माझ्या मत्रिणीचा मला आठ दिवसांपूर्वी फोन आला की आता थंडी संपली म्हणून कोरेगाव पार्कला ब्रॅण्डेड वुलन गारमेंटसचा मस्त सेल लागला आहे, तर चलतेस का म्हणून. मी म्हटलं, ‘‘नाही गं! भरपूर स्वेटर्स आणि शाली आहेत, सध्या नक्कीच नको.’’ तर म्हणाली, ‘‘अगं, मला तरी कुठे घ्यायचे आहे? जस्ट गंमत म्हणून जाऊ या!’’ शेवटी गेले तिच्याबरोबर. आणि नको असतानादेखील तिने चांगली तीन-चार स्वेटर्स घेतली.

शेजारच्या स्वप्नालीने मिक्सर बिघडला, तर दुरुस्त करण्यापेक्षा नवीनच घेतला. ‘‘का गं, दुरुस्तीचा खर्च जास्त होता?’’ मी विचारलेच न राहून. ‘‘माहीत नाही गं, पण नवीन मॉडेल आले आहे नं बाजारात म्हणून घेतलेच. शिवाय हा मिक्सर जुना झालाय. अगं वर्ष झालंय् वापरून!’’ एका वर्षांत मिक्सर जुना होतो? ‘युज अ‍ॅन्ड थ्रो’ संस्कृती येथेही रुळली तर.

परवा रमणकडे त्याच्या वाढदिवसाला गेले, तर नवीन मनगटी घडय़ाळ घेतले म्हणून दाखवत होता. ‘‘अरे आधीच ४ आहेत न तुझ्याकडे?’’ माझा निर्थक प्रश्न. ‘‘मग काय झालं? आवडलं मला, घेऊन टाकलं ऑनलाइन! आणि मला बोनस मिळालाच होता की!’’

चंगळवादाच्या विळख्यात सापडलेला आजचा तरुण ग्राहकवर्ग बघितला की १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व जास्त पटते. मुख्य म्हणजे पैसे खर्च करून त्याचा पुरेपूर मोबदला मिळतो की नाही याचेही त्याला भान नाही. खरे तर ग्राहक हा बाजारपेठेचा ‘अनभिषिक्त सम्राट’ आहे, पण तोच आज जास्त फसवला जातो. म्हणून तर दुसरीकडे अशीही उदाहरणं आहेत की विकत घेतल्यानंतर सहा महिन्यांत बिघडलेला फ्रिज गॅरण्टी पीरिएडमध्ये असूनही विनामूल्य दुरुस्त करून देत नाही, किंवा फ्लॅटचे बुकिंग करून, वेळेवर मासिक हप्ते भरून ५ वर्ष झाली तरी पझेशन नाही, किंवा रेल्वेचे कन्फर्म आरक्षण असूनही वेळेवर गाडीत सीट मिळत नाही किंवा वहीवर २०० पाने लिहिली असूनही आत मोजली तर १८० च आहेत, किती उदाहरणं द्यावीत? आणि आता तर विक्रेत्याला ‘जीएस्टी’मुळे ‘एमआरपी’ हे नवीन हत्यार मिळाले आहे फसवणुकीचे! पण ग्राहकाला याची खंत नाही की जाणीव नाही? म्हणून त्याला जागे करण्यासाठी हा लेख-प्रपंच!

अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अर्थव्यवस्थेतील ग्राहकांचे स्थान, लक्षात घेऊन, त्याच संदर्भातील त्यांच्या आणि अन्य देशातील जागरूक नेत्यांच्या प्रयत्नामुळे १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून मान्य केलेला आहे.  आपण भारतात २४ डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न असा आहे की, प्रत्येक जण जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत ग्राहक असतोच. त्याने स्वत:च्या हक्कासाठी, संरक्षणासाठी प्रत्येक क्षण जागरूक असायला हवे. त्याला १५ मार्च किंवा २४ डिसेंबर अशा दोन संरक्षक कुबडय़ा देऊन चालणार नाही. विशेषत: भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त म्हणजे तरुण ग्राहक जास्त आहे, त्यांनी तर याबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे.

१९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला. २००२ मध्ये त्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या. ग्राहकांना स्वत:चे संरक्षण करण्याची अनेक कायदेशीर शस्त्रे दिलेली आहेत. पण सर्वेक्षण केले तर असे लक्षात आले की या कायद्यांची माहितीदेखील तथाकथित सुशिक्षित ग्राहकांना नाही. ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातील सुशिक्षित उच्चशिक्षित ग्राहकांनादेखील नाही. कारण घोडय़ाला पाण्यापर्यंत आणता येतं, पण पाणी पिण्याची इच्छा त्याच्यात निर्माण करता येत नाही.

आजचा ग्राहक ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन शॉपिंग, मोबाइल बँकिंग हे सर्व शिकतोय पण या सर्व व्यवहारात जर माझी फसवणूक झाली, तर त्याविरुद्ध मी काय काय करू शकतो याचे त्याला ज्ञान नाही व ज्ञान नसल्याची खंतही नाही. आज जाहिरातीच्या सततच्या भडिमारामुळे तो गोंधळून वस्तूची योग्य निवड करू शकत नाही. वस्तू विकत घेताना अवाजवी किंमत देतो. जी वस्तू बनावट किंवा भेसळयुक्त असते आणि वापरताना खराब झाली तर विक्रयोत्तर सेवाही धड मिळत नाही. खरे तर ग्राहक बाजारपेठेचा अनभिषिक्त सम्राट आहे, पण आजच्या बाजारपेठेत तो लाचार झालेला दिसतो. आणि तरीही तो जागा होत नाहीये. ज्या प्रमाणे फक्त मतदानाच्या दिवशी मतदार ‘राजा’ असतो, त्या प्रमाणे ग्राहक हा वस्तू घेतानाच राजा वाटतो. बाकी तो हवालदिल असतो.

पूर्वी ही परिस्थिती एवढी गंभीर नव्हती. मग आता काय बदलले? थोडा सविस्तर विचार करायला हवा. १९९१ मध्ये आर्थिक समुद्रमंथन झाले. त्यातून तीन रत्ने बाहेर पडली -उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण! त्यांचा स्वीकार तत्कालीन अर्थमंत्री व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना करावाच लागला. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत समाजव्यवस्थेत इतक्या झपाटय़ाने व सखोल बदल झाले की त्या बदलांना क्रांतीच म्हणावे लागेल.

भारतीय मध्यमवर्ग नवश्रीमंत झाला. आय.टी. सेक्टरमधील तंत्रज्ञ, व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील अधिकारी यांना प्रचंड पगार मिळू लागले आणि अर्थशास्त्रातील अऱ्हासी सीमांत उपयोगितेच्या सिद्धान्तानुसार या भरमसाट वाढणाऱ्या पगारामुळे पशाचे महत्त्वच वाटेनासे झाले. खर्च करतानाच विवेक कमी झाला. दुसऱ्या बाजूने, जागतिकीकरणामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची दारे-खिडक्या सताड उघडली गेली आणि विदेशी वस्तू व सेवा यांच्याबरोबरच पाश्चात्त्य जीवनशैली आपल्या बाजारातच नव्हे, तर आपल्या घरात अगदी घरपणात शिरली व हे विदेशी पाहुणे तर आता घरचेच झालेत, तरीही जुनी पिढी, या आर्थिक प्रवाहात झपाटय़ाने पुढे जाणाऱ्या तरुण पिढीला, स्वत:च्या बचत करण्याच्या जन्मजात सवयीने मागे खेचत होती, आणि त्यामुळेच अमेरिकेत जेव्हा तेथील सबप्राईम क्रायसिसमुळे आर्थिक मंदीची लाट आली तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था त्यात वाहून गेली नाही. बुडत्याला बचतीच्या सवयीचा आधार मिळाला!

पण यापासून आम्ही धडा घेतलेला नाही. कारण अजूनही आजचा ग्राहक अर्थसाक्षर झालेला नाही. खरेदी करणे हा त्याचा आवडता छंद झालाय. कारण खिशात मावणार नाही एवढा पसा मिळत नसेल तर वित्तीय संस्था कर्ज द्यायला उत्सुक आहेत. सुलभ हप्त्यांवर वस्तू देणारे विक्रेते आहेत. पूर्वी ‘ऋण काढून सण साजरा करू नये’ अशी म्हण होती; आता ऋण काढूनच अख्खा संसार सजवला तर ते जणू काही आर्थिक शहाणपणाचं लक्षण समजलं जातं.

त्यामुळे हळूहळू या खरेदीच्या छंदाचे व्यसनात रूपांतर होत आहे व हे व्यसन पराकोटीला गेलं की त्याला नाव दिलं जातं, Affluenza. अमेरिकेतील तिघा लेखकांनी, डेव्हिड वॉक्स, प्रो. जॉन ग्राफ, थॉमस नायलॉर यांनी मिळून, याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या तिघा लेखकांनी ‘अफ्लुएन्झा इज अ‍ॅन ऑल कन्झ्युमिंग एपिडेमिक  अशी परिभाषा करून खरेदी करण्याच्या या गंभीर व्यसनाला एक संसर्गजन्य रोग म्हटलेले आहे. या रोगाने पीडित माणसांची अनेक धक्कादायक निरीक्षणे अमेरिकेच्या या लेखकत्रयींनी सांगितली. जसे, अमेरिकेत एकूण उत्पन्नाच्या दोन तृतीयांश हिस्सा उपभोग्य वस्तूंवर खर्च होतो. तेथील उपभोक्ता स्वत:च्या शिक्षणावर १५ टक्के खर्च करतो, तर पादत्राणे घडय़ाळे व अलंकार यावर ८५ टक्के खर्च करतो. ९३ टक्के मुलींचा छंद शॉपिंग हा असून प्रत्येकी जवळ किमान पाच क्रेडिट कार्ड आहेत. तेथे पदवीधरांपेक्षा दिवाळखोरांची संख्या जास्त आहे. ड्रायव्हरच्या लायसेन्सच्या संख्येपेक्षा गाडय़ांची संख्या जास्त आहे. कारण दरडोई ३/४ गाडय़ा आहेत. किशोरवयीन मुले रोज सरासरी १०० जाहिराती बघतात.  ही निरीक्षणे किती भयानक आहेत हे आपण समजू शकतो, म्हणून आपल्याकडे ग्राहक शिक्षणाची प्रचंड गरज आहे. चंगळवादाच्या विळख्यातून सुटण्यासाठी व वरील रोगापासून स्वत:ला वाचवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला कायद्याने दिलेले अधिकार माहीत हवेत व ग्राहक म्हणून स्वत:ची कर्तव्ये व जबाबदाऱ्या कोणत्या हेही माहीत हवे.

ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना पुढील मूलभूत हक्क दिलेले आहेत –

माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तूच्या निवडीचा हक्क, वस्तू/ सेवा वापरताना सुरक्षिततेचा हक्क, ऐकून घेतले जाण्याचा हक्क, तक्रार करण्याचा हक्क,  ग्राहक शिक्षणाचा हक्क, मूलभूत गरजांचा हक्क, पर्यावरणाचा हक्क. या सर्व हक्कांबरोबर ग्राहकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजणे आवश्यक आहे. या जबाबदाऱ्या तीन टप्प्यांमध्ये बघता येतील.

१. खरेदी करण्यापूर्वीच्या जबाबदाऱ्या –

ग्राहकाने वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती आता विकत घेणे खरंच आवश्यक आहे का? याचा विचार करावा. मनात आले म्हणून, सेल लागला म्हणून, शेजाऱ्याकडे आहे म्हणून जर वस्तू खरेदी केली जात असेल तर तो निव्वळ चंगळवाद ठरेल. आणि चंगळवाद हा आर्थिक गुन्हा मानला पाहिजे. खरेदी पुढे ढकलून बचत व गुंतवणूक वाढते हे सामान्य ज्ञान ग्राहकाला हवेच.

२. खरेदी करतानाच्या जबाबदाऱ्या –

समजा वस्तू खरेदी करायची आहेच तर जेवढी आवश्यक आहे तेवढीच विकत घेतली पाहिजे. वस्तू वाया जाऊ देणे हा गंभीर अपराध आहे हे जाणवले पाहिजे. प्रत्येक सुजाण ग्राहकाने स्वत:ला आर्थिक शिस्त लावायला हवी. तो अनेकदा चुकीची वस्तू खरेदी करतो म्हणजे त्या वस्तूच्या बाजूने आर्थिक मतदान करतो. केमिकल पद्धतीने पिकविलेली फळे विकत घेतली, तर त्याचा अर्थ असा की असली रद्दी व आरोग्याला घातक फळे विकायला ग्राहक परवानगी देतो आहे. हलक्या दर्जाच्या वस्तू नाकारणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. तसेच काळाबाजार, साठेबाजी याला प्रोत्साहन मिळू नये म्हणून महाग असली तरी ती वस्तू मी विकत घेतली असा टेंभा मिरवायचा नाही. प्रत्येक खरेदीची पावती घ्यायची. पेट्रोल भरल्याची व डॉक्टरांना फी दिल्याची पण!

. खरेदी केल्यानंतरच्या जबाबदाऱ्या –

वस्तू खरेदी करून स्वत:ची झाली की ती सांभाळून वापरणे, नीट काळजी घेणे आवश्यक आहे. ‘वापरा व फेका’ ही चन भारतीय ग्राहकाला परवडणारी नाही.

या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर ग्राहक सुजाण, शहाणा झाला असे म्हणता येईल. वस्तू विकत घेताना तो फक्त पसा खर्च करत नाही, तर वेळ व ऊर्जा पण खर्च करतो. पसा तर पुन्हा तो कमावू शकतो, पण वेळ मात्र कोणत्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही. पसा कसा कमवावा यासाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पण पसा खर्च कसा करावा याचे शिक्षण ग्राहकाला मिळाले पाहिजे तरच तो अर्थसाक्षर होईल; अन्यथा तो कायम फसवला जाईल. देव करो अन् ती वेळ न येवो! म्हणून ‘जागो ग्राहक जागो.’

– प्रा. अनुपमा भेदी

bhedianupama@gmail.com

chaturang@expressindia.com