संपदा वागळे,

आषाढी एकादशीला पंढरपूर वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं असतं. मजल दरमजल तेथे पोहोचणाऱ्या या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या अनेक गरजा लक्षात घेऊन गेली ३०-३५ वर्षांपासून अनेक व्यक्ती, संघटना त्यासाठी कार्यरत आहेत. वैद्यकीय गरज असो वा स्वच्छतेची, डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवक या वारीत सेवा देऊन प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीचं समाधान मिळवतात. माणुसकीची ही दीपमाळ वर्षांनुवर्षे लावणाऱ्या या हजारो ‘भक्तां’मुळे ही वारी सफल संपूर्ण होते..  सोमवारच्या आषाढी एकादशीनिमित्ताने..

UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार

पिंपळ सोन्याचा हलला

निघाली माऊली यात्रेला

निघाली माऊली पंढरीला

रंगून जाती भजन कीर्तनी

चित्त तयांचे श्रीहरी चरणी

चरण दर्शना आतुर होती

निघाली वारी..

दर्शन होता विठुरायाचे

भान हरपते संसाराचे

सार्थक हरपते संसाराचे

सार्थक होते नरदेहाचे

निघाली वारी..

अरविंद हर्षे यांची ही कविता वाचतानाही मनात वारीचा माहोल जागा होतो. टाळमृदुंगाचे स्वर कानी घुमू लागतात. भक्तीभाव दाटून येतो आणि आपणही एक दिवस तरी वारी अनुभवावी असं वाटू लागतं. याच ऊर्मीने हल्ली अनेक नवशे-गवशे एखादं-दोन दिवस वारीसोबत चालताना दिसतात. मात्र काही निष्ठावंत खरा तो एकची धर्म.. ही साने गुरुजींची शिकवण शिरोधार्य मानून वारकऱ्यांमध्येच विठ्ठलाला पाहात त्यांच्या चरणी सेवा रुजू करतात अथवा वारीच्या अनुषंगाने पर्यावरण दक्षतेची धुरा उचलतात. वारीच्या या अधारस्तंभापैकी काही जणांची ही ओळख.

ठाण्यातील ‘सह्य़ाद्री मानव सेवा संघ’ ही संस्था गेली ३५/३६ वर्ष वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. डॉ. विश्वास सापटणेकर, डॉ. अच्युत जोशी आणि सुनंदा केळकर या संस्थापकांसह आता ५० ते ६० स्वयंसेवक या सेवाकार्यात योगदान देतात. या लेखानिमित्त डॉ. जोशींना भेटायला मी त्यांच्या दवाखान्यात गेले तर तेव्हा त्यांचे सहा कॅम्प झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी ते शेवटच्या शिबिरासाठी निघणार होते. म्हणाले, ‘आमच्या कॅम्पसाठी पाच तंबू उभारले जातात. पहिल्यात तपासणी. त्यासाठी सात-आठ डॉक्टरांची टीम मदतनीसांसह सज्ज असते. दुसऱ्या तंबूत औषधे, इंजेक्शन देण्याची व्यवस्था. तिसऱ्यात सलाइन लावण्याचं काम. पुढे ड्रेसिंगची व्यवस्था. ड्रेसिंग आणि सलाइन लावणं या कामासाठी तैनात असलेल्या १० सिस्टर्सना खाण्यापिण्याचीही उसंत मिळत नाही. त्यानंतर दात, नाक, कान आणि घसा यांवरील उपचारांची सोय आणि शेवटचा तंबू म्हणजे चक्क ऑपरेशन थिएटर. डॉ. विश्वास  सापटणेकर हे आमचे सर्जन. इथे प्लॅस्टर घालणं, पायात मोडलेला काटा काढणं, जखमांना टाके घालणं.. अशा छोटय़ा छोटय़ा शस्त्रक्रिया लोकल अ‍ॅनेस्थेशिया देऊन करतात. दिवसाला दहा हजारांच्या वर वारकरी या सेवेचा लाभ घेतात..

वारकऱ्यांच्या दमलेल्या दुखऱ्या पायांना आराम मिळावा म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने खास तेल बनवण्याची जबाबदारी पुण्यातील विनय नाफडे यांची. या तेलाच्या पिचकारीसारख्या बाटल्या घेऊन स्वयंसेवक वारी येण्याआधीच कॅम्पलगतच्या रस्त्यावर अर्धा किमी पुढे-मागे उभे असतात. या तेलाच्या लहान लहान बाटल्या भरणं, सर्दी, खोकला, ताप या आजारांवरील गोळ्यांची पाकीटं बनवणं.. अशा पूर्वतयारीसाठी मोठय़ांबरोबर छोटेही आनंदाने येतात.

सीमा हर्डीकर ही वृक्षप्रेमी मुलगीही ‘जिज्ञासा’ संस्थेच्या माध्यमातून इयत्ता आठवीपासूनच या उपक्रमाशी जोडली गेलीय. ती म्हणाली, ‘‘पहिल्या वर्षी डॉक्टर काकांनी आम्हाला ड्रेसिंग करणं, सलाइन लावणं.. अशी कामं शिकवली. ही जबाबदारी काळजीपूर्वक निभावताना आम्हाला मोठं झाल्यासारखं वाटे. कॅम्प संपल्यावर मिळालेल्या कौतुकपत्राचं तर आम्हाला केवढं अप्रूप! गेली १७/१८ वर्ष सातत्याने गेल्याने आता तर आम्हा तरुणांचा एक ग्रुपच बनलाय. तंबू लावणं, उतरवणं, बसच्या टपावर सामान चढवणं, औषधांच्या साठय़ांचा हिशेब ठेवणं.. अशी कामं आम्ही हिरिरीने करतो.’’

क्वचित प्रसंगी थांबलेली एखाद्या हृदयाची टिकटिक (हार्ट बीटस्) तोंडाने श्वसन देऊन सुरू करणारे तसंच पायाच्या ड्रेसिंगसाठी प्रसंगी खाली चिखलात बसणारे डॉ. सापटणेकर त्यांना देवासमान वाटतात. डॉक्टरांचं म्हणणं – जेव्हा वार्धक्याने वाकलेले स्त्री किंवा पुरुष वारकरी मला शोधत कॅम्पमध्ये येतात आणि सांगतात की दोन वर्षांपूर्वी तू पायाला प्लॅस्टर घातलंस म्हणून मी आज चालतोय आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून ‘म्हातारा हो’ असा आशीर्वाद देतात तेव्हा मला प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीचं समाधान मिळतं.

‘ज्ञानदेव सेवा मंडळ’ हीदेखील गेली ३५ वर्ष वारीला वैद्यकीय सेवा देणारी ठाण्यातील आणखी एक संस्था. या मंडळाचे सर्वच सदस्य वारकरी पंथाचे आहेत. यांची साधारण २० ते २५ जणांची टीम निघते. सात जागी कॅम्प लागतात. मंडळाचे अध्यक्ष अभय मराठे म्हणाले,

‘‘माझे आई-वडील अनेक वर्ष पायी वारी करत होते. त्या वारशाला आमच्या पिढीने सेवेची जोड दिली. वारकऱ्यांच्या शिरांनी तडतडलेल्या पायांना मसाज केल्यावर किंवा चालून थकलेल्या जीवांना सलाइन लावून टवटवीत केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारी कृतज्ञता हीच आमची प्रेरणा. आपण कुणाचा तरी आधार बनू शकतो, ही भावनाच आम्हाला पुन:पुन्हा येण्यासाठी बळ देते..’’

‘जनकल्याण समिती’तर्फे गेली १७ वर्ष वाखरी या गावात जिथे शेवटचं रिंगण होतं तिथे वैद्यकीय शिबीर आयोजित केलं जातंय. यात सहभागी होणारे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी परिषदेत घडलेले. या कॅम्पचं वैशिष्टय़ म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला औषधांबरोबर पोटभर नाश्ताही दिला जातो. डॉ. नितीन झोडगे यांचं वाखरीतील संपूर्ण घरच या वेळी वारीमय झालेलं असतं. या टीममधील डॉ. अश्विनी बापट म्हणाल्या की, ‘‘भक्तीत तल्लीन होणं म्हणजे काय ते या वारकऱ्यांकडे पाहून कळतं. भक्तीतील उत्कटता अनुभवायची असेल तर वारीला पर्याय नाही.’’

वारीच्या अपरिहार्य अडचणींवरील तोडगा म्हणून सुरू झालेल्या ‘निर्मल वारी’ या अभियानाने तर पर्यावरणपूरक असे अनेक बदल घडवलेत. वारकऱ्यांना शौचासाठी उघडय़ावर जाण्याची सवय असल्याने पूर्वी वारी पुढे निघाली की मागे राहायची ती अस्वच्छता आणि दुर्गंधी. यावर मात करण्यासाठी काही संघ स्वयंसेवक, तसंच पुण्यातील ‘सेवा सहयोग’ या संस्थेचे प्रमुख संघटक संदीप जाधव आणि शिवाजीराव मोरे, प्रदीप रावत असे संवेदनशील कार्यकर्ते पुढे सरसावले. पहिल्या वर्षी म्हणजे २०१५ला त्यांनी स्वबळावर लोणी आणि यवत या वारीमार्गावरील गावात प्रत्येकी २०० पोर्टेबल टॉयलेट्स उभारली. वीज आणि पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली. परंतु वारकऱ्यांना बंदिस्त जागेत प्रात:विधी उरकण्याची सवय नव्हती. त्यासाठी अडीचशे स्वयंसेवकांची टीम रात्रभर जागत राहिली. ‘माऊली, उघडय़ावर जाऊ नका, या संडासांचा वापर करा..’ हात जोडून केलेल्या या विनंतीचा परिणाम दिसू लागला. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर २०१६ पासून शासनाने हे आव्हान स्वीकारलं आणि सेवा सहयोगाच्या सहकार्याने ‘निर्मल वारी’ या नावाने हा उपक्रम मोठय़ा प्रमाणावर सुरू झाला. स्त्री वारकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होतो आहे. आर्थिक व्यवस्था शासनाची आणि प्रबोधनाची जबाबदारी ‘सेवा सहयोग’ची. आता तर जिथे जिथे वारीचा मुक्काम असतो ते ते गावच या आंदोलनात सहभागी होऊ लागलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीत जो मैला जमा होतो तो गावाबाहेरील मुद्दाम खणलेल्या शोषखड्डय़ात टाकून त्यावर प्रक्रिया करून त्याचं खत बनवलं जातं आणि हे खत शेतकऱ्यांना मोफत दिलं जातं. संदीप जाधव म्हणाले की, ‘‘या उपक्रमाला एवढा प्रतिसाद मिळतोय की गेल्या वर्षी अकरा हजार स्वयंसेवक यात सामील झाले, ज्यात शाळा-महाविद्यालयांमधील मुलंही सहभागी होती. परिणामी आषाढीला चंद्रभागेच्या वाळवंटात जिथे विष्ठेचा सडा असायचा तिथे आता रांगोळ्यांची पखरण असते..’

निसर्गात देवत्व जाणणारा आणखी एक आस्तिक म्हणजे प्रशांत अवचट. ‘प्लास्टिक मुक्त भारत’ हे अभियान या वर्षी सुरू झालं. पण त्या आधीच म्हणजे गेली आठ वर्ष प्रशांत अवचट आपल्या ३०० शिलेदारांसह ‘थम् क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त वारीसाठी जीवाचं रान करत आहेत. दिंडीच्या मार्गावरील शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन, दिंडीतील कीर्तनकारांच्या कार्यशाळा आणि वारकऱ्यांशी संवाद अशा तीन मार्गानी संस्थेचं काम चालतं. थर्माकोल वा धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या स्टीलच्या ताटांऐवजी त्यांनी पत्रावळींचा आग्रह धरला आहे. फक्त आग्रह नव्हेच तर दिंडय़ांना पत्रावळी पुरवून नंतर त्या ताब्यात घेऊन त्याचं खत बनवून ते शेतकऱ्यांना वाटतात. या वर्षी त्यांनी आळंदी आणि पंढरपूर देवस्थान आणि कमिन्स इंडिया कंपनीच्या मदतीने एक कोटी पत्रावळी बनवल्या आणि वाटल्या. या कामात दहा हजार विद्यार्थ्यांचा हातभार लागला. अर्थात आजही वारीतील लोकांसाठी खूप काही करणं आवश्यक आहेच.

वारीबद्दल खूप बोललं जातं, लिहिलं जातं, सोयी-सुविधा पुरवल्या जातात. परंतु जे वारकरी पालखी सोबत परत वारी करतात (तीही निम्म्या दिवसात) त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. ही गोष्ट कल्याणमधील स्वकष्टाने नावारूपाला आलेले एक बिल्डर सखाराम भोईर यांच्या निदर्शनाला आली. आणि त्याक्षणी ‘माऊली सेवा मंडळ’ ही संस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे २००५ पासून परतवारीच्या वारकऱ्यांसाठी वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे आणि सासवड या सात मुक्कामांवर दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था केली जातेय. यासाठी स्वत: भोईर आणि त्यांनी उभ्या केलेल्या तरुण उद्योजकांची टीम सज्ज असते. या संदर्भात भोईर यांचे मित्र सुधीर महाबळ यांनी लिहिलेल्या ‘परतवारी’ या पुस्तकातील ‘सखा आभाळाएवढा’ हे प्रकरण मुद्दाम वाचण्यासारखं आहे. महाबळ हे गल्फमध्ये नोकरीत असताना खास सुट्टी काढून या परतवारीत सहभागी होत असत.

आयुष्य जगत असताना आपले कान, डोळे नेहमी नकारात्मक किंवा हिंस्र बातम्याच ऐकत असतात.. बघत असतात. परंतु माणुसकीची दीपमाळ जोडणारी अशी देवमाणसं जेव्हा दिसतात.. समजतात तेव्हा पटतं की हे जग आजही सुंदर आहे ते अशा व्यक्तींमुळेच!

या सेवाकार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सह्य़ाद्री मानवसेवा मंच

विनय नाफडे – ९५२२५४४७११

ज्ञानदेव सेवा मंडळ

अभय मराठे – ९८२१८७५७३१

जनकल्याण समिती, वारी सेवा

डॉ. नितीन झोडगे – ९४२३३३०१११

सेवा सहयोग, पुणे</p>

संदीप जाधव – ९८२२५२७८३८

थम् क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच

प्रशांत अवचट – ९४२३५७९६८१

परत वारी

सुधीर महाबळ – ९१६७७२०४१३

waglesampada@gmail.com

chaturang@expressindia.com