30 September 2020

News Flash

तंबाखू मुक्त महाराष्ट्र अभियान

ती नेहमी सांगते, मी तल्लफ निवडली आणि जगणंच संकटात टाकलं.

कोणतंही व्यसन वाईटच. कारण एकदा का ते लागलं की ते सुटायला प्रचंड प्रयत्न करावे लागतात, मात्र मरणाला कवटाळण्यापेक्षा असे प्रयत्न करणे केव्हाही चांगलंच. सोबतच्या अनुभवातील दोघीही धुम्रपानाच्या व्यसनातून आता बाहेर आल्या आहेत परंतु त्याची पुरेपूर किंमत मोजूनच. त्यामुळे वेळीच सावध व्हा.. हेच सांगणाऱ्या या कहाण्या..

किंमत वसूल करणारं व्यसन
सीमा (नाव बदलले आहे) एका नौदल अधिकाऱ्याची कन्या, एक उत्तम राष्ट्रीय टेनिस खेळाडू. वयाच्या १०व्या वर्षी गंमत म्हणून तिने पहिली सिगरेट ओढली होती आणि नंतर ती तिची सोबतीण झाली. त्याचा परिणाम म्हणून तिच्या १८ व्या वाढदिवसाला तिच्या शरीराने तिला ‘बर्जर्स’ रोगाची भेट दिली. ही मुलगी त्या वेळी दर दिवसाला २ पाकिटं या मात्रेत सिगरेट ओढत होती. बर्जर्स रोग हा एक असा रोग आहे ज्यात तंबाखूच्या परिणामाने छोटय़ा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन त्यातून विविध अवयवांना आणि पेशींना होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि यामुळे ते शरीराचे भाग सडतात आणि पुढे ते कापून काढावे लागतात.
लग्नाआधी तिच्या या सिगरेटवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता मात्र लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिला अनेकदा ही सवय सोडण्यास सांगितलं, परंतु तिने त्याचं गांभीर्य समजून घेतलं नाही. बर्जर्स शरीरात होताच, त्यामुळे पाहता पाहता तिचा डावा पाय सडू लागला. नवऱ्याने आमच्या ‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ तंबाखूमुक्ती सल्ला केंद्राशी संपर्क साधला. तेव्हा मात्र तिने ते गंभीरपणे घेतलं. वर्तणूक उपचार पद्धती, मानसिक शांतता उपचार घेऊन तिने व्यसनावर मात केली. तीन वर्षांनी ती पूर्णपणे व्यसनमुक्त झाली पण आधीच्या व्यसनाने त्याची किंमत वसूल केलीच. संपूर्ण डावा पाय आणि उजव्या पायाची तीन बोटं तिने गमावली होती.
३१ वर्षांची सीमा गेली २ र्वष धूम्रपानमुक्त आयुष्य जगत आहे. तिने आयुष्य जगण्याचा आनंद आता शोधला आहे, पण त्याच्या शोधासाठी मोजलेली किंमत फार मोठी आहे. ती किंमत मोजूनच शहाणं व्हावं, हे गरजेचं नाहीये हे कळलं म्हणजे बरं!!

आयुष्य निवडा
अनुष्का (नाव बदलले आहे) आई-वडिलांची एकुलती एक लेक.. वडील सॉफ्टवेअर इंजिनीअर, आई प्राध्यापिका. अतिशय हुशार मुलगी, अगदी शाळेपासून मेरिटमध्ये येणारी मुलगी..
अगदीच किशोरवयीन वयात एक्स्चेंज प्रोग्राममध्ये ती जर्मनीला गेली. मुलगी शिकेल प्रगती होईल म्हणून संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिला आणि तिकडे एका स्थायिक मराठी कुटुंबात ती राहायला लागली. दरम्यान, एक वेगळाच विलक्षण अनुभव म्हणून मित्रांच्या संगतीने तिने पहिली सिगरेट ओढली आणि हळूहळू त्यात ती अडकत गेली. अनेकदा त्यातून बाहेर पडावं असं वाटायचं, प्रयत्न व्हायचा मात्र बाहेर पडण्याचा निश्चित मार्ग काही तिला सापडत नव्हता. २०१२ मध्ये वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर तिला फुप्फुसाचा रोग (सीओपीडी) झाल्याचे निदर्शनास आले, पण तरीही तिचे धूम्रपान सुरूच राहिले.
आमच्या तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानाचा ठाण्यातला एक युवा स्वयंसेवक मित्र तिच्याच सोबत ऑफिसमध्ये होता. त्याने आमच्या स्थानिक टीमच्या सल्ल्याने दररोज तिच्या डायरीत एक चित्रमय इशारा ठेवायला सुरुवात केली.. ती दररोज ते वाचत असे आणि रागाने फेकूनही देत असे. त्यावर व्यसन सोडायचे असल्यास या संपर्क क्रमांकावर फोन करा असेही लिहिलेले असायचे. अनेक दिवस तिची वाट पाहिली, पण ती आली नाही. महिना संपल्यानंतर मात्र अचानक एके दिवशी तिचा फोन आला आणि तिने दुसऱ्या दिवशी यायचे कबूल केले.. पण उशीरच झाला थोडा. त्या दिवशी कामावरून घरी जात असताना तिला प्रचंड दम लागला, हृदयाचे ठोके वाढून श्वास घेणंही अवघड झालं आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तात्काळ वैद्यकीय मदत घेण्यात आली. ती त्यातून बाहेर आली. त्यानंतर मात्र तिने सिगरेटचं व्यसन सोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला सुरुवात केली.
ती आजही आमच्या टीमसह अनेक प्रबोधनपर कार्यक्रमांना हजेरी लावते आणि सर्वाना ‘त्या’ भयाण दिवसांचे अनुभव सांगताना अतिदक्षता विभागात शुद्धीवर येतानाचा अनुभव आणि त्या वेळी आयुष्याचा लढा जिंकल्याची भावना सगळ्यांना आवर्जून सांगते. खूप उशिरा ती मदत केंद्राकडे आल्यामुळे आजही तिला श्वास घ्यायला सतत ऑक्सिजनची आवश्यकता भासते. मात्र त्या व्यसनापासून मुक्त असल्याने ती आनंदी आहे. त्या काळात तिला मदत करणाऱ्यांविषयी ती कृतज्ञता व्यक्त करते. ती नेहमी सांगते, मी तल्लफ निवडली आणि जगणंच संकटात टाकलं, मात्र तुम्ही वेळीच सावध व्हा आणि तुमचं आयुष्य निवडा. ते खूप मोलाचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:59 am

Web Title: bad effects of tobacco and smoking
Next Stories
1 वारकऱ्यांसाठी खास अभियान
2 वादळातील दीपस्तंभ
3 धम्माल मस्तीत जपलेला नात्यातला गोडवा
Just Now!
X