25 November 2020

News Flash

छायाचित्रण आणि भटकंतीचा मस्त मेनू

माझ्या मीच घेतलेल्या निवृत्तीनंतर आता छायाचित्रकार.

मी व्यवसायाने फार्मासिस्ट, वय ७१ आणि माझ्या मीच घेतलेल्या निवृत्तीनंतर आता छायाचित्रकार. बरीच वर्षे औषध विक्रीत काढली पण जन्मजात असलेला कलाकार मात्र संधीचीच वाट पाहात होता. त्यामुळे व्यवसायात असल्यापासूनच छायाचित्रणाचा अभ्यास सुरू झाला होता. व्यवसायातून वेळ मिळेल तसा सरावही चालू होता तोही सर्व जबाबदाऱ्या सांभाळतच. व्यवसायात एकपात्री असावे लागल्यामुळे बरीच कसरत करावी लागायची. पण जबरदस्त इच्छाशक्तीमुळे सर्व जमून गेलं. त्यातच होईल तेवढा आणि वेळ मिळेल तसा भारत पाहायची मनोमन सुप्त इच्छा असल्यामुळे भटकंतीही चालू असायची. आता मात्र पूर्ण वेळ छायाचित्रण आणि भटकंती असा मस्त मेनू जमून जातो आहे.

पुष्कळसा भारतही पाहून झाला आहे. एकूणच निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दल प्रचंड आकर्षण असल्यामुळे भारतातील अभयारण्याच्या सहलींचाही छंद गेली २० वर्षे चालू आहे. आजवर २० वेळा या सहली झाल्या आणि अजूनही होत आहेत. वन्य प्राणी म्हणजे फक्त वाघ सिंहच नव्हेत तर अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत. त्यामुळे अगदी घराभोवतीही किती तरी विषय मिळतात. याही पुढे जाऊन ही छायाचित्रे फक्त स्वत:पुरतीच ठेवायची कशाला असाही विचार मनात आल्यावर छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शने यांनाही ही छायाचित्रे पाठवायला सुरुवात केली. येथे सविनय सांगावेसे वाटते की माझ्या छायाचित्रांना आजवर आठ आंतरराष्ट्रीय, चार राष्ट्रीय आणि आठ राज्य पारितोषिके मिळाली आहेत आणि अजूनही मिळणार आहेत. युरोपमधील जागतिक प्रदर्शनात माझी छायाचित्रे प्रदर्शित झाली. या आंतरराष्ट्रीय पारितोषिकात युरोपमध्ये मिळालेल्या तीन ब्रॉन्झ पारितोषिकांचा समावेश आहे. येथे हे मुद्दाम सांगावेसे वाटते की, जून २०१७ मध्ये माझ्या एका कलात्मक छायाचित्रास कॅलिफोर्नियात पारितोषिक मिळाले आणि हे छायाचित्र ही स्पर्धा प्रायोजित करणाऱ्या लंडन येथील एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने घेतले असून ते याची भेटकार्डे छापणार आहेत आणि त्यातून मिळणारा निधी ते लंडनमधील गरजू लोकांसाठी वापरणार आहेत. माझे छायाचित्र जागतिक पातळीवर पोहोचले याचा आनंद आणि समाधान आहे. एकूणच काय, तर हा छंद नुसता छंद राहिला नाही तर त्याने जागतिक उंची गाठली. मी कोणताही छायाचित्रणाचा कोर्स केलेला नाही. जन्मजात देणगीचा पूर्ण उपयोग केला एवढेच. याचप्रमाणे दोन वर्षांआधी फुलपाखरांच्या संवर्धनाचा छंद लागला. सध्या सर्वत्रच पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे फुलपाखरांचे अधिवासही कमी होत आहेत. निसर्गाच्या साखळीतील फुलपाखरे हा अतिशय सुंदर आणि अतिआवश्यक घटक. त्यामुळे यांच्या संवर्धनाचे वेड सध्या लागले आहे. अंडी घालण्यासाठी आवश्यक झाडे घरीच मोकळ्या जागेत लावली आहेत. यावर फुलपाखरे अंडी घालतात. त्यातून अळ्या बाहेर आल्या की त्यांना पक्ष्यांपासून संरक्षण द्यायचे, म्हणजे त्यांचे जीवनचक्र पूर्ण होऊन फुलपाखरे जन्म घेतात. आजवर २०० पेक्षा जास्त फुलपाखरांनी माझ्या डोळ्यासमोर जन्म घेतला आहे. प्रत्येक फुलपाखराचा जन्म आमच्यासाठी कमालीच्या आनंदाचा सोहळा असतो. मात्र यासाठी याचा अभ्यास असणे जरुरीचे आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी हे आपले योगदान. अगदी घरच्या घरी करता येण्यासारखे. तसेच घरातल्या नव्या पिढीलाही मार्गदर्शक. यामुळे माझा मुलगा पुणे येथेही हा आनंद घेतो आहे. कोणास आवश्यक असल्यास थोडे मार्गदर्शनही मी करू शकेन. तर अशा वेडापायी कंटाळा हा शब्दच माझ्याकडे नाही.

निवृत्ती ही माझ्यासाठी संधी होती, त्याचा पुरेपूर उपयोग करून राहिलेली ४०-५० वर्षे मस्तच जाणार हे निश्चित. या सर्वामागे स्वा. सावरकर यांच्या चरित्रातून मिळालेली प्रेरणा मुख्य आहे. हे चरित्र म्हणजे एक अखंड ऊर्जा आहे. ज्याने त्यातून एक कणभरही ऊर्जा घेतली त्याला आयुष्य भरभरून जगता येईल.

– सुभाष पुरोहित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 5:02 am

Web Title: articles in marathi on wildlife photography
Next Stories
1 माझी आक्का
2 जगणं व्हावं गाणं
3 कायद्यामागचं वास्तव
Just Now!
X