19 February 2019

News Flash

नाही थरकणार..!

हे असं मधूनच तुम्हाला पत्र वगैरे लिहिणं कदाचित आउटडेटेड वाटेल.

प्रिय सुर्वेसर,

सलाम!

हे असं मधूनच तुम्हाला पत्र वगैरे लिहिणं कदाचित आउटडेटेड वाटेल. पत्र कोण लिहितं अलीकडे कुणाला? आणि तेही लौकिक अर्थाने या जगातून कायमसाठी निघून गेलेल्या माणसाला उद्देशून? पण तरी हे पत्र लिहिते आहे याचं कारण सांगू का? तुम्हाला लिहिता लिहिता मी मलाही उद्देशून लिहितेय. डोकावून पाहतेय आत आत माझ्या आत. या निमित्ताने भेटतेय कडकडून माझ्यात कायमच्या वस्तीला आलेल्या तुमच्या कवितेतल्या कितीतरी लढाऊ  स्त्रियांना. मग त्या कामगार असोत, कष्टकरी, वंचित असोत अथवा थेट शरीरविक्री करणाऱ्या वेश्या असोत.

सुंद्री, चंद्री, चिमणी, इंदी.. किती म्हणून नावं घेऊ ! तुमच्या कवितेचं जग ज्या गत्यात्मक भांडवली संघर्षांशी जैविकरीत्या जोडलेलं आहे त्याचा विलग करता न येणारा एक अपरिहार्य हिस्सा म्हणजे या तमाम स्त्रिया. अतिशय जीवट आणि चिवट स्त्रिया. मोर्चात उंच स्वरात घोषणा देणाऱ्या, तिसऱ्या पाळीतही काम करणाऱ्या, ज्यांना अत्यंत ठसठशीत असं दृश्यात्मक रूप तुम्ही दिलं आहे, ज्यांना त्यांची त्यांची म्हणून स्वत:ची अशी एक पृथक भाषा तुम्ही दिली आहे. ज्यांच्या कष्टाचा, घामाचा, श्रमाचा, दमल्या-भागल्याचा तीव्र असा अंगभूत वास तुम्ही त्यांना बहाल केला आहे.

तुमची एक कविता आहे, ‘नेहरू गेले त्या वेळची गोष्ट’ या शीर्षकाची. त्या कवितेतली सुंद्री म्हणते,

-‘आज लोबन मत जला! ..नेहरू गये!!’

‘सच; तो चलो आज छुट्टी!..’

शीण पेलणारे जग खाटेवर कलले.

‘कलले’ असं म्हटलं आहे तुम्ही कवितेत. ‘विसावले’ असंही म्हणता आलं असतं तुम्हाला. पण ‘कलले’ या क्रियापदातून देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या कातडीत, हाडामांसात घुसलेला अपार थकवा, तो ठणका नेमका पोहचवला आहे तुम्ही. ‘आज लोबन मत जला’ या वाक्यातून त्यांचा नेहरूंच्याप्रति असलेला आदरभाव तर व्यक्त होतोच पण धंदा बंद ठेवण्यातली विवशता आणि ‘सच; तो चलो आज छुट्टी’ अशी सुटकेची भावनाही. केवळ या तीन ओळींमधून अधो-वास्तवातल्या बायामाणसांच्या जगण्यातला संमिश्र कोलाहल ताकदीने उभा राहतो. हे तेव्हाच घडू शकतं, जेव्हा सभोवतालच्या दाहक, कठोर वस्तुस्थितीचा एकाच वेळी तुम्ही आंतरिक भागही असता आणि त्या वस्तुस्थितीचं साकल्याने आंतरिकीकरणही केलेलं असतं. बांधिलकीप्रधान विचारसरणीच पुरते ‘कविता होण्यासाठी’ असं होत नसतं. हा समज अत्यंत लाडका होऊन बसलाय अलीकडे. विचारसरणीच्या लोलकातून आजवर न लागलेले अर्थ लागू शकतात, त्याच्या प्रकाशात अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी वर्तन-व्यवहाराची चिकित्सा करता येते, तो अभ्युपगम विषम अशा व्यवस्थात्मक घटितांच्या विश्लेषणासाठी मौलिक सामग्री पुरवतो हे तर खरंच आहे. पण चांगली कविता निर्माण होण्यासाठी एवढंच पुरेसं नसतं. मुळात कवितेचं कवितापण उमजावं लागतं.

तुमच्या कवितेतल्या स्त्रियांचे आवाजही भिन्न आहेत. ती सांसारिक आहे; अगदी ‘किती वाळलात तुम्ही’ अशी हळुवार फुंकर घालून नवऱ्याला उभारी देणारी स्त्री आहे. तर कधी ‘थांब, पहाट झाली नाही, दिवे मालवून कसे चालेल? तू थकला असशील तर माझी देहवात पेटवून ठेव’ असा विलक्षण धीर देणारी आहे. सहचर, जोडीदार, मित्र, नवरा या तशा तर संज्ञाच केवळ! यातल्या प्रत्येक रूपातल्या, नात्यातल्या पुरुषाच्या मागून नव्हे तर सोबत चालणारी ही स्त्री आहे. त्याच्या बरोबरची आहे. समान आहे. प्रसंगी त्याच्या देहाची ढाल होणारी आहे. ती ‘चैत्रपालवी’, ‘स्नेहमयी’ तर आहेच शिवाय ‘मुठीत मेघझरा बाळगणारी’ही आहे. विपरीत परिस्थितीतही तिचे फूलपण तिला विसरून गेलेले नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनक्षम जगाच्या निर्मितीसाठी ती पुरुषाइतकीच सक्रिय भागीदार आहे. तुमच्या कवितेतला मला सर्वात महत्त्वाचा वाटणारा ऐवज म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात ‘खाजगी आणि सार्वजनिक’ यात प्रस्थापित व्यवस्थेने मारलेली पाचर तुम्ही ठामपणे नाकारली आहे. तिसऱ्या जगातल्या, सर्वात पायतळी असणाऱ्या स्त्रीच्या अपार कष्टाला तुम्ही नजरेआड केलेलं नाही. तुम्ही तिच्या श्रमांना अदृश्य अथवा मूक ठेवत नाही. तिच्या श्रमिकत्वाची दखल घेऊन तिच्याकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून तुम्ही पाहिलं आहे आणि तेही साठीच्या दशकाच्या उंबरठय़ावर उभं असताना अगदी सहजगत्या तुमच्या हातून हे घडलं आहे. यासाठी विशेष वाटतं मला हे कारण स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद या संकल्पना तेव्हा रुजायच्याच होत्या भारतात अजून. त्या काळात तुम्हाला समकालीन असणाऱ्या अन्य मराठी कवींच्या कवितेतली स्त्रीरूपं पाहता तुमचं हे वेगळेपण फारच उठून दिसतं मला. अभिसारिकेच्या प्रतिमेची, स्त्रीच्या दैहिक तपशिलात गुंतून पडलेली वर्णनपर कविता अभावानेही लिहिली नाही तुम्ही. विशिष्ट अशा पारंपरिक चौकटीतलं, मध्यमवर्गीय अभिरुचीने गिरवलेलं, उगीचच थोर केलेलं, रांगोळी, भरतकाम, तुळशीवृंदावन यात अडकून पडलेलं, आईपणाचं अवाजवी उदात्तीकरण केलेलं स्त्रीत्वं तुमच्या कवितेत चुकूनही दिसत नाही. उलट धर्मशास्त्र, कर्मकांड, व्रतवैकल्ये, पुराणे यात अडकून न पडलेली, पुरुषाला आपल्यासारखाच माणूस मानणारी, त्याच्यावर प्रेम, माया, स्नेह असलेली आणि प्रसंगी त्याला फटकारून ताळ्यावर आणणारी, घराच्या आत आणि बाहेर असला भेद तात्काळ मिटवणारी स्त्री तुम्ही चित्रित केली आहे. या स्त्रियांचं जग पुरुषप्रधानतेच्या अमानुष सत्तेमुळे पूर्णपणे झाकोळून गेलेलं नाही. उलट गरिबी, दारिद्रय़, भांडवलशाहीचा निर्मम घाला असणारी व्यवस्था बदलण्यासाठी ती भर मैदानात, लढय़ात उतरणारी स्त्री आहे. आणि म्हणूनच ती स्त्री मला माझीच सख्खी थोरली बहीण वाटते यात नवल ते काय?

खुराडय़ातील जग माझे

उठते गं कलकलून

तू येतेस जेव्हा दमून

किंवा

डोंगरी शेत माझं गं

मी बेनू किती

आलं वरीस राबून

मी मरावं किती?

बाईच्या श्रमाची इतकी तंतोतंत कवितिक अभिव्यक्ती तुमच्या कवितेला थेट सआदत हसन मंटोच्या स्त्रीव्यक्तिरेखांशी जोडून टाकणारी आहे. म्हणूनच ‘स्त्री : केवळ एक मादक आणि उत्तेजक पदार्थ’ हा स्त्रियांकडे केवळ वस्तुवत पाहणारा दृष्टिकोण नाकारून तुम्ही नवी स्त्रीरूपे घडवत आला आहात.

‘मनीऑर्डर’ आणि ‘मास्तर, तुमचंच नाव लिवा’ या दोन कवितांमधील स्त्रीरूपे मला विशेष भावलेली आहेत. ‘मनीऑर्डर’ कवितेत देहविक्रय करणारी स्त्री गावाकडे मनीऑर्डर पाठवताना सोबतच्या पत्रासाठीचा मजकूर सांगते आहे लिहिणाऱ्याला. ‘आन् हे बगा असंबी लिवा’, अशी सुरुवात करून ‘येत जा तिकडं मदनंमदनं..’ या अखेरच्या ओळीपर्यंत एक प्रवाही संवादात्मकता दिसते या कवितेत. ती तिच्या अवघ्या आयुष्याचा निचोड सहजगत्या मांडून टाकते. त्यात त्रागा नाही, कडवटपणा नाही, उपहास तर नाहीच नाही. उलट एक कारुण्य आहे, सगळंच कंटाळल्यागत असल्याची एक विफलताही आहे.

मागं याक गिऱ्हाईक आलं,

‘हितं रहान्यापरीस

बाईल व्हशील का?’ म्हनलं..

‘आता हाय की मी शेजंला तुमच्या’

म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.

अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.

अख्ख्या पुरुष जातीचं हसू येणं आणि रडू येणं ही माझ्या मते पुरुषी व्यवस्थेत वावरणाऱ्या स्त्री – पुरुष नात्याच्या प्रतवारीसंदर्भातली अत्यंत करुण आणि वैफल्यग्रस्त प्रतिकिया तर आहेच, पण ती या व्यवस्थेला लगावलेली एक सणसणीत चपराकही आहे.

‘तुमचंच नाव लिवा’ ही तुमची आणखी एक अतिशय गाजलेली कविता. मुलाला शाळेत घालण्यासाठी गेलेल्या देवदासीला जेव्हा शाळेतले मास्तर विचारतात, पोराच्या वडिलांचं नाव काय लिहू तेव्हा ती बाई उत्तर देताना देवदासीच्या आयुष्याची व्यथाच मांडून जाते.

कनच्याबी देवाचं नाव नगा लिवू

मानसाचच लिवा..

देवानं काय केलंय हो,

वटी त्यानंच भरली ना ही..

तुमचंच लिवा.

तुमच्या कवितेतलं जग हे आतून बाहेरून इतकं खरंखुरं आहे आणि ते तसं का दिसतं याचा विचार करताना मला असं जाणवतं की, तुमच्या धारणा कवितेतून व्यक्त होणाऱ्या विचारसूत्रांमधूनच जाणवतात असं नसून कवितेच्या रूप-तत्त्वातूनही त्या ठळकपणे उजागर होतात. एक संपूर्ण सांगीतिक म्हणण्यापेक्षाही मौखिकतेच्या उच्चारित ध्वनी-लयीशी नातं सांगणारी असंख्य भाषारूपं तुम्ही घडवली आहेत. ती मुक्तछंदातली जरी असली तरी त्यात संवादात्मकता आहे आणि म्हणून तिथे नाटय़ही आहे. तुमच्या कवितेतली माणसं सहज बोलतात. नेहमीचं बोलतात. साधसुधं बोलतात. जगण्याच्या विक्राळ प्रश्नांविषयी बोलतात आणि खूप खरेपणाने बोलतात. ही माणसं संघर्षांच्या आत असलेली माणसं आहेत, ती क्रियाशील आहेत आणि म्हणून ‘संभाषण’ हे तुमच्या कवितेचं एक महत्त्वाचं रूप-तत्त्व बनून येतं.

सुर्वेसर, तुमच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या कवितासंग्रहात ‘थरकूं नको’ या कवितेतल्या शेवटच्या ओळी अशा आहेत –

कधीतरी राक्षस येतील

आपुले दार ठोठावतील

घराची झडतीहि घेतील

कदाचित तुलाहि नेतील

क्षणभरहि थरकूं नको –

ही कविता आजच्या गौरी लंकेशला चपखल बसते. तुमच्या कवितेतले भांडवली व्यवस्थेचं संरक्षण करणारे पोलीसरूपी राक्षस आज आणखी वेगळ्या रूपात समोर आलेले दिसत आहेत. भारतीयत्वाच्या सर्वागसुंदर संकल्पनेला मोडीत काढणारे शासनपुरस्कृत गुंडपुंड असं आजचं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून तुमची कविता अंतर्बाह्य़ राजकीय कविता आहे. आणि त्या राजकारणात तुम्ही स्त्रीला मध्यभागी आणून उभं केलं आहे. तुमचे ऋण आम्हाला कधीही विसरता येणार नाही. ‘आम्ही’ आणि ‘मी’ यात कसलंच अंतर नसणं आणि एका गतिमान परिवर्तनाच्या प्रक्रियेशी घट्टपणे जोडलेलं असणं हा तुमचा वारसा आहे आणि तो मी मनोमन मानते. तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यातून आणि तुमच्या कवितेतून घालून दिलेल्या मार्गाने चालणं अवघड आहेच पण त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही.

‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘सनद’ (निवडक कविता), ‘नव्या माणसाचे आगमन’ हे तुमचे कवितासंग्रह म्हणजे बांधिलकीच्या कवितेचे दस्तावेज म्हणता येतील ज्यांना अभिजात असं संबोधायला मला आवडेल. जग बदलता येतं यावर तुमच्या कवितेतल्या स्त्रियांचा जो अढळ विश्वास आहे तो मला चकित करतो, ऊर्जा पुरवत राहतो. जग बदलण्यासाठी प्रत्यक्ष हस्तक्षेप करावा लागतो, त्यासाठी प्रसंगी कवितेचा हत्यार म्हणून वापर करावा लागतो, आपल्या आणि व्यवस्थेतल्या संबंधांचं तल्लख भान बाळगावं लागतं या सगळ्याच बाबी आजच्या उत्तर आधुनिकतेचा हैदोस चालू असलेल्या काळात एकतर नाहीशा होताना दिसतात आणि दिसल्याच तर केवळ फॅशनेबल, दाखवेगिरीच्या वळणापुरत्या राहिलेल्या दिसतात. या दोन्ही टोकांपासून स्वत:ला वाचवणं, स्वत:च्या कवितेला वाचवणं ही अवघड कामगिरी तुमच्या अस्सल लोकाभिमुख कवितेमुळेच शक्य झाली असं मी मानते.

थांबते.

लोभ आहेच.

आपली, प्रज्ञा.

 

आन हे बगा..

असंबी लिवा,

का मी खुस हाय;

आंग ठनाकतंय पर म्हनावं,

गावापक्षा बरं हाय.

ढगावानी माणूस येतो आन,

म्हामूर होतो बगा..

पन बबडी

डूक धरल्यावानी परतेकाला इचारते,

माज्याकडं येन्याआदी कितीजनीकडं गेलता!

अवं, तो पुरुस;

बसा म्हनलं; बसावं.

त्येंच्या बायकांनी दावं का सोडावं..

हे तुमाला सांगते.

म्होरं लिवा

मनीआडर उशीरानी का व्हयना,

पर जाती,

म्हनावंनवी वजरटीक घडवलीय

वाक्या पाटिवल्यात इष्णूकडं.

आन धा कमी पन्नास रुपयंबी.

त्येचं गंगीला याक पुस्तक घ्या.

नाम्याला चरडी.

रोजचं धा पैसं देत जा पोरोस्नी

म्हंजी पळंल पोरगं साळंला.

दोघास्नी मुका बी लिवा.

आता हितंबी म्हागाई वाढलीय.

मानसाला नवी चादर लागती.

गिलासावरलं पानी उडालंय..

नुसता कंद्या न्हाई पुरत

पंकाबी लागतो.

हे नगा लिवू,

पर तुमी ऐकता म्हनून म्हनले,

बगा मला हसू येतंय,

सांगू का नगं, असं व्हतंय..

मागं याक गिऱ्हाईक आलं,

हितं रहान्यापरीस

बाईल व्हशील का?’ म्हनलं..

आता हाय की मी शेजंला तुमच्या

म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.

अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.

कातडं लई वंगाळ बगा.

मानुस गोचीडीवानी चिकाटतं.

आन कायबी बोलून जातं.

पुरुस जातीचं मला हसूबी येतं,

आन रडूबी येतं बगा..

पर ह्य कातडय़ाची

ढोरावानी वड असती मानसाला.

कटाळा आला असंल तुमाला,

सगळंच कटाळल्यागत हाय.

येत जा तिकडं मदनंमदनं..

(‘नव्या माणसाचे आगमन’मधून साभार, पॉप्युलर प्रकाशन)

 

– डॉ. प्रज्ञा दया पवार

pradnyadpawar@gmail.com

First Published on September 23, 2017 2:30 am

Web Title: articles in marathi on poet narayan surve poetry