लक्ष्मीबाई टिळक जशा बोलत तशाच लिहीत. त्यांच्या तोंडी आणि लेखी भाषेत फरक नसे, हीच त्यांच्या लिखाणाची यशस्विता. आज ८० वर्षांनंतरसुद्धा वाचकांचे ‘स्मृतिचित्रां’वर तेवढेच प्रेम आहे. आपली गोष्टीवेल्हाळ आजी आपल्या आयुष्यातल्या घटना सांगते, हा अनुभव प्रत्येकाला घ्यायला आवडतो.. लक्ष्मीबाईंचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष गेल्या वर्षी साजरे करण्यात आले, २४ फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख.

मध्यरात्र, १९२४/२५ मधली! दोघा चोरटय़ांनी पाहिले, एक आजी पदराखाली काही घेऊन चालली आहे. दाट झाडीखाली येताच त्यांनी तिला रोखले खरे, पण तिने त्यांनाच दरडावले. चोर चाचरत म्हणाले, ‘‘काही नाही आजी, आम्हाला वाटले कोणी चोर आहे की काय!’’ आजी रागावत म्हणाली, ‘‘काय रे, चांदण्या रात्री कोणी चोर असा उघड उघड चोरी करील का?’’ आपली असलीयत लपवून चोर चालते झाले. असं चोरालाच दरडावून विचारणारी आजी म्हणजे लक्ष्मीबाई टिळक. त्या रात्री त्यांचा मुक्काम सोपानदेव चौधरींच्या घरी होता. रात्री लिहिता लिहिता त्यांना आठवले, लिखाणाचे बाड शांतिसदनाच्या व्हरांडय़ातच राहिले. म्हणून त्या एवढय़ा रात्री ते घेऊन माघारी परतत होत्या. त्यांना भीती कशी ठाऊकच नव्हती.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

१ जून १८६६ या दिवशी जलालपूरच्या गोखल्यांच्या घरात ११ भावंडांपैकी वाचलेल्यात दोन मोठे भाऊ आणि बहिणींनंतर जगलेली ही पाचवी. आत्या रखमाबाई खांबेटेंना मूलबाळ नव्हते म्हणून मनकर्णिका नारायण गोखले- मनू- त्यांच्या घरी राहिली, वाढली. यापूर्वी मोखाडय़ाहून नाशिकला आलेला एक तरुण, नारायण वामन टिळक जिज्ञासू विद्यार्थी आता कवी आणि वक्ता म्हणून गाजत होता. वडील मंडळींचे बोलणे, पत्रव्यवहार, मुलीला पाहाणे, पसंती वगैरे होऊन नारायण – मनकर्णिका यांचा विवाह नाशकात १८८० मध्ये झाला. आणि मनकर्णिका झाली लक्ष्मी. कालांतराने १८८८ च्या सुमारास राजनांदगावी लक्ष्मीबाईंचा अभ्यास सुरू झाला. लक्ष्मीबाई आपल्या ‘स्मृतिचित्रे’ मध्ये लिहितात – ‘‘होते नव्हते तितके पैसे खर्च करून पुस्तके आणली! एका बाजूला मी बसले, पलीकडे टिळक. मध्ये पुस्तकांचा ढीग. व्याकरणापासून सुरुवात. टिळकांनी विचारले, ‘‘शब्द म्हणजे काय?’’ मला सपाटून हसू लोटले, हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? ‘शब्द म्हणजे शब्द!’ टिळक खूप संतापले. माझे आपले ‘शब्द म्हणजे शब्द’ ठरलेलेच. मी हसू लागे तसतसे टिळक आणखी संतापत. शेवटी संतापाग्नीने व माझ्या हास्याच्या वायूने मोठा भडका उडाला. पुस्तकांचाही भडका उडाला, सारी पुस्तके टिळकांनी टराटर फाडली. ढिगाऱ्याला काडी पेटवून लाऊन दिली. हा आमच्या पहिल्या दिवसाचा ‘अभ्यास’! पुढे टिळकांनी ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत अक्षरे वळविण्यास दिली. यानंतर ‘क’ची बाराखडी. मग मी आपली आपण बाराखडय़ा-जोडाक्षरांची ओळख करून घेतली. पण क्ष, ज्ञ, कै, ख वगैरे मंडळी अजून एखाद वेळेस माझी फजिती करतात.’’

लक्ष्मीबाई अशिक्षित होत्या. त्यांची ‘कळण्याची शक्ती’ मात्र चांगली तल्लख होती. व्याकरणाची काहीच माहिती नसतानादेखील त्यांचे लेखन सवरेत्कृष्ट ठरले. एवढेच नाही तर ते अभिजात अक्षर वाङ्मय या पदापर्यंत पोचले. इतर भाषांतूनही ‘स्मृतिचित्रें’ची भाषांतरे झाली आहेत. इंग्रजी, कन्नड, गुजराती आदी.

ch01rr१५ डिसेंबर १९३४ रोजी ‘स्मृतिचित्रें’चा पहिला भाग तात्यासाहेब कोल्हटकरांनी प्रकाशित केला. मुखपृष्ठावर लक्ष्मीबाई, पाश्र्वभूमीवर हिंदू धर्माचे प्रतीक- नाशकातील काळाराम मंदिर, ख्रिस्ती धर्माचे प्रतीक- अहमदनगरचे मोठे चर्च रेखाटले आहे. तळाशी लक्ष्मीबाईंची प्रिय गोदावरी नदी (नाशिकची गंगा) दाखविलेली आहे. अत्यंत अर्थपूर्ण असे रेखाटन. त्यानंतर १, २ व ३ भाग १५ डिसेंबर १९३५ रोजी आणि ४ था भाग लक्ष्मीबाईंच्या पश्चात १५ डिसेंबर १९३६ रोजी वि. द. घाटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. यातील ११ प्रकरणे लक्ष्मीबाईंची आहेत. पुढली ५ प्रकरणे, मुलगा देवदत्त टिळकांनी लिहून ‘स्मृतिचित्रें’ पूर्ण केले. ‘स्मृतिचित्रें’ च्या ४० व्या वर्धापनदिनी लक्ष्मीबाईंचे नातू अशोक टिळक यांनी संपादित केलेली ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ची पहिली अभिनव आवृत्ती १५ डिसेंबर १९७३ रोजी स्वत: प्रकाशित केली. त्यानंतर ‘पॉप्युलर प्रकाशना’ने हिची दुसरी आवृत्ती १९८९ मध्ये आणि तिसरी १९९६ मध्ये प्रकाशित केली. ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’च्या अभिनव आवृत्तीमध्ये परिशिष्टे आहेत. यात ‘लक्ष्मी-नारायणा’ विषयी अधिक माहिती, काही घटना-पैलू, स्पष्टीकरणे, टिपा, लक्ष्मीबाईंची दोन व्याख्याने, ‘स्मृतिचित्रें’च्या पहिल्या भागाच्या पहिल्या आवृत्तीमधल्या तात्यासाहेब कोल्हटकरांच्या आठवणी, चौथ्या भागाच्या दुसऱ्या आवृत्तीमधील वि. वा. शिरवाडकर यांची प्रस्तावना, लक्ष्मीबाईंच्या सत्कार समारंभातील प्र. के. अत्रेंचे भाषण आणि लक्ष्मीबाईंचे सत्काराला उत्तर हे सर्व समाविष्ट केले आहे. उत्सुक अभ्यासू वाचकांसाठी ही आवृत्ती उपयुक्त ठरते. दुर्दैवाने यापैकी कोणतीही आवृत्ती आज उपलब्ध नाही!

१९२३ मध्ये फादर जॅक विन्स्लो यांचे ‘नारायण वामन टिळक द ख्रिश्चन पोएट ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रकाशित झाले. आणि देवदत्तांनी आईला   त्यांच्या आयुष्यातील आठवणी लिहायला सांगितल्या.  लक्ष्मीबाई आपल्या या आठवणी कित्येकांना अनेकदा सांगत असत. आता त्या लिहू लागल्या. वेग गोगलगायीचा. जोडाक्षरे पटकन साधत नसत. काही सुचले की त्या खडू, कोळसा, काडी कशानेही भिंतीवर-जमिनीवर लिहीत. जो भेटेल त्याला कागद-पेन्सिल घेऊन आपला लेखनिक करीत. ‘मनुष्य’ शब्द लिहिता येईना तेव्हाची बालकवींची आठवण फार मजेदार आहे. तिरप्या-घसरत्या ओळी, समास बिमास काही नाही म्हणून मंडळी हसत. लक्ष्मीबाई म्हणत, ‘‘मी पान भरून जेवते, पान भरून लिहिते आणि तोंड भरून बोलते.’’

त्यांची भाषा सोपी, मार्मिक, सहृदय, अवीट गोडीची, ओघवती आणि अकृत्रिम. त्यांचा जिव्हाळा नि कळवळा कारुण्याचे झरे नि हास्याची कारंजी निर्माण करतात. डोळ्यात पाणी आणतात, कधी गहिवरून तर कधी हसून हसून! प्रसंग करुण असो नाहीतर भीषण. त्या कुशलतेने सूक्ष्म विनोदाची झालर त्या प्रसंगाला जोडतात, प्रसंगाचे औचित्य न गमावता. आपल्या आयुष्यात पदोपदी नाटय़ प्रसंग घडले. त्यातील नेमके नाटय़ वेचून, ते सादर करायचे ही त्यांची समर्थ शैली. कला आणि सत्यता यांचे मिश्रण करताना जणू लक्ष्मीबाई स्वत:च लेखणी बनल्या. ज्या घरात कधीच पाऊल टाकायचे नाही असा निश्चय केला त्याच घरात त्या पाय रोवून बसल्या. सोवळे-ओवळे पाळणाऱ्या कर्मठ वडिलांची मुलगी स्वप्नातही कल्पना न केलेल्यांच्या घरात त्याकाळी जाते, तिथे जेवते. पती-पत्नी उभयता घोडय़ावर बसून नाशिक-जलालपूर प्रवास करतात. पतीचे धर्मातर आणि त्यानंतरचा परीक्षेच्या कठीण काळात धैर्याने जगते. स्वत:चा आणि मुलाचा बाप्तिस्मा, नगरच्या प्लेग आणि दुष्काळातील समाजसेवा, बालकवी ठोंबरे यांच्या आठवणी, पतीचा मृत्यू, कराचीतील वास्तव्य अशा अनेक घटनांमधील दोलायमान अवस्था याचं ‘स्मृतिचित्रें’ मध्ये उत्स्फूर्तपणे वर्णन त्या करतात. आपण जे लिहीत आहोत ते कधी वाचले जाईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. म्हणूनच ते लेखन इतके सहज उतरले आहे. त्या आपल्या वण्र्य विषयाकडे, आपल्या जीवनाकडे अगदी निर्विकार मनाने पहातात. बघा..

‘तारा प्लेगने आजारी पडली, डॉक्टरांनी तिची आशा सोडून दिली. टिळकांना भडभडून आले. मीही निराश झाले. जवसाचे पीठ शिजवून तिला अंगभर पोटीस घातले. एरंडेल-दूध-साखर गरम करून कसे तरी तिच्या पोटात घातले. पायाशी शेगडी पेटवून ठेवली. ब्लँकिटाने तिला चांगले गुंडाळले. मग तिला म्हटले, ‘‘आता तू खुशाल मर. माझ्या मनाला अमुक एक केले नाही असे वाटायला नको,’’ दार लाऊन मी दूर रानात गेले गुडघे टेकून मोठय़ाने आरोळी मारत देवाजवळ प्रार्थना केली. ‘‘देवा, ही पोर जगू दे. तुझी इच्छा असेल तर तू तिला ने. ती जगली तर मी येथे आजाऱ्यांचे काम करीन.’’ मी घरी परतले, दार उघडताच ताराने विचारले, ‘‘ममा, तू कोठे होतीस? पपा कोठे आहेत?’’

लक्ष्मीबाईंना प्रार्थनेची गोडी होती, प्रार्थना व परमेश्वरावर त्यांचा गाढ विश्वास होता. परमेश्वराने वेळोवेळी त्यांच्या प्रार्थनेला उत्तरे दिली होती. एका ख्रिस्ती बांधवाला कर्जातून सोडवायला टिळकांनी आपले स्वत:चे घर सामानासह विकून टाकले. लक्ष्मीबाईंना नगरमध्ये हे कळले. ‘‘हळूहळू घर विकल्याची बातमी माझ्या कानावर आली. अगदी सालंकृत कन्यादान! या वेळेस ताटाबरोबर काठही गेला. विहिरीबरोबर शेत गेले आणि शेताबरोबर घरही. घर गेले, घर बांधून देणारे गेले, घेणारे गेले, डोळ्यांचे पाणी गेले. आठवणी मात्र अजून पाणीदार आहेत.’’

टिळकांच्या पश्चात मुंबईत बोर्डिगमध्ये काम करत असतानाची ही घटना. शाळेला सुट्टी म्हणून मुलींना घेऊन त्या, साहेब-मॅडम साहेब, माहीमच्या समुद्रावर सहलीला गेल्या. दिवस नागपंचमीचा. भरती-ओहोटीचे काही ज्ञान नाही. मुली समुद्रात गेल्या आणि बुडाल्या. काळजाला चटका लावणारी ही घटना. लक्ष्मीबाईंना कोर्टात हजर व्हावे लागले. त्याचं वर्णन करताना त्या लिहितात, ‘‘काल समुद्रात भिजलेले लुगडे तसेच अंगावर वाळलेले. शरीराचे घुसळण चालूच होते. आधीच माझी मान हालते. त्यात हे वारे! सारे शरीरच ताजाचा कळस बनले. ही थरथरणारी मैना पिंजऱ्यात अडकली. दोन्ही हात कठडय़ावर टेकलेले. जणू काय, लक्षुंबाई डेराच घुसळायला उभ्या! सर्व अंग हालते आहे. पाठीवर मोकळे केस लोळत आहेत. पुढे कठडय़ावर मान आपटत आहे. आता ऊद-कापराचाच उशीर, का हे वारे लागणार बोलायला!’’ आपल्या रूपाचा उल्लेखही त्या अगदी गमतीने करतात. ‘‘माझे रूप, रंग अगदी बेताचेच होते. बाकी नाक-डोळे जरी रेखीव नव्हते तरी ते होते व अगदी जागच्या जागी होते.’’

अशी अलिप्तवृत्ती साधणे कठीण असूनही त्यांना ती साधली. पतीबरोबरचे आणि त्यांच्या पश्चातही आपले जीवन त्या कणखरपणे जगल्या. जे मांडायचे ते सत्य त्यांनी निर्भीड आणि खेळकरपणे मांडले. या त्यांच्या ‘आठवणी’ कोल्हटकरांच्या संजीवनी मासिकात क्रमश: प्रसिद्ध होऊ लागल्या. या आठवणींना ‘स्मृतिचित्रें’ हे नाव देवदत्त टिळक, भा. ल. पाटणकर, प्र. श्री. कोल्हटकर यांच्या मतानुसार दिले. ‘स्मृतिचित्रें’च्या अनेक आवृत्त्या निघाल्या. सर्वाधिक वाचली गेली ती देवदत्त टिळकांनी संक्षेप केलेली ‘संक्षिप्त स्मृतिचित्रें.’

लक्ष्मीबाईंचा नाशकात भव्य नागरी सत्त्कार झाला. अध्यक्ष होते, प्र. के. अत्रे. त्यांनी लक्ष्मीबाईंना ‘साहित्यलक्ष्मी’ हे बिरुद प्रदान केले. ते म्हणाले, ‘‘महात्मा गांधींनी आपले ‘सत्याचे प्रयोग’ लिहिताना जो मोकळेपणा व जी निर्भयता प्रकट केली आहे, तो मोकळेपणा आणि ती निर्भयता लक्ष्मीबाईंच्या लेखनातही अत्यंत प्रकर्षांने जाणवते. त्यांनी भोगलेल्या सर्व दु:खांचे आणि अनुभवलेल्या सर्व सुखांचे वर्णन अतिशय कळवळ्याने आणि जिव्हाळ्याने केले आहे. बाई, हे पुस्तक लिहून आपण मराठी साहित्याची इतकी उदंड सेवा केली आहे की, आता आपण उतार वयात पूर्ण विश्रांती घ्यावी. अशी मी प्रार्थना करतो.’’

या विनंतीला लक्ष्मीबाईंनी एकच उत्तर दिले, ‘‘लक्ष्मीबाईंचा ‘फुल स्टॉप’ अजून झालेला नाही!’’

साहित्य क्षेत्रात अग्रपूजा घेणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्या साहित्यापेक्षाही मोठा होता. कित्येक साहित्यिक

त्यांना ‘आई’ म्हणत. तर त्यांच्या कित्येक ‘लेकरां’ना आपली आई प्रसिद्ध लेखिका आहे याची गंधवार्ताही नव्हती. त्यांच्या चरित्रग्रंथामुळे त्या साहित्य क्षेत्रात अजरामर झाल्या. त्यामुळे ‘ख्रिसायन’ आणि ‘भरली घागर’ या त्यांच्या पद्यलेखनाकडे क्वचितच कुणाचे लक्ष जाते. रेव्हरंड टिळकांनी ‘ख्रिस्तायन’ हे ख्रिस्तचरित्र सांगणारे ओवीबद्ध महाकाव्य लिहायला घेतले. पण ते पूर्ण झाले नाही. लक्ष्मीबाईंनी पतीचे हे काम हाती घेतले. एकूण ७६ अध्यायांपैकी १० अध्याय टिळकांचे आहेत. ६५ व्या वर्षी ‘स्मृतिचित्रें’ लेखनाचे काम थांबवून दिवस-रात्र एक करून ५ वर्षांत लक्ष्मीबाईंनी हे कठीण काम पूर्ण केले. त्या ‘ख्रिस्तायना’लाच आपले जीवित कार्य मानीत असत.

‘भरली घागर’ हा कविता संग्रह लक्ष्मीबाईंच्या स्वतंत्र प्रज्ञेची साक्ष देतो. त्यांच्या कविता संख्येत कमी, मोलात भारी आहेत. सौंदर्यविषयक, राष्ट्रीय, सामाजिक, प्रासंगिक, वात्सल्यपर, भक्तीपर, उपेदशात्मक, पती-पत्नी प्रेमावर, मुलांसाठी अशा अनेक विषयांवरील या कविता आहेत. ‘‘काव्य म्हणजे व्याकरण नव्हे, शुद्धलेखन नव्हे, अलंकारही नव्हे. काव्य म्हणजे काव्य. ’’ ही काव्यासंबंधीची टिळकांची कल्पना, लक्ष्मीबाईंच्या कवितेला तंतोतंत लागू पडते. ‘भरली घागर’ हे नाव त्यांच्या ‘मी तुझी मावशी तुला न्यावया आले’ या प्रसिद्ध कवितेवरून घेतले आहे. ही कविता विश्राम बेडेकरांनी आपल्या ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात घेतली. हे गाणे खूप गाजले.

रेव्ह. टिळकांनी सुरू केलेल्या ‘ख्रिस्ती’ या मासिकाच्या कामात त्या सर्वतोपरी सहाय्य करीत. पतीच्या निधनानंतर त्यांची काव्य प्रतिभा पुन्हा जागृत झाली. ‘श्रीमती नाव मज आले, सौभाग्य लयाला गेले’ आणि पहिला नातू जन्मल्यानंतर ‘चिमुकले बालक माझ्यापुढे’ या कविता सवरेत्कृष्ट मानल्या जातात. नातवंडांना शिकविण्यासाठी त्यांनी प्राणी-अक्षरे, अंक यांची ओळख करून देणारी बडबड गीते लिहिली. प्रभात फेऱ्यांमधून आपली देशभक्तीपर गीते गात गात भाग घेतला. नाशकातील काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाविषयीही त्यांनी कविता लिहिल्या. जळगावी भरलेल्या कवी संमेलनाला त्यांनी पाठविलेला काव्य-संदेश ‘कवी तुम्ही भिकारीण हो मी तुमच्या दारी’ चांगलाच गाजला. नाशकातील कवी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आणि नागपुरातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष या दोन्ही पदांवरून केलेली त्यांची व्याख्याने जाणकार साहित्यकारांना चकित करणारी होती. त्यांचा व्यासंग यातून स्पष्ट दिसून येत होता. त्या इंग्रजीही शिकल्या. देवदत्तांना त्यांनी इंग्रजीतून पत्रे लिहिली होती. इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न त्या करीत. सत्कार समारंभात बोलताना त्यांनी आपल्या प्रगतीचे वर्णन ‘अगदी स्टेप बाय स्टेप’ असे केले. त्या उत्तम कीर्तनकार होत्या. त्या कीर्तनाचे दौरे काढीत. रेव्ह. टिळकांनी त्यांना सर्टिफिकेट दिले होते, ‘गुरु तो गुडम् ही रहे चेला शक्कर भये.’

मुरबाडला त्या आपल्या सासरेबुवांकडे राहात तेव्हा त्यांनी खूप सासूरवास सहन केला. त्यांची एक आठवण – ‘एकदा मामंजी संतापले. म्हणाले, ‘‘तू दगड झाली असतीस तर तुझा पायखान्याच्या पायरीला तरी उपयोग झाला असता.’’ कोणास ठाऊक पायखान्याच्या पायरीला उपयोग झाला असता का देवाच्या मूर्तीला उपयोग झाला असता? माझे हे म्हणणे मात्र मनातल्या मनात होते.’

मला त्यांची ही सकारात्मक वृत्ती फार भावते. आणखी म्हणजे, ‘अमुक एक गोष्ट आपल्याला जमणार – येणार नाही. असे त्यांना कधी वाटतच नसे.’ त्या म्हणत, ‘मी अज्ञ आहे. ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत जिला लिहिता येते अशी.’ बोलताना त्या जसे बोलत तसेच लिहिताना लिहीत. त्यांच्या तोंडी आणि लेखी भाषेत फरक नसे. हीच त्यांच्या लिखाणाची यशस्विता. ते वाचताना त्या आपल्या समोर मूर्त रूपाने वावरत आहेत असाच भास होतो. वत्सल, प्रेमळ, सोशिक, प्रसन्न अशी माऊली आपल्याला पूर्णत: मोहून घेते. त्या माणसातले माणूसपण जाणवते आणि आपण सुखावले जातो.

स्मृतिचित्रांचे सगळेच गुणविशेष आपण वाचले आहेत. आज ८० वर्षांनंतरसुद्धा वाचकांचे  ‘स्मृतिचित्रां’वर तेवढेच प्रेम आहे. आपली गोष्टीवेल्हाळ आजी आपल्या आयुष्यातल्या घटना सांगते, हा अनुभव प्रत्येकाला घ्यायला आवडतो. लक्ष्मीबाई नितळ विनोद, खेळकरपणा, आपलेपणा आणि स्पष्टवक्तेपणा यातून वाचकाला आकर्षित करतात. एक अशिक्षित स्त्री आपल्या उतारवयात विदुषी म्हणून नावारूपाला येते हाच चमत्कार वाचकाला आकृष्ट करतो. त्यांच्या निर्भेळ भाषेत नाटकीपणा, अतिरंजितपणा कुठेही नाही. स्मृतीचित्रांतील घटनांना एक वेग आहे आणि हल्ली वेगवान, उत्सुकता वाढवणाऱ्या घटना वाचायला आवडतात. त्यांचे घर, अंगण, बागबगीचा, त्यांचे मुके मित्र मनाला ओढ लावतात. स्वयंपाकघर, माजघर, भांडीकुंडी, साध्या साध्या वस्तू यातून त्याकाळचे चित्र स्पष्ट होते. स्मृतिचित्रं तरुणवयात वाचणं आणि प्रौढ वयात वाचणं खूप फरक जाणवतो, तो आनंद वाचक घेत असतात.  जुन्या पिढीतल्या अभिनेत्री कुसुम कुलकर्णी यांनी १९६५ च्या सुमारास आणि त्यानंतर अभिनेत्री सुहास जोशी यांनी केलेले स्मृतिचित्रांवरील एकपात्री प्रयोग खूप गाजले. पुढे ‘दूरदर्शन’वर विजयाबाई मेहता यांनी केलेली टेलीफिल्मही लोकांनी उचलून धरली.  हीच परंपरा आजही कायम आहे. नाशिक आकाशवाणीवरुन गेल्या मार्च महिन्यापासून आठवडय़ातून एकदा स्मृतिचित्रांचे वाचन होत आहे आणि सर्व स्तरातील वाचकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे, हे विशेष.

चरित्र घडले तसे लिहिणे घरच्याच माणसाला फारसे सोपे वाटणार नाही. परंतु लक्ष्मीबाईंनी स्वत:ची ‘स्मृतिचित्रें’ लिहून पतीचे घरगुती चित्र त्यात इतक्या कुशलतेने रंगवले की याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. पण यामागे ‘माझे घडले, तसे चरित्र लिहा.’ ही रेव्ह. टिळकांची इच्छाच खरोखर कारणीभूत आहे.

‘रंग नभाचे कसे तरी, कसे तरी, ही मजा खरी,

फुले आपुली, किती उमलली, कुठे लटकली,

चिंता नच ही वेलीला, सुंदरतेची ही लीला’ असे रेव्ह. टिळकांच्या शब्दांतच लक्ष्मीबाईंच्या ‘स्मृतिचित्रें’चं  यथार्थ वर्णन करता येईल.

मुक्ता अ. टिळक muktatilak4@yahoo.com