कवी मंगेश पाडगावकर यांनी साठहून अधिक वर्षे काव्यलेखन केले. ‘धारानृत्य’ (१९५०) पासून सुरू झालेला त्यांचा काव्यप्रवास ‘अखेरची वही’ (२०१३) पर्यंत चालू होता. त्यात ‘जिप्सी’, ‘विदूषक’, ‘गझल’, ‘बोलगाणी’, ‘मोरू’ अशी काही वळणेही होती. सुरुवातीला तरल भावसंवेदन व्यक्त करणारी त्यांची कविता ‘सलाम’मध्ये उपहासाच्या रूपात सामाजिक-राजकीय वास्तवावर भाष्य करताना दिसते. प्रचंड लोकप्रियता आणि साहित्य अकादमी पुरस्कार, तसेच पद्मभूषण अशा सन्मानांमुळे मिळालेली राजमान्यता लाभलेली पाडगावकरांची कविता मराठी सांस्कृतिक परंपरेचे आकलन करून घेताना साहजिकच महत्त्वाची ठरते.

pooja sawant and siddhesh chavan performed satyanarayan pooja
लग्नानंतर पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा! बहिणीने शेअर केला खास फोटो
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

पाडगावकरांनी ‘जिप्सी’मध्ये काही प्रेमकविता लिहिल्या आहेत. पुढेही त्यांच्या इतर संग्रहांमध्ये ते स्त्रीचे भावचित्रण करीत गेले. त्यांच्या स्त्रीविषयक जाणिवा व्यक्त करणाऱ्या कविता एकत्रितपणे वाचू लागल्यावर त्यातून कविमनातील ‘स्त्रीप्रतिमा’ स्पष्ट होऊ लागते. पाडगावकरांच्या सौंदर्यवादी (रोमँटिक) वृत्तीचा ठसा या प्रतिमेतून कसा जाणवतो, ते पाहण्याजोगे आहे.

स्त्रीच्या अस्तित्वाने जाणवणारी संवेदना निसर्गस्पर्शाशी एकरूप होऊन कवीला कशी सतत सोबत करते,  याची अनुभूती अशा कवितांमधून उत्कटपणे येते.

स्त्रीचे प्रेयसी या रूपातील दर्शन घडवणाऱ्या अनेक कविता पाडगावकरांनी लिहिल्या आहेत. हे रूप म्हणजे ‘रतिप्रतिमा’ होय. पाडगावकरांच्या कवितांमध्ये प्रेयसी जिवंतपणे साकार झाल्याचा अनुभव काही कवितांमध्ये येतो. ‘मज नव्हते ठाऊक’ मध्ये प्रेयसी म्हणते,

‘‘क्षण पिसापरी हे शरीर हलके झाले

अन् लहरत तरळत वाऱ्यावर भुरभुरले!’’

प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाने हरखून गेलेली नकळत धीट बनलेली अशी प्रेयसी त्यांच्या प्रेमकवितांचे विश्व व्यापून राहिली आहे. ती ‘सुरंगा’ बनून येते. पिवळी किनार असलेली लाल साडी, अंगठीतला किरमिजी खडा, उंच टाचेचे बूट, लालचुटूक ओठ अशा तिच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक रंगीत पैलू त्यात रेखाटलेले असतात. ‘असे मोकळे हसल्यावर तू’ मध्ये ते लिहितात –

‘‘बर्फालाही सुचतात फुले

असे मोकळे हसल्यावर तू

सूर होऊनी आणि उमटती

कळकांतून वाऱ्याचे हेतू’’

येथे तिच्या ‘प्रेयसी’ असण्याला महत्त्व आहे. ‘प्रेम’ हे एक जगण्यातले संजीवक मूल्य आहे; ही सौंदर्यवादी कवीची धारणा आहे. त्यामुळे प्रेयसीच्या दर्शनानेही कसा त्याच्या जगण्याला परीसस्पर्श घडतो, हा अनुभव निसर्गप्रतिमांमधून येथे तरलपणे व्यक्त झाला आहे. ‘तू असताना’मध्येही कवीचे जगणे कसे कात टाकते, याचा अनुभव आहे. या अनुभवातील बंधमुक्ततेचा स्पर्श व्यक्त करण्यासाठी नक्षत्रांची डहाळी, चंद्राची होडी अशा पार्थिव जगापलीकडच्या प्रतिमा त्यात योजल्या आहेत.  ‘बोलगाणी’ या १९९० मधल्या संग्रहातही त्यांची ही दृष्टी टिकून राहिलेली दिसते. त्यात ते लिहितात,

‘‘मी तिला विचारलं, तिने लाजून ‘होय’ म्हटलं :

सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं!’’

चाकोरीबद्ध यांत्रिक जगण्याला नवतेची झळाळी देणारी प्रेयसी हीच त्यांच्या प्रेमगीतांमधली नायिका आहे. पाडगावकरांच्या प्रेमकवितांमध्ये ही प्रेयसी केवळ आभासात्मक पातळीवर वावरत नाही. ती सजीव असते. याचे कारण तिचा स्पर्श, तिचे शारीर रूप कवी नाकारत नाही. आपल्याकडे एकेकाळी प्रेमभाव व्यक्त करण्याबाबतचे सामाजिक निर्बंध लक्षात घेता कवीचा प्रेयसीला ‘हाडामासाची स्त्री’ या रूपात उभी करण्याचा पवित्रा लक्षात घ्यावा लागतो. बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर हे कवी त्यांच्या पार्थिवतेचा जयजयकार करण्याच्या वृत्तीमुळे त्या काळी लक्ष वेधून घेत होते. पाडगावकरांनी ‘जय जय हे पार्थिवते!’ ‘सुंदर आहे माझी वासना’ अशी कविता लिहिल्या आहे. त्यामुळे प्रेम या भावनेमागील नैसर्गिक अशी जगण्याची आसक्ती ते सहजपणे प्रकट करतात. त्या भोवतीचे पापाचे कुंपण त्यांना पटत नाही. त्यांची ‘ईव्ह’ (‘विदूषक’) ही कविता येथे आठवते. मात्र प्रेयसीच्या मिठीतच ‘स्वर्गीय’ आनंद कसा मिळतो, याचे प्रत्ययकारी वर्णन कवी करतो, ते असे :

‘‘संस्काराच्या पायऱ्यांवरून कोसळलो

आणि तुझ्या चिवट मिठीत घट्ट आलो;

ताठर ओलसर वक्षांवर फिरताच हात

कळ्यांची फुले झाली अंधारात..’’

स्त्रीच्या या रतिप्रतिमेमध्ये तिच्याविषयी जसे धुंद आकर्षण आहे, तसेच गूढ कुतूहलही आहे. ते कुतूहल तिच्यातील सर्जनशक्तीमुळे निर्माण झाले आहे. पाडगावकरांच्या कवितेतली स्त्री स्वत:च आपले व्यक्तिमत्त्व शब्दांकित करताना म्हणते.

‘‘मी चंचल होउनि आल्ये

भरतीच्या लाटांपरि उधळित जीवन स्वैर निघाल्ये

..

पाडगावकरांनी कवी या नात्याने स्त्रीच्या या सर्जनशक्तीविषयी स्तोत्रे लिहिली नाहीत.  तिच्या मानवी अस्तित्वासकट या अनुभवातील स्पंदने त्यांनी काही कवितांमध्ये टिपली आहेत. ते ‘आज’ या कवितेत ‘मातृप्रतिमेविषयी लिहितात :-

‘‘आज तुझ्या पावलांत

झाले भविष्य चकित

फलभारे जड झाला

निळा सोनेरी एकांत

आज तुझ्या रूपांतून

झाला अरूपाचा भास

उरी पहाटे आधीच

जाग आली प्रकाशास’’

पाडगावकरांच्या कवितेत संसारी स्त्रीची प्रतिमाही वास्तवदर्शी स्वरूपात रेखाटलेली आहे.

पाडगावकरांच्या अशा कवितांमध्ये मध्यमवर्गीय  चाळकरी कारकुनाच्या पत्नीच्या रुपातली स्त्री चित्रित झाली आहे. आपल्या मध्यमवर्गीय न्यूनगंडामुळे दुबळ्या ठरणाऱ्या पतीला ती आत्मविश्वास देते. त्याला ‘राजा’ असे म्हणून पुलकित करते. तिच्यामुळे त्याला त्याही अवस्थेत जगणे सुसह्य़ होत असते. पाडगावकरांच्या ‘विदूषक’, ‘मोरू’ अशा विविध संग्रहांमध्ये या प्रकारच्या कविता आढळतात. ‘हनिमून’ या कवितेत लग्नाला बारा र्वष होऊन गेली तरी हनिमूनला जाता न आलेल्या पत्नीचे समजूतदार रूप पतीच्या अस्वस्थतेला शांत करीत राहते.

सौंदर्यवादी दृष्टीतून चित्रण न करता कवी कधी लिहितो :

‘‘मी तुझी राधा प्रिया, तू सजण माझा शाम रे,

एक खोली, हा उकाडा, घाण वाटे घाम रे,

वाकले आकाश ताऱ्यांनी जरी चाळीवरी,

लागले डोके दुखू, हा उग्र भारी बाम रे’

(‘त्रिवेणी’)

कारकुनाची स्वप्ने, स्वप्नभंग, दिवास्वप्ने या साऱ्यांमध्ये त्याला साथ देणारी पत्नी त्याचे जीवन व्यापून राहिलेली दिसते. पाडगावकरांच्या या कविता त्यांच्या वाचकांच्या जीवनानुभवाला जवळच्या वाटल्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झालेल्या दिसतात. काही वेळा त्याच्यातल्या ‘मूकनायका’ला डिवचणारी कजाग बायको हेही तिचे रूप असते.

उदाहरणार्थ,

‘‘पुरुषासारखे पुरुष तुम्ही

सतत खांदे पडलेले,

थोडी तरी हिंमत दाखवा!’’

असे जेव्हा बायको म्हणते

तेव्हा ते मोरूला ऐकू कसे येणार?’’

अशी प्रसंगानुरूप भूमिका स्वीकारत संसार सांभाळणारी पत्नी पाडगावकरांच्या कवितांमध्ये ठळकपणे येते.

त्यांच्या ‘बोलगाणी’मध्येही  ‘गाणं घरच्या राजाचं’ मध्ये हाच सूर आहे –

‘‘चाळीतील दीड खोलीच

राजाचं राज्य असतं,

खोलीमधल्या नळाला

बहुत करून पाणी नसतं!

पण जेव्हा राजा म्हणतो,

काय म्हणतो?

‘‘लाथ मारीन तिथे मी

काढीन पाणी!’’

भारावून बघू लागते

राजाकडे त्याची राणी!

अशी ही पाडगावकरांनी रेखाटलेली ‘राणी’ रूपातील संसारी स्त्रीची प्रतिमा वैशिष्टय़पूर्ण आहे.

पाडगावकरांनी कवितेत सौंदर्यवादी वलयातील स्त्रीप्रमाणे ही वास्तववादी नेपथ्यातील स्त्रीही जीवनसन्मुख अशा रूपामध्ये चित्रित केली आहे. त्यांनी आपल्या कवितेत स्त्रीला चिरतरुण, स्वर्गीय, सौंदर्यसंपन्न, अप्सरा म्हणून रेखाटले नाही, तसेच ‘भोगवस्तू’ किंवा ‘देवी’ या रूपातही रेखाटले नाही, याची आवर्जून नोंद घ्यायला हवी. मात्र त्याच वेळी त्यांची एक मर्यादाही येथे नोंदवली पाहिजे. पाडगावकर अनेक वर्षे कविता लिहीत होते. ते मोठय़ा सामाजिक बदलाचे साक्षीदार होते. त्या काळात आपल्याकडे दलित, ग्रामीण व नंतर स्त्रीवादी असे वेगळे काव्यप्रवाह रुजले. त्यातून स्त्रीची समाजमान्य प्रतिमा आणि स्वत:ला गवसलेली प्रतिमा यातील अंतराचेही प्रसंगी दर्शन घडले. सतत प्रियकराच्या बाहुपाशात पहुडलेल्या स्त्रीच्या प्रस्थापित स्त्री प्रतिमेवर टीकाही झाली. अशा संक्रमणशील वास्तवातील स्त्रीचे चित्रण पाडगावकरांच्या कवितेत आढळत नाही. याउलट त्यांच्या कवितेतील काही जागा आता खटकतात.

उदाहरणार्थ, प्रेसयीला प्रियकर सांगतो,

‘‘इतुके आलो जवळ, जवळ

की जवळपणाचे झाले बंधन तसेच.

‘‘मागे हवे ते गडे तू

माझे पंख मागू नको’’

येथे प्रेसयीलाही ‘पंख’ असू शकतात. तिलाही स्वत:चे ‘अवकाश’ हवेसे असू शकते; ही जाणीव दिसत नाही. किंबहुना ‘बोलगाणी’मध्येही ते ‘अजून तुझा हात आहे’ या कवितेत म्हणतात –

‘‘हगुडर्य़ा बाळाला तू जेव्हा उचलून घेतेस,

हसत हसत आणि त्याचं बरबटलेलं ढुंगण धुतेस,

तेव्हा तुला प्रार्थनेची गरज नसते!’’

तेव्हा पाडगावकरांना स्त्रीच्या दैनंदिन संसारी कामातच तिच्या हाताचे सार्थक झाले असे वाटावे; याचे आश्चर्य वाटते आणि खंतही वाटते! खरे तर या कालखंडात वेगवेगळ्या क्षेत्रांतली मोठी आव्हाने पेलणाऱ्या स्त्रिया प्रभाव गाजवत होत्या. पण पाडगावकरांना मात्र ‘संसारी स्त्री’ हेच तिचे रूप जवळचे वाटत राहिले! अर्थात येथे एकटे पाडगावकर तरी काय करणार? शेवटी स्त्रीची सांस्कृतिक प्रतिमा ही त्या त्या समाजमनाच्या सामूहिक नेणिवेशी नाते राखून असणार! आपल्या पुरुषप्रधान समाजमनातच जर स्त्री त्याच प्रतिमेत बंदिस्त असेल, तर त्याचेच प्रतिबिंब कवीच्या काव्यात पडले, असे म्हणावे लागते. (आपल्याकडील काही स्त्रियांच्या आत्मकथनांतून  या वास्तवावर प्रकाशझोत टाकला गेला आहेच!)

वास्तविक समाजमनावर प्रभाव गाजवणारा प्रतिभावंत कवी नवी सांस्कृतिक प्रतिमा घडवू शकतो. पण पाडगावकरांच्या कवितेतली स्त्रीची प्रतिमा एकीकडे ‘ईव्हची वंशज’ अशी असली तरी पुढे ती सांकेतिक परंपरेत बंदिस्त रूपात अडकलेली दिसते. पाडगावकरांच्या कविततेल्या स्त्रीचा शोध शेवटी समाजमनाशी घट्टपणे नाळ जोडल्या गेलेल्या स्त्री प्रतिमेकडे आपल्याला नेतो आणि अंतर्मुख करतो; हे महत्त्वाचे आहे.

 

शहाळ्यांतल्या मलइसारखें

ऊन, तुला आवडतें भारी;

तूं असतांना हवीच मजला

हिरवळ ओली लुसलुसणारी..

 

तूं असतांना मला वाटतें

श्वासांनी भोगावी माती..

डोळ्यांच्या होडींत बसुनियां

दोन भावल्या भटकत जाती..

 

तूं असतांना धुरकटलेलीं

कडवट दु:खें विसरून जातों

..पिक्या टपोर क्षणांची द्राक्षें

ओठांवरती पिळून घेतों..

 

सर्वागाने सुख भोगावें

कसें तुला तें पुरते ठाऊक

स्पर्शातुन भिनविसी फुलांचे

तूं रंगीबेरंगी कौतुक!!

 

तूं असतांना मनांत झुलते

नक्षत्रांची शुभ्र डहाळी

तुझ्या नि माझ्यासाठीं झुरते

चंद्राची होडी आभाळीं

(‘छोरीमधून साभार, मौज प्रकाशन)

 

– डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com