|| सायली परांजपे

दररोज लक्षावधी फोटो पोस्ट होतात, अशा सोशल मीडियाच्या चावडीवरून एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो होता अफगाणिस्तानतला. मध्य अफगाणिस्तानातल्या दायकुंडी प्रदेशाची राजधानी निलीमध्ये विद्यापीठ प्रवेशाची परीक्षा सुरू असतानाचा हा फोटो. एक पंचविशीची तरुणी जमिनीवर बसून पेपर लिहितीये आणि तिच्या मांडीवर आहे एक तान्हं बाळ. एकीकडे त्या दोन महिन्यांच्या बाळाला जोजवत त्याची आई विद्यापीठात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन एकाग्र करतेय. हे भारावून टाकणारं दृश्य कॅमेऱ्यात पकडण्याचा मोह एका प्राध्यापकांना आवरला नाही आणि त्या फोटोनं किमया केली, तिचं उच्चशिक्षणाचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ पाहातंय.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
dhairshil mane
कोल्हापूर: खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, धैर्यशील माने
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

अर्थातच या फोटोमागे एक मोठी कहाणी आहे. संघर्षांची, जिद्दीची, निश्चयाची! या स्त्रीचं नाव जहांताप अहमदी. वय २५. तीन मुलांची आई. दायकुंडीतल्या एका दुर्गम खेडय़ांत राहणारी जहांताप. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात हातातोंडाची गाठ पाडण्याचा संघर्षही तिच्यासमोर होताच. जहांतापचं लग्न झालं वयाच्या अठराव्या वर्षी. त्या वेळी तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं होतं. गावात प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळवण्यासाठी खरं तर हे शिक्षण पुरेसं आहे. पण तिची नजर विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्याकडे आहे, कारण तिला डॉक्टर व्हायचं आहे. तिला तिच्या दुर्गम भागातल्या लोकांची सेवा करायची आहे. त्याआधी आपल्या मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं असंही तिला वाटतंय.

तालिबानची सत्ता उलथून टाकली गेली त्याला आता १७ र्वष पूर्ण होत आली आहेत. तालिबानी राजवटीने गळा घोटलेल्या स्त्री शिक्षणाला आता थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळाला असला तरी एकंदर साक्षरतेचं प्रमाणच जेमतेम २६ टक्के. देशातल्या ३५ लाख मुलांनी शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही आणि त्यातल्या ७५ टक्के मुली. वीसेक लाख मुलींची मजल प्राथमिक शिक्षणाहून पुढे जात नाही. जहांतापची कहाणीही याच रस्त्यावरून पुढे जात राहिली असती, पण तिचा दृढनिश्चय आणि रूढार्थाने अशिक्षित नवऱ्याने तिला दिलेली साथ यामुळे तिला वेगळं वळण मिळालं. विद्यापीठात प्रवेशासाठी आवश्यक परीक्षा देण्याकरता जहांताप तिच्या दुर्गम खेडय़ापासून दहा तासांचा खडतर प्रवास करून निलीला पोहोचली. सोबत अर्थातच दोन महिन्यांची खेझरान. तिला मांडीवर घेऊनच जहांताप पेपर लिहिणार होती. त्यात खेझरान कानदुखीने हैराण झाल्याने सतत रडत होती. तिच्या रडण्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून जहांतापने खाली जमिनीवर बसून पेपर लिहिला आणि मिळवले दोनशेपकी १५२ गुण.

मात्र, त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिचा हा निश्चय बघून भारावून गेलेले प्राध्यापक नसीर खुस्त्रो यांनी तिचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. आणि अनेकांपर्यंत पोहोचला. अफगाणिस्तानातील स्त्रीहक्क कार्यकर्त्यां झहरा यगाना यांना जहांतापबद्दल कळल्यानंतर त्यांनी तिला कुटुंबासह काबूलला आणलं. त्यांच्या मदतीने जहांतापला काबूलमध्ये खासगी विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि तिच्या कुटुंबाला काबूलमध्येच घर आणि उपजीविकेचं साधन मिळावं यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गटाने तिच्या विद्यापीठ शिक्षणासाठी क्राऊड फंडिंग सुरू केलं आहे. एकंदर जहांतापचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन उभं आहे.

यामध्ये जहांतापचे पती मुसा मोहम्मदी यांनी तिला दिलेला पाठिंबा दुर्लक्षून चालणार नाही. स्वत: निरक्षर असून, किंबहुना त्यामुळेच, मुसा यांना शिक्षणाचं महत्त्व पुरेपूर समजलेलं आहे. जहांतापचा अभिमान वाटतो, असं ते आवर्जून सांगतात. तिने मिळवलेल्या यशामुळे तिच्या गावातल्या, कुटुंबातल्या स्त्रियांमध्येही शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

स्त्री हा शब्द उच्चारला तरी अस्वस्थतेचं मळभ दाटून यावं अशा घटना आजूबाजूला होत असताना, स्त्रीत्वाच्या मर्यादा पार करून आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी निश्चयाने उभ्या राहिलेल्या जहांतापची कहाणी सगळ्यांसाठीच आशेच्या किरणासारखीच आहे.

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com