव आपल्या अस्खलित इंग्रजीमुळे हे नाकारू शकत नाही. मग हे मराठी वाचवण्याचं शिवधनुष्य आपल्या गल्लीबोळातल्या दुकानदारांच्या पाटय़ांनीच पेलायचे का? (तसंही आपला व्यापारी वर्ग, मग तो कुठल्याही भाषा, धर्म व शहरातला असो, तो त्या त्या जागेची आणि त्याच्या सगळ्या ग्राहकांची भाषा बोलतच असतो.) असो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की, पूर्णपणे व्यावहारिक दृष्टिकोन आणि उपजीविकेचं साधन म्हणून भाषेकडे पाहिलं तर इंग्रजीमध्ये ” more is merrier ” (म्हणजे जितक्या जास्त तेवढय़ा उत्तम) या म्हणीला दुजोरा दिला पाहिजे. भाषेचा दुसरा आणि माझा  खूप जिव्हाळ्याचा ‘रोल’ हा साहित्यिक, सांस्कृतिक व सृजनाचा आहे. चारोळ्यांपासून ते ग्रंथांपर्यंत भाषा आपल्याला मानवी मनाचे किती तरी कंगोरे दाखवते- कधी लय, कधी लकेर, कधी कविता, कधी उपहास, कधी खूप खोल, तर कधी फक्त खुसखुशीत शाब्दिक खेळ. किती तरी भाषांच्या किती तरी लेखकांनी त्यांचे विचार आणि जाणिवा लिहून ठेवल्यामुळे आपलं अनुभवविश्व, आपलं ‘असणं’ अधिक समृद्ध केलं आहे (म्हणून तर कुसुमाग्रजांच्या जयंतीला भाषा दिनाचं औचित्य योग्य वाटतं ना?) मराठीत तर साहित्य समृद्ध आहेच आणि काही मैलांवर बदललेल्या बोलीभाषेतसुद्धा भरपूर लेखन झाल्यामुळे भाषेच्या आस्वादाची आणखीनच मज्जा येते. नुसतीच रंगत म्हणून नाही तर अनेक वेळा काही अनुभव ठरावीक बोलीभाषेतूनच पूर्ण अर्थ पोचवू शकतात- मग ती ढसाळांची कविता असो किंवा प्रकाश नारायण संतांचे कर्नाटकी मराठी. अजूनही खूप उदारहणं देता येतील, पण विषय तो नाही, इतकंच मराठी भाषेची लज्जत आणि पोच पुण्या-मुंबईच्या भरपूर पुढे आहे आणि प्रत्येक ठिकाणची तितकीच महत्त्वाची आहे. पण असं म्हणणं की हे सर्व फक्त मराठीत आहे तर ते चुकीचंच होईल ना. मग वेगवेगळ्या भाषांमधलं उत्कृष्ट साहित्य एक तर अनुवादामार्फत आपल्यापर्यंत येतं (आणि आपलंसुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये पोहोचतं). त्यामुळे किमान अनुवादकाला तेवढय़ा भाषा अवगत असणं गरजेचंच. किंवा आपल्याला ज्या मोजक्या भाषा येतात (आता सगळेच थोडी ना नरसिंह राव असतात, सोळा भाषा यायला!) त्या त्या भाषांमधील साहित्य, नाटक, चित्रपट यांचा आपण आनंद घेतो. शेक्सपिअरची मजा विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’मध्ये तर असतेच (कारण ते नाटय़ भारतात घडत असतं.) पण खुद्द ब्रिटिश कलाकार Benedict Cumberbatchच्या ‘हॅम्लेट’चं थेट प्रक्षेपण ‘एनसीपीए’मध्ये पाहताना अंगावर काटा येतोच. पाब्लो नेरुदाची कविता असो की अल्बर्ट कामूचं लिखाण, कोणी तरी आपल्यासाठी इंग्रजीत आणलं म्हणून अनुभवलं. त्याच वेळेला पृथ्वी थिएटरमध्ये विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’चा अनुवाद अलेक पदमसीला सादर करताना बघून वेगळाच आनंद होतो. काही लेखकांनी मातृभाषेत लिहिलं, काहींनी दोन भाषांमध्ये लेखन केलं. अनुवादकांचे तर आपण ऋणीच असलं पाहिजे. इथंसुद्धा एकापेक्षा दुसरी भाषा वरचढ अशी चढाओढ नसून जेवढय़ा जास्त लेखनाचा आपण आनंद घेऊ शकतो तेवढं आपल्याच कक्षा रुंदावल्याचं दिसतं.

माझे आजोबा मराठीमध्ये कविता करीत व त्यांचे मोठे भाऊ, म्हणजे माझे मोठे आजोबा, इंग्रजीचे शिक्षक, संडे स्टॅण्डर्ड नावाच्या साप्ताहिकात उपसंपादक व इंग्रजीचे सखोल अभ्यासक. त्या दोघांच्या अनेकानेक गप्पा ‘सेशन्स’मध्ये खूप सारे विषय यायचे, पण कुठली भाषा श्रेष्ठ अशी साधी चर्चा पण मी ऐकली नाही. आजोबांच्या मराठी कविता पाठ करून घडाघडा म्हणून दाखवल्या की त्यांची शाबासकी आणि रात्री मोठय़ा आजोबांबरोबर ‘खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार – आजोबा, मैं और Wren and Martin (व्याकरणाचे बायबल)’ अशी परिस्थिती. प्रॉब्लेम कुठेच नाही.

त्याच शालेय वयात असताना माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या बाबांनी मला समजावलं होतं, ‘बघ बेटा, आपलं संगीत ऐकताना आपण तल्लीन होऊन डोकं हलवतो, मात्र ती पाश्चात्त्य गाणी (धांगडधिंगावाली) ऐकून फक्त पाय थिरकतात. म्हणून लक्षात आलं ना काय मोठं?’ मी नंदीबैलासारखी मान डोलावली. पुढे काही वर्षांनी लक्षात आलं की आपलं शास्त्रीय संगीत ऐकून जे होतं तेच पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत ऐकूनही होतं- मग ते पियानो असो किंवा संपूर्ण ऑर्केस्ट्रा आणि आपली ठसकेबाज लावणी, नौटंकी असे प्रकार बघून तेच होत जे मायकेल जॅक्सनच्या कॉन्सर्टला- म्हणजे खूप नाचावंसं वाटणं. तर हा पाश्चिमात्य किंवा जे आपलं नाही ते सगळं कसं दुय्यम आणि आपलं तेवढं ते कसं सकस, सांस्कृतिक, अभिरुचिसंपन्न हा पोकळ पण प्रचंड पॉवरफुल व यशस्वी प्रयोग खूप वर्षांपासून चालू आहे. त्याला आपण आणखीन किती दिवस बळी पडणार? मराठी आपल्याशिवायसुद्धा नीट तरेल अशी मला खात्री वाटते. मी एवढय़ातच वेगवेगळ्या कठीण परिस्थितींना सामना देऊन नेटाने लिहिणाऱ्या मराठी लेखिकांविषयी लिहिलं. त्यांचं काम, कष्ट, जिद्द आणि सृजन प्रेरणादायी तर होतंच पण त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेक धडपडय़ा, संवेदनशील युवांच्या हातात मराठी सुरक्षित राहील, असा विश्वास वाटतो. पण मराठीला जर खरंच जपायचं असेल, तर प्रथम दुसऱ्या भाषांचा तिरस्कार- मग तो आंडू गुंडू म्हणून असो किंवा इंग्रजी शिकण्यावर ‘पी जे’ मारून असो- बंद केला पाहिजे.

खूप मराठी बोलू या, लिहू या, वाचू या – समजून, अभ्यासून आणि त्याची मजा घेऊन! सकस अनुवाद करू, दुसऱ्या भाषांमध्ये देवाणघेवाण चालू ठेवू. कुणाला माहीत एलकुंचवारांनी शेक्सपिअरला वऱ्हाडी ठसक्यात उतरवलं, चंद्रकांत कुलकर्णीनी ते पुन्हा पेललं तर ‘वाडा चिरेबंदी’सारखी शेक्सपिअरीयन ट्रॅजेडीवर भयंकर अंगावर येणारी कलाकृती आपल्यापुढे येईल. नुसता विचार करूनच मस्त वाटलं. त्याला ना शेक्सपिअरची हरकत असेल, ना आपल्या मराठमोळ्या शिवसेनेची. तर अभिमानाचं जाऊ  दे, मनापासून जीव लावा माय मराठीवर. तिला आपली नाही, आपल्याला तिची जास्त गरज आहे म्हणून!

प्राची पिंगळे

prachi.pinglay@gmail.com

chaturang@expressindia.com