अंक पहिला : २०१३ मध्ये एके दिवशी अचानक चंदू कुलकर्णीचा फोन आला. मी ‘हॅलो’ म्हणायच्या आतच त्याने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे भरभर बोलायला सुरुवात केली, ‘‘हे बघ! आपल्याला एक फार उत्तम संधी मिळत्येय, तर तू नाही म्हणू नकोस, म्हणजे निर्णय तुझाच आहे, पण हो म्हण, कारण हे नाटक आपल्याला करायचंय. आता सांगतोय ते नीट ऐक. आपण ‘शांतता कोर्ट चालू आहे’ करतोय, तेंडुलकरांना ट्रिब्युट म्हणून. ‘एव्हरेस्ट’ निर्माता असणार आहेत आणि तू बेणारेची भूमिका करायची आहेस. बरं, मग मी हो समजू?’’

मी-  ‘‘अरे पण!’’

चंदू- ‘‘अगं, आपण काही खूप तालमी वगैरे करणार नाही आहोत, व्हिडीयो शूटिंग आहे, त्यामुळे काही दिवस वाचन करून ब्लॉकिंग केल्यावर शूटिंग करायचंय. तुझं पक्कं समजतो! वाचनाची तारीख कळवतो. ठेवू फोन?’’

हो – नाही म्हणायच्या आतच चंदूने फोन ठेवला. त्याच्या फोननंतर मी तशीच उभी होते, स्तब्ध!

‘मी ही भूमिका पेलवू शकेन? माझ्यात तेवढी

अभिनयक्षमता आहे? कु. बेणारे ही भूमिका सुलभा मावशीने अजरामर केली आहे, माझी तेवढी लायकीच नाही आणि हे शूटिंग तेही डीव्हीडीवर. म्हणजे आपण गेल्यावरही ती डीव्हीडी राहणार.’ या सगळ्या विचारांनी डोकं भणभणायला लागलं. त्या नाटकाचं, भूमिकेचं दडपण आलं होतं, इतकं की पोटात गोळा वाढू लागला.

दुसऱ्या दिवशी ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ची प्रत चंदूने माझ्या घरी पाठवून दिली. आतल्या पानावर लिहिलं होतं ‘कु. बेणारे- रेणुका’. पोटातला गोळा अधिकच वाढला. मी ते नाटक वाचलं नव्हतं की पाहिलं नव्हतं. फक्त एवढंच ऐकलं होतं की, अभिनयात मैलाचा दगड म्हणजे सुलभा मावशींची बेणारे!

मी नाटक न वाचायचं ठरवलं. नाटकाचा संपूर्ण संच आणि विशेष करून कर्णधार चंदूचा नाटकाबद्दल काय दृष्टिकोन आहे ते पाहायचं ठरवलं. त्यामुळे नाटकाच्या वाचनाला अगदी कोरी पाटी बनून गेले. पहिल्या वाचनातच नाटक मला सुन्न करून गेलं. २०व्या शतकातलं हे नाटक २१व्या शतकातही किती प्रासंगिक आहे याची जाणीव झाली. आपल्या मध्यमवर्गीय समाजातल्या ‘सुसंस्कृत’ माणसांची समाजमान्य विकृती उघड करणारं नाटक. सगळ्याच व्यक्तिरेखांमधले बारकावे जणू काही एका मानसशास्त्रज्ञांनी टिपलेले. तेंडुलकरांची बेजोड भाषा आणि कु. लीला बेणारे हिचं नाटकात हळूहळू घडवून आणलेलं चारित्र्यस्खलन आणि भीषण कुचंबणा यांनी माझं हृदय हेलावून गेलं. या तीन अंकी नाटकात समकालीन परिस्थितीचं अचूक जीवनदर्शन घडवून आणलंय तेंडुलकरांनी.

‘‘आयुष्य कुणासाठी नसतं. ते स्वत:साठीच असतं, असलं पाहिजे.’’

अंक दुसरा : शूटिंग केवळ दोन दिवसांत आटपायचं होतं. पहिल्या दिवशी रंगमंचावर आधी ब्लॉकिंग करून मग तांत्रिक तालीम करायची होती नि दुसऱ्या दिवशी नाटकाचे चित्रीकरण. व्हिडीयो शूटिंगचं दिग्दर्शन करण्यासाठी मंगेश कदमला नेमलं होतं. चंदूने सगळी नट मंडळी चोखंदळ पद्धतीने निवडली. हो, सगळे सज्ज होते. शूटिंग सुरू होण्याची भीती-मिश्रित उत्सुकता वाटत होती. एखाद्या पात्राला शोभेल अशी रंगभूषा, वेशभूषा व केशभूषा केल्यानंतर त्यात खऱ्या अर्थाने परकाया प्रवेश केल्यासारखा वाटतो. माझ्या बदललेल्या रूपाकडे आरशात पाहात मी स्वत:ला ताकीद दिल्यासारखं बोलले, ‘‘कु. लीला बेणारे!’’

शूटिंग सुरू झालं. पहिल्या सीनमध्ये बराच वेळ बेणारे आणि सामंत बोलत असतात. त्यात नाटकाची लय प्रस्थापित होते. लगेच लक्षात येतं की, वरवर आत्मविश्वासाने भरलेली ही खेळकर बेणारे आत, खूप खोल काही तरी लपवून ठेवत आहे. तिच्या आयुष्यात बरीच वादळं येऊन गेली असावीत याचा अंदाज या पहिल्याच सीनमधून प्रेक्षकांना लावता येतो. नाटक करताना मात्र आम्हाला लक्षात यायला लागलं होतं की, अशा नाटकासाठी जितक्या तालमींची गरज असते तितकी आम्ही केली नव्हती. हे नाटक अगदी आतपर्यंत मुरून करण्यात जी परिपक्वता आली असती ती शूटिंगच्या तांत्रिक गरजांमुळे थांबून थांबून करायला लागल्यामुळे आम्हा कुणाच्याच अभिनयात दिसत नव्हती. या दुसऱ्या अंकात जसा बेणारेचा गोंधळ वाढत जातो तसाच गोंधळ एक अभिनेत्री म्हणून माझा होत होता. सतत वाटत होतं की, घाई होतेय, पण इलाज नव्हता. आम्ही त्या लुटपुटीच्या खटल्यात बेणारेसारखेच अडकलो होतो. दुसऱ्या अंकाच्या शेवटाला जशी त्या खोलीला बाहेरून अनाहूतपणे कडी लागते आणि बेणारे त्या कोर्टाच्या पिंजऱ्यात अडकते काहीशी तशीच परिस्थिती आम्हा नटांची झाली होती. दुसरा अंक संपता संपता बराच उशीर झाला होता आणि करायला कठीण असलेल्या तिसऱ्या अंकासाठी खूप कमी वेळ उरला होता.

अंक तिसरा : तिसऱ्या अंकात बेणारेच्या लक्षात येतं की, वरवर खोटय़ा, ‘गेम’ म्हणून चालू असलेल्या या खटल्यात ती भुकेल्या वाघासमोर सापडलेल्या हरणीसारखी आहे. त्या कोर्टातून बाहेर पडावंसं वाटलं तरी ते शक्य नाही याची जाणीव तिला एकदम गप्प करते. तिचं कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देणं हेच तिचं प्रतिकाराचं सगळ्यात शक्तिशाली साधन असतं; पण जसं तिच्याभोवती जाळं घट्ट होत जातं आणि तिला विचारलेले प्रश्न अधिक खासगी आणि भयावह होत जातात, तशी हळूहळू तिची ताकद कमी होत जाते. ती कुठल्याच प्रकारचा प्रतिकार करत नाही, तिचा आत्मविश्वास ढेपाळतो आणि ती पूर्णपणे हताश होते. एका जखमी हरणीसारखी निपचित पिंजऱ्याच्या कोपऱ्यात कोलमडून पडते. तिच्या गप्प राहण्याने इतर पात्रांना अजूनच चेव येतो. ते तिला अधिक डिवचतात, टोचून बोलतात, तिच्या खासगी आयुष्याची लक्तरं काढतात आणि त्यांचा आसुरी आनंद वाढतच जातो. शेवटी निकाल सुनवायच्या आधी न्यायाधीश बेणारेला तिची बाजू मांडायला निव्वळ १० सेकंद देतात. खटल्यामध्ये बेणारे काहीच बोलत नाही; पण प्रेक्षकांपर्यंत बेणारेच्या मनातलं वादळ ती एका स्वगतातून व्यक्त करते. त्या वेळी रंगमंचावर इतर पात्र फ्रीज झालेली असतात, जणू घडय़ाळाचे काटे त्या वेळेपुरते थांबलेले असतात.

ते संपूर्ण स्वगत खरं तर १० मिनिटांचे आहे. पण माझ्या हातात ते सादर करायला फारच कमी वेळ होता. जिथे आम्ही शूटिंग करत होतो त्या म्हैसूर असोसिएशनचे लोक आम्हाला लवकर आटपायला सांगण्यासाठी हालचाली करत होते.. टिक् टाक टिक् टाक ‘युवर टाइम स्टार्टस् नाऊ’..

‘हुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो. जगण्यातल्या वेदनेहून मोठा.’ ही अशी वाक्यं, या अशा भावना व्यक्त करायला मिळणं याला खूप मोठं भाग्य लागतं. ‘जीवन म्हणजे काहीच नाही असं काही तरी आहे किंवा काही तरीच आहे असं काहीच नाही.’

या एका स्वगतात तेंडुलकरांनी एका स्त्रीच्या इतक्या खासगी भावना एवढय़ा प्रामाणिकपणे मांडल्या आहेत, की जरी बेणारे पूर्ण वस्त्रात दिसत असली तरी भावनिकदृष्टय़ा पूर्णपणे निर्वस्त्र झाल्याशिवाय बेणारेचा अभिनय करणं शक्य नाही. काहीच पडदे ठेवून उपयोगी नाही, ना स्वत:पासून, ना प्रेक्षकांपासून! नो सिक्रेटस्! नो सेन्सॉर!

‘माय लॉर्ड! जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे.’ बेणारेची पीडा, तिची वेदना, त्या क्षणाला एक स्त्री म्हणून माझी झाली होती. तिचा राग, तिचे अनुत्तरित निष्पाप प्रश्न, तिला दु:ख देणारे नेभळट पुरुष, नैतिकता, पुरुषप्रधान समाजाला तोंड वेडावून दाखवणारी एकटी स्त्री, जीवनाने रसरसलेली, टुकार संस्कृतिरक्षकांच्या कचाटय़ात सापडलेली, ती स्त्री, बेणारे, मी झाले होते. माझ्या आजूबाजूला ते विकृत सगळे, सोवळ्याचं सोंग पांघरणारे, ना जगू देत होते, ना मरू देत होते!

.. स्वगत संपलं. रंगमंचावरचे १० सेकंद संपले होते. न्यायाधीशांकडून दंड सुनावला गेला. नाटक संपलं. नाटकात बेणारे वगळता इतर पात्रं आवराआवर करत त्या बीभत्स कोर्टाचा प्रकार चट्कन विसरून जातात तसेच आमच्या संचातले सहकलाकार, दिग्दर्शन व निर्मितीच्या संचातले गुणी रंगकर्मी एकमेकांचं अभिनंदन करत होते, नेपथ्याचे खिडकी, दरवाजे पाडू लागले होते. मी मात्र सुन्न होते. मला एक स्त्री म्हणून खूप काही बोलायचं होतं. माझा अव्यक्त राग मी कुठे काढू, असा प्रश्न सतावत होता. बेणारेचं स्वगत मला अपुरं वाटत होतं. एक कॅथार्सिस नाही मिळाला. उलट अस्वस्थपणा वाढला. त्याला कारण आहे आपला समाज. आजही २०१७ मध्ये हे नाटक तितकंच प्रासंगिक वाटण्याचं कारण आपल्या समाजातल्या काही न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आपण आजूबाजूला बघून तेंडुलकरांची वाक्ये आठवू या-

‘‘हे विसाव्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसत आहेत ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत.’’

खरंच आजूबाजूला बघू या! तेच ते. तसंच! रात्री ९ वाजता प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधे नीतिमत्तेचा पाठ पढवणारे, स्वत: न्यायाधीश असल्यासारखे रोज कुणा नवीन अपराधीला दंड सुनावणारे कर्कश ‘पत्रकार’, सर्वत्र पसरलेले धर्मरक्षक, हिंसक देशप्रेमी, संस्कृतिरक्षक, राक्षसी, भ्रष्ट राजकारणी, एकमेकांच्या घरी काय शिजतंय, कोण कोणाशी लग्न करतोय यात नाक खुपसणारे समाजरक्षक, जात व धर्माचा झेंडा हातात धरून राष्ट्रीय एकता आणि अखंडतेची उदात्त स्वप्न पाहणारे, आपलेच लोक दिसतात. एखादी आधुनिक विचारांची व पेहराव्याची सुशिक्षित, बुद्धिमान स्त्री दिसली की तिच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे, स्वत: हवी तेवढी पापं करून स्त्रियांना मात्र पाप-पुण्याचे धडे देणारे गलिच्छ लोक; समाजमाध्यमांमधून स्त्रीच्या चारित्र्यावर हमला करून भ्याडपणे पळ काढणारे ‘ट्रोल्स’ सगळीकडे निर्भीडपणे वावरत आहेत. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ म्हणूनच समकालीन आहे. तेंडुलकरांच्या दूरदृष्टीला सलाम! पण ही अशीच परिस्थिती २२व्या शतकात तरी नसावी. हा रोजचा विकृत कोर्ट थांबला पाहिजे. आता पीडित, बलात्कारित स्त्रियांना जाब विचारणाऱ्या, तिलाच दोषी ठरवणाऱ्या दुटप्पी लोकांची वेळ संपायला हवी.. टिक् टाक टिक् टाक. ‘टाइम इज अप!’

रेणुका शहाणे

renukash@hotmail.com