अरुणाचल प्रदेशातील ‘पाके’ या जंगलव्याप्त प्रदेशांतील आम्ही दाखल झालो होतो ते धनेश म्हणजे ‘हॉर्न बिल’ या देखण्या पक्ष्याच्या संवर्धन कार्यक्रमाविषयी जाणून घेण्यासाठी. पुण्याची अमृता राणे तिथे प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम करीत होती. संवर्धनाचा एक भाग म्हणजे धनेशाचे घरटे बाहेरच्या लोकांनी दत्तक घ्यायचे म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चाचा वाटा उचलायचा. स्थानिक आदिवासी लोकांनी त्याचे जतन संवर्धन करायचे. त्याबद्दल त्याला मासिक मोबदला मिळणार. निसर्गप्रेमी लोकांनी एखादे तरी घरटे दत्तक घ्यायचे, म्हणजे आर्थिक भार उचलायचा! त्याच दरम्यान रोहित नानिवडेकर हा जीव वैज्ञानिकही याच संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तिथे होता. संवर्धनाचा हा उपक्रम गेली काही वर्षे एन.सी.एफ. म्हणजे ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेनं अरुणाचलाच्या पर्जन्य जंगलात सुरू केला आहे. ही संस्था म्हैसूर स्थित आहे, बंगळूरुला त्याची एक शाखा आहे. वन्य जीव संवर्धनाबरोबरच स्थानिक आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारणे हेही संवर्धनात समाविष्ट आहे हे विशेष. अर्थात  हे दोन्ही परस्पराश्रित आहे हेही खरेच.

रोहित नानिवडेकरबरोबर जंगलातला फेरफटका मारताना या संवर्धन कार्यक्रमाची माहिती आम्हाला मिळाली. धनेश पक्ष्याची घरटी असलेली, ढोल्या असलेली झाडे आम्ही पाहिली. प्रचंड उंची आणि विस्तार असलेली ही झाडे बहुधा टेट्रामेलिस न्यूडिफ्लोरा किंवा मराठीत ‘जर्मल’ची होती. इतक्या दूर परक्या प्रांतात, परक्या भाषेच्या प्रदेशांत, मागास आदिवासी लोकांमध्ये राहून, त्यांना कामांत सहभागी करून संवर्धनाच्या विविध पैलूंवर काम करणाऱ्या या लोकांचे आम्हाला फार कौतुक वाटले होते. आणि या सर्व प्रकल्पामागे अपराजिता दत्ता नावाच्या स्त्री वैज्ञानिकाची तपश्चर्या उभी आहे, हे कळल्यावर तिच्याविषयी कुतूहल जागे झाले. बंगळूरुला वनसृष्टीचा अभ्यास करणाऱ्या माझ्या मुलाकडे मी गेले, आणि वन्यजीव संवर्धन हा समान धागा असल्यामुळे मुलगा अपराजिताशी परिचित होता. त्यामुळे तिला भेटणं सोप्पे झाले आणि इतक्या धाडसी स्त्री वैज्ञानिकाशी बोलता आलं याचं समाधान मिळाले. आपल्या कामाविषयी ती अत्यंत तळमळीनं बोलली.

३ जानेवारी १९७० मध्ये जन्मलेली अपराजिता मूळची बंगाली. वडिलांच्या व्यवसायामुळे लहानपणी काही काळ ती आफ्रिकेत राहिली. तेव्हापासून वृक्षवल्ली आणि वन्यजीव याविषयी तिला प्रेम वाटू लागले. त्याचे श्रेय ती ‘झांबिया’मधील तिच्या जीवशास्त्राच्या शिक्षकांना आणि नंतर कोलकाताला शिकताना तिथल्या शिक्षकांना देते. डेहराडून येथील संस्थेत ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये एम.एस्सी. झाल्यानंतर अरुणाचलमधील ‘पाके’च्या पर्जन्य जंगलात वनसृष्टी आणि प्राणिसृष्टी यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करण्यासाठी ती दाखल झाली ती १९९५ मध्ये आणि आजही तिचे नाते ‘पाके – नामदफा’शी तितकेच घट्ट आहे. जंगलतोडीचा, शाकाहारी, फलाहारी प्राण्यांवर होणारा परिणाम हा तिचा अभ्यास विषय होता. त्यावेळी तिने जायंट स्क्विरल आणि माकडे यांचा अभ्यास केला. त्यापूर्वी एम.एस्सी.च्या काळांत गुजरातमधील लांडग्यांचा माग तिनं काढला आणि मध्य प्रदेशातील मोठय़ा खारींचाही. पण पाकेमध्ये आल्यानंतर १९९९ मध्ये धनेश पक्ष्यांना रेडिओ टॅगिंग करण्याचं आणि थायलंडमध्ये डेरेदार वृक्षांवर चढण्याचं कौशल्य यांत तिनं प्रशिक्षण घेतलं आणि धनेश पक्ष्यांच्या अभ्यासक क्षेत्रात ती दाखल झाली.

अरुणाचलांतील ‘पाके’चा आणि ‘नामदफा’ राष्ट्रीय उद्यानाचा भवताल हा सगळा भाग सदाहरित पर्जन्य जंगलांचा. शिवाय पर्वतमय प्रदेशांतील पठार, उतार हा भाग अल्पाइन वृक्षराजींचा, बारमाही वाहणाऱ्या नद्यांची खोरी, दऱ्या! थोडक्यात हा भाग म्हणजे वन्यजीवांसाठी नंदनवनच. म्हणूनच तिथे विविधता विपुल वन्यप्राणी संख्या १००, पक्ष्यांची ५०० आणि अगणित वनस्पती अशा प्रदेशाचं अपराजिताला मोठ्ठं आकर्षण होतं. त्यांच्या म्हणजे ‘नेचर कन्झर्वेशन संस्थे’च्या चमूने अपराजिताच्या बरोबर माकडांची एक नवीन प्रजाती शोधली. मकॉकची एक प्रजाती तर नंतरच्या काळात ‘नामदफा’ राष्ट्रीय वनात अपराजितानं ‘लिफ डियर’ या अगदी लहान आकराच्या हरीणाच्या नव्या प्रजातीचा शोध घेतला. ‘पाके’मध्ये जंगलतोड खूप होत होती. जंगलतोडीमुळे धनेशसारख्या, फलाहारी प्राण्यांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा तिनं अभ्यास केला. तिथे आढळणाऱ्या पाच प्रकारच्या धनेश पक्ष्यांपैकी दोन प्रकारच्या धनेशांच्या प्रजातीच्या संवर्धनांत तिचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. धनेश पक्ष्याची डौलदार भक्कम चोचीवरची चोच किंवा शिंग, त्यांची आकर्षक रंगाची लांब पिसं, कसबी शिकाऱ्यांना मिळणारा मान या सर्वामुळे त्यांची शिकार होत होती. शिवाय त्याचं मांसही त्यांच्या खाण्यांत चालतं. या कारणांमुळे त्यांची शिकार होत होती. या दोन्ही गोष्टी संवर्धनाला पूरक खासच नव्हत्या. खरं तर धनेश पक्ष्यांची वृक्षलागवडीमध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. फळांचा गर गट्ट करून बिया ते बाहेर ओकतात. झाडाखाली त्यांनी खाऊन टाकलेल्या बियांचा सडा असतो. काही टक्के झाडे या बीजप्रसारांतून मोठ्ठी होतात. ८० ते ९० टक्के वृक्षांच्या फळांचा, बियांचा प्रसार वन्यप्राणी आणि धनेशसारखे पक्षी करतात. पण त्यांची शिकार आणि वृक्षतोड हे मोठ्ठे धोके त्यांच्या संवर्धनात होते. शेती करण्यासाठी तेथील आदिवासींनी नामदफा राष्ट्रीय वनालगतचा काही प्रदेश, पार साफ करून टाकला. तिथे पक्षी, प्राणी नाही की वनसृष्टी नाही. हे पाहिल्यावर अपराजिता अस्वस्थ झाली आणि तिचं मन विचारमग्न झालं. ही परिस्थिती बदलायला पाहिजे असे तिच्या मनानं घेतलं.

‘नामदफा’ राष्ट्रीय उद्यानांत तिच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्यापासूनच तिच्या संवेदनाक्षम मनावर प्रभाव पडला तो या वनांतील ‘लिसू’ या आदिवासी जमातीचा ‘पाकेतील’ निशी जमातीपेक्षा हे आदिवासी उग्र स्वभावाचे त्यांच्या चालीरीती, रीतीरिवाज निराळे होते. शिकार, प्राण्यांची कातडी काढून ती विकायची आणि जमेल तेवढी शेती हे त्यांचे व्यवसाय होते. अरुणाचलमधील वेगवान नद्या किनाऱ्याचीही झीज करतात. नदीकांठची शेतजमीनही धुपून जाते, त्यामुळे लोकांना शेतीचा भरवसा वाटत नाही, त्यामुळे शिकार आणि जमेल तशी तस्करी, प्राण्यांची कातडी विकून त्या बदल्यात मीठ, तंबाखू या गोष्टी घ्यायच्या, ही जीवनशैली. त्यांचा जीवनाचा झगडा रोजचाच! जंगल आणि पावसामुळे दलदल, त्यात भरपूर डास, त्यामुळे आदिवासींमध्ये ‘मलेरिया’नं मरण्याचं प्रमाण जास्त. जळणासाठी ते झाडे तोडत. ‘नामदफा’ नॅशनल पार्क आणि ‘वाघ संरक्षित क्षेत्र झाल्याची घोषणा झाल्यानंतर, नियमाप्रमाणे त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना नामदफाचे बाहेर जागा देण्यात आली. पण ‘लिसू’ आदिवासींना नामदफा सोडायचं नव्हतं. त्यांचा या सरकारी धोरणाला विरोध होता. अपराजिता २००२ नंतर ७-८ वर्षे नामदफामध्ये होती. या जमातीचा जीवनसंघर्ष, अस्तित्वाची लढाई ती पाहत होती. त्यांच्या अडचणी जीवनावश्यक बाबींशी निगडित होत्या. जळण हवे झाडे तोडा, शेती करायची, झाडे तोडून जंगल साफ करा. अशा परिस्थितीत अपराजिता सरकार – वनखात्याशी चर्चा करून लिसूंचं जीवन सुसह्य़ करायचा प्रयत्न करीत होती. त्यांना मीठ, साबण पुरवणे, वैद्यकीय उपचार पुरवणे आदी प्रयत्न तिने केले. जळणासाठी केरोसिनचे स्टोव्ह दिले. सोलर एनर्जीवर चालणारे दिवे दिले. पाणी तापवण्यासाठी भांडीकुंडी दिली. प्राथमिक वैद्यकीय उपचारांची सोय केली. औषधे पुरवली. स्थानिक लोकांमधून आरोग्यदूत तयार केले. मोबदला देऊन शिक्षकांची सोय केली. नदीच्या किनाऱ्याची बांधबंदिस्ती करून शेतीला अनुकूलता दिली. पाकेसारख्या ठिकाणी तर आदर्श निसर्ग पर्यटनाची सोय सुरू केली. होम स्टेची पद्धत रुजवली. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार, चार पैसे मिळू लागले. लोकसमूहाला नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला आर्थिक लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले.

निसर्गाबरोबर सतत राहिल्यामुळे नैसर्गिक अनुकूलता, प्रतिकूलता यांच्यात समतोल साधून जगण्याची कला या आदिवासींमध्ये असते. त्यांच्यात अनुभवजन्य असं एक शहाणपण आणि निसर्गाची समज असते; त्यांची दृष्टी वेगळी असते. भोवतालाशी ते जोडलेले असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे तिचे मत आहे. आदिवासींशी तिचे नाते डोळस आत्मीयतेचे आहे. ती म्हणते की, या अत्यंत दूरच्या प्रदेशांतील लोकांबरोबर जंगल वाचवणं म्हणजे नवनवीन अनुभव असतो. त्यांच्या बरोबर हिंडण्यामुळे मला निसर्गातील किती तरी गोष्टी कळल्या.

नामदफांतील कडू गोड आठवणींचा हा सगळा घटनाक्रम आठवला की एरवी हसतमुख असणारी अपराजिता थोडी गंभीर, काहीशी खिन्न होते. लिसू जमातीचे हितसंबंध आणि वनखात्याचे कायदेकानू यामध्ये तिच्या मनाची खूप ओढाताण झाली. आपण लिसू आणि वनखाते यामधील दुवा होतो. आपण त्यांच्याबाबतीत अन्याय तर केला नाहीना या शंकेनं ती ग्रस्त होते. वनखात्यानं नामदफाच्या बाहेर लिसूंना पर्यायी जमीन दिली खरी. पण त्यांच्या मनात या धोरणाबद्दलचा असंतोष आहे. खरंतर हा यक्ष प्रश्न एकटय़ा अपराजिताचा नाही. स्थानिकांचे-आदिवासींचे हित, सरकारी धोरण आणि राजकारण आणि वन्यजीवांचे संवर्धन असे या प्रश्नाचे तीन कोन आहेत. या तिन्हीचा समन्वय साधायची अवघड कसरत तिला करायला लागली. ‘लिसू’ लोकांबरोबर तिने जे अनुभवले त्याबाबतीत ती कृतज्ञतेने म्हणते की लिसूंमुळे मला कामाचं बळ मिळालं. तिनं नामदफाच्या अंतर्भागांत मुलांसाठी शाळा सुरू केली. स्थानिक शिक्षक नेमले. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मुलांमध्ये संवेदना जागृत व्हाव्यांत म्हणून संवर्धनावर गोष्टीची पुस्तके लिहिली. अंतर्भागातील शाळेला भेट द्यायला तिला कित्येक मैल चालावे लागले आहे. नदी ओलांडावी लागली आहे. पण या सगळ्यांत आदिवासींनी तिला साथ दिली. निशी, लिसू जमातीतल्या लोकांच्या हस्तकलेला तिनं प्रोत्साहन देऊन बाहेरची बाजारपेठ मिळवून देण्याचा तिने प्रयत्न केला.

पाकेच्या परिसरांत मात्र जंगलाचे संवर्धन, धनेशांचे संवर्धन आणि स्थानिक लोकांचे हितसंवर्धन याचा एक चांगला मेळ तिला घालता आला. पहिली काही वर्षे त्यांच्या चमूने धनेश पक्ष्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांच्या सवयी त्यांचे खाद्य-फळे असलेल्या झाडांची ओळख आणि नोंद, धनेशांचा रात्रीचा निवारा असलेली झाडे आणि धनेश घरटय़ासाठी निवडत असलेली झाडं यांचा त्यांनी अभ्यास केला. ही झाडे तोडली जाणार नाहीत यासाठी प्रबोधन केले. धनेश पक्षी कोणत्या झाडांच्या ढोलीत अंडी घालतात ते पाहून त्या झाडांच्या खाली, भोवतालच्या झाडांखाली ते नेट अंथरतात. धनेशानं खाल्लेल्या आणि ओकलेल्या बियांमुळे ती झाडे त्यांना कळली. अशा झाडांचं संरक्षण करणं महत्त्वाचं होतं. आदिवासींपुढे फोटो शो, फिल्म शो सादर करून झाडांचे, पक्ष्यांचे आणि बियांचे महत्त्व त्यांना दाखवून दिले. प्राण्यांविषयी आत्मीयता वाटावी असा प्रयत्न या चमूने केला. ही टीम स्थानिक लोकांना बरोबर घेऊन हा सगळा अभ्यास करायचे. तुम्ही शिकार करू नका हे त्यांना सांगावे लागले नाही, या अभ्यास पथकाबरोबर आदिवासींनी वृक्षतोडीचे, शिकारीचे परिणाम पाहिले. मलेशियांत या वन्य प्राण्यांच्या संवर्धनात स्थानिकांचा सहभाग असलेली फिल्म, परदेशी लोकांना वन्यजीवांविषयी वाटणारी अपूर्वाई याविषयी जेव्हा त्यांच्यापुढे फिल्म शो झाला तेव्हा त्यांना जाणवलं की अरे आपल्याकडे तर किती तरी वैविध्य आहे. अभिमान वाटेल असे प्राणी-पक्षी आहेत. आपण त्यांचं संवर्धन केलं तर आपल्याकडेही पर्यटक येतील. आपले उत्पन्न वाढेल, याची त्यांना खात्री झाली आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिंग-चोची मिळवून शिरोभूषण बनविण्यासाठी गावातल्या ज्या प्रौढ मुखियानं २० धनेश मारले होते तो आपणहून संवर्धनासाठी पुढे सरसावला. शिकारीकडून संवर्धनाकडे असा पाकेच्या सभोवतालच्या लोकांचा हा प्रवास अपराजितानं अनुभवला. बरीच जणं आता अंत:स्फूर्तीनं घरटय़ांच्या, झाडांच्या संवर्धनासाठी पुढे येत आहेत. त्यांना ही संस्था महिन्याला काही ठरावीक मोबदला देते. धनेशाच्या मागावर राहून हे स्थानिक आदिवासी त्यांची घरटी शोधून त्यावर लक्ष ठेवतात. त्या झाडाखाली धनेशाच्या चोचीतून पडलेल्या फळबिया गोळा करतात. त्यांची माहिती लिहून ठेवतात, बियांतून उगवलेल्या झाडांची नोंद ठेवतात. हा सगळा प्रकल्प अपराजिताच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आणि त्याचं वैशिष्टय़ असं की जी मंडळी शिकारी होती तीच आता धनेशांची रक्षक झाली आहेत.

आमचे प्रयत्न, माहितीपर फिल्म्स, धनेश संवर्धन आणि माहिती केंद्र यामुळे स्थानिक लोकांना आपल्या नैसर्गिक ‘वारशा’ची जाणीव झाली आहे. त्यांची मानसिकता आता अधिक ‘विधायक’ झाली आहे. पाकेच्या संरक्षित वनांतील धनेशाची ३९ घरटी आणि अभयारण्यातील ४२ घरटी आता संरक्षित केली आहेत. दरवर्षी मादी पिलांना जन्म देते आहे. पाकेच्या धनेशांना, पाकेच्या जंगलांना आता असं अभयदान मिळालं आहे. या मागे अपराजिताचे मार्गदर्शन आणि संपूर्ण टीमचे प्रयत्न कारणीभूत आहेत. अलीकडच्या काळात तर धनेशच्या शिंग चोचीच्या ‘फायबर ग्लास’च्या लाकडाच्या प्रतिकृती त्यांच्याकडे मिळू लागल्या आहेत. त्यांच्या भागाचे प्रतीक  म्हणून टोपीवर ते लावून उत्सवांत ते लोक आता मिरवतात. नेचर कॉन्झर्वेशन संस्थेने पाकेला होमस्टेस्ची पद्धत प्रचलित केली आहे, जवळ लायब्ररीही आहे. तिथली मुले आता शिकू लागली आहेत. प्राणी, पक्षी, वनस्पती यांची शास्त्रीय माहिती घेत आहेत. संस्थेने २०१५ पासून ‘पाके पगा’ नावानं वार्षिक हॉर्नबिल उत्सवही सुरू केला आहे. त्यामुळे सांस्कृतिक अस्मितेला जाग आली आहे आणि पर्यटनालाही प्रोत्साहन मिळते आहे.

हॉर्नबिल ज्या झाडांची फळे खातात ती झाडे आहेत – इलेक्स पॉलीअलथिया, चिसोचेटॉन, डिसोझायलम, हॉर्सफिल्डीया किंगी, टेट्रामेलिस न्यूडीफ्लोरा-  जर्मलचे झाड – वगैरे. गेली काही वर्षे यांच्या बिया गोळा करून साठवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेचे लोक करत आहेत. पाकेबाहेरच्या तुमच्या आमच्यासारख्या निसर्गप्रेमींनी ५००० रुपये देऊन घरटय़ाचे पालकत्व घेतले आहे. हेही संवर्धनासाठी चांगले लक्षण आहे.

वन्यजीवांमध्ये आवड असणारे अनेक तरुण-तरुणी पाकेला राहून काही महिने संवर्धनाच्या कामाचा अनुभव घेत आहेत. इथे येणाऱ्या युवकांमध्ये आयटीच्या पदवीधरांचे प्रमाण जास्त आहे. संवर्धनासाठी हे सुचिन्हच आहे.

ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशांत अपराजिताच्या निसर्गप्रेमाचा, निसर्ग संवर्धनांतील कामाचा आलेख असा चढता आहे. तिचा पती चारुदत्ता मिश्रा तिच्याच सारखा पर्यावरण विषयांतील वैज्ञानिक आहे. ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन’ ही संस्था त्यांनी १९९६ मध्ये सुरू केली. ही संस्था फंड्स मिळवते. आणि विज्ञानाधिष्ठित सामाजिक जबाबदारीचे भान राखून निसर्ग संवर्धनासाठी अभ्यासू व्यक्तींना आर्थिक मदत देते.

अपराजिता आणि चारुदत्त या संवर्धनातील वैज्ञानिकांचे घर बंगळूरुला आहे. त्यांचा मुलगा ८-९ वर्षांचा आहे, त्याच्या रक्तातच निसर्गप्रेम, निसर्गभान आणि संवर्धनाची ओढ असणार हे नक्की.

अपराजिताच्या या कामगिरीची दखल घेऊन तिला अनेकानेक पारितोषिकांचा सन्मान प्राप्त झाला आहे. महत्त्वाचे २०१६ मध्ये प्रतिष्ठेचे ब्रिटनचे ग्रीन ऑस्कर व्हाइटली अ‍ॅवॉर्ड आणि तीस लाख रुपयांचा निधी तिला तिच्या कामासाठी मिळाला. विशेष म्हणजे तिचा पती चारुदत्त मिश्रा यांनाही हा सन्मान २००९ मध्ये मिळालेला आहे. तसेच नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा ‘उगवते संशोधक’ अ‍ॅवॉर्ड तिला २०१० मध्ये मिळाला  आहे. सध्या ती नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशनची वरिष्ठ वैज्ञानिक आहे. राष्ट्रीय वाघसंवर्धन अ‍ॅथॉरिटीची आणि अरुणाचलच्या वाइल्ड लाइफ अ‍ॅड्वाझरी बोर्डची ती सदस्य आहे. तिची कामगिरी सतत उंचावणारी आणि भविष्यात आश्वासक ठरणारी आहे.

– उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com